जावयाचा मान - भाग २ (अंतिम)

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2021 - 16:54

भाग १ खालील लिंकवर टिचकी मारून वाचू शकता. आई मीन वाचला नसेल तर वाचाच Happy

https://www.maayboli.com/node/78092

--------------------------------------------------------------

भाग २ (अंतिम)

तिथून मग गाडी भरघाव सुटली. तासाभराचा प्रवास होता. म्हटलं तेवढेच झोप काढून घेऊया. मेहुण्यांनी आदल्या रात्री गप्पांच्या नादात फार जागवलेले. तर डोके टेकले काचेवर आणि झोप लागली. पण कसले काय थोड्यावेळातच गाडी थांबल्याच्या आवाजाने जाग आली. म्हटले आता कोणाला मध्येच बाथरूमला लागली? तासाभराचा प्रवास, तासाभराची झोप, त्यातही हा ब्रेक! घरून करून निघता येत नाही का या लोकांना, ईतका काय त्या काकांवर राग जे आता तिथे बाथरूमलाही जायचे नाही ठरवले होते.. असे विचार मनात चालू होते, तो मी सोडून सगळेच खाली ऊतरले. म्हटलं वाह, सगळ्यांनी एकजुटीनेच ठरवले होते की काय बाथरूमचा बहिष्कार?? पण मग बायकोने काचेशी टकटक करत मलाही खाली ऊतरायला सांगितले. बघतो तर हायवे पासून जरा आत शिरताच झाडींनी झाकलेले एक मंदीर, एक शिवालय होते. गर्द झाडांची सावली, थंडगार वारा, शेजारून वाहणारे पाटाचे पाणी, दूरवर शेत आणि पार्श्वभूमीला डोंगर, डोंगरावर निळे आकाश आणि आकाशात पांढर्‍या ढगांचे ठिपके... मुंबईहून निघाल्यापासून पहिल्यांदा आता कुठेतरी छानश्या गावात आल्यासारखे वाटले. दोनचार वेळा मग उगाचच घंटा वाजवून त्या घंटानादाने वातावरणास आणखी मंजुळ केले.

असे वाटले ईथेच असते कुलदैवत तर छान झाले असते. पण ते तिथून विसेक किलोमीटर लांब होते. जिथे होते त्या गावात सध्या यांचे राहते घर नव्हते. पण ओळख होती. त्यामुळे मुक्काम करायचा नव्हता. मात्र ज्या विधी प्रथापरंपरा पार पाडायच्या होत्या त्याची तयारी फोनवरच झाली होती. मला वाटले फोनवर सांगून काम होतेय म्हणजे थोडक्यात आटोपणारी आणि ठरलेली जुजबी पूजा असेल. पण कसले काय. म्हणजे होती तशी ठरलेलीच, पण जुजबी नव्हती. जवळपास पन्नासेक लोकांचा जेवणाचा घाट होता. आणि त्याला साजेशी भलीमोठी पूजा मांडली होती.

त्या पन्नास लोकांपैकी मानाचे पाच लोकं आत आमच्यासोबत मंदीराशेजारील एका खोलीत जेवायला बसवले होते. तिथे मला मान मिळणार नव्हता तर त्या पाच लोकांना मान द्यायचा होता. तो ही कसा,
तर असा ..

१) मला जेवण सुरु करायच्या आधी त्या जेवणाच्या खोलीबाहेरच त्या पाचही ज्येष्ठ नागरीकांचे चरणस्पर्श करायचे होते. पायावर थोडे पाणी सोडायचे होते. आणि सन्मानाने त्यांना आत आणायचे होते.

२) ते आत ताटावर बसल्यावर त्यांच्यासमोर हात जोडून, आणि हातात नारळ घेऊन प्रार्थना करायची होती. जी साधारण अशी होती - मी आपल्या गावातील, समाजातील, कुळातील मुलीशी लग्न केले आहे. तिच्याशी कायम एकनिष्ठ राहीन, तिला सुखात ठेवेन. ईथे मी आपल्या गावच्या देवतेची पूजा करून तिला भेट चढवत आहे. प्रसाद म्हणून आपल्याला जेवण देत आहे. तर त्याचा स्विकार करावा आणि आम्हा उभयतांचे लग्न स्विकार करून आम्हाला आशीर्वाद द्यावा.

३) सर्वात महत्वाचे, किंबहुना पार्श्वभूमीचा विचार करता सर्वात डेंजरस - मला जेवण झाल्यावर त्या पाचही जणांच्या ऊष्ट्या पत्रावळी ऊचलायच्या होत्या.

वाह काय जावयाचा मान होता Happy

पण आता हे क्रमांक ३ सर्वात डेंजरस का होते याची पार्श्वभूमी जाणून घेऊया.

पहिले म्हणजे एक किस्सा होता यामागे. दंतकथा होती की बहुधा नसावीच, कारण चारपाच वर्षांपूर्वीचा किस्सा होता.
तर माझ्यासारखेच एक आंतरजातीय विवाह झालेले जोडपे याच पूजेसाठी या देवळात आले होते. सारे रीतीरिवाज जेवणखाने अगदी असेच. मुलगी यांच्या गावची, आणि मुलगा म्हणजे जावईबापू डॉक्टर होते. तथाकथित उच्च जातीतील होते. ओपन क्यॅटेगरी. आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणजे विचारांनीही संकुचित नसावेत. पाच ज्येष्ठांना त्यांनी यथोचित मान दिला. त्यांच्या पायावर पाणी टाकून त्यांना जेवायला बसवले, त्यांच्या गावच्या मुलीला मी छान सुखात ठेवेन असे हात जोडून आश्वासन दिले. मात्र अखेरचा राऊंड, त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलणे याला मात्र विनम्रपणे नकार दिला.

आता सांगणार्‍यांनी तर मला सांगितले की डॉक्टरसाहेबांनी आपल्या ऊच्चजाती आणि ऊच्चशिक्षणाच्या अहंकाराने नकार दिला. किस्सा सांगणार्‍याचा दॄष्टीकोन तसा असणे स्वाभाविकच होते. पण मला मात्र ते पटले नाही. तसे असते तर प्रकरण अखेरच्या राऊंडला पोहोचलेच नसते.
अरे नसेल आवडत एखाद्याला असे ईतरांच्या ऊष्ट्या पत्रावळ्या उचलणे. पण त्या ज्येष्ठांना तरी हा कसला अहंकार की आपल्या पत्रावळ्या जावईबापूंनी उचलायलाच हव्यात.
किंवा कदाचित जो आपल्या ऊष्ट्या पत्रावळ्या कां कूं न करता ऊचलेल तोच आपल्या गावच्या मुलीला सन्मानाने ठेवेल अशी चाचणी घेण्यासाठी ती प्रथा बनवली असावी.

जे काही असेल ते असेल, पण पुढे झाले काय ते तर ऐका.
अर्थात चाणाक्ष वाचकांनी अंदाज लावला असेलच.
येस्स, ज्येष्ठ चिडले. त्यांनी जोडप्याला आशीर्वाद द्यायला नकार दिला. मनोमन शापच दिले. आणि साधारण वर्षभरातच त्या डॉक्टरची वाताहत होत त्याचा अखेर अपघाती मृत्यु झाला Sad

आता मी सुद्धा असे नकार देईन हि भिती माझ्या सासरच्यांना का वाटली? यालाही एक पार्श्वभूमी आहे. आमची जेवणपद्धती जी त्यांना ठाऊक होती.

आमच्याकडे लहानपणापासून जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापले ताट उचलायची सवय आहे. ताटातले शिल्लक खरकटे अन्न वा मिरची कडीपत्ता जे काही असेल ते सुद्धा आपल्या हाताने डस्टबिनमध्ये टाकायचे आणि रिकामे ताट बेसिनमध्ये ढकलून ते सुकू नये म्हणून पाणी टाकायचे अशी पद्धतच आहे.
हे मी आमच्या घरीच नाही तर बाहेर कुठे जातो तिथेही आवर्जून करतो. सासुरवाडीला जेव्हा जायचो तेव्हाही न चुकता करायचो. जे मी करू नये असे माझ्या सासरच्यांना वाटायचे कारण त्यांच्यामते जावयाचे वा विशेष पाहुण्याचे ताट उचलणे हा त्यांचा मान होता. त्यामुळे माझे जेवण होताच ते लागलीच माझ्या ताटावर झेप घ्यायचे, पण मी देखील शिताफीने ते उचलून त्यांच्या हातात पडू नये याची काळजी घ्यायचो. कारण ताट उचलायला आपल्या सासूबाई किंवा कॉलेजला जाणार्‍या मेहुण्या येणे आणि आपण जे ताट घरी असताना सहजपणे आपले आपण उचलतो ते ईथे जावयाचा मान मिरवत त्यांना उचलायला लावणे हे फार ऑकवर्ड वाटायचे.

त्यामुळे आता एकंदरीतच मला कोणी दुसर्‍याचे ताट उचल म्हणून सांगितले तर मी त्याला तयार होईल का याबाबत त्यांच्या मनात साशंकताच होती. आणि म्हणून त्यांनी मला ही प्रथा सांगण्यासाठी माझ्या बायकोलाच पुढे केले. मला त्यात काही विशेष वाटले नाही. जर मी एखाद्या हॉटेलात कामाला असतो तर गिर्‍हाईकाचे ताटही उचलले असते आणि टेबलही पुसले असते. तिथे तो माझ्या कामाचा भाग असता. ईथेही आता लग्न केलेय प्रथापरंपरेनुसार तर त्या प्रथेचाच भाग समजून सहजपणे करायला तयार झालो. त्या पाचही जणांची जेवणे होताच आता लागू का कामाला म्हणत झपझप तीन ताटे उचलली, तसे माझा मेहुणा पुढे आला आणि माझ्या हातातली ताटे आपल्या हातात घेत उरलेली दोन त्यानेच उचलली.

खरं म्हणजे मला तर वेगळेच टेंशन होते. आधीच त्या जवळच्या नात्यातल्या काकांनी नाराजी व्यक्त करत भेंडी अन शेपूची भाजी खाऊ घातली होती. तर तसेच ईथे कोणी नाराज लोकांचा समूह असेल, आणि काही उचनीच झाली तर मला मारणार तर नाही ना ही भिती होती. पण माझ्या लव्ह-ए-स्टोरीच्या नशीबात तितके थ्रिल लिहिले नव्हते.

पण जे झाले त्याने माझ्या सासकरडच्यांना मात्र अगदी भरून आले. आपल्याला किती छान जावई मिळाला आहे आणि आपण उगाच त्याच्या लग्नाला विरोध करत होतो. आता त्याच्यासाठी हे करावे की ते करावे असे त्यांना झाले. आणि या भावना त्यांनी बोलूनही दाखवल्या. किंबहुना तेव्हापासून सुरू झालेला माझा कौतुकसोहळा आजतागायत अध्येमध्ये चालूच असतो. त्यामुळे माझ्या बायकोला माझी तक्रार करावी असे हक्काचे माहेरच उरलेले नाही Happy

बाकी ते माझ्या जेवणाचे ताट कोणी उचलायचे हा खेळ आता संपुष्टात आला आहे. कारण मुले झाल्यावर मी त्यांच्या जवळच घर घेऊन राहू लागलो आणि जवळपास दररोजच मुलांना खेळायला म्हणून त्यांच्याकडे जाणे होऊ लागले. रोजच त्यांच्याकडे खाणे होऊ लागले. आपल्याच हाताने ताटात वाढून घेणे आणि आपल्याच हाताने ते धुणे होऊ लागले. अखेरीस जावयाचा मान कमी कमी होत अगदी शून्य झाला आहे आणि त्याची जागा माया ममता वात्सल्य अश्या आपलेपणाच्या भावनांनी घेतली आहे Happy

ईति जावयाचा मान पुराण सुफळ संपुर्ण !

बाई दवे,
योगायोगाने हे लिहितानाच व्हॅलेंटाईन डे उजाडला आहे. तर सर्व मायबोलीकरांना संत व्हॅलेंटाईन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

ता.क. - कभी कभी लगता है अपुनिच मायबोली का घरजावई है Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे..आवडले !
माझे पण असेच झालेय...नवर्याची तक्रार करायला माहेरच नाही.. माझ्यापेक्षा जावयाचाच लाड जास्त असतो माझ्या माहेरी Happy

वा! जावयाचा मान ह्या विषयावर 2 धागे झालेच आहेत, तर पुढील दोन धागे 'यावयाचा मान' ह्या विषयावर काढायला हरकत नाही. Wink

कृपया हलके घ्या

पाच उष्ट्या पत्रावळ्या उचलायला डॉक्टरला कमीपणाचे का वाटावे??? आणि उचलल्या नाहीत तर म्हाताऱ्याना राग का यावा? यावर चर्चा होण्यासाठी एक स्वतंत्र धागा काढण्याची गरज आहे असं मला वाटतंय.

त्याची जागा माया ममता वात्सल्य अश्या आपलेपणाच्या भावनांनी घेतली आहे Happy>>> छान..!! कुठल्याही नात्याचे बंध घट्ट होण्यासाठी हे जास्त गरजेचं आहे.
छान लेख लिहिलायं.. आवडला.

धन्यवाद

@ बोकलत
पाच उष्ट्या पत्रावळ्या उचलायला डॉक्टरला कमीपणाचे का वाटावे??? आणि उचलल्या नाहीत तर म्हाताऱ्याना राग का यावा? यावर चर्चा होण्यासाठी एक स्वतंत्र धागा काढण्याची गरज आहे असं मला वाटतंय.
>>>>
ईथेही ती करू शकता, आपल्याला काय वाटते Happy

पण हे कमीपणाचे वाटणे किंबहुना खटकणे स्वाभाविक आहे. कारण ते ज्येष्ठ त्यांचे पाहुणे नव्हते तर समोरच्या पार्टीचे होते. उद्या तुम्ही एखाद्याकडे पाहुणे म्हणून जेवायला गेलात आणि त्यांनी तुम्हाला ईतर पाहुण्यांचे ऊष्टे ताट उचलायला लावले तर कसे वाटेल तसाच विचार त्यावेळी डॉक्टरांच्या मनात आला असेल. शेवटी तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कश्या नजरेने कोणत्या दृष्टीकोनातून बघता हे ईथे महत्वाचे.

दोन्ही भाग अगदी मस्त लिहिले आहेत. जेवणानंतरचे सोपस्कर पार पाडण्यासाठी अशा चांगल्या सवयी आपल्या मुलांना आई-वडिलांनी कटाक्षपणे लावायला हव्यात. स्वतःची कामे स्वतः करण्यात का..कू.. करणार्‍या आपल्या मुलांना बिघडवण्यात आई-वडिलांचाच दोष असु शकतो या मतावर मी ठाम आहे.

धन्यवाद

@ डीजे. हो खरे आहे. खाण्यापिण्याच्या आणि स्वावलंबनाच्या. चांगल्या सवयींबाबत आईवडील हे पहिले गुरू आणि दुसरे हॉस्टेल.. Happy

हॉस्टेलच्या धाग्याचा विषय सुचतोय कि काय ? ओ थांबा. माझे किस्से येऊन जाऊ द्या.
तुम्हाला इतर हजारो विषय आहेत.

कुणी कशाला स्वतःच काढा. नाहीतर मग ऋन्मेष काढेल. आणी पब्लीक त्याच्या नावाने बोंबा मारेल : हाहाः

कुणी कशाला स्वतःच काढा. >>> आताशी कुठे मराठी लिहायला शिकतेय.. मी धागा काढला तर व्याकरणाचा बट्ट्याबोळ होईल..

छान!
*कभी कभी लगता है अपुनिच मायबोली का घरजावई है * - अरेच्चा, पण घराबाहेर पाटी तर तुमच्याच नांवाची लागलीय ! Wink

धन्यवाद लोकहो Happy
भाऊ Happy

कुणीतरी सुनेचे लाड, सासूचा मान असाही धागा काढा कि..
>>>>>
कुणी कशाला स्वतःच काढा. नाहीतर मग ऋन्मेष काढेल.
>>>>>

मी स्वतः सून किंवा सासू नसताना कसा धागा काढू? किंवा त्यासाठी आधी मला ओळखीच्या सासूसुनांच्या मुलाखती घ्याव्या लागतील.

मला पण एक धागा काढून हवाय.
मायबोलीवर अजून कोणकोणत्या इमोशन्ससाठी स्मायल्या हव्यात असा.
>>>>
छान विषय आहे, तुम्हीही धागा काढू शकला असता, फारश्या प्रस्तावनेचीही गरज नव्हती. तरी ओके, घेतली सुपारी.. तुम्ही तोपर्यंत ड्रीम ईलेव्हनवर टीम बनवा Happy

@ रानभुली
आप की खिदमत मे धागा हाजीर है Happy

मायबोलीवर अजून कोणकोणत्या इमोशन्ससाठी स्मायल्या हव्यात?
https://www.maayboli.com/node/78133