लिमिटेड ममता!
पाळणाघर म्हणा, अथवा डेकेअर अथवा कोणतंही नाव द्या- आपण कामाला जाताना मुलाला अन्य कोणाकडे सोपवणं हे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या कोणत्याही आईसाठी एक अवघड काम! त्या पाळणाघराची बाई आपल्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष देईल ना, त्याला नीट खायला-प्यायला देईल ना, त्याला झोपवेल ना, त्याला बरं नसलं तर औषध-पाणी करेल ना? हजार प्रश्न! माझ्यावरही माझ्या आठ महिन्यांच्या मुलाला पाळणाघरात ठेवायची वेळ आली, तेव्हा माझीही अवस्था फार बिकट झाली होती. एक तर आम्ही राहतो, त्या भागात हे एकच पाळणाघर. त्यामुळे इथे आपलं, किंवा आपल्या मुलाचं पटलं नाही तर??? हा यक्षप्रश्न! बिचकत बिचकतच मी त्या पाळणाघरात चौकशी करण्यासाठी गेले.
’पाळणाघर’ म्हटल्यावर आपल्या घरी आलेल्या बायकांची मनस्थिती कशी असते, हे ’काकूंना’ माहिती असणारच ना! थोडंसं हसून स्वागत केलं तर आलेल्या बाईला धीरच येईल, हे काय वेगळं सांगायला हवं? पण बाईंचा चेहरा कोरा! "मी गेली वीस वर्ष पाळणाघर चालवत आहे. सगळीच मुलं थोडा त्रास देतात, नंतर रुळतात. ठेवा तुम्ही मुलाला. त्याचं खाणंपिणं, कपडे, सगळं पाठवा सोबत. दोन दिवस रडेल, मग राहील. अगदीच आक्रस्ताळा असेल, तर सांगेन तुम्हाला. पण जरा रडला, तर मऊ पडू नका.." बाई रोखठोक!
मला तसाही पर्याय नव्हताच. निमूटपणे सर्व सूचना मनात साठवून घेत लेक दुसर्या दिवसापासून काकूंकडे जायला लागला. या बाबतीत तो अगदीच गुणी. त्याला माणसांची आवडच. त्यामुळे जरी लहान असला, तरी त्याला तिथे सरावायला काहीच वेळ लागला नाही- या गोष्टीचं मला, आमच्या घरातल्यांना इतकं कौतुक! पण काकू निर्विकार! "रहातात हो मुलं, सांगितलं होतं मी तुम्हाला.." इतकंच म्हणून त्यांनी विषयावर पडदा पाडला. यथावकाश, लेक मोठा व्हायला लागला, शीशूशाळा, प्लेग्रूप इत्यादींबरोबर पाळणाघर अर्थातच चालू होतं. त्याला कळायला लागलं, तसं तिकडचं एकएक सांगू लागला.. तिथल्या मुलांबद्दल, त्यांचे खेळ, भांडाभांडी, खाऊबद्दल वगैरे. काकूंकडे मुलं चिकारच होती. त्यातली काही अगदी तान्ही होती- अगदी तीन महिन्यापासूनची. त्यातल काही मुलं कधीमधी काकूंच्या कडेवर, मांडीवर दिसत. एरवी त्या मुलांपासून लांबच असायच्या.. मुलांना बघायला दोन ’ताया’ होत्या. त्याच मुलांचं बघायच्या, काकू सूपरव्हिजन करायच्या. फार क्वचित कोणत्याही मुलाचं कौतुक केलं असेल त्यांनी. माझा लेक त्या पंगतीत असावा असं मला वाटायचं, कारण तो खरंच काहीच त्रास देत नसे. पण, तो इतका भाग्यवान नव्हता, हेच खरं!
पाळणाघर चालू केलं, त्या अर्थी मुलांची थोडी तरी आवड हवी असा माझा तरी समज होता. मुलांना सांभाळणं, त्यांचं सगळं व्यवस्थित करणं हे निव्वळ व्यावसायिक होऊ शकत नाही. या ’व्यवसायात’ human touch असावाच लागतो- अशी माझी मतं काकूंचं वागणं बघता चुटकीसरशी बदलली. एकूण मुलगा तिथे रहात होता. प्रेम, ममता जरी तिथे नव्हती, तरी दुर्लक्षही नव्हतं. मुलांवर लक्षं असायचं त्यांचं, पण त्यांनी कधी ते फारसं अंगाला लावूनही घेतलं नाही, एक प्रकारचा कोरडेपणा म्हणा, की अलिप्तपणाच अनुभवला त्यांच्या वागण्यातून. मुलांमध्ये बसावं, त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांना खेळ वगैरे शिकवावे, किंवा नुसतं त्यांच्या विश्वात रममाण तरी व्हावं वगैरे त्यांना पटण्यासारखं नव्हतं. मुलं नुसतीच त्यांचे आई-वडील येईस्तोवर पाळणाघरात असायची- ना आनंदी, ना दु:खी, नुसतीच वाट पहाणारी. पाळणाघर बदलावं असा विचार अनेक वेळा मनात आला. पण सर्वांना सोयीचं पडेल असं पाळणाघर जवळ नव्हतं आणि लांबून का होईना, पण मुलावर लक्ष रहातंय म्हणून तो तिथेच जात राहिला.
आणि एक दिवस सोडायला गेल्यावर काकूंच्या काकांनी सांगितलं, की काकूंची तब्येत बरी नाहीये, त्यांचं पोटाचं ऑपरेशन करावं लागणार आहे, तर उद्यापासून पाळणाघर बंद राहील! त्यांच्या तब्येतीची चिंता वाटलीच, पण व्यक्तीगत स्वार्थापायी ’मुलाचं काय करायचं?’ ही मोठी चिंता मानेवर बसली. दुसरं घरापासून बरंच लांब असलेलं पाळणाघराबद्दल ऐकून होते. ’लांब’ म्हणून त्याचा विचार कधी केला नव्हता. पण आता इलाज नव्हता, म्हणून जाऊन आले तिकडे. मुद्दाम लेकाला सोबत घेऊन गेले होते. त्याला ती जागा आवडली, कारण तिथे sand pit, doll's house होतं, आणि मला ते चालवणार्या मावशी आवडल्या कारण त्या छान बोलल्या. दुसर्या दिवसापासून मुलाचं ते रूटीन सुरू झालं! तो तिथेही लगेचच रुळला. उन्हाळी सुट्टी असल्याने खूप मुलंही होती, दोन ओळखीचीही निघाली, त्यामुळे गडी खुशही झाला!
काही दिवसांनंतर असं वाटलं की काकूंच्या तब्येतीची चौकशी करावी. त्यांचं ऑपरेशन होऊन साधारण एक महिना झाला होता. थोडी तब्येत सुधारली असेल, हिंडत्या-फिरत्या झाल्या असतील या अंदाजाने मी आणि लेक गेलो विचारपूस करायला एका संध्याकाळी. दार काकूंनीच उघडलं. दार उघडल्याबरोब्बर पुन्हा चेहरा गूढ! मी मुलाच्या निमित्ताने आज पाच वर्ष जातेय त्यांच्याकडे.. पण आजवर मला त्यांच्या चेहर्याकडे बघून, त्यांना मुलं आणि त्यांच्या आया आलेल्या आवडतात/ चालतात की नाही याचा पत्ता लागलेला नाही!!
मी गेल्यागेल्याच तब्येतीची चौकशी केल्यानंतर त्यांना थोडं हायसं वाटलं! मग स्वत:बद्दल बोलू लागल्या.. ऑपरेशन, नंतरची काळजी, औषधं, पथ्य सगळंच.. मग म्हणाल्या, ’आता पाळणाघर बंदच ठेवणार आहे. मुलांना बघायचं म्हणजे फार त्रास होतो.. फार लक्ष द्याव लागतं. आता मुलं (त्यांना दोन मुलगे) म्हणत आहेत, इतकी वर्ष दुसर्यांच्या मुलांना पाहिलंस, आता जरा स्वत:च्या मुलांकडे बघ!’ ही हिन्ट मी घेतली आणि ’तब्येतीची काळजी घ्या’ असं सांगून त्यांचा निरोप घेतला!
बाहेर पडले तेव्हा माझं डोकं गरगरत होतं. चहापाण्याची मी त्यांच्याकडून अपेक्षा करतच नव्हते, पण जी काही दहा मिनिटं आम्ही त्यांच्याकडे होतो तेव्हा त्यांनी साधी चौकशी, की ’अचानक पाळणाघर बंद करावं लागलं, तुमच्या मुलाची काय सोय केली आहेत आता तुम्ही?’ केली नाही! माझा मुलगा निदान मोठा तरी आहे, पण जी वर्षा-दोन वर्षांची मुलं होती, त्यांना दुसर्या जागी रुळायला किती वेळ लागला असेल? त्यांची कसलीच जबाबदारी नव्हती हेही मान्य, पण किमान उपचार म्हणून एक साधी चौकशीही नाही? आणि सर्वात चाट मी अजून एका गोष्टीने पडले.. माझा मुलगा माझ्या बरोबर होता, तोच तर आमच्यामधला मूळ दुवा होता.. नाहीतर कशाला माझा आणि त्यांचा संबंध येणार होता? पण माझ्या मुलाची एका शब्दाने चौकशीही केली नाही!! रोज जात होता तो त्यांच्याकडे, पण त्याच्याकडे ढुंकून पाहिलंही नाही त्यांनी! प्रेम, माया नाही पण साधा शिष्टाचारही नाही? इतकं मश्गूल असावं एखाद्याने आपल्याचमध्ये? इथे येताजाता ओळखीच्या मुलाशीही आपण एखाददुसरा शब्द बोलतो, त्याच्या गालाला हात लावतो, काहीतरी gesture दाखवतो.. इथे माझा मुलगा जवळजवळ त्यांच्या डोळ्यादेखत मोठा झाला होता.. त्याच्याशी ’सुट्टीचा काय करतोस आता? शाळा कधी सुरू?’ असे निरर्थकच, म्हटले तर, पण आवश्यक असे प्रश्नही नाहीत?? त्यांचा आणि माझ्या मुलाचा आता संबंध संपला, पाळणाघर आता बंद झालं म्हणून इतकं टोक? जी काही बांधिलकी होती, ती केवळ पाळणाघराच्या वेळात आणि पैशापुरतीच होती? इतकी लिमिटेड?
प्रचंड अस्वस्थ झाले मी तिथून बाहेर पडले तेव्हा. माणसांचे अजब नमूने नेहेमीच अनुभवायला मिळतात आपल्याला, पण एक पाळणाघर चालवणारी बाई असं वागू शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं! शेवटी, मला गरज असताना त्यांनी माझ्या मुलाला त्यांच्याकडे ठेवून घेतलं, दिलेल्या पैशाचा मोबदला व्यवस्थित चुकवला असंच म्हणायचं. पैशाने त्यांचं लक्ष माझ्या मुलासाठी मी विकत घेतलं होतं हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं! त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करून मी तो विषय कायमचा संपवून टाकला!
मला वाटतं
मला वाटतं की एकदा लेख 'publish' केला, कुठेही की त्यावर चर्चा होणारच .. तो कितीही वैयक्तिक (की व्यक्तिगत) अनुभव असला तरी ..
बरी/वाईट
बरी/वाईट कशी का होईना पण माझ्या लिखाणावर मतं द्या - अशा प्रकारचे जोगवे जे लोक मागतात, त्यांनी मतभेद व्यक्त केल्यावर त्याला 'बायस्ड' म्हणून लेबल करावं हा मोठाच विनोद आहे. >>>
स्वाती प्रश्न मतभेदाचा नाहीये मतभेद कुठल्याप्रकारे मांडले आहेत त्यावर आहे...
बोल्ड केलेया वाक्यावरून तर नक्कीच हल्ला हा मांडणार्याच्या मतावर नसून मांडणार्यावर आहे असे वाटायला जागा आहे... बरे वाईट कशी का होईना लिखाणावर मते द्या म्हटले म्हणून काहीही आरोप ऐकुन पन घ्यावेत असे होत नाही..
एकंदरीतच तुझ्या पोस्ट वर सुद्धा जे उपासने लिहिले आहे तेच लागू पडते हेच खरे.. तुझ्या जागी दुसर्या कुणी तेच पोस्ट टाकले असते तर मनाला लावून घेतले नसते एवढे... मला वाटतेय मला काय म्हणायचे आहे हे तुला समजले असेल आता जेव्हा मी मैत्रीण म्हणून तीचे म्हणणे समजून घ्यावेस असे मटले होते ...
मनु, सशल तुमचे बरोबर आहे कोणीही लिहू शकते इथे.. पण रंगिबेरंगी ला ब्लॉग सारखेच treat करण्यात यावे असे माझे वैयक्तिक मत आहे.. पण जोपर्यंत Admin अशी सोय करून देत नाहीत की नको असलेले प्रतिसाद उडवता येतील रंगिबेरंगी वरून तोपर्यंत इथे कोणीही मत प्रदर्शन करू शकते
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
पूनम, तुझी
पूनम, तुझी कळकळ पोचली. मुलांना बाहेर ठेवून कामावर जाणार्या कोणत्याही आईला असं न वाटलं तरच नवल.
त्यातल्या त्यात जमेची बाजू हीच की तुझा मुलगा आनंदी जरी नसला त्या काकूंकडे तरी दु:खीही नव्हता. बेसिक काळजी त्यांनी कोर्या चेहर्याने का होईना घेतली.
मैत्रेयी, नी उपासचं म्हणणं ही पटलं.
स्वाती, १.
स्वाती,
१. एक शक्यता - यात 'मुलाची अगदी आबाळ होत आहे' असे वाटले नसेल म्हणून ठेवले असेल. पण आबाळ होत नसली तरी सर्वच मिळते असेही नाही. >>>"मुलं नुसतीच त्यांचे आई-वडील येईस्तोवर पाळणाघरात असायची- ना आनंदी, ना दु:खी, नुसतीच वाट पहाणारी"<<< हे तिने म्हटलेच आहे.
मिल्या, स्वातीला बहुतेक असे म्हणायचे होते की "पाळणाघर सुरू केल्यापासून ते आजारी पडेपर्यंत असा काळ तिथे बाळाला ठेवले..." असो.
२. >>> आपण ५ वर्षांच्या आतल्या १० मुलांबरोबर दिवसभर असं काही वर्षं राहिलो तर आपले चेहरे किती दिवस आणि किती प्रफुल्लित राहतील? <<<
तुम्ही हौसेने करत असाल तर नये राहू. पण व्यवसाय म्हणून करणार असाल तर व्यावसायिकता म्हणून ते आवश्यक नाही का ? दुकानात दररोज तासन् तास त्याच त्याच साड्या उपसत राहणे व त्याच त्याच प्रकारच्या गिर्हाईकांना तोंड देणे, असे वर्षानुवर्षे करणार्या दुकानदाराकडून आपण हसतमुख वगैरे असण्याची अपेक्षा करतो, तोही व्यावसायिकतेचाच भाग असतो. इथे आईलोक गिर्हाईक नव्हेत काय ? आता दुकानदार जर हसतमुख नसेल तरीसुद्धा लोक जातात, कारण दुसरा तेवढा चांगला पर्याय उपलब्ध नसतो. पण म्हणून व्यावसायिकतेची अपेक्षा चूक नसते. ("मिठाईवाले फार माजोर्डे हो !" हे मिठाईच्या रांगेतच ऐकायला मिळते.)
३. हे प्राधान्यक्रम अथपासून इतिपर्यंत प्रत्येकाने ठरवावेत. काहीजणांना स्वच्छता, सुरक्षितता वगैरेंबरोबर ममता, जिव्हाळा याबाबतही तडजोड चालणार नाही. काहींना चालेल.
४. परत क्र(२)चा मुद्दा येतो. पालक लोकांनी बालसंगोपन हे व्यवसाय म्हणून केले तर ही तक्रार त्यांना करता येईल का ? मुळात त्यांना तशी तक्रार करण्याचा अधिकार राहील का ? अशा तक्रारी करत राहिले तर 'गिर्हाईके' टिकतील का ? व्यवसाय कसा होईल ?
५. हट्ट नसावा हे पटले, पण अपेक्षा तर असतेच ना
ती नैसर्गिक आहे.
फारेंडाने उत्तम मुद्दा मांडला आहे. त्या ताया व्यवस्थित लक्ष देत होत्या का ?
मुळात आपण पाळणाघरातून काय विकत घेत आहोत ? फक्त प्राथमिक लक्ष्य की त्याहीपलिकडे आणखी काही ? पाळणाघरे एक व्यवसाय म्हणून पाहिली तर 'बालसंगोपन' हे व्यासायिक उद्दिष्ट असेल का ? मला वाटते, प्रमुख उद्दिष्ट हे की बाळ सुरक्षित राहते, स्वच्छ राहते, खाणेपिणे व्यवस्थित होते हे. याउप्पर बाळाच्या वाढीस पोषक असे काही करणे हे बालसंगोपन होईल, जे पालकांनी करायचे आहे आणि जे करायला पाळणाघरे मुळातच बांधील नाहीत
त्यामुळे काही ठिकाणी ममत्व मिळेल, काही ठिकाणी नाही. गिर्हाईकांचे प्राधान्यक्रम वेगळे असतील तर तशी सेवा देणारे दुकान शोधावे लागेल 
डे-केअर मोठा मस्त शब्द आहे, ते काळजीवाहू आहेत आणि 'जैसे थे' परिस्थिती चालू ठेवतील. ते डे-रिअरिंग/डे-ब्रिंगिंगअप सेंटर नाही
***
Finagle's First Law : If an experiment works, something has gone wrong.
प्रत्येक
प्रत्येक व्यावसायिकाकडून काही अपेक्षा असतात तसेच प्रत्येक व्यावसायिकाला काही गुणांची गरज असते. जसं शाळेतल्या शिक्षकाने मुलांना वर्गात येऊन नुसते धडे वाचून दाखवले की शिकवलं असं नसतं तर त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी असते आणि ते सुध्दा नुसतं हुशार मुलांना समजलं म्हणजे चांगलं शिकवल असं नसतं. अशा वेळी जर पालकांची शिक्षकाबद्दलची अपेक्षा असली की त्याने आपल्या पाल्याला समजाऊन सांगावं तर ती चुकीची नाही. तुमच्या मुलाला समजत नाही तर तुम्ही दुसर्या शाळेत जा किंवा शिकवणी ठेवा हे उत्तर होऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे पाळणाघरातले चालक जेंव्हा मुलाला ठेवतात तेंव्हा त्या मुलांना घराप्रमाणे अगदी घरासारखच जरी नाही तरी वातावरण मिळेल ह्याची जबाबदारी घेतात आणि घेत नसली तर ते पाळणाघर चालवण्यास लायक नाहीत. आईवडिलांनी अशी अपेक्षा ठेवणं सार्थ आहे. चालक मुलांना ठेवतात ते काही आईवडिलांवर उपकार करत नाहीत. मुलांना प्रेमाने वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे पूनमच्या अपेक्षा सार्थ आहेत. त्या बाईंनी व्यवसाय २० वर्षं कसा काय केला हे आश्चर्यच आहे. ज्याप्रमाणे काही शिक्षक शिक्षण क्षेत्रात कसे टिकतात ( काही जण तर अक्षरश: पाट्या टाकतात) हे कळत नाही.
आर्च,
आर्च, भारतातली बरीचशी पाळणाघरं (घरगुती) ही उपजीविकेचं साधन म्हणून, संसाराला हातभार म्हणून चालवली जातात. त्यातल्या किती बायकांना मुलांशी जमवून घेण्याची, त्यांच्यात रमायची आवड असते कोण जाणे. इथल्या सारख्या प्रोफेशनल डे केअरसारख्या बायका किंवा शिक्षक लायसन्स्ड नसतात किंवा त्या क्षेत्रातला अनुभव त्यांना असतोच असंही नाही.
(मला स्वतःला भारतातल्या घरगुती पाळणाघरांचा अनुभव अजिबात नाही. समजण्यात काही चुकलं असल्यास दुरुस्त करा.)
आर्च,
आर्च, शिक्षकी पेशाची व्याख्याच ही की शिक्षण देण्याचा पेशा. त्यामुळे जर शिक्षण देण्यातच हयगय केली तर 'दुसर्या शाळेत न्या' हे उत्तर होऊच शकत नाही. हे मान्य. (तरी तो 'समस्येवरचा आपल्यापुरता उपाय' नक्कीच होऊ शकतो).
पाळणाघर या पेशाची व्याख्या काय ? मुलांना घरच्यांच्या अनुपस्थितीत प्रेमाने घरच्यासारखे वाढवणे की मुलांना घरच्यांच्या अनुपस्थितीत सांभाळणे ?
***
Finagle's First Law : If an experiment works, something has gone wrong.
पर्याय
पर्याय दुसरा. मुलांना घरच्यांच्या अनुपस्थितीत सांभाळणं.
मुलांना घरच्यांच्या पर्यायाने आई-वडिलांच्या अनुपस्थितीत घरच्यासारखं वाढवण्याचं काम आजी आजोबाच करु शकतील.
भारतात
भारतात माझ्या माहितीप्रमाणे घरगुती डे केअर सुरु करण्यासाठी कोणतेच नॉर्म, कोणताच निकष नसतो, कुणीही ते सुरु करू शकते. कुणाचेही नियंत्रण नाही, पात्रता लागत नाही , मग काय! हे वर सर्वांनी लिहिलेले प्रॉब्लेम्स नसतील तर च नवल
अर्थात ही पालकांची जबाबदारी आहे की मुलासाठी योग्य ते डे केअर निवडणे. आपले प्रेफरन्सेस आपण ठरवायचे हे आहेच . पण मुलाला तिथे आवडते का, सुरक्षित वाटते का, तिथे ठेवण्यात मुलाच्या हित आहे का याला पहिला प्रेफरन्स. त्यापुढे आपली दुसरी कोणती सोय / गैरसोय महत्वाची नाही. असे माझे मत.
एक नवीन
एक नवीन धागा सुरु केलाय- त्याची प्रेरणा हे पान आणि सर्व उद्बोधक चर्चा.
पूनम तुझी परवानगी असल्यास मी तेच पोस्ट इथे, किंवा याची लिंक तिथे टाकू इच्छिते.
पैश्याने
पैश्याने त्यांचं लक्ष माझ्या मुलासाठी मी विकत घेतलं >> पूनम हे पटल.. माझी ताई पण यातुनच गेलीये त्यामुळे भा.पो
"आई" या
"आई" या प्रत्यक्ष भुमिकेतून चान्गले लिहीलय!
तरीही
लिखाणातील आशयाबद्दल बोलायचे तर,
मला श्रीयुत झक्की अन स्वाती आम्बोळे यान्चे मत पटले
काही प्रमाणात मनुस्विनी यान्चे देखिल!
आपल्या अपत्याचे कोडकौतुक व्हावे असे कोणत्या आईबापान्ना वाटणार नाही? मी देखिल यास अपवाद नाही. तसेच अगदी लहान मुलास देखिल त्याची "दखल" घेतली जावी असे वाटतच अस्ते!
तरीही
वरील लेखात वर्णन केलेल्या त्या बाईन्च्या "बाह्यवर्तणूकीवरून" (खास करुन, ऑपरेशननन्तरच्या भेटीचा प्रसन्ग), मला तरी असा अन्दाज लावता येत नाहीये की अन्तर्यामी "त्या बाई, मुलतःच कोरड्या, जिव्हाळारहीत असतील".
तसेच, मुलान्चे "सन्गोपन नव्हे", तर "साम्भाळ" करताना, त्या त्या मुलान्बरोबर किती "अॅटॅचमेण्ट" तयार होऊ द्यायची, या बद्दलची प्रत्येकाची मते (मुलान्चे आईबाप, ते पाळणाघरवाली बाई ते मुलान्चे इतर नातेवाईक) वेगवेगळी असू शकतात. अगदी स्वत:च्या अपत्यान्च्या बाबतीतहि, सन्गोपन व साम्भाळ करताना जितक्या व्यक्ती तितके वेगवेगळे निकष लावले जातात.
अर्थात, आपल्या अपत्याबाबत काही एक विशिष्ट निकष प्रत्येकजण लावतोच लावतो, त्या असतात "अपेक्षा"
अन त्या पुर्या झाल्या नाहीत, तर होते ते "अपेक्षाभन्गाचे" दु:ख!
वरील लेखात ते दु:ख नीटसपणे मान्डले आहे असे वाटते!
आता, या अशा वा त्या तशा अपेक्षा ठेवाव्यात की ठेऊच नयेत यावर बरीच वादचर्चा झडू शकते!
माझ्या मते तरी वरील लेखात दृगोच्चर झालेल्या "अपेक्षा" जशा चूकीच्या नाहीत (कदाचित कुणाला त्या अवास्तव वाटू शकतीलही), तसेच "त्या बाईन्चे" वागणेही कोरडे व केवळ व्यावहारीक नसून, "त्रयस्थ वा तटस्थ" असे असू शकते! किन्वा, तो त्यान्च्या "व्यक्तिमत्वाचा" एक पैलु असू शकतो जो बोचरा भासतोय.
किन्वा असेही असेल कदाचित, त्या बाईन्नी केलेल्या लहानग्याचा "अनुल्लेख" जिव्हारी बोचला असेल तर ते साहजिकच म्हणावे लागेल.
(मी अनुभव वा अनुभूती शिवाय काहीच बोलत नाही
माझ्याकडेच १९९२ व पुढील काही वर्षे पाळणाघर होते, लिम्बीने कसलासा "बालवाडीचा" कोर्सही लग्नानन्तर लगेच केला होता.
मुम्बईतील माझ्या काकुकडे तर कायमच कोण ना कोण साम्भाळायला असायचे! ही काकू जेवढी प्रेमळ, तेवढीच शिस्तीची देखिल! पण तिच्याकडे साम्भाळायला असलेल्या दोन लहान मुली मला आजही आठवतात, लालू अन गाथा! पुढे जेव्हा त्यान्ची लग्ने ठरली, तेव्हाही त्या आवर्जून काकुस निमन्त्रण द्यायला आल्या होत्या!
असो)
ही रन्गिबेरन्गीवरील तशि "खासगी" जागा असल्याने, माझी पोस्ट आवरती घेतो!
]
[अन माझ्या माहितीनुसार, आलेले प्रतिसाद डिलीट करण्याची सुविधा जरी नसली, तरी "नावडते" प्रतिसाद, योग्य कारण देऊन, मॉड्स किन्वा अॅडमिनद्वारे डिलीट करवुन घेता येतात
तेव्हा ही पोस्ट ठेवायची की डिलीट मारुन घ्यायची ते ज्याच त्याने ठरवावे! मी काय सान्गणार बापडा????
सर्व चर्चा
सर्व चर्चा वाचली.
'पाळणाघर' हा विषय अत्यंत संवेदनशील आहे खराच. यात काही मुद्दे मला ठळक जाणवले-
१) 'तुला तुझं मूल प्रिय असेल, त्याचं कौतुक असेल, तसंच बाकीचे लोक करतील ही अपेक्षा जरा अवास्तव नाही का?' - मान्य. त्यांनी अगदी माझ्या मुलाचं गुणगान करावं अशी माझी अपेक्षा कधीही नव्हती. तसं त्या अगदी दोन-तीन मुलांचच कौतुक करायच्या हेही मी वर लिहिलंय आणि माझा मुलगा त्यात नव्हता ही केवळ माझी एक खंत होती. बस, इतकंच.
मुळात मला 'लोक कोरडे असतात' हे पचायला अवघड जातं. मुलांना मोठं करणं, म्हणजे सोपी गोष्ट नाही. सतत त्यांचे असे उद्योग चालू असतात, की पालकही वैतागतात. पण सर्वच मुलांमध्ये एक inborn innocence असतो. आणि त्या एका निरागसतेपुढे भलेभले शरण येतात! काकू जेव्हा वीस वर्ष मुलं सांभाळत आहेत, तेव्हा त्यांना कशाचच कौतुक वाटेनासं झालं असेल, हेही मान्य, पण म्हणून एक बेसिक औपचारिकता, एक हास्य, दोन साधे प्रश्नही महाग असतात का? उलट इतकी मुलं पाहिल्यानंतर कोणात कोणते गुण आहेत, हे एका झटक्यात समजत असेल त्यांना, मग हेच त्या मुलांना दोन गोड शब्दात सांगितलं, पालकांना कळवलं तर काय बिघडलं असतं?
आणि 'पाळणाघर' चालवणारी बाई, जिच्या आगेमागे सतत निरागसपणा, खोडकरपणा, खेळकरपणा आहे, तिच्याकडून आपल्या पाल्याबद्दल ऐकण्यासाठी पालकांनी आसूसलं तर ही इतकी अवास्तव अपेक्षा आहे? परदेशातल्या ट्रेन्ड बायका कृत्रिम हास्य चेहर्यावर आणत का होईना, तुमच्या मुलांना 'बाय' म्हणतात, तेव्हा तुम्हाला नाही बरं वाटत? फार छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यांनी बराच फरक पडतो.
२) इतक्या आवडत नव्हत्या, तर बदललं का नाही पाळणाघर?- बरेच मुद्दे आणि काही अपरिहार्य कारणंही. बेसिक गोष्टी- लक्ष, खाणं, झोप, स्वच्छता पाळली जात होती. यापैकी एकातही हयगय झाल्याचं लक्षात आलं असतं, तर बदललच असतं. अपेक्षा होती थोड्याश्याच ओलाव्याची. पण तीही अतीच होती वाटतं!
३) त्यांना इतकं बरं नव्हतं तर ठेवलं कशाला? - विश्वास ठेवा, याबद्दल त्यांनी कोणत्याच पालकांशी संवाद साधला नाही कधी. त्यांना बरं नाहीये हे माहितच नव्हतं, कारण त्या रोजच दिसत होत्या. त्यांच्या मोठ्या आतड्यामध्ये ब्लॉक होते, ज्याचं निदानच होत नव्हतं. शेवटी दुर्बिणीतून बघायचं असं ठरलं तेव्हाच त्यांनी पालकांना तडकाफडकी सूचना दिली. ताया मात्र चांगल्या होत्या. त्या मुलांचं बर्यापैकी नीट बघायच्या.
४) त्यांना त्यांच्या वागण्याचं कारण का नाही विचारलं?- काय विचारणार? काकू, तुम्ही जरा मनमोकळेपणानी बोलत का नाही? तुम्ही जरश्या हसत का नाही? तुमचा चेहरा नेहेमी निर्विकार का असतो? - इतकं सोपं आहे? शेवटी 'स्वभाव'! आणि पुन्हा तेच- मुलाला काही त्रास नाही ना होत आहे- हे प्राधान्य.
मला बोचलं काय होतं, ते नंतर मुलाकडे ढुंकूनही न पहाणं. किती स्वाभाविक असतं लहान मुलांशी बोलणं! पण 'आता माझा मुलांशी संबंध संपला' असं म्हटलं की सगळं संपवता येतं? मोठ्या माणसांशी जिथे असं करता येत नाही, तिथे लहान मुलांशी असं करता येतं हे पाहूनच मी स्तंभित झाले होते. गोड बोलायला, साधी विचारपूस करायला ना पैसा लागतो, ना वेळ. वृत्ती हवी, इतकंच. पण ही वृत्ती इतकी दुर्मिळ आहे, हेही आताआताच समजतंय!
असो.
सर्वात शेवटी एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे-
मला याबद्दल आज सकाळी तो उठल्यावर त्याने सांगितले.
बर्याच जणांनी विचारले की वर प्रतिक्रिया 'तू' का लिहिली नाहीस, मिलिंद(मिल्या)ने का लिहिली?- हे सर्व झाले, तेव्हा भारतात रात्रीचे १२ वाजून गेले होते. मी झोपले होते. मिलिंद काम करत होता ऑफिसचे, त्याने हा लेखही आधी वाचला नव्हता. तो त्याने वाचला, त्याच वेळी प्रतिक्रिया वाचल्या आणि त्याने त्याला वाटली ती प्रतिक्रिया दिली.
मी आणि त्याने मिळून उत्त्तरं ड्राफ्ट केली, मग त्याने त्याच्या आयडीमार्फत ती पोस्ट केली इत्यादी काही शंका असल्यास, त्या मनातून काढाव्यात. मी आणि तो संगनमत करून वगैरे लिहित नसतो मायबोलीवर
चर्चा घडावी, त्यातून अनेकांना अनेक मुद्द्यांवर विचार करायला वेळ मिळतो. त्याला कधीच आक्षेप नाही.
असो.
मात्र स्वाती, 'अहो-जाहो' असा त्रयस्थ उल्लेख करून पोस्ट लिहिलेस याचे वाईट वाटले. तसंच, पोस्ट जरासं पर्सनल होऊ शकलं असतं का? आपण ओळखतो एकमेकांना, म्हणून अपेक्षा असते एक. 'जोगवा' though was most unfortunate
पूनम,
पूनम, तुझ्या भावना अगदी योग्य शब्दातं मांडल्या आहेस. तुझी कळकळ वाचकांपर्यंत पोचतेय. मानवी स्वभाव अनाकलनीय असतो हेच खरं...
तुझ्या ह्या लेखाचा उद्देश केवळ 'मला आलेला एक अनुभव' असा होता आणि तो निश्चितच व्यक्त झालेला आहे. तुला कुठल्याही प्रकारची टीका करायची नव्हती किंवा असा अनुभव मला 'का' आला अशी कारणमिमांसाही करायची नव्हती हेही व्यवस्थित स्पष्ट होतंय. तरीही ह्या लेखावर आलेल्या तश्या प्रकारच्या प्रतिक्रिया वाचून वाईट वाटलं.
असो, रैनाने ह्या विषयावर साधकबाधक चर्चा घडवण्यासाठी वेगळं पान उघडलेलं आहेच. तिथे इतक्या चांगल्या विषयावर चर्चा योग्य शब्दात व्हावी ही अपेक्षा.
पूनम, तुला
पूनम, तुला झालेला त्रास दुर्दैवी आहेच पण केवळ त्या बाईंचीही काही बाजू असेल असं वाटलं इतकंच.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
काही
काही माण्से खरच कोरडी अस्तात. मी एका घरी दत्तक मुल्गी म्हनून वाडले. त्या घरातील एक काकू मला काहिही किमत द्यय्चा नाहीत. पूर्ने कोरा चेहरा, माझे उल्टॅ आहे. लहान मुले छोटॅ कुत्री सर्वना प्रेमाने हसून बोल्नार. त्याला पन लोक घाबर्तात.
psg तुम्हाला
psg
तुम्हाला आई म्हणून वाटनारी कळकळ समजली. माझ्या ओळखीतील एक आजी पाळणाघर चालवतात, अगदी त्यांची आठवण व्हावी इतकं तुमच्या अनुभवातील आजी आणि त्या आजीं मधे साम्य आहे. त्या अश्या निर्लिप्त का वागतात हा त्यांनीच दिलेला खुलासा मी तुम्हाला सांगत आहे.
त्या मुलांना त्यांचा किव्हा त्यांना मुलांचा जास्त लळा लागु नये हे मुद्दाम करतात कारण त्यांना असे अनुभव आलेत की मग सुट्टीच्या दिवशी मुलं घरी आई जवळ रहात नाहीत. आजी जवळच जाण्याचा हट्ट करतात आणि आयांचे मन खूप दुखावतात. मुलांचा एकदा लळा लागला आणि मुलं पाळणाघर सोडून गेलीत की आजींना खूप खिन्न व्हायचं आणि मुलं ही दुसरी कडे रमायचे नाहित. अगदी स्वताच्या आजी जवळ सुद्धा नाही. म्हणून मग त्या खूप जाणून बुजून त्रयस्थ पणे (पण नीट नेटकेपणाने, काळजी पुर्वक पण व्यवसायिक दृष्टीनेच) अता मुलांना संभाळतात.
कदाचित तुमच्या मुलाच्या "आजी" ही असाच विचार करत असतील.
========================
बस एवढंच!!
पूनम, तू
पूनम, तू व्यक्त केलेली कळकळ व्यवस्थित पोचतीये आणि एक आई म्हणुन तर मी पुर्ण सहमत आहे तुझ्याशी.
मी जेव्हा माझ्या मुलाला डेकेअर मध्ये सोडते तेव्हा त्याची टीचर जेव्हा प्रेमाने त्याला आत घेते , जवळ घेते, आज तू कसा आहेस असं विचारते तेव्हा तिच्या ताब्यात सोडून जाताना मी निर्धास्त होते. तेच जर ती टीचर कोरडेपणाने वागली असती तर नक्कीच माझ्यातली आई शांत मनाने ८ तास ऑफीसात कामच करू शकणार नाही. त्यामुळे तू म्हणतीयेस ती अपेक्षा अजिबात अवास्तव नाही.
शेवटी ही प्रत्येकाची वृत्ती. वाईट नक्कीच वाटतं असे अनुभव आले की.
जाता जाता, एक चांगला अनुभव पण सांगावसा वाटतोय. माझ्या इथे एक बाई घरगुती डेकेअर चालवतात. त्या एकदा सांगत होत्या कित्येकदा छोटी बाळं पहिलं पाऊल माझ्यासमोर टाकतात. पहिल्यांदा माझ्यासमोर धरुन धरुन उभं राहतात पण मी त्यांच्या आयांना कधी सांगत नाही की आज तुमचं बाळ धरून उभं राहिलं का तर त्यांच्या आयांना वाईट वाटु नये. त्याच आया २-३ दिवसांनी अगदी उत्साहानी सांगत असतात. त्यांच्या तोंडुन ते ऐकताना जास्त आनंद वाटतो.
पुनम! तुझि
पुनम! तुझि कळकळ पोहोचली..
एकेश्री,
एकेश्री, तुम्ही मला अभिप्रेत असलेला "अॅट्याचमेण्टचा" मुद्दा चान्गला मान्डला आहे
नीधप म्हणते तसे, त्या बाईन्ची व्यवसाय चालवितानाची "आपल्या अपेक्षान्वेगळी" भुमिका असू शकते!
खरं तर
खरं तर 'असंच' व्हायला हवं, किंवा 'तसंच' व्हायला हवं- असे नियम याबाबतीत तरी लागू करता येणार नाहीत, व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरे.
बर्याच वेळा होतं काय, की अतिशय छोट्या गोष्टी-घटनेतून आपण समोरच्याबद्दल चटकन मत बनवून टाकतो. मग त्या व्यक्तिचे सरळ बोलणे-चालणे-वागणे आपल्याला खुपते. फारसे लपवून वागायची सवय नसेल, तर कपाळावर आठ्याच पडतात चक्क. आपण बनवलेलं मत चुकीचं होतं, हे कधी नंतर कळते; तर कधी कधी शेवटपर्यंत कळतच नाही. हे रोज होते. घरात, मित्रांत, नोकरीत, व्यवसायात आणि सर्वत्र.
हे पूनमच्या बाबतीत घडणे शक्य आहे, आणि तितकेच त्या बाईंच्या बाबतीतही. (त्या बाईंची काही बाजू असेल- असे काही म्हणतात- ती कदाचित याही बाजूने असेल!)
पण तरीही-
१) पैसे कमविण्यासाठी, नाईलाज म्हणून, व्यवसाय म्हणून एखादी गोष्ट करायला घेतली, तर व्यावसायिक दृष्टीकोन बाळगणे आवश्यकच. बर्याच होष्टी व्यवसायात निव्वळ 'नाईलाज' म्हणून करव्या लागतात. आणि 'मुले सांभाळणे' हा व्यवसाय करायला घेतलेल्या बाईंकडून किमान स्मिताची अपेक्षा आहेच आहे. (अगदी टोकाची शक्यता, म्हणजे त्या बाईंना एखादी आई आवडत नसावी (आता हे त्या बाईंचेच पर्सेप्शन शेवटी), तरी देखील आपल्याला थोडेफार पैसे कमवून देणारे हे गिर्हाईक आहे- हे समजून घेऊन किमान स्मिताची, कमीत कमी माफक स्वागताची तर अपेक्षा आहेच आहे. याचा ते मुल कसे आहे किंवा त्याची आई आपल्याला आवडते की नाही- याच्याशी काहीही संबंध नाही. बाईंची कहीही बाजू असली, तरी व्यवसाय या दृष्टीने तिला इथे जागा नाही.
२) छंद म्हणून एखादी गोष्ट करायला घेतली, तर त्यात आपले जरा जास्तच समर्पण असते नाही? त्या बाई छंद म्हणून हे करत असल्या, तर मुलाला, त्याच्या आईला बघितल्यावर किमान स्मित किंवा तोंडभर स्वागताची अपेक्षा पुन्हा एकदा अधोरेखित होते. मुलाचे किंवा आईचे काही चुकत असेल, तर त्यांनी अशा वेळी आईला विश्वासात घेऊन सरे काही सांगायला हवे. (हे सारे काही पूनम किंवा तिच्या लेकाबद्दलच नाही; तर अतिशय जानरली.) इतरांपेक्षा जरा वेगळे / जास्त हुशार / जास्त भावनशील / जास्त एकल्कोंड्या मुलांबद्दल तर बाईंनी जरा जास्तच जागरूक राहणे स्वाभाविक आहे. कारण शेवटी छंद / आवड म्हणूनच हे चालू केले आहे.
थोडक्यात, वरील दोन्हींपैकी काहीही असले, तरी बाईंचे कोरडे वागणे चुकीचे आणि खटकणारे. त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. लहान मुले- हा तर नाजूकच विषय. व्यवसाय म्हणून करायला घेतला, तरी त्यात थोडी तरी मानसिक गुंतवणूक होणारच. त्या पार्श्वभूमीवर बाईंचे वागणे बरोबर वाटले नाही. अगदी त्याची बाजू - अगदी तब्ब्येतीपासून घरातल्या आर्थिक प्रश्नांपर्यंत आणि पूनमबद्दलच्या / लेकाबद्दलच्या मतापासून ते पैशाची गरज नसल्याने व्ययसाय बंद करण्याच्या निर्णयापर्यंत - अशी काहीही असली तरी!!
--
कसा चंद्र! कसं वय! कशी तुझी चांदणसय..!
कसा निघेल इथून पाय! वेड लागेल, नाहीतर काय!
सर्वांचे
सर्वांचे धन्यवाद.
स्वभावाला औषध नाही हेच खरं! शक्यतो कोणाला या बाबतीत तरी वाईट अनुभव येऊ नयेत. टचवूड!
प्रेम, माया, ममता या गोष्टी मागून मिळत नाहीत, नशीब एकेकाचं. असो.
या निमित्ताने रैनाने एक चांगली चर्चा सुरू केली आहे- http://www.maayboli.com/node/7805 इथे. हेही पहा.
----------------------------------------------------
No matter how you feel, get up, dress up and show up.
ही चर्चा
ही चर्चा वाचलीच नव्हती की..
लहान मुलांनाकडे ढुंकुनही न पहाणारे माणुसघाणे असतात.. त्यांना कसली आलीये बाजू? अकश्री , साजिरा अन अशा अर्थाच्या पोस्ट पटल्या. पण व्यवसाय असला पा.घर त्यांचा तर एक व्यावसायीक हसू अन औपचारिक चौकशी करायलाच पाहिजे त्यांनी. ही अपेक्षा अवाजवी नाही वाटत मला. साधं आपण बसमधून जाताना समोरचं एखादं ६ म. बाळ गोड हसतं पाहून तेव्हा आपण नकळत प्रतिसाद हसून देतोच की त्याला ! लहान मुलांचा लळा लागू नये व आईवडिलांना घरी गेल्यावर त्रास देऊ नये म्हणून फार लाड करू नयेत्(ते तर शक्यच नाहीये म्हणा) पण ह्या नाजुक वयात अस अलिप्त ... जराही बरं नाही वाटलं...
स्वातीचं
स्वातीचं म्हणणं पटलं नाही. पूनमने फक्त अनुभव शेअर केला त्यात त्याला दुसरी बाजू असेल हे कळण्याइतकी परीपक्वता तीलाही आहे तशीच इतर अनेकांनाही आहे. प्रांजळ मत असलं तरी अजून चांगल्या शब्दात नक्कीच मांडता आलं असतं मिल्या अथवा पूनमला न दुखवता.
मला सुद्धा मिल्या आणि पूनमचं म्हणणं पटलं. आपल्या मुलाला या बाई फारशा प्रेमळ नसतानाही त्यांनी ठेवलं त्यामागे त्यांचाही नाईलाज असणार त्याशिवाय त्यांनी असं केलं नसतंच.
पूनमच्या लेखनाचा इतका विपर्यास का गेला हे खरंच कळलं नाही. चित्रविचित्र अनुभवामधे अजून एक जमा.
"जोगवे" मागितले तरी द्यायलाच हवेत असं बंधन नाहीये.
...
...
अनुमोदन.
अनुमोदन. अन मला वाटते की स्वातीला काहीसे असेच म्हणायचे असावे.
मला पण
मला पण नाही पटले लेखातले विचार. आपण कोणीतरी उच्च आहोत अशा भावनेतून केलेली टिप्प्णी वाटली.
पण मी इथे फारशी लिहित नाही, मग प्रतिकूल प्रतिसाद द्यायची भीती वाटते. कारण स्वातीसारख्या सिनिअर व्यक्तीवर लगेच लेखिकेच्या ग्रूपने जोरात वैयक्तिक हल्ला केला. म्हणे दुसरीच खसखस काढली, विचित्र स्वभावाचा अनुभव अन काय काय... आणि मी जुनी असले तरी लिहिणारी नाही, माझा ग्रुप नाही मग आमच्यासारख्यांची तर धडगतच नाही.
स्वातीचे जोगवाचे पण म्हणणे पटले. पूनम जरा काहि लिहिले कि सर्व वहात्या बाफवर जाउन 'मी लिहिले आहे प्रतिक्रिया द्या लवकर' सांगत असते, त्याच वहात्या बाफवर प्रतिक्रिया दिली की छान आहे ग वगैरे तर म्हणते, आता हेच तिकडे पण जाऊन लिहा म्हणजे टीआरपी वाढेल. पण प्रतिकूल लिहिल तर असा मिळून हल्ला. म्हणजे ज्यांचा इथे चांगला ग्रूप जमला असेल त्यांना प्रतिकूल प्रतिक्रिया द्यायचीच नाही का ?
म्हणजे छान छान प्रतिक्रिया दिली तरच समजून घेतल, काय म्हणायच होत ते समजल, तरच मैत्रिण असण्यास पात्र अस आहे का ?
माफ करा खूप लिहिले. मायबोलीवर आता मराठी लिहिणे खूप सोपे झाले आहे म्हणून लिहावेसे तर वाटते, मत मांडवेसे वाटते पण या वातावरणामुळे भीती वाटते.
सर्वांनी
सर्वांनी इतके लिहिले आहे तरी मला जाणवलेला एक मुद्दा लिहावासा वाटतो . कित्येकांना तो पटणार सुद्धा नाही तरीही ....
परदेशात राहायला लागल्यावर आपली मानसिकता बदलते . सर्वच कामे स्वत हून करावी लागत असल्याने किंबहूना आपण करु शकतो असा विश्वास निर्माण झाला की कुटुंब सोडून बाहेरच्या कोणत्याच लोकांवर मानसिकरीत्या अवलंबून राहणे बरेच कमी होते . मग अशा एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या भारतात राहणार्या मित्र मैत्रिणी , नातेवाईक ह्यांच्या पेक्षा फार वेगळा असतो . अॅटलिस्ट माझा स्वत चा असा अनुभव आहे .
मला वाटते , वैयक्तिक मत प्रदर्शन हे विचार स्वातंत्र्य म्हणून स्वीकारावे . एखाद्या घटनेचा एक त्रयस्थ म्हणून विचार दोन्ही बाजूंनी करुन बघावा . त्याला पर्सनल पातळीवर घेऊ नये .
हे माझे प्रांजळ मत आहे .
Pages