प्रवास

Submitted by abhishruti on 18 December, 2007 - 06:21

खूप वर्षापूर्वी लिहिलेली डायरी सापडली, तेव्हा लिहिलेली एक कविता

कधीतरी मला विलक्षण ओढ लागते
वाटतं, वाटतं - दिसेल त्या वाटेने तुझ्याकडे धावत सुटावं
त्या भावनेच्या भरात मी धावतही सुटते
त्या धावण्यातही एक मजा असते
त्या दमण्यातही एक आनंद असतो
त्या धावण्यात, दमण्यात, अडखळण्यात - काहीच कसं कळत नसतं.

आणि खूप धावल्यावर माझ्या लक्षात येतं की
तुझ्या-माझ्यातलं अंतर अजून तेव्हढंच आहे
त्याक्षणी मला श्रम जाणवायला लागतात,
श्वास गुदमरायला लागतो, जीव गोळा होतो.

सारासार विवेकबुद्धी जागृत होउन मी परत फिरते
पूर्वीच्या सीमेवर आल्यावर माझा श्रांत चेहरा पाहून लोकांना वाटतं
खूप दूरचा प्रवास आटोपून आली पोर
मला उगाचच अपराधी वाटायला लागतं

गुलमोहर: 

कविता आवडली. अजून वाचायला आवडेल.

तुझ्या-माझ्यातलं अंतर अजून तेव्हढंच आहे.. अहा ! हा एकच क्षण जाणीवेचा जिवघेणा असतो ज्या क्षणी खरं अंतर कळतं.. मस्त आहे कविता.

माणिक !