झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढं म्हणण्यासाठी तरी श्र्वीटू तोंड उचकटते हे कमी नाही.. तिचं अन
प्रेक्षकांचं अभिनंदन...!!

नवीन नोकरी च्या ठिकाणी ही ऍग्रिमेंट करे पर्यंत दोघे समोर येऊ नयेत म्हणून स्वीटू ला बॉस च्या केबिन मध्ये बॉस नियम समजावून सांगते,सही घेते
आणि ओम इंटरव्ह्यू घेणारा पोरग्या समोर बसून काँट्रॅक्ट वाचतो.

स्वीटू ने मंगळसूत्र घालायचे की नाही ह्यावर कुणाचे काही म्हणणे नाही, जबरदस्ती नाही
मग लग्नाच्या वेळी कुठे गेलं होतं हे शहाणपण??

वाचला मोहीत >> असं कसं आसं कसं....मग काय अर्थय त्या लग्नाला. अस्संच लग्न होतं तर मग इतकं फुटेज का दिलं त्याला?

काल अनेको दिवसांनी एक प्रोमो पाहिला त्यात स्वीटु एक जळका पत्राचा तुकडा वाचाताना दाखवत होते , तिला कोणीतरी ( बहुतेक चिन्या, काका, रॉकी ) पत्र देतात की लग्नात नक्की काय झालं होतं ते.... म्हणुन आज उत्साहाने पुढचा भाग पहिला की चला आता कळलं असेल तिला खरं...तर कुठलं काय ? नेमकं महत्वाचे शब्द जळले म्हणे त्या पत्रातले आणि पहिली ओळ वाचुन स्वीटु चा गैरसमज झाला की ओम मुळे वडील जीव द्यायला गेले ई ई....
मी रागारागाने त्यांच्या ऑफिशिअल पेज कर कमेंट लिहुन आले आहे...इतकं भंगार का लिहितोय यांचा लेखक ? किती दिवस तेच तेच दळण...
मालिका बघायची सोडली तेच बरं आहे....परत अशा प्रोमो ला भुलणार नाही..
आपला बिग बॉस झिंदाबाद...बाकी काही बघण्यालायक नाहिये Wink

अरे कोण हा ढ लेखक? Angry
केड्या लिहितोय की काय हे पण? अत्यंत फालतू स्टोरी चालू आहे.

भारी ट्रॅक सुरू आहे... फास्ट लोकलला स्लो ट्रॅक वर आणुन कुठ्ल्याही स्टेशनवर थांबवत आहेत. काय तो साळव्यांचा अविर्भाव. किती किलोची खीर करायला घातली म्हणे..? त्या खिरीच्या ऑर्डरसाठी आख्खं घर १००-२०० स्क्वेअर फुटांनी मोठं करावं लागलं बिचार्‍यांना. स्विटूने विलायची कुटली. नक्की काय कुटलं हे बघितलं तर ज्वानीचा मसाला आहे की काय अशी शंका आली. त्यात त्या ओम्याने दोन्ही हात भाजून घेतले तोवर हिने चिठ्ठी जाळून ठेवली. अरे देवा... प्रेक्षकांना किती वेळा धक्के द्यायचे यालाही काही सीमा..?

मी हल्ली सोनी मराठी वरची "अजुनही बरसात आहे" अन ही "येऊ कशी तशी मी नांदायला" एकाच वेळी बघतो. दोन्हींचे ब्रेक एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे बघा असं करतो मी की ८ वाजता येऊ कशी तशी मीचं भन्नाट टायटल सॉंग बघायचं (इतके महिने झालं सुरु होऊन पण अजुनही तेवढंच आवडतं..!) ते संपलं की लगेच सोनी मराठीवर "अजूनही बरसात" लावायचं तिकडे पहिल ब्रेक लागला की इकडे झीम वर यायचं अन इथे ब्रेक लागला की तिकडे सोनी म वर पळायचं. एकाच वेळी दोन्ही बघून होतात अन साळव्यांच्या दळभद्रीपणाचा असर तिकडे माठक अन कसाईंचा रग्गेलपणा बर्‍याच प्रमाणात कमी होतो असा स्वानुभव आहे Proud

त्या स्विटूला केस बांधणं जमतच नाही का? केवढे ते पिंजारलेले केस दिवसरात्र.
आणि शेवटी एकता कपूर स्टाइलने ओमच्या हातून स्विटूची माँग भरली गेली. Uhoh

काहीही दाखवलं का हे..? देवीच्या मंदीराची पुजा ष्वीटू अन मोहितच्या हस्ते होणार असते. त्यासाठी मोहित सासुरवाडीत आलेला असतो. दीड रुमच्या घरात कसं झोपायचं म्हणुन तो सर्वांना बाहेर झोपवतो. जाता जाता ओम्याची उशी पण हिसकावतो. काहीही दाखवत होते काल. देवीच्या पुजेला बसायचा मान मिळाला पण त्यासाठी या दोघांना उपास करायला सांगितला होता. ष्वीटू उपास ठेवते पण मोहितला असह्य होऊन तो काहीतरी खाऊन येतो. मग एवढी जोडपी चाळीत असताना ओम्या अन ष्वीटूला कसं काय बरं पुजेला बसवलं..?
बाकी तायडाचा नवीन ड्रेस भारी होता.. नेहमीप्रमाणेच..!!

स्विटू एकटीच बसली पुजेला. पण ते कुंकवाचं ताट ओम आणत असताना कसा काय कुणास ठाऊक तोल जातो त्याचा आणि ते ताट कुंकवासकट मैलभर लांब बसलेल्या स्विटूच्या जवळ असंकाही पडतं की त्यातलं सगळं कुंकू तिच्या तोंडावर पडतं. पण पडताना exactly तिच्या भांगात पडायला विसरत नाही हं. Btw उद्या असणार आहे हा छळ. प्रोमोमधे दाखवलं.

हो ना... किती रडत असतो हल्ली. त्याचं अभिनय कौशल्य बघून त्याला पुढे हिरोईनची कामे मिळतील असं वाटून गेलं.

स्विटू एकटीच बसली पुजेला. पण ते कुंकवाचं ताट ओम आणत असताना कसा काय कुणास ठाऊक तोल जातो त्याचा आणि ते ताट कुंकवासकट मैलभर लांब बसलेल्या स्विटूच्या जवळ असंकाही पडतं की त्यातलं सगळं कुंकू तिच्या तोंडावर पडतं. पण पडताना exactly तिच्या भांगात पडायला विसरत नाही हं. Btw उद्या असणार आहे हा छळ. प्रोमोमधे दाखवलं.>>> वाचूनच हसं थांबेनास झालं... Rofl Rofl Rofl

भारी विनोदी सीन आहे.
ओम डाव्या दिशेने चालतोय , त्याचा पाय मुडपतो बहुतेक.
त्याने उजव्या हातात पकडलेली थाळी अक्षरशः उडून दोन फुट लांब बसलेल्या स्वीटूच्या चेहर्यावर कुंकू उडत.
थाळी कुठे आदळली त्यात मला जास्त interest आहे.

कुणी बघितलं का ते हळदी कुंकू ड्रामा..? ष्वीटूच्या भांगात कुंकू पडलं म्हणजे त्यांचं लग्न झाल्यात जमा असंच नलीला वाटलं असणार अन त्या आनंदाने तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असणार. पडत्या फळाची आज्ञा मानून नली अन शकू मोहित अन ष्वीटूचा घटस्फोट करणार. मोहीत मग ष्वीटूला २-४ करोडची पोटगी मागणार. मोहितची पोटगी फेडून ओम्यासोबत संसार थाटवण्यासाठी शकू, रॉकी भरपूर प्रयत्न करणार. नलीसहीत उरवरीत समस्त साळवी भयंकर कष्ट उपसणार. पोटगीचे पैसे भरण्यासाठी नली अन महामाठ काकू ३०० ऐवजी रोज ३००० चपात्यांच्या ऑर्डरी घेणार. माठ चिन्या अंबरणाथ ते सी.एस.टी.एम. स्थानका पर्यंत्रोज चणे-फुटाणे विकणार. महामाठ काका मिक्सर, इस्त्री सोबत टिव्ही,फ्रीज्, ट्रक, विमान दुरुस्तीची कामे घेणार. दादा साळवी पुन्हा तायडाच्या पाया पडून खानविलकर्स मधे अकाउटंटची नोकरी मागुन घेणार अन सफाईकामगाराची कामे करणार. ष्वीटू फराळाचे सामान खांद्यावर घेऊन चाळीत दारोदार भटकणार... ओम्या पण थाथुर-माथुर कामं करुन मोहितला पोटगी देणार.

हे सर्व करण्यापेक्षा मोहितला सवत्या म्हणुन खानवीलकर व्हिल्यात ठेऊन त्याच्या खानपानाची जबाबदारी का घेऊ शकत नाहीत हे ओम्या-ष्वीटू..?

DJ फारच बाई मोठ्या अपेक्षा तुमच्या. Lol
नली मोहितच्या उपकाराखाली दबलेय. स्विटूची आणि एकूणच साळव्यांची लाज राखली म्हणे त्याने मांडवात. दादांना भलं मोठं लेक्चर दिलान 'मोहितराव-एक देवमाणूस' या विषयावर तिने. पोरीचा "सुखात" चाल्लेला संसार बघतेय ना ती.

मागचा इतिहास बघता झालेली चुक लवकरच कळेल नलीला (भले गाढवही गेलं अन ब्रम्हचर्यही गेलं तरी चूक कळाली हे महत्त्वाचं..!!). पुन्हा एकदा तिचं नाक गळू लागेल... ओठ लळू लागेल.. डोळे वाहू लागतील. पिंजारलेल्या टारल्यातला मेंदू लवकर ठिकाणावर येइल असं वाटतंय. बघु.. काय होतं ते. आपल्या हातात आहेच काय म्हणा..! आपल्या हातात असतं तर एकेका दळभद्री साळव्याचं इकडचं गालफाड तिकडे केलं असतं..!! :रागः

आजच्या भागात नक्की काय झालं..? रॉकी अन श्वीटू ठाणे-वंदना एस.टी. स्टँडवर का धावपळ करत होते..? ओम्या एका साधारण श्रेणीच्या मुंबई-बेंगलोर एस.टी. मधे जाऊन का बसला होता..? तेही सूट-बुट घालून...?? असं सुटा-बुटात कोणी एस.टी. मधे बसतं का..?? बरं पैसेच वाचवायचे होते तर मुम्बई-बेंगलोर एस.टी.चं तिकिट स्वस्त वाटलं का निर्मात्याला..?? निदान १५०० रुपये तरी नक्कीच असेल. त्यापेक्षा रेल्वेने स्लिपर कोच ने गेला असता तरी ५००-६०० मधे बेंगलोरला पोचला असता. सेकंड क्लास चेअर कारने गेला असता तर दोक्यावरून पाणी २५० रुपयांपेक्षा जास्त खर्च आला नसता त्याला.

एस.टी. स्टँड वरची रॉकी अन श्वीटूची धाववळ बघणं असहनिय झालं होतं. एवढ्या मोठ्या स्टँडवर इन मीन दोनच बस उभ्या होत्या. त्यातली एक एशियाड. ओम्या बेंगलोरला जाणार होता तर आख्ख्या स्टँडवरचे सर्व प्लॅटफॉर्म धुंडाळत अन तिथं वाट बघणार्‍या प्रवाशांना ओम्याचे फोटो दाखवत नक्की काय साध्य करत होते ते दोघे..? थेट बेंगलोरला जाणार्‍या प्लॅटफॉर्मवर जायचं ना.. तो माहित नसेल तर कंट्रोलरला विचारायचं. तेवढीही बुद्धी नसेल तर आख्ख्या स्टँडवर उभा असणार्‍या २ बसेस मधे चढुन बघायचं ना... दळभद्री साळव्यांच्या खानदानातली आहे म्हणुन ष्वीटूचं एकवेळ पटवून घेता येईल पण रॉक्या..?? तोही तसाच...???? हे असले सुना-जावई मिळाल्यावर कसं व्हायचं खानवीलकरांचं काय माहीत..!!!!!

तिकडे साळव्यांच्या घरात मोहित श्वीटूचं तुटलेलं मंगळसुत्र हातात घेऊन सोन्याची अंडी देणारी कोंबडी पळून गेली असं मनाशीच काहीतरी पुटप्टत होता अन दादा साळवी, केसं पिंजारलेली नली ग्यानमुड्यासारखे मोहितकडे एकदा अन एकमेकांकडे एकदा असे बघत होते. नक्की काय झालं कुणास ठाऊक.

उद्याच्या भागात ओम्या एस.टी.च्या खाली उतरला आहे अन स्टँड मधे उभा असलेल्या एस.यु,व्हीच्या पुढे उभा राहुन श्वीटूच्या हातात हात देऊन निरुपा रायला लाजवेल अशी टिपं गाळत असलेला दिसला तर तिकडे शकू अन नली एकमेकींना भेटून श्वीटू अन ओम्या एकत्र येऊ दे रे देवाचा गजर करताना दिसल्या.

Biggrin
सात्विक संताप DJ. मुंबई ते बँगलोर ३०० रुपये तिकिट ऐकून गलबललंच. एवढं स्वस्त आहे सगळं आणि लोक उगाच महागाई-महागाई ओरडत असतात. ज्या स्पीडने हे मुंबई-अंबरनाथ फिरतात, ओम फारफार तर ४ तासात पोहोचला असता बँगलोरला. असो. उतरला ना, बास. ३०० रुपडे फुकट गेले.
रडताना एकूण एक पात्र भयानक दिसतात, प्रचंड भीतीदायक.
आता सगळं नॉर्मल झाल्यावर म्हंजे तायडाचं डोक ठिकाणावर आल्यावर, तिने सगळं खरंखरं बरळल्यावर, मोहितचा पत्ता कट केल्यावर, ओम-स्विटूचं लग्न झाल्यावर तरी संपणार ना हा टॉर्चर?

अहो मी चिन्मयी, मी एस.टी. चं तिकिट ३०० नाही १५०० रुपये म्हणलो (कदाचित जास्तही असावं..!) ते ३०० रुपये भारतीय रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या अनारक्षित कुर्सीयान साठी तसेच द्वितीय श्रेणीच्या आरक्षित शयनयान साठी फार फार तर ५००-६०० रुपये लागले असते असं म्हणलो.

आपल्या एस.टी. सारखी महागडी एस.टी. उभ्या भारतात सापडणार नाही. तरिही ती चांगलीच आहे हे मान्य करावंच लागेल.

ओमचा मेकओव्हर होणार, तो बॅड बॉय होणार आणि मालिका लीप घेणार अशी बातमी वाचली. मालिका वाईटच राहणार याची खात्री आहे.

ओमने ३०० रुपयेच दिले तिकिटाचे. म्हणून म्हटलं मी तसं.>> ३००₹ मध्ये एस. टी.ने मुंबई ते बेंगलोर..? हाप तिकीट पण ८००₹ च्या वर असेल... ओम्याला ३००₹ मध्ये बेंगलोर..??

मुंबई ते बंगलोर एस टी जाते? ऐतेन. थोडा भाग बघितला या प्रसंगाचा. स्वीटू डोळे पुसत होती की नाक साफ करत होती तेच कळत नव्हतं. सगळे भयाण दिसतात जसा काहीच मेकअप नाही केलाय. मोहित खाली बसून मंसू मधले मणी गोळा करत होता.

मुंबई ते बंगलोर एस टी जाते? >> हो जाते. आपली पण जाते अन त्यांची पण येते. सर्वसाधारण बस फेरीमधे मुंबई ते बेंगलोर अशा डायरेक्ट शिटा मिळण्याची जरी सुतराम शक्यता नसली तरी त्या रुटवरच्या १५०-२०० किमी वरच्या शहरांना या फेरीमुळे जरा फास्ट सर्व्हिस मिळते असा माझा तरी अनुभव आहे.

काल ओझरते बघितलं. ओम्या मवाली झालाय. टाळकं पण सटकलेल दिसलं. शकू त्या स्क्रिझोफोनिक ओम्याला शहाणपणा शिकवताना दिसली. काय चाललंय म्हणे नक्की..??

Pages