झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामत रागावून जरी गेला असला तरी बाबा-पुता करून त्याला प्रेझेंटेशनसाठी तयार करवलं जातं अन त्याच्या अटीनुसार त्याच्याच रिसोर्टवर प्रेझेंटेशन द्यायला बोलावलं जातं (नै तर मग आपणाला स्विटू-ओम्याचा कोळीगीतावरील डान्स बघायला कसा मिळाला असता Wink ). मग तिथे तो आधिच्या प्रेझेंटेशनचे उट्टे काढायला जातो पण स्विटू त्या उट्ट्यातुन मार्ग काढत डील गळ्यात घालते अन मोहिम फत्ते होते.

इकडे खानविलकर व्हिलात भयंकर मानापमान नाट्य घडते. शकुच्या आजारपणाविषयी स्विटूकडुन कळाल्या कळाल्या नली अन बाबा साळवी व्हिलात येऊन धडकतात अन त्यांना आलेलं पाहून शकुला फार बरं वाटतं. नलीने येताना घरून मऊ भात करून आणलेला असतो (खायचे वांदे झालेल्या साळव्यांच्या घरात तांदळाचं पोतं कुणी आणून टाकलं कै मैत..!) आणि तो गरम करायला नली शकुच्या किचन मधे जाते अन तिथे तिची भेट मालविकेशी पडते. मग जो काय जाळ अन धूर उठतो तो शब्दातीत आहे (खानविलकर बहुतेक कडक भात खात असावेत..! Biggrin ). दळभद्री नली अन बाबा साळवी व्हिलात आल्यावर आपल्या मनात जे प्रश्न उमटले त्यापेक्षा २-४ वरचढ प्रश्न विचरुन मालविका समस्त साळव्यांची हंबरणाथमधली जागा दाखवून देते Proud

बाकी रिसॉर्ट मधे जंगी फिश फेस्टिवल होतो.. काल एक तासाचा महाएपिसोड होता

काल जातायेता बघितला तो प्रेझेंटेशनचा सीन..... अरेरे! कुठे नेऊन ठेवलेय कार्पोरेट कल्चर यांनी Angry
काय ते प्रेझेंटेशन, काय तो क्लायंट आणि काय ती मिटींग प्लेस!
बिझनेस प्रेझेंटेशनशी दुरान्वयानेपण संबंध न आलेल्या कुणा पाट्याटाकू लेखक दिग्दर्शकाकडूनच असले काही पडद्यावर उतरु शकते..... यांनी फक्त सासूसुनेच्या कुरघोड्या आणि विबासं वगैरेच साकारावे.
बाकी गोष्टींच्या नादाला लागू नये Wink

१ तासाचा महाएपिसोड महाबोअर होता...कोळी नृत्य घुसवण्यासाठी हा एपिसोड केला एवढेच कळले.
मला मालविका चा अभिनय फारच आवडायला लागला आहे. तिने नलु ला विचारलेले सगळे प्रश्ण भारी होते Wink

झी च्या सगळ्या सिरीअल मधे व्हिलन भुमिका करणार्‍या बायका खरच चांगला अभिनय करतात असं माझा झी मराठी चा अभ्यास सांगतो Happy
उदा. होणार सून मी मधली जानु ची आई , तुझ्यात जीव रंगला मधली वहिनी, खुलता कळी खुलेना मधली अभिज्ञा भावे ई ई ई...
हिरो हिरोइन पेक्षा व्हिलन चे रोल लॉगिकल लिहिलेले असल्यामुळे अभिनय करयला सोपं पडतं की उलट माहित नाही .
पण हिरोइनी सगळ्या कणाहीन आणि व्हिलन एकदम टु द पॉइंट बोलणार्‍या अशा काय बुवा नेहेमीच.
तरी काल नलु बर्‍यापैकी बोलली बाई....

असो... या स्पीड ने लग्न कधी होणार आणि मग लग्नानंतर चे मानापमान नाट्य ई ई...अजुन २-३ वर्षाचं पोटेन्शिअल आहे या सिरीअल मधे.

एका प्रश्नाचं उत्तर कधीपासून शोधत आहे, एव्हढे महत्त्वाचे क्लायंट आणि प्रेझेंटेशन जेमतेम महिनाभराच्या अनुभवी स्वीटूवर सोडून मालविका घरी काय करते?
आणि ती स्वीटू काही कारणाने प्रेझेंटेशन करू शकली नाही तर ओम्याला कव्हर करता येत नाही? की त्याचं काम साळव्यांचे पर्सनल आणि फायनान्शियल पेचप्रसंग सोडवणं हेच आहे?

जेनु काम तेनु भये असा काहिसा विचार करुन ओम्या अन तायडी अस्ले प्रेझेंटेशन पगारी नोकरांकडून करून घेत असावेत Proud

आणि ओम्याचं म्हणाल तर स्विटूच्या केवळ महिनाभराच्या अनुभवावर डिलं क्लाएंटच्या गळ्यात घालण्याच्या कौशल्यावर तो जाम खुश असणार.. असं कौशल्य असणारं व्यक्तिमत्त्व भविष्यात बिनपगारी घरी अन कंपनीत राबावं असा विचार करून तो सद्ध्या चपातीवाल्या साळव्यांच्या सळो की पळोस अधुन-मधुन थोडा ब्रेक देत असावा.

धन्यवाद डीजे. खानविलकर व्यवसाय मिसेस खानविलकर यांनी उभा केलेला असतो हे माहित नव्हते. आता मिसेस खानविलकर फक्त प्रेमळ आईची भूमिका निभावतात. तीनशे पोळ्यांची ऑर्डर अशी अचानक रद्द करतात आणि त्या पोळ्या विकण्याचा दुसरा कुठलाही मार्ग साळव्यांकडे नसतो Uhoh काका थोडा वेडसर आहे का आणि काकी कुठल्या शाळेत शिकली होती ती शाळा नक्कीच बंद झाली असणार.
पुढे जाऊन मुलगी सगळा बिझनेस सांभाळणार म्हणून तिचं नाव "माल" विका असं ठेवलं मिसेस खानविलकरांनी, भारी दूर दृष्टीच्या आहेत त्या. आता स्वीटूही नावाप्रमाणे गोड बोलून माल विकतेय म्हणूनच त्यांना ती कायमची घरात यायला हवीये. मालविकाचा होणारा नवरा अगदी क्युट आहे.

कामत रागावून जरी गेला असला तरी बाबा-पुता करून त्याला प्रेझेंटेशनसाठी तयार करवलं जातं अन त्याच्या अटीनुसार त्याच्याच रिसोर्टवर प्रेझेंटेशन द्यायला बोलावलं जातं -
काल दोनदा बघितला महाएपिसोड रिमोट बिघडला म्हणून सलग दोन्ही (अग बाई आणि येऊ कशी तशी) सिरियल्स बघाव्या लागल्या . तुम्ही जे म्हणता ते मला तर नाही दिसले कि ओमने त्या कामतला मनवले .
मला तर कालचा महाएपिसोड तुकड्या तुकड्यात शूट केल्यासारखा वाटला कशाचे कश्याशी मेळ नसलेला .
ती हत्तीचं पिल्लू शकूला पट्ट्या लावते सूप बनवते म्हणते पण बनवताना नाही दाखवले लगेच उचलून तिला रिसॉर्टवर प्रेझेन्टेशन ला नेले गेले पण शकूला सांगताना नाही दाखवले कि मी जाते तू काळजी घे वैगेरे मालविका सोडून सगळेच रिसॉर्टवर . ते गाणं सरळ सरळ घुसवले असेच वाटत होते.

पुढे जाऊन मुलगी सगळा बिझनेस सांभाळणार म्हणून तिचं नाव "माल" विका असं ठेवलं मिसेस खानविलकरांनी, भारी दूर दृष्टीच्या आहेत त्या.>>>

काहीतरीच ........ हा SS हा SSS हा SSSS हा SSSS .

@Ajnabi : अगदी अगदी... एडिटिंग मधे गंडला होता कालचा महाएपिसोड. झी वाल्यांनी अचानक तयार करायला लावला असणार. पण मागच्या पुढच्या लिंक जुळवून असं असं झालं असेल असं म्हणायचं आपण. Wink

शिवाय रिसॉर्ट वर फिश फेस्टिवल होता पण एकही फिश डिश दाखवली नाही.. पण असो.. ऐनवेळी महा एपिसोड द्या असं झी वाल्यांनी सांगितल्यामुळे धावपळ झाली असेल असं मानायचं आपण.

******* १०० क्लब धागा ********** Biggrin

लहान असताना हिला फणफणुन ताप आलेला आणी आई माल विकायला गेली म्हणून तायडीचं नाव मालविका Lol हे फेबूवर वाचलं.
बरं रॉकीचं नक्की काय कॅरेक्टर आहे? लग्न करण्यासाठी मागे लागलेला असतो. तायडीचं त्याच्यावर प्रेमबीम असेल असं वाटत नाही. ह्याला का ठेवलाय?
आता दादा साळवी वाचमनची नौकरी करायला रोज अंबरनाथहून येजा करणार का इथेच रहाणार लेकीसारखं?
ओम शाळकरी कॉलेजीन वयात प्रेमात पडल्यासारखा वागतोय. शिकुन सवरून, वाढलेला (वयाने) बिझनेस 'मॅन ' आहे. डोन्ट टेल मी की स्वीटु ही त्याला आवडलेली पहिलीच मुलगी आहे, हे त्याचं पहिलं प्रेम आहे

मला वाटतंय रॉकी अन मोमो चं जुळेल काही दिवसात. खानविलकरांच्या पैशावर आणि अन्नावर स्विटू, बाबा साळवी सहीत रॉकी अन मोमो देखील जगणार. तायडी अशीच थोराड होऊन जमलंच तर तिच्या स्विय सहाय्यकाशी लग्न करेल..!

ओम्याला कॉलेजमधे असताना समज आली असेल असं वाटत तर नाही.. त्यामुळे त्याचं स्विटूवर लट्टु होण स्वाभाविक वाटतं.

सस्मित, दादा साळवींना कल्याणच्या फॅक्टरीत नोकरी दिली असं ऎकलंसं वाटलं.... त्यामुळे ते खानविलकर व्हिलामध्ये राहणार नसावे.

मिळु दे एकदाची बाबा साळव्यांना नोकरी. त्यांना नाही म्हटलं तरी १५ हजार पगार मिळेलच. शिवाय त्या काकाला चपराशी म्हणुन १० हजार अन चिन्याला डिलिव्हरी बॉय म्हणुन १५ हजार पगार मिळाला की साळव्यांच्या घरी ६० हजार महिना येऊ लागतील.. नलू अन काकू दोघी मिळून ३०० चपात्या लाटून महिनाकाठी १० हजार घरखर्चाला काढू शकतात. असं झालं तर लवकरच साळव्यांचं दळीद्र फिटेल.

त्या मुलीला काही धड नाचता येइना. नलु व मालु चा संवाद छान होता मग कट की लगेच नाच. प्रेझेंटेशन एकदम फालतू.

नाही हो श्रवू, तुम्ही स्विटूचा २० हजार पगार विसरलात. मी साळवीणींच्या १० हजार वरकमाईचे सोडून इतर साळव्यांचा पगार मोजला.. २००००+१५०००+१००००+१५००० = ६०००० Bw

ते उदय साळवी - दादा साळवी (स्वीटू चे वडील ) फारच भकास आहेत त्यांच्या चेहऱ्यावर लाचारीचे इतके भाव आहेत कि ते जन्मजात तसाच चेहरा घेऊन पैदा झालेत का असे वाटते।
त्या माल विका कडे नोकरी मागताना सेम भाव मग ती नोकरी देते तेव्हा सेम भाव ती अपमान करत आहे हे एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल तरी त्याच्या चेहऱ्यावर दुःख नसून सेम लाचारीचेच हावभाव अगदीच भंकस

DJ मग चपात्यांचे १०००० कुठे गेले.. .. त्या बिचाऱ्या रोज ३०० चपात्या लाटतात .. आणि त्याना कोणीतरी लाटतंय..:G Biggrin Biggrin

याना कोणीतरी लाटतंय>> Biggrin

अहो, ते १०००० मुद्दाम पकडले नाहीत. त्याचा शुन्य शुन्य करत हिशेब लावायचा झाला तर शेकड्या पासुन लाखापर्यंत आकडे येतील.. त्यापेक्षा नकोच ते १००००... त्या साळवीणी काय ते बघुन घेतील त्याचे Proud

ते उदय साळवी - दादा साळवी (स्वीटू चे वडील )>> वसंत साळवी. ते कलर्स मराठी वर घाडगे सून मध्ये fraud काका होते(दिनकर घाडगे).

गमतीची गोष्ट अशी की तायडी आणि नलू या खऱ्या आयुष्यात जवळपास एकाच वयाच्या आहेत. या मालिकेत त्यांच्यात एका पिढीचे अंतर दाखवले आहे. शकू या त्यांच्याहून 13 वर्षांनी मोठ्या आहेत. पण शकू आणि नलू एका वर्गात होत्या आणि तायडी ही शकूची मुलगी असते.

नलू मावशीचा दळभद्रीपणा दिवसेंदिवस बहरत चालला आहे.. काल ती स्विटूला खानविलकर व्हिलातून फरफटत हंबरणाथला घरी घेऊन आली. कसाबसा ओम्या पटला होता तर त्या सर्व कष्टांवर पाणी ओतलं हिने. ही नलू मावशी असं करू लागली तर तायडीला काही कामच उरणार नाही..!!!

श्रीमंत लोकांना गरी ब लोकांचा अपमान करणे हे एकच काम आहे हा झीचा एक मोठा गैरसमज आहे. त्यात हे लोक गर्भ श्रीमंत पण नाहीत. झी मधल्या कंपन्या नेहमीच फूड प्रॉडक्ट च्याच असतात.

तायडी कसली तायडा आहे अजस्र

>> बरोबर. फिटनेस ग्रुप मालकीण या भूमिकेत अदिती सारंगधर शोभत नाही आणि वयस्कर पण वाटते. अभिज्ञा भावे योग्य वाटली असती.तिला खलनायिकेच्या भूमिका करायची सवय आहे.किंवा नाही तरी तेजश्री प्रधान अग्गबाई मध्ये रहाणार नाहीये, तिला हा रोल मिळाला पाहिजे होता. As an actor, एक challenge आणि ती उंच, बारीक आहे मुख्य म्हणजे वयाने पण योग्य आहे.

एका एपी मध्ये पोळ्या ऑर्डर कॅन्सल झाल्यावर ते साळवी पोळ्यांचा लाडू, पोळ्यांचा चिवडा, जेवणात पोळ्या भाजी आणि रात्री पोळ्यांची खीर करतात। झी च्या लेखकांना पोळ्या फारच आवडतात। याआधी तुला पाहते रे मध्ये पोळ्यांचा लाडू पूर्ण सिरियलभर पुरून उरला होता.

झी मधल्या कंपन्या नेहमीच फूड प्रॉडक्ट च्याच असतात.

Submitted by अमा on 24 February, 2021 - 00:४२

किंवा जेवणाचे डब्बे पोचवणाऱ्या

Pages