पेठवाटा..
कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा काही खुप मोठा किल्ला नाही. अगदी छोट्या मोठ्यांपासून, हवश्या नवश्यांसाठी भटकंतीसाठी आदर्श असा. आजुबाजूच्या घाटावाटांवर खेड वांद्रे भामा आसखेड भागात ‘नाखिंडा घाट’, ‘कौल्याची धार’ तसेच सावळा भागात जाणाऱ्या ‘पायिर घाट’ (बैलदारा), ‘बैलघाट’ अशा घाटावाटांवर वचक ठेवण्यासाठी सह्याद्रीतले याचे भौगोलिक स्थान फार महत्वाचं. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पुढे मराठ्यांच्या काळात शस्त्रागार म्हणून किल्ल्याचा वापर केला जाई.
किल्ल्याच्या ईतिहासाबद्दल बरीच माहिती पुस्तकात व आंतरजालावर उपलब्ध आहे. असा हा नव्या जुन्या ट्रेकर्स मध्ये प्रसिद्ध पेठचा किल्ला. याच किल्ल्याच्या इतर वाटांबद्दल थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न..
१. आंबिवली पासून...
हि तर पूर्वापार चालत आलेली वाट, खास करून अजूनही ट्रेकर जमातीत हीच वाट वापरली जाते. आंबिवली, धामनी आणि जामरूख ही पेठ घेऱ्यातील महत्वाची गावं. कर्जत भागातून नियमित एस्टीची सोय असल्याने पेठ वस्तीतील लोकांना बाजार म्हणा तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी सोयीचं. आंबिवली गावातून समोरच्या डोंगरावर मोठी वाट जाते, आता तर हल्ली बाईक आणि जीप सारखं वाहन ही जातं. या वाटेने डोंगर आणि पेठ पठार या खिंडीत आल्यावर समोर दिसतो तो लोभसवाणा कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला. पुढची पठारावरील अर्धा तासाची वाट गावात घेऊन जाते. गावातून किल्ल्याच्या प्रचलित वाटेने पाऊण तासात गडमाथा गाठता येतो.
२. डुक्करपाडा उर्फ देवाचा पाडा मार्गे..
आता आपण गडाच्या उत्तरेकडील वाटा लक्षात घेऊया. गडाच्या ईशान्येला जामरुख हे गाव. कर्जत जामरूख कामतपाडा एस्टी आहे. जामरूख मध्ये आत जाताना नदीवर पूल लागतो त्या पुलाच्या अलीकडे एक छोटा डांबरी रस्ता उजवीकडे जातो त्याच रस्त्याला जेमतेम पाच सातशे मीटरवर डुक्करपाडा नावाची लहानशी स्वच्छ आणि आटोपशीर घरांची वस्ती. इथली मंडळी अगत्यशील आहेत. वाडीत शिरताना नव्याने बांधलेले कृष्ण मंदिर नजरेत येते. वाडीतून उत्तरेला पदरगड भीमाशंकर नागफणी पासून सह्याद्रीची भली मोठी रांग नाखिंडा पर्यंत तिथल्याच कौल्याच्या धारेने कोथळीगड सह्याद्रीशी जोडलेला. वाडीतून बाहेर येताच दक्षिणेला कोथळीगड अगदी हाकेच्या अंतरावर. या भागात असलेल्या बऱ्याच फार्म हाऊस पर्यंत गेलेल्या डांबरी रस्त्याने काही अंतर जाताच उजवीकडे एका फार्म हाऊसच्या कडेने गडाच्या दिशेने सुटायच. ‘मिस्ट्री हिल्स कर्जत’ असे काहीतरी नाव आहे. तेच खूण म्हणून लक्षात ठेवायचं. लहानसा चढ चढून रस्ता संपतो, पुढे व्यवस्थित रानात जाणारी मळलेली पायवाट. या भागात जांभळं आंब्याची झाडं भरपूर त्यामुळे वाटेवर चांगलाच झाडोरा आहे. भर उन्हात ही सुसह्य अशी चाल. अर्धी चढाई झाल्यावर वाट उजवीकडील नाळेच्या रोखाने आरामशीर वळणं वर घेत जाते. अगदी झक्क मळलेली या भागातील गावकरींची नेहमीच्या वापरातील वाट. पाऊण तासात पठारावर आल्यावर सरळ रेषेत पेठ गाव. दहा पंधरा मिनिटांत पेठ गावात जाऊन किल्ल्याच्या प्रचलित वाटेने पाऊण तासात गडमाथा गाठता येतो.
अधिक माहितीसाठी https://ahireyogesh.blogspot.com/2017/05/chilhar-caves-kothaligad.html
३. पाऊलखाची वाट...
याच डुक्करपाडा हून पंधरा मिनिटांत ठोंबरवाडी गाठायची. या अगदीच लहानशा वाडी मागे दिसतो तो रंगमंचा सारखा सह्याद्रीचा भव्य नजारा. दक्षिणेला किल्ल्याकडे पाहिल्यावर डावीकडे लहान सुळका सारखा भाग तर समोर दोन तिरक्या मोठ्या झाडी भरल्या घळी. यातील पहिल्या घळीतून वाट आहे. सुरुवातीचे दोन फार्म हाऊस मागून वाट सोंडेवर चढू लागते. दाट रानातून व्यवस्थित दगडी रचाई आणि टप्पा टप्प्यात उंची गाठत तासाभरात आपण पठारावर येतो. पुढे उजवीकडे पंधरा मिनिटांत सपाट चालीने पेठ गावात. पेठ गावातून किल्ल्याच्या प्रचलित वाटेने पाऊण तासात गडमाथा गाठता येतो.
अधिक माहितीसाठी https://ahireyogesh.blogspot.com/2017/11/paulkha-andhari-khetoba-vajantr...
४. नाळेची वाट..
आता आपण गडाच्या दक्षिणेकडील वाटा पाहू. धामणी हे गडाच्या दक्षिणेला वसलेले आहे. कर्जत धामणी अशी एस्टी आहे. याच धामणीतून उत्तरेला नाळेच्या वाटेने गडावर जाता येते. या भागातही फार्म हाऊसचे जाळे भरपूर त्यातूनच दिशेनुसार वाट काढत सुटायचे. खरंतर सोपं जरी वाटत असले तरी सुरुवातीच्या टप्प्यात फार्म हाऊस आणि गावकरींची शेती यात चुकायला नको म्हणून गावातून मुख्य वाटेला लावून देण्यासाठी कुणीतरी सोबत घ्यावा. जस जसे गडाच्या जवळ जाऊ लागतो तशी समोर खालच्या बाजूला झाडीचा भाग आणि वर कातळ भिंत दिसू लागते. प्रथम पाहता इथून कुठून वाट असेल हा विचार डोक्यात येतो. निरखून पाहिल्यावर तिरक्या रेषेत एक लहानशी घळ दिसते. तीच आपली मुख्य वाट. रानात शिरल्यावर एकच मळलेली वाट, अस्ते कदम चढत अर्धा पाऊण तासात आपण कातळाला भिडतो. तिथून उजवी मारत थेट घळीत. इथून पंधरा ते वीस मिनिटात आपण गडाच्या पठारावर येतो. या बाजूने पेठ गाव जरी दिसत नसले तरी टोपी सारखा गडमाथा अगदी नजरेत. गावात जाण्यासाठी डावीकडची वाट धरायची. या ठिकाणी आता नव्याने बांधलेली स्मशानाची शेड आणि पुढे काही अंतरावर पाणी अडवायला लहान असा बंधारा. गडमाथा उजव्या हाताला ठेवत मळलेल्या वाटेने गावात. पेठ गावातून किल्ल्याच्या प्रचलित वाटेने पाऊण तासात गडमाथा गाठता येतो.
अधिक माहितीसाठी https://ahireyogesh.blogspot.com/2018/01/nalechi-vaat-bail-ghat-kaulyach...
५. निसणीची वाट...
धामणी पासून दहा मिनिटांच्या अंतरावर मेचकरवाडी. कर्जत धामणी एस्टी मेचकरवाडी पर्यंत येते. छोटेखानी टुमदार अशी मेचकरवाडी, तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेली डाव्या बाजूला पेठचा किल्ला, समोर सह्याद्रीची मुख्य रांग तर उजवीकडे कळकराय पठार. तसं पाहिलं तर मेचकरवाडीच्या लागूनच असलेल्या दोन वाड्या, पहिली वाडी सोडल्यावर ओढ्यावर एक पूल लागतो. त्या जवळ असलेल्या घराच्या मागून गडाच्या दिशेने थोडक्यात उत्तरेकडे निघायचं. फार्म हाऊसवर जाणारा मोठा कच्चा रस्ता लागतो काही अंतर त्याच रस्त्याने जात. वाट तारेचे कुंपण पार करून रानात शिरते. आता हे लक्षात ठेवणं अवघड यासाठी निदान वाटेची सुरुवात अचूक दाखवायला तरी स्थानिक माहितगार घेणं गरजेचं अन्यथा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या फार्म हाऊसच्या विळख्यातून वाट मिळणं महाकठीण काम. समोर पाहिल्यावर लहानसा दांड खाली उतरलेला दिसतो, तिथूनच वाट आहे. दांड चढून आल्यावर छोटासा रॉक पॅच तो पार करण्यासाठी झाडाची मोळी ठेवली आहे. पावसाळा सोडला तर हा पॅच बायपास करून उजवीकडून वळसा घेत ओढ्यातून वर येता येते. पुढे लहानसा चढ चढून आपण पठारावर येतो. किल्ल्याचा माथा अगदी नजरेत. इथून ठळक अशा दोन वाटा फुटतात सरळ जाणारी किल्ला आणि कौल्याची धार यांना जोडणाऱ्या खिंडीत तर डावीकडची पठारावरून किल्ल्याला वळसा घालून गावात. दोन्ही वाटांनी जाता येईल पण त्यातल्या त्यात पठारावरील वाट सोयीची. काही अंतर जाताच डावीकडे नव्याने बांधलेले स्मशान शेड त्या मागून येणारी नाळेची वाट मिळते. पुढे वाटेत लागणारी पावसाळी शेतं पार करत गावात. पेठ गावातून किल्ल्याच्या प्रचलित वाटेने पाऊण तासात गडमाथा गाठता येतो.
या प्रचलित पाच वाटा ज्या अजूनही या गड रहाळातील लोकं सर्रास वापरतात. घाटावरील मावळ (वांद्रे पढारवाडी) भागातून यायचं झाल्यास नाखिंडा किंवा कौल्याच्या धारेने कोथळीगड येणं सहज शक्य. या खेरीज पेठ पठाराच्या दक्षिणेकडील कळकराय वस्ती तर उत्तरेला रामखंड भागात काही वाटांनी येता येते. पण त्या वाटा दूरच्या थेट किल्ल्यावर येत नाहीत त्याबद्दल लिहिणं इथे नको.
भारीच की. त्या काळात किती
भारीच की. त्या काळात किती खडतर वाटा होत्या, पण केवढ्या उत्साहाने लोक एवढे कष्टमय जीवन जगत होते. फोटो मस्त आहे. सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.
उत्तम धांडोरा घेतलात या
उत्तम धांडोरा घेतलात या किल्ल्याचा आणि भवतालाचा ...
फोटो नेहमी प्रमाणे डोळ्याना सुखावणारे...
लेख, फोटो सुंदर...पुलेशु
लेख, फोटो सुंदर...पुलेशु
धन्यवाद.. रश्मीजी, पशुपत आणि
धन्यवाद.. रश्मीजी, पशुपत आणि ऋतुराज
उत्तम धांडोरा घेतलात या किल्ल्याचा आणि भवतालाचा >>>> माझा जवळचा आवडता किल्ला.
खूप छान वर्णन, माहिती आणि
खूप छान वर्णन, माहिती आणि फोटो. आम्ही कोणे एकेकाळी हौशी ट्रेकिंगच्या काळात धामणीवरून पेठचा किल्ला केला होता. त्या मधल्या गावात चांगला खवा मिळतो की मिळायचा असं आठवतं. (इफ मेमरी सर्व्ह्ज मी करेक्टली )
आभार पुलेशु.
मधल्या गावात चांगला खवा मिळतो
मधल्या गावात चांगला खवा मिळतो की मिळायचा असं आठवतं. >>> अगदी बरोबर वेका . खव्यासाठी पेठ प्रसिद्ध होते, पण आता तेवढे मात्र नाही परिस्थिती बदलली हल्ली पशुधन फारसे राहिले नाही.