पावसा आहेस सोंगाड्या किती

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 January, 2021 - 01:28

आवळत सुटलास तू नाड्या किती
चकवतो आहेस वाटाड्या किती

बाप भाऊ मित्र मुलगा अन पती
लढवतो आहेस आघाड्या किती

मी जुन्या गावात येउन थांबले
बदलल्या आहेत ह्या वाड्या किती

सोंग कुठल्याही ऋतूचे काढतो
पावसा आहेस सोंगाड्या किती

मोडतो आहेस घरटे बांधले
हिकमतीने जमवल्या काड्या किती

प्रेम मिळते प्रेम केल्याने म्हणे !
सांगणारा संत थापाड्या किती

पोचवत नाहीस कोठेही मला
वल्हवत आहेस नावाड्या किती

सांग ओलांडायचा रस्ता कसा ?
चालल्या भरधाव ह्या गाड्या किती !

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला शेर नाही कळाला.

बाकी सगळे शेर आवडले.
आघाड्या, नावाड्या, संत हे विशेष आवडले. Happy