'विद्येचं माहेरघर', महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’, ‘ऐतिहासिक वारसा’ जपलेलं शहर, ‘पुणेरी पाट्यांचं’ शहर. हे सगळं मान्य. पण ह्या आमच्या ”पुण्या”ची आणखी एक खरी आधुनिक ओळख म्हणजे पुणे हे एक असंख्य अश्या लोकल'ब्रॅण्ड्स'नी गजबजलेलं असं एक अनोखं शहर आहे.
आदिदास, प्युमा, अँपल वगैरे कसे जागतिक दर्जाचे ब्रॅण्ड्स आहेत किंवा लिज्जत, अमूल, गोदरेज आदी (इथे कुणीतरी म्हणेल, अहो आदी गोदरेज नं? मग गोदरेज आदी असं उलटं का लिहिलंय? नाही 'गोदरेज आदी'च ! कारण इथे 'आदी' हा शब्द 'इत्यादी' ह्या अर्थाने वापरलाय, ‘आदी’ गोदरेज’ साठी नव्हे) असो तर गोदरेज आदी सारखे राष्ट्रीय स्तरावरचे ब्रॅण्ड्स आहेत, अगदी तस्सेच काही ब्रॅण्ड्स हे फक्त आणि फक्त पुण्यात जन्माला आले, पुण्यातच त्यांनी बाळसं धरलं आणि पुण्यातच त्यांनी आपलं निजशैशव जपत ते पोक्त आणि प्रगल्भ झाले.
वानगी दाखल अर्थातच प्रथम क्रमांक येतो तो 'मस्तानी'चा. ‘मस्तानी’ ह्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या बुंदेलखंडी 'गर्लफ्रेंड'च्या नावाने दूध कोल्ड्रींक आणि पॉट आईस्क्रीम ह्या दोन पदार्थांचा एक अनोखा 'क्रॉस' (संकर) करून एक मस्त प्रॉडक्ट बनवायचा. आणि त्याचा ब्रँड बनवून संबध पुण्यात अफाट संख्येने विकायचा. अशी भन्नाट कल्पना ही फक्त पुण्यातल्या 'कोंढाळकरांच्याच' सुपीक डोक्यात जन्म घेऊ शकते. ज्यांना अजूनही मस्तानी हा आईस्क्रीम/डेझर्ट चा प्रकार नसून ती एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा असावी असं वाटतं, दुर्दैवाने त्यांचा ‘महाराष्ट्राचा इतिहास’ आणि ‘पुण्याचा अभ्यास’ दोन्हीही कच्चा आहे.
मस्तानी पाठोपाठ दुसरा नंबर येतो तो अर्थातच 'चितळ्यांच्या'. बाकरवाडीचा. घरगुती बाकरवडीनं कात टाकली आणि पुण्यात चितळे नामक कोकणस्थ ब्राम्हण कुटुंबाच्या घरी एक ब्रँड म्हणून तिने पुनर्जन्म घेतला. इथेच एका सामान्य मराठी माणसानं संबंध गुजराती अस्मितेला तडा दिला. कारण सध्या पुण्यात वास्तव्याला असलेली बाकरवडी मुळात माहेरची गुजराती. आता लोक म्हणतील बाकरवडी गुजरातीच कॅश्य्याssवरून? इथे प्रश्न बाकरवडीच्या ‘डोमिसाईल’चा नसून चितळ्यांच्या घरी लग्न करून सुवासिनी म्हणून पुण्याच्या बाजीराव रोडवर सासरी नांदायला आलेल्या दृष्ट लागेल अश्या सुंदर देखण्या अश्या चितळ्यांच्या बाकरवडीच्या ‘पुणेरी’ ब्रँडचा आहे. त्यामुळे ‘बाकरवडी गुजराती कशावरून’ असले प्रश्न विचारात मूळ विषयाला फाटे फोडून कृपया उगीचंच आमचा वेळ वाया घालवूं नये. बाकरवड्या, सुरळीच्या वड्या, कोथिंबीर वड्या, ह्या सगळ्या ललना मूळच्या 'मराठी' की 'गुजराती' ह्या विषयीच्या वादास तूर्तास स्थगिती देण्यात येत आहे.
चितळ्यांच्या बाकरवडी ह्या ब्रँड पाठोपाठ आणखी एक ब्रँड म्हणजे 'चितळे दूध'. खरं तर चितळे दूध हा पुण्यात ब्रँड नसून चक्क एक 'रिलिजन' आहे 'रिलिजन'. भारतात क्रिकेट कसा रिलिजन किंवा पंथ आहे! तसाच पुण्यात ‘चितळे दूध’ हा सुद्धा एक पंथ आहे. एकदा कोकणात फिरायला गेलो होतो बायको आणि लेकीला घेऊन. तिथे लेकीने गरम पाण्याचे झरे पहिले. पुण्यातल्या वन बी.एच.के. फ्लॅटमधल्या बाथरूम मध्ये फक्त गिझर मधून गरम पाणी येतं हे तिला माहिती होतं. त्यामुळे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे बिरे प्रत्येक्षात असतात हे तिला पाहून फार नवल वाटलं. त्यानंतर पुण्यात परत आल्यावर एके दिवशी अचानक पणे तिने "कोकणात ग्रमग्रम पाण्याच्ये झ्झर्रे अश्तात, तश्ये चितळ्यांच्या डेअरीत गार दुधाचे झ्झर्रे अश्तात का र्रे बाब्बू??” असं तिच्या निरागस बालबुद्धीनुसार मला विचारलं होतं. मी कपाळाला हात मारून घेतला चक्क. पण नंतर म्हंटल बरोबर आहे. तिचा जन्म आणि बालपण सगळं पुण्यातलं. तिच्यादृष्टीने भिलवडीतल्या गोठ्यातल्या गाईंचा आणि चितळ्यांच्या दुधाचा काय संबंध? पण हेच आहे चितळे दुधाच्या ब्रँड चं खरं यश. (आणि आम्ही लेकीला पुरेसा वेळ आणि एवढं साधं पाठ्येतर सामान्य ज्ञान देऊ नाही शकलो हे एक पालक म्हणून आमचं अपयश.)
त्याचं काय आहे? खरंतर पुण्यात कशाचाही ब्रँड होऊ शकतो. आता हेच पहा. चहाचा जर 'अमृततुल्य' असा नामांकित 'ब्रँड' होऊ शकतो तर दुधाचं काय घेऊन बसलायंत? अमूल आईस्क्रीम ने जसं “आमच्या आईस्क्रीम व्यतिरिक्त” इतर कोणत्याही आईस्क्रीम्स ना आईस्क्रीम असं न म्हणता 'फ्रोझन डेझर्ट' असं म्हणावे. अशी जनहित याचिका दाखल केली होती, तशीच जनहित याचिका काही पुणेकर मंडळी “चितळे दूध” सोडून बाकी सर्व दुधाच्या पिशव्यांवर 'दूध' असे न लिहिता, चक्क “कृत्रिम कषाय धवल द्रव्य” ('आर्टिफिशियल टी व्हाईटनर') असे लिहावे - अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्याच्या विचारात आहेत, असे आमच्या काही खात्रीलायक सूत्रांकडून आम्हांस समजले आहे.
मस्तानी, बाकरवडी आणि चितळे दुधानंतर क्रमांक येतो तो अर्थातच 'गाडगीळ' ज्वेलर्स ह्यांचा. पु.ना.गाडगीळ' हा ब्रँड वयाने ‘टाटा’ आणि ‘गोदरेज’ ह्यांच्या इतकाच ‘ज्येष्ठ’ आहे. मी नवखा पुणेकर असताना ‘पूना’ स्टेशन, ‘पूना’ बोर्डिंग हाऊस किंवा ‘पूना’ बेकरी प्रमाणे ‘पुना’ गाडगीळ असं काहीतरी असावं समजण्याची चूक केलेली आहे. ह्र्स्व दीर्घाची/शुद्धलेखनाची तमा न बाळगणे ह्या हुन दुसरे मोठे पातक पुण्यात नाही. त्यामुळे मी पुण्यात नवखा असताना “पु.ना.गाडगीळांच्या” दुकानाची पाटी “पूना” गाडगीळ अशी वाचली ह्या माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल ह्या मा.बो. च्या मंचावरून पु.ना. गाडगीळांची जाहीर माफी मागतो. असो. मुंबईत जसे त्रीभोवन दास भीमजी आणि तिकडे दक्षिणेत जसे म्णणंपुरं (हे नाव शुद्धलेखनाच्या नियमांना धरून कसं वाचायचं ते तुमचं तुम्ही ठरवा) तसे पुण्यात आमचे फक्त 'पुरषोत्तम नारायण गाडगीळ!'. पुण्यात सोनं जर गाडगीळांचं नसेल तर त्याला 'कथला'चा सुद्धा भाव मिळत नाही आमच्या सराफ कट्यावर. सोनं काय कुणीही विकेल पण खऱ्या खुऱ्या 'विश्वासार्हते'चा जर कुणी दागिना करून पुण्याच्या ग्रामदैवतेच्या मस्तकावर चढवला असेल तर तो फक्त गाडगीळांनी. गाडगीळ नसतील उघडे दुपारचे तर फार तर फार वामन हरी पेठे किंवा मग बारामतीचे चंदूकाका सराफ चालतील, बाकी हे 'जॉय अल्लुकास', 'मलबार' वगैरे लोकांचं 'कल्याण' पुणेकर फार दिवस करतील अशी काही लक्षणं नाहीत.
“वैशाली” हा पुणेकरांचा अजून एक असांच खासा लोकल ब्रँड. माझ्याकडं कुणी वैशालीचं रि-ब्रॅण्डिंग करून द्याल का? अशी विचारणा केली तर "आम्ही मनमुराद 'गप्पां'साठी भाडोत्री ‘जागा’ देतो… (सोबत इडली डोसा कॉम्पलीमेंटरी)!" अशी ऍड करा असं सुचवेन. अsहा:हाss! इथल्या गप्पांना, इथल्या चटणी आणि सांबारापेक्षा सुंदर चव आणि स्वाद आहे. राजकारणा पासून क्रिकेट पर्यंत आणि मराठी रंगभूमी पासून ते कोविड च्या सेकंड वेव्ह पर्यंत, विषय कोणताही असो, इथे रंगलेल्या चर्चांची चव ‘मनात’ आणि इथे उकळलेल्या सांबाराची चव ‘जिभेवर’, इथून बाहेर पडल्यानंतरही बऱ्याच वेळ रेंगाळत राहते. हे ह्या ब्रँड चं वेगळंच यश.
पुण्यात ऋतू नुसार ब्रँड सुद्धा आहेत. पुण्यात पावसाळ्यात रेनकोट आणि हिवाळ्यात स्वेटर घ्यायचा तर फक्त "रमेश डाईंग" मधेच, अन्यथा पिरपिर पाऊस जानेवारी मध्ये सुद्धा पडत राहतो, आणि फेब्रुवारी संपून मार्च उजाडला तरी आला तरी थंडी जात नाही. त्याच प्रमाणे उन्हाळ्यात मुलायम बंड्या आणि बारमाही वापरासाठी दणकट पायजमे घ्यावेत तर फक्त “शालगर” मध्येच. लग्न सराईत जावयांच्या मानपानाचे कपडे फक्त करायचे तर फक्त “सिलाई” मधेच आणि जर्तारीच्या, काठापदराच्या गर्भ रेशमी साड्यांचा बस्ता काढायचा तर तो फक्त आणि फक्त लक्ष्मी रोड वरच्या “कासट” मधेच! ह्या लग्न सराईच्या दिवसात लक्ष्मीरोड वर खरेदी करताना उन्हाळा फारंच वाढू लागला आणि मस्तानीचा अगदीच कंटाळा आला असेल तर ‘उसाचा रस’ पिण्यास हरकत नाही पण तो मात्र फक्त “मुरलीधर” रसवंती गृहाचाच.
भेळ, पाणीपुरी आणि एस.बी.डी.पी. वगैरे खायची तर फक्त आणि फक्त “गणेश”च! बाकी सगळे भेळपुरी वाले, पुदिन्याचं पाणी गरजे पेक्षा अंमळ जरा अधिकच तिखट केल्याबद्दल अन्न आणि भेसळ प्रतिबंध कायद्याखाली ‘अजामीनपात्र’ गुन्ह्या अंतर्गत अटक करावी" ह्याच लायकीचे.
प्यूव्वर व्हेजिटेरियनलोकांसाठी साठी जशी “वैशाली”, “रुपाली”, “वाडेश्वर” अशी पावित्र्य आणि शुचिर्भूतता जपलेली ठिकाणं आणि ब्रॅण्ड्स तसेच अस्मादिकांच्या सारख्या नॉनव्हेज प्रेमींसाठी, पुण्यापासून थोडे दक्षिणेला जात जरासा कात्रज घाट ओलांडला की तिकडे “जगदंबा”, “पलंगे”, “जयभवानी”, “कावेरी”, “वाडा”, अश्या डोळ्यात पाणी आणि जिभेवर चटक आणणाऱ्या ब्रॅण्ड्स ची सुद्धा रेलचेल आहेच. अगदीच बाहेरचं ‘तिखटी’चं जेवण खाऊन कंटाळा आला असेल आणि तुमच्या बायको च्या हाताला चांगली चव असेल (आणि तुमचे आणि तिचे राजकीय संबंध चांगले असतील तर) आणि मुख्य म्हणजे तुमची रविवारी सकाळी रांगेत उभे राहण्याची तयारी आणि हौस असेल तर “सुपेकर”, “तारू” वगैरे असे अस्सल मत्स्य प्रेमींच्या करिता कोकणी ब्रँड्स ची सुद्धा पुण्यात कमी नाही, फक्त तुम्हाला काय कुठे चांगले आणि स्वस्त मिळते ह्याची मात्र चोख माहिती पाहिजे.
थोडक्यात काय? तिकडे गोळीबार मैदाना जवळ रेसकोर्स वर उंच्यापुऱ्या तगड्या जवान घोड्यावर वर पैसे लावायला उत्सुक असणाऱ्या स्टड फार्म वाल्या पूनावालांच्या “सिरम” वॅक्सीन च्या ब्रँड पासून ते जीवनातले सगळे उपभोग घेऊन शेवटी जगण्याची 'अथश्री' झालेल्या “परांजप्यां”च्या रियल ईस्टेट ब्रँड पर्यंत पुण्यात ब्रॅंड्सची अजिबात कमतरता नाही. झालंच तर चोरडियांच्या “प्रवीण” मसाल्याच्या खमंग ब्रँड पासून ते लोकडाऊन दरम्यान नुकत्याच लाँच झालेल्या पटवर्धनांच्या “किमया” क्राफ्ट बियर पर्यंत...ही यादी संपता संपत नाही.
पुण्यात “श्रेयस”, “श्रुती” मंगल कार्यालय, हे जसे ब्रँड आहेत तसे "दीनानाथ", "जहांगीर", "रुबी हॉल" हे ही ब्रँडस आहेत . रुबी हॉल वरून आठवलं. तिकडे पुण्यापासून दूर मराठवाड्यात जर का "पुण्यात लग्न आहे, यायचं बरं कां लग्नाला नक्की!" असं म्हंटल्यावर "अरे वा:, पुण्यात लग्न का ? मज्जाय ब्वा! लग्न कुठं मग? रुबी हॉल मध्ये का? संबंध एसी आहे न हो रुबी हॉल?" असं विचारतात. त्यांना मग सांगावं लागतं तिथे नुसता 'एसी'च नाही 'आयसीयू' सुद्धा आहे म्हणून.
खरं सांगायचं तर, पर्वती टेकडी किंवा तळजाई पठारा पासून ते बण्डगार्डन कडच्या आगाखान पॅलेस पर्यंत आणि तिकडे ‘प्राधिकरण’ ते भक्ती शक्ती पासून ते सिंहगडा पर्यंत तुम्ही पुण्यात बाईक वरून सुट्टीच्या दिवशी कुठेही फिरा. ह्या पुण्या मध्ये कुठल्याही गोष्टीचा ब्रँड होऊ शकतो, हे तुमच्या सहज लक्षात येईल. “ज्ञानप्रबोधिनी” ते “सिम्बायोसिस” आणि नू.म.वि. ते गोखले इन्स्टिटयूट. बादशाही बोर्डिंग ते तिरंगा/पिके बिर्याणी. आपटे रोडवरच्या संतोष बेकरी पासून ते टिळक रोडवरच्या रामनाथच्या मिसळी पर्यंत, जोशी वडे वाल्यांचं तर नावंच घ्यायची गरज नाही. आणि हे सगळं कमी पडलं की काय म्हणून? जागो जागो मिळणाऱ्या "येवले चहा" पर्यंत. सगळी कडे नुसती लोकल/हायपर-लोकल ब्रॅण्ड्सचिच रेलचेल.
थोडक्यात काय? आयुष्यभर काटकसर करत जगणाऱ्या एखाद्या कवडीचुंबकाला सुद्धा खर्च करताना हात थोडे अधिक सैल करायला लावणारे असे एक गंमतशीर शहर आहे. इथे विक्रीस असलेली प्रत्येक वस्तूच काय? इथे खरेदीला आलेली प्रत्येक 'व्यक्ती' सुद्धा ब्रँड बनून जाते. साहजिकच आहे. इथे प्रत्येक जण “स्वतःच” “स्वतःचं” ब्रॅण्डिंग करायला उत्सुक! इथे स्पर्धा थोडी जास्त गळेकापू आहे हे मान्य आहे, परंतु एकदा का तुम्हाला 'पुणेकर' हा ब्रँड प्राप्त झाला की मग उर्वरित आयुष्य केवळ त्या "एका" ब्रँड लॉयल्टी वर पुण्यात तुम्ही सहज पणे काढू शकता.
अहो, साध्या रोजच्या रोज दुकानात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या ब्रॅण्डिंग चं काय घेऊन बसलायंत? पुण्यात कोणत्याही गोष्टीचं एवढं “ओव्हरब्रॅण्डिंग” सुद्धा होऊ शकतं, की “एवरेस्ट बेसकॅम्प वरून निराशा पदरी घेऊन परत आलो यार प्रद्युन्म्या...छ्या, साला आपल्या इकडे सिंहगड तर दूरच राहिला आपल्या पर्वती चढण्यात जेवढी मज्जा आहे नं त्याच्या निम्मी सुद्धा नाही रे तिकडे !" असं वाक्य मी ह्या माझ्या कानाने ऐकलंय एकदा वैशालीत नाश्ता करत असताना माझ्या मागच्या टेबल वर बसलेल्या ग्रुप मधून एकाच्या तोंडी. आता बोला...!
चारुदत्त रामतीर्थकर
१८ मार्च २०२१, पुणे
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
अजूनही अनेक ब्रँड्स लिहिता येतील, पण भा.पो.
छान आहे लेख.
छान आहे लेख.
छान लेख आहे.
छान लेख आहे.
अजूनही भर घालता आली असती.
पुण्यात बहुधा अति कौतुकाने ब्रांड बनवले जातात असे वाटते.
म्हणजे पर्वती आणि सारसबाग या जागाही तिथे ब्रांड बनवल्या आहेत. यांचा उल्लेख मुद्दाम करायचा हेतू असा की लहानपणी पुण्याला मित्रांसोबत गेलो होतो. एका मित्राचेच घर होते तिथे. त्याने आम्हाला दोन तीन दिवस पुणे फिरवले. फार काही स्पेशल जागी फिरलो असे वाटले नाही. तर त्याला मी म्हणालो अरे ते तुमचे फेमस पर्वती आणि सारसबाग दाखव ना, लांब आहे का ईथून. तर त्याने सांगितले की काल परवा आपण जाऊन आलो की तिथे
जोक्स द अपार्ट, तरीही मला हि अभिमान बाळगायची वृत्ती आवडते. बाकीच्यांना कौतुक असो वा नसो आपल्याला का फरक पडावा, आपल्याला आपल्या गोष्टींचे कौतुक असणे आणि त्यातून आनंद मिळणे हे जास्त मॅटर करते. भले आता मुंबईकर असल्याने मला पुणे रुचत नसले तरी पुण्यातच जन्म घेत आणि जन्मापासून पुणेकर होणे आवडले असते मला
मस्त लिहिले आहे. पुण्याचा
मस्त लिहिले आहे. पुण्याचा अभिमान असायला पुण्यात जन्माला आलंच पाहिजे असे काही नाही. मला पुण्यात येऊन आता 21 वर्षे होतील. माझ्यासारखे पुण्याचा अभिमान असणारे अनेक असतील.
बाहेरून येऊन इथे सेटल होणारे आणि वर पुण्याला शिव्या घालणारे बघितले की कीव वाटते.
पुण्याचा अभिमान असायला
पुण्याचा अभिमान असायला पुण्यात जन्माला आलंच पाहिजे असे काही नाही.
>>>
हो, हे खरे आहे. माझेही सारे बालपण तरुणपण दक्षिण मुंबईत गेले. लग्नही तिथेच झाले. पण आता गेले तीनचार वर्षे नोकरीनिमित्त आणि बायकोचे माहेरही जवळ या दोन गोष्टी लक्षात घेत नवी मुंबईला सेटल झालोय. आणि नवी मुंबई सुद्धा आवडू लागलीय. अभिमान हा शब्द मला पर्सनली रुचत नाही. त्यामुळे नवी मुंबईचेही मी आता कौतुक करतो असे म्हणतो.
माझे वरचे वाक्य यासाठी होते की मुंबई पुणे यांच्या लाईफस्टाईलमध्ये फार फरक आहे. त्यामुळे एकदा मुंबईत जन्म घेतल्यावर मग पुण्याशी जुळवणे अवघड आणि व्हायसे व्हर्सा.
बाहेरून येऊन इथे सेटल होणारे आणि वर पुण्याला शिव्या घालणारे बघितले की कीव वाटते.
>>>
हे मात्र तितकेसे पटले नाही.
बाहेरून पुण्यात वा मुंबईत वा जसे ईथे मी नवी मुंबईत आलो आहोत पोटापाण्यासाठी तसे आपापले प्रत्येकाचे एक कारण असते. पण म्हणून ते शहर आवडलेच पाहिजे असे गरजेचे नाही. काही नाही पटले तर टिका करू शकतातच. हे शहर आपल्याला पोसतेय वगैरे हे भावनिक विचार झाले. कोणाला नसेल असा विचार करायचा तर इटस ओके असे मला वाटते.
बरेचदा असेही अनुभव येतात की त्या शहरातील मूळ रहिवासी बाहेरून आलेल्यांना नेहमी परकेच समजतात वा सुरुवातीच्या दिवसात काही असे अनुभव आले असतील तर मग नाळही नाही जुळत त्या शहराशी.
याव्यतिरीक्त अजून एक कारण म्हणजे ज्या शहराच्या लोकांना आपल्या शहराविषयी जास्तीचे कौतुक असते त्यांना सोबत टिकाही झेलावी लागणे हे स्वाभाविक आहे. कारण हा मनुष्यस्वभावच असा आहे की समोरच्याने स्वतःचेच कौतुक सुरू केले की आपल्याला ते नाही रुचत. मी तर बरेचदा कोणाशी वाद घालायचा असल्यास हा फंडा वापरतो. समोरच्यावर टिका करण्यापेक्षा स्वतःचेच कौतुक सुरू करतो. त्यामुळे समोरचा जास्त चिडतो हा अनुभव
गोळीबार मैदानापर्यंत येऊनही
गोळीबार मैदानापर्यंत येऊनही आमच्या कॅम्पात न आल्याबद्दल निषेध
कयानी आणि बुधानी यांचा उल्लेख झालाच पाहीजे.
कँपमधील पारसनीसांची गूळपोळी
कँपमधील पारसनीसांची गूळपोळी विसरलात का हर्पेन?
दव्यांचा ढोकळा?
'जोग' क्लासेस अजुनी आहेत का? मी अर्थात 'दातार' आणि 'गुप्ते' ला गेले होते. पण तेव्हा 'जोग' क्लासेस प्रसिद्ध होते. आहाहा दिवाळी, मे मधील व्हेकेशन बॅचेस. पुण्यातील हवेचा दुपारचा गंध अजुनी आहे. इतका ट्राफिक नसे. हवा फार मस्त होती.
____
हेन्री नावाचा एक कृष्णवर्णिय प्रॉडक्ट ओनर आहे आमच्या टीममध्ये. तो बँगलोर, मुंबई व पुण्याला जाउन आलेला आहे पूर्वी. त्याने देखील पुण्याचे कौतुक केले.
लेख चांगला आहे.
लेख चांगला आहे.
पण मस्तानीची कल्पना कोंढाळकर यांची नाही.
अमृततुल्यही मुंबईतून पुण्यात आले.
ते जीआरई आणि अमेरिकेत
ते जीआरई आणि अमेरिकेत पाठवण्याचे कंत्राट घेतलेले क्लासवाले कोण हो? ते राहिले
ओक बहुतेक.....
छान लेख. चांगला धांडोळा घेतला
छान लेख. चांगला धांडोळा घेतला आहे
पूर्वी शिमल्याला हनिमूनला, अमरनाथ यात्रेला किंवा यूरप, अमेरिकेला जातांना सुद्धा गरम कपडे घेण्यासाठी 'प्रकाश' की काहीतरी दुकानातूनच खरेदी करावी लागे. आयुष्यात पुण्याबाहेर जाऊन एकदा तरी थंडी सोसलेला माणूस 'प्रकाश मधूनच खरेदी करायची बरंका' हा अमूल्य ज्ञानठेवा गळी ऊतरवतच असे. लग्नातल्या शालूच्या आठवणीसारख्या ह्या गरम कपड्यांच्या ऊबदार आठवणी असतील पुणेकरांच्या.
शिमल्याला हनीमूनला जातांना घेतलेले प्रकाशचे थर्मल कपडे लहान भाऊ/मित्र पुन्हा हनिमूनला जातांना हक्काने मागून घेत किंवा बाळे मोठी होऊन अमेरिका/यूरपला गेली की त्यांना भेटायला जातांना पुन्हा माळ्यावरच्या पेट्यातल्या बासनातून बाहेर निघत.
छान लिहिलंय! पुण्यात
छान लिहिलंय! पुण्यात जगप्रसिद्ध असलेल्या जागांची, वस्तूंची आणि व्यक्तींची यादी मोठी आहे!
प्रतिसादांत भर घालतीलच मंडळी
केप्र, बेडेकरांची मिसळ, मानाचे गणपती, दगडूशेठ गणपती हे आत्ता लगेच आठवले!
खूप छान लिहीलंय.
खूप छान लिहीलंय.
मी यात हिंदुस्तान बेकरीच्या पॅटीसचा समावेश करीन. पूर्वी ते फक्त रविवारी सकाळीच मिळत असत. त्यांच्या विजय टॉकीजसमोरील दुकानाबाहेर भली मोठी रांग लागत असे. मी अजूनही पुण्याला गेले की ब्रेफाला चहाबरोबर पॅटीसची आठवण होतेच होते. . आता तर ते दररोज, अगदी जवळच्या बेकरीत पण मिळतात.
येस पॅटिस मस्त!!!
येस पॅटिस मस्त!!!
कयानी आणि बुधानी यांचा उल्लेख
कयानी आणि बुधानी यांचा उल्लेख झालाच पाहीजे. >> अन मार्झोरीन?
ते जीआरई आणि अमेरिकेत पाठवण्याचे कंत्राट घेतलेले क्लासवाले कोण हो? >> दिलीप ओक बहुतेक
तसेच एम बी ए एंन्ट्रन्स साठी - सुजाता खन्ना...
सी ए लोक्स - झावरे
फक्त बी कॉम - पुरंदरे, बेहरे वगैरे....
कँपातील, दोराबजी प्रसिद्ध आहे
कँपातील, दोराबजी प्रसिद्ध आहे ना?
पेठेत प्रसिद्ध म्हणजेच
पेठेत प्रसिद्ध म्हणजेच राष्ट्रीय ब्रॅण्ड झाले ते.
आणि आता सर्व पुण्यात मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आहे.
आपटे रोड जवळची फेमस संतोष
आपटे रोड जवळची फेमस संतोष बेकरी. तिथे सकाळी काय तोबा गर्दी असायची..तिथला बनपाव आणि केक..आहाहा
प्रभात रोड वरील घोडके बंधूंची आंबा बर्फी..ही मला चितळेंपेक्षा जास्त आवडायची आता आहे की नाही माहीत नाही.
शालगर, दुल्हन, कल्पना साडी, देसाई बंधू आंबेवाले..गावातील चिरपरिचित खरेदीची ठिकाणे!
मस्तच लिहिलंय.
मस्तच लिहिलंय.
अजून काही ब्रँड्स म्हणजे अग्रजची दुकाने, दुर्गा कॉफी, लहान मुलांसाठी खेळीया, पुस्तकांसाठी अक्षरधारा.
प्रभात रोड वरील घोडके बंधूंची
प्रभात रोड वरील घोडके बंधूंची आंबा बर्फी..ही मला चितळेंपेक्षा जास्त आवडायची Happy आता आहे की नाही माहीत नाही.///
घोडके आहे की अजूनही. म्हणजे मी लास्ट पाहिलं होतं तेव्हा होतं. प्रभात रोडचंच जोशी स्वीटस पण छान आहे. तिथला मऊसूत म्हैसूरपाक आणि कुंदा मस्त असतो.
छान लेख. पुण्यातील वास्तु आणि
छान लेख. पुण्यातील वास्तु आणि (खाद्य) वस्तुंचा मस्त आढावा घेतला आहे.
लेखात राहुन गेलेल्या ज्या ज्या गोष्टी मी लिहिल्या असत्या त्या प्रतिसादात येऊन गेल्या आहेत. तरीही अजुन बरंच काही पुणे ब्रँडेड लिहायचं राहिलं आहे, प्रभात रोडचं 'दर्शन', हॉटेल श्रेयस, शनिवारवाडा, पुण्याचे सार्वजनिक गणपती, असं आणि बरंच काही.
लेखकाप्रमाणेच प्रत्येकाची आवड
लेखकाप्रमाणेच प्रत्येकाची आवड वेगळीच. आवडला लेख. यातली एक दोनच पाहिली/ अनुभवलीत.
चांगला लेख आहे.
चांगला लेख आहे.
मस्तानी बद्दल लिहीताना ती सर्वात आधी "बाजीराव" रोड जवळच विकणे सुरू झाले हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे
<मस्तानी बद्दल लिहीताना ती
<मस्तानी बद्दल लिहीताना ती सर्वात आधी "बाजीराव" रोड जवळच विकणे सुरू झाले हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे>
नाही.
गोळीबार मैदानापर्यंत येऊनही
गोळीबार मैदानापर्यंत येऊनही आमच्या कॅम्पात न आल्याबद्दल निषेध Proud
कयानी आणि बुधानी यांचा उल्लेख झालाच पाहीजे.
<<
+१११११
बर्गर+, सॉफ्टीज = मार्झोरीन
बिर्याणि =जॉर्ज
भुर्जी पाव, मिनि सामोसे , चहा = कॅफेनाझ
#कँपचाजाज्ज्वल्याभिमान
#कँपचाजाज्ज्वल्याभिमान >>>>
#कँपचाजाज्ज्वल्याभिमान >>>> :thumbs up:
मी कॅम्पजवळ आर्मी एरियात रहाते त्यामुळे या हॅशटॅगसाठी अजुन एकदा :thumbs up:
छानच जमलंय! मस्तानी बाजीराव
छानच जमलंय! मस्तानी बाजीराव कनेक्शन जबरी!
बाहेरून येऊन इथे सेटल होणारे आणि वर पुण्याला शिव्या घालणारे बघितले की कीव वाटते.>>>>>>> ++++११११
@मीरा मी पूर्वी नेताजीनगरला
@मीरा मी पूर्वी नेताजीनगरला रहायचे. सेम कॅन्टॉनमेन्ट एरी या
नाझचे नॉनव्हेज सामोसे फेमस आहेत.गेल्या ४० वर्षांपासून.
लेख चांगला आहे. मी फार रिलेट
लेख चांगला आहे. मी फार रिलेट करू शकत नाही ती गोष्ट वेगळी.
खारी पॅटीस आवडलं (कुठलं खाल्लेलं माहीती नाही, ना पे तल्या नणंदेकडे एकदा रविवारी सकाळी आणलेलं, विजय talkiesजवळचा एरिया) . मस्तानी फार काही आवडली नव्हती. जेवढं कौतुक करतात त्यामानाने नव्हती आवडली.
काका हलवाई नाही का पुण्यातला फेमस brand, त्यांच्या काही मिठाया वेगळ्या आणि टेस्टी वाटल्या एक चंद्रकळा का चंद्रकला आणि दुसरी मलई mango बर्फी. अर्थात खूप गोड त्यामुळे मी थोड्याच प्रमाणात खाऊ शकते.
बाकी चितळे बाकरवडी आवडतेच, बरेच प्रकार आता इथे कोपऱ्यावर पण मिळतात . मला काजूकतली फार आवडत नाही पण चितळे बेस्ट. चितळे दुध मात्र फार नाही आवडत, गोकुळ स्पेशल चवीला बेस्ट, मधुर एकदम. साय चितळे दुधाची जास्त जाड येते पण कॉफीसाठी मी गोकुळला प्राधान्य देते.
झकास लिहीलाय लेख!
झकास लिहीलाय लेख!
घोडके - लक्ष्मी रोड जवळचा -
घोडके - लक्ष्मी रोड जवळचा - त्याच्याकडचे कंदी कंदी, काका हलवाईचे साखरी पेढे, चितळे ची आंबा बर्फी आणी बाकरवडी (चितळेचे पेढे ही निव्वळ अंधश्रद्धा).
रमेश डाईंग नवीन आहे. टोप्या, दप्तरं, रेनकोट साठी राजिवडेकर हा ब्रँड बाकीच्या ब्रँड्सजवळ जाणारा.
आता कालौघात मागे पडलेला पण वाडेश्वर वगैरेच्या आधीचा म्हणजे स्वीट होम.
आईसक्रीम मधे मस्तानीवाल्या 'सुजाता' च्या आधी 'कावरे' (तुळशीबाग). 'कोंढाळकर्स' मस्तानी ही नंतरची, त्या आधी सुजाता मस्तानी म्हणून च ओळखली जायची.
Pages