झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. - DJ>>>> tata sky na

amulgirl001>> (हो)*८ Bw

संध्याकाळच्या वेळी पत्ते खेळल्याने लक्ष्मी जाते आणि हळदी कुंकु केल्याने येते मग हिरवीनच्या घरात खायचेही लाले का??

डी जे मस्त लिहीलंय.
श्रीमंत अति श्रीमंत आणी गरीब अगदी दरिद्री. अधेमधे काय नाय.
रोज तिनशे चपात्या विकतात. एक चपाती ५ रुपये असेल तर दिवसाचे १५०० होतात. शिवाय पुपो, चिवडा लाडुच्या ओडरी. हिशेब येतो का ह्यांना. एकवेळ जेवायचं फक्त आणी स्वीटु कपडे इयरिंग्ज तर भारी घालते.
आणी स्वीटु काय स्वीटु? नावच स्वीटु? मला वाटलं लाडाचं नाव असेल. अशा कुटुंबात (कशा ते समजुन घ्या) असं नाव ठेवतात?

धन्स सस्मित Bw
---------------------------------

अहो त्या स्विटुचं पडनाव (शिरेलितलं) स्विटु आहे... खरं नाव (पाळण्यातलं) अवनी साळवी आहे (जे की आकारमान बघता सार्थ आहे..!).

शाल्व किंजवडेकर ( ओमकार खानविलकर) रियल लाईफ मध्ये अन्विता फलटणकर (स्वीटू) पेक्षा वयाने लहान आहे.
ओमकार खूपच छान आहे पण स्वीटू ला तो काल आलेला स्थळरूपी मुलगा शोभतो.

स्वीटू ला तो काल आलेला स्थळरूपी मुलगा शोभतो >> +++++१११११११११

पण क्काय करणार.. आले झीच्या मना तेथे कोणाचे काही चालेना..!!

बॉडी शेम नाही पण माझी मुलगी त्या स्वीटू ला हत्तीचं पिल्लू आणि कलर्स वरील सुंदरा (अक्षया नाईक) लतिका (सुंदरा मनामध्ये भरली) हिला बदकाचं पिल्लू म्हणते.

मस्त लिहिलय... Happy

रोज तिनशे चपात्या विकतात. एक चपाती ५ रुपये असेल तर दिवसाचे १५०० होतात. शिवाय पुपो, चिवडा लाडुच्या ओडरी. हिशेब येतो का ह्यांना >> अगदी अगदी....अशी छोटी छोटी कामं करत केटरींग चा व्यवसाय करणारी माझी एक मैत्रिण स्वतः च्या मेहेनतीमुळे आज एक यशस्वी व्यवसायिक झालेली पाहिली आहे..ते पण फक्त गेले २-३ वर्षाच्या काळात.....झी मराठी काही म्हणजे काहीच अभ्यास करत नाहीत बुवा....
थोडं खाउन पिउन सुखी कुटुंब दाखवायला काय झालेलं कोण जाणे.
असो....पण शाल्व आवडला मला. उगीच कोणी सुप्रसिद्ध थोराड नट पंचवीशीचा दाखवण्यापेक्षा हे बरं...
नावं ठेवत ठेवत मी पण बघते ही सिरीअल आजकाल...झी ५ वर पळवत पळवत ... Wink

खर्पुस भाजलेल्या!! खोबर्‍र्‍याचे उकडीचे मोदक ऐकले बहुतेक!! धन्य

नवीन Submitted by रावी >> होना आणि म्हणे तुला आवडतो म्हणून गूळ घातला होता Uhoh
अग्गबाई सासूबाई सारखा food show आहे. पुरणपोळी, मोदक, विक्रीच्या पोळ्या,(₹२ प्रमाणे Uhoh ) चकली, शेव, लाडू, marshmallow, इ. कितीतरी पदार्थ करताना, खाताना दाखवतात.
बॅकग्राउंड म्युझिक मस्त आहे पण. शाल्व किंजवडेकर handsome आहे.
स्वीटू ला तो काल आलेला स्थळरूपी मुलगा शोभतो >> अगदीच
ओमकारसाठी स्वीटूपेक्षा मोमोच योग्य वाटते.
मालविका ओमकारपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे म्हणे. तीच बिचारी बिझनेस सांभाळते म्हणून नाहीतर ओमकारला स्वीटूच्या व तिच्या घरच्यांच्या समस्या सोडवण्यातून सवडच नसते.
लेखक एक भाग लिहिला की महत्त्वाचा तपशील विसरून जात असावा. कुत्र्याचा दरमहा खर्च 3.5 - 4 लाख रुपये होता तो पुढच्या भागात 1 लाख रुपये झाला.
नलिनी(नलू साळवी)कडे असलेला शकुंतला(शकू खानविलकर)चा 20+ वर्षांपूर्वीचा नंबर अजून चालू असणे, स्टेशनचा हास्यास्पद प्रसंग, गरिबी आणि श्रीमंतीतली अतिशयोक्ती, all is totally unrealistic. Thus,this is a perfect imaginary serial. नवी आहे तोपर्यंत बरा टाईमपास आहे.

माझी मुलगी त्या स्वीटू ला हत्तीचं पिल्लू आणि कलर्स वरील सुंदरा (अक्षया नाईक) लतिका (सुंदरा मनामध्ये भरली) हिला बदकाचं पिल्लू म्हणते.
Submitted by Ajnabi >> किती गोड!

धन्स स्वाती. Bw
---------

नलुच्या डोक्यात खानविलकरांचा ओम्या का आला नसावा याचं उत्तर परवाच्या भागात समजलं अन पटलंही. आपल्या घरची लाडाची लेक दुसर्‍याच्या घरी गेली तर तिची योग्य काळजी घेतली जावी, तिला योग्य मान-सन्मान मिळावा एवढी माफक अपेक्षा ठेवणारी नलु साळवी बरी वाटली. तिचं बोलणं ऐकुन शकुलाही आपला व्हिला स्विटू साठी कसा योग्य नाही हे जाणवलं. स्विटूसारखी मुलगी सून म्हणुन घरी यावी म्हणुन आपल्या घरात (म्हणजे घरातील माणसांच्या वागण्यात) बराच बदल घडवला पाहिजे असं तिचं मत बनलं.

आज शकुने मालविकेला चांगलं समजावलं पण मालविकेला पैशांपेक्षा प्रेम-माया-संस्कार या गोष्टी कद्रू वाटल्या. मला तरी ती मालविका शकुच्या थोरल्या सवतीची मुलगी वाटते एवढं ती शकुला छळते Proud . त्या रॉक्यासोबत लग्न करून त्याच्यासोबत संसार करायचा तर कशाला अजुन खानविलकरांच्या घरी रहात आहे मालविका हे न कळे. खानविलकर गँगला दुसरा बंगला बांधुन देऊ शकत नसेल का ती..? निदान अंबरनाथला २ बि.एच.के. तरी नक्कीच घेऊन देऊ शकते अन रॉक्यासोबत व्हिलात सुखाने राहु शकते.

लोल खरपूस भाजलेल खोबरं.. असंच एकदा बायडीने मोदकासाठी गुळ खोबरं खरपूस भाजल आणि त्याची चिक्की झाली Happy ह्यात ती बाई (की बाबा?) कोण आहे? सगळ्यात मोठं ध्यान ते आहे सिरेलमध्ये. लाडलाच्या श्रीदेवीची उल्हासनगर कॉपी.

एक मोमो आणी एक (खरपुस भाजलेल्या खोबर्याचा) उकडीचा मोदक. बिचारा ओम्या : हाहा:

ती नलु सारखं सारखं काय देवापुढे साखर ठेवायला जाते. साखर बरी परवडते हिला. २००-३०० पोळ्या नलु करते आणि नवर्‍याला २०-२२ हजार पगार होता तर चाळीत राहुन एकवेळचं अन्न खाण्याची ददात कशी होती??? अन एक वेळचं अन खाण्याची ददात होती तर स्वीटु रोज नवे आणी चांगले चांगले कपडे कसे घालते? नोकरी तर तिला ओमकडे गेल्यानंतर लागली आणि मालविकाने अॅडव्हान्स पगारही दिला नाही स्वीटुला. आणि स्विटुचा बाबा काय उठसुठ ओमकडे जातो आणि सततची चक्कर काय येते त्याला, बिचारा दाखवावं पण काही लिमिट?

हा बाफ वाचून मी बघायला सुरू केली आहे. तो ओम अमेरिकन स्थळाला हाकलून देतो ते बेस्ट होते. टिपरे बाई मला एकदम फार आवड्ते. ती आणि ऐश्वर्या नारकर. मराठी सौंदर्याचा आदर्श. ती मोमो म्हणजे शनायाचाच मोल्ड आहे. झी च्या लेखकांचा मॉडर्न मुलीचा मोल्ड आहे. कमी कपडे, थोडे इंग्रजी बोलणे आणि पिझा बर्गर नूडल खायचे. जुने काहीही माहीत नाही व्गैरे.

टिपरे बाईंनी एक दिवस सून कशी हवी ते सांगितले ते फारच दोन पिढ्यां मागचे आदर्श होते. प्रेक्षकांनी माना डोलावल्या असतील.

टिपरे बाईंनी एक दिवस सून कशी हवी ते सांगितले ते फारच दोन पिढ्यां मागचे आदर्श होते. प्रेक्षकांनी माना डोलावल्या असतील.>> हो..हो..हो..हो.. Proud

सुशील त्या स्वीटु ला फसवायचा प्रयत्न करतो आणि मग एकदम हिरो के मफिक एन्ट्री घेउन ओम्या येतो तो प्रसंग फारच हास्यास्पद वाटला Happy
एकतर त्या मर्तुकड्या सुशील ने स्वीटु चा हात घरुन तिला खेचुन नेण्याचा प्रयत्न करणे हेच कॉमेडी होतं. स्वीटु ने एक हिसडा मारला असता तर पडला असता तो सुशील.... जर जाड नायिका आणि बारीक नायक अशी हटके गोष्ट दाखवायची आहे तर असे घिसेपिटे प्रसंग पण जरा वेगळे करु दाखवायचे ना ...
आणि आता ओम्या तायडी ला वचन देउन बसलाय की तिच्या आवडीच्या मुलीशीच लग्न वगैरे...म्हणजे अजुन किती गुर्‍हाळ असणार कोण जाणे.
बाकी आदिती सारंगधर ने ओम ला गुंडाळण्यासाठी केलेला अभिनय सुंदर...लहानपणीचे दाखले आणि डोळ्यात पाणी वगैरे वगैरे...चेहेरा काय भराभर बदलत होता तिचा... मस्तच...

पण वयाने मोठ्या असलेल्या तायडीच्या आधीच ओम्याचं लग्न लावायचा प्रकार काही खपत नाही. लहानपणीच्या गोष्टी ऐकुन ओम्या नॉस्टेलजिक झाला अन ताई म्हणेल त्या मुलीशी लग्न करायला तयार झाला हे अतर्क्य वाटले. ही तायडी ओम्याची नक्की सख्खी बहीण आहे की सावत्र बहीण हे कळायला मार्ग नाही. शकुंतला खानविलकरची मुलगी असं वागु शकते यावर विश्वास बसत नाही. सावत्र प्रकरण असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

जर जाड नायिका आणि बारीक नायक अशी हटके गोष्ट दाखवायची आहे तर असे घिसेपिटे प्रसंग पण जरा वेगळे करु दाखवायचे ना ... >>> अगदीच पण तेवढी कल्पकता कुठे झी वाल्यांकडे. हिरविणीचे तेच लांबलचक सरळ केस, ओढणी उडुन डोक्यावर पडणे, हिरवीणीचा पाय घसरणे किंवा मुरगळणे आणि हिरोने तिला सावरणे मग दोघे तासभर एकमेकांचे थोबाड पहात बसणे. सगळे टिपिकल.

Pages