भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक. अखंड सौभाग्यवती वाचून आश्चर्य वाटलं.>>>>> कोणत्यातरी समाजात नववधूचे मंगळसूत्र वेश्येकडून ओवून घेतात, ती अखंड सौभाग्यवती असते म्हणून असे वाचनात आले आहे

एका रोचक पुस्तकाची ओळख डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांनी करून दिली आहे. हे पुस्तक वाचायला आवडेल.

https://www.weeklysadhana.in/view_article/dattaprasad-dabholkar-on-umesh...

शब्दतरंग - लेखक डॉ. उमेश करंबेळकर

अखंड सौभाग्यवती भव - असा आशीर्वाद ऐकला होता, त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. आता यापुढे कुणी असा आशीर्वाद देताना मी पाहिलं तर आश्चर्य वाटेल. भाई, कहना क्या चाहते हो!

डॉ. उमेश करंबेळकर >>>धन्यवाद वावे. त्यांची ‘ओळख पक्षिशास्त्राची’ आणि ‘कार्ल विनिअस’ पुस्तके माझ्या संग्रही आहेत. अप्रतिम

छान !
......
मराठीप्रेमाचा चिरतरुण आविष्कार
https://www.loksatta.com/lokrang/marathi-love-marathi-language-grammar-e...

मराठी भाषा आणि व्याकरणतज्ञ्य श्रीमती यास्मिन शेख या 21 जूनला 98 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
अभिष्टचिंतन !!

अखंड सौभाग्यवती भव >> ह.पा. आशीर्वाद देताना तु जिवंत असे पर्यंत तुझे सौभग्य टिकू दे हा अर्थ .म्हणजे तुझा सौभाग्याला तसे आयु ष्य लाभू दे

अखंड सौभाग्यवती असतात या स्त्रिया कारण यांच्या सौभाग्याचे कधीच. हनन होत नाही.. कारण काही वेळाचाच पती व नंतर दुसरा असा काहीसा अर्थ आहे.

ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी ।
अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥ ८२२ ॥

रोज निरनिराळ्या देवांची उपासना करणाऱ्याला ज्ञानेश्वर महाराजांनी गांव शिवेवरची अहेव म्हटले आहे.

"तुझ्यासारखे छप्पन्न पाहिलेत" या वाक्यातील छप्पन्न या शब्दाचा उगम काय यासंबंधी भिन्न माहिती मिळाली:

१. डॉ. नीलिमा गुंडी यांनी इथे असे लिहिले आहे:
(https://www.loksatta.com/navneet/process-of-forming-phrases-in-marathi-l...)

छप्पन्न हे मूळ ‘षट्प्रज्ञ’ या शब्दाचे बदललेले रूप आहे. षट्प्रज्ञ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, व्यवहार आणि तत्त्वज्ञान या सहा गोष्टी जाणणारा!

२. बृहदकोशात अशी माहिती आहे :
५६ देश, भाषा व संस्कृतकोश आहेत अशी समजूत आहे. [सं. षट्पंचाशत; प्रा. छपन्न]

(यावरून). छपन्नी, छपन्न्या-वि. १ अनेक देश हिंडून, अनेक भाषा शिकून आलेला (माणूस).

जी पण्य ( खरेदी विक्रीव्यवहारयोग्य वा अशा व्यवहारास तयार) अंगना.

.... अखंड सौभाग्यवती असतात या स्त्रिया कारण यांच्या सौभाग्याचे कधीच हनन होत नाही.....

इथे थोडे अवांतर होईल पण बंगाली संस्कृतीत वारांगनांना खऱ्या 'चिरसोहागिनी' (अखंड सौभाग्यवती) मानतात, त्यांच्या दाराची माती दुर्गाप्रतिमा घडवतांना मूर्तीच्या मुखासाठी वापरतात.

नॉर्मली मोठ्यांना वाकून नमस्कार केल्यास सवाष्ण स्त्रियांना 'चिरसोहागिनी थाको' म्हणजे 'अखंड सौभाग्यवती भव' असाच आशिर्वाद मिळतो, म्हणजे तो शब्द अर्थदूषित नाहीये.

>>>तुझ्यासारखे छप्पन्न पाहिलेत" या >>>
छान माहिती समजली
'छप्पन टिकल्या' असे बोलीभाषेत म्हणतात . पण त्याचा नक्की अर्थ काय?

कळसवणी =
(लग्नांत) वधूवरें नहातेवेळीं नवर्‍यामुलाच्या अंगावरील पाणी मुलीच्या अंगावर जें पडतें त्यास म्हणतात. (सामा.) नवर्‍याचें उष्टें पाणी; एक ग्रामाचार
हे माझ्या ऐकण्यात आजिबात नव्हते.
कोणी पाहिला आहे का प्रकार ?

मी पाहिलेला नाही हा प्रकार, पण नवरा नवरीने एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे ह्या प्रथेचा उल्लेख असा मी असामी मध्ये आहे.

अच्छा धन्यवाद
मला हा शब्द कोड्यामध्ये आला होता

तिथे दिलेले सूत्र असे आहे:
दोघे एकत्र नहात असता एकमेकांच्या अंगावर टाकलेल्या चुळा.

लग्नाच्यादिवशी काही विधी झाल्याबर एक नाहायचा विधी असतो, त्यात जे पाणी वापरतात त्याला कळसवणी म्हणतात असे मला वाटते. नवरा व नवरी हा विधी वेगवेगळा करतात, एकत्र नाही.

मालवणीत आधीच्या पिढीपर्यत अमुकाचे लग्न झाले असे न म्हणता अमुक लगीन न्हालो असा शब्दप्रयोग होता. आता हा नहाण्याचा कार्यक्रम असतो का माहित नाही. हा शब्द प्रयोग पण हल्ली फारसा ऐकायला मिळत नाही. मी मझ्या मावश्या मामांच्या लग्नात पाहिलाय व माझ्या लग्नात अनुभवलाय. कळसवणी आंगावर पडला की पोरगो/पोरग्या सुधारतला अशीही (खोटी) भावना (उगीचच) लोकांच्या मनात असायची.

Pages