ओल्या काजूगरांची परतून भाजी (कोरडी)

Submitted by वावे on 10 March, 2021 - 04:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओले काजू - अंदाजे दीडशे ते दोनशे नग
बटाटा -१
हिरवी मिरची -१
फोडणीचं साहित्य,
कढीलिंब, कोथिंबीर, ओला नारळ वगैरे.

क्रमवार पाककृती: 

ओले काजूगर म्हणजे काजूच्या ओल्या/हिरव्या बिया सोलून आतले काढलेले गर. हे ताजे याच सीझनमध्ये मिळतात. कोकणात मिळतातच. पण मला यावर्षी चक्क बंगळूरला मिळाले. दापोलीहून थेट पार्सल! ते वाळवलेले आणि त्यामुळे टिकाऊ आहेत. पण तरीही धीर न निघाल्यामुळे आज पार्सल मिळाल्यामिळाल्या लग्गेच भाजी केली.
त्यांनी पाकिटाबरोबर दिलेल्या सूचनांनुसार उकळत्या पाण्यात ते काजूगर अर्धापाऊण तास भिजवून ठेवले. जरी ताजे, ओले असतील तरी गरम पाण्यात घालून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्यांना चीक असतो, तो निघाला पाहिजे.
भिजलेले काजूगर सोलून घेतले.
IMG-20210310-WA0001.jpg
बटाट्याच्या काचऱ्या चिरून घेतल्या.
फोडणी करून त्यात कढीलिंब, हिरवी मिरची घातली आणि आधी बटाट्याच्या फोडी घातल्या. त्या परतून शिजत आल्यावर काजूगर घातले. थोडा वेळ परतून झाकण ठेवून एक वाफ काढली, मीठ घातलं. झाली भाजी. खूप शिजवायची नाही. वरून सढळ हस्ते ओला नारळ 'मस्ट' आहे. कोथिंबीर असल्यास तीही घालावी.
ही भाजी पोळीबरोबर, ताकभाताबरोबर छान लागते. नुसतीही खायला छान लागते. नुसते सोललेले काजूगरही तसेच खायला छान लागतात. सोलता सोलता एकीकडे खाल्ले जातातच.

वाढणी/प्रमाण: 
चौघांना पुरते
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीचे काजू जून आणि भाजलेल्या बियांमधून काढलेले असतात. त्यामुळे ते खरपूस चवीचे आणि कडक असतात.
हे कोवळे असतात. त्यामुळे चवीत फरक पडतो. दुधाची तहान ताकावर हेच खरं.
अस्मिता, स्निग्ध अशी खूप नाही होत भाजी. नारळाचा स्निग्धपणा जो असेल तेवढाच. तेल फोडणीपुरतं. कदाचित खोबरं वाटून घेतलं तर जास्त स्निग्धता उतरत असेल.
चैत्राली, साधनाताई, धन्यवाद Happy महागच असतात हो हे कोवळे काजूगर. मला इथे मिळाले याचंच अप्रूप वाटल्यामुळे मी 'होऊ दे खर्च' मोडमध्ये आहे! Wink
गुलबकावली, त्यांचा फोन-पत्ता इथे थेट देऊन चालेल का हे त्यांना विचारते आधी.
कुंतल Happy

बोटे खराब न करता काजू कसे काढावेत याचा विडिओ. माझ्या ओळखीचे एक शेतकरी श्री. माधव साटम यांची ही कल्पना. थोडे लक्ष देऊन काम केले तर काजुगाराला बोटही न लावता काजूगर काढता येतो. मी करून पाहिले आहे.

https://youtu.be/In-1xt3RjpE

गोड काजूगर (गूळ + ओले खोबरे + काजू सर्व एकत्र शिजवून) खाल्ले आहेत. ह्या धाग्यावर मला वाटते देवकी यांनी लिहिले आहे त्याबद्दल.
काजूगरांचे नेहमीचे साखरेच्या पाकातले लाडू छानच लागतात. दादरच्या लाडूसम्राटांकडे मिळायचे. आताचे माहीत नाही

Pages