आपण एक डोनट

Submitted by Barcelona on 28 December, 2020 - 21:52
डोनट

आपण एक डोनट
(उर्फ ओळख मायक्रोबायोटाची)

कधी तुम्हाला कुणी प्रेमाने "बरेली की बर्फी" म्हणाले असेल, तर कधी कुणी रागात “आरं बत्ताशा” अशी हेटाळणी ही केली असेल, किंवा कुणी तुम्हाला कधीच कुठल्याच गोड पदार्थाची उपमा दिली नसेल. मंडळी, हिरमुसले होऊ नका, कुणी उपमा देवो न देवो, जीवशास्त्रज्ञांना विचाराल तर आपण सगळे डोनट सारखे आहोत असे उत्तर येईल. मान पाठीकडे झुकवा की लक्षात येईल आमुखगुदांत पचनसंस्था साधारण मध्यभागी आणि आजूबाजूला आपले शरीराचे इतर अवयव अशी माणसाची रचना आहे. आता पेशीबंधनामुळे (sphincters) मुळे ह्या मधल्या पोकळीचे विविध भागात विभाजन होते जसे लहान आतडे, मोठे आतडे इ. पण एकूणात माणूस म्हणजे जणू मध्यभागी पोकळी असलेला डोनट आहे.

एकटा माणूस ही खऱ्या अर्थाने एकटा कधी नसतो कारण ह्या पचनसंस्थेच्या पोकळीत अनेक सूक्ष्मजीव - बॅक्टरीया, फंगस, अर्केया इ - सुखाने नांदतात. कशासाठी? माणसाला काही फायदा होतो का? ह्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने 2007 साली ह्यूमन मायक्रोबायोम प्रॉजेक्ट सुरु केला. त्यामुळे सूक्ष्मजीवांचे विशेषतः जीवाणूंची (बॅक्टरीया) अनेक महत्त्वाची कार्य किंवा फायदे लक्षात आले. जवळ जवळ 10 वर्ष चाललेल्या प्रॉजेक्ट साठी सुमारे 170 मिलियन डॉलर खर्च झाला आणि उपयोगी मायक्रोब्जचा डेटाबेस निर्माण झाला. अजूनही शास्त्रज्ञ ह्यावर काम करत आहेत पण काही ठळक गोष्टी प्रकाशित झाल्या आहेत.

ह्या प्रॉजेक्टमध्ये नाक-कान-घसा, मूत्रमार्ग, त्वचा, योनिमार्ग इ अन्य भागातील जीवाणूंचे ही फायदे अभ्यासले गेले. इथे मात्र आपण फक्त पचनमार्गातील जीवाणू बघू.

संशोधनानुसार मानवी पचनसंस्थेत सुमारे 3.0 × 10000000000000 (13 शून्ये!!) इतके सूक्षमजीव असावेत. एकत्रितपणे त्यांचा उल्लेख मायक्रोबायोटा असा केला जातो. त्यांचेच वजन जवळजवळ दोन ते चार पौंड भरेल. ह्यामध्ये साठ प्रकारच्या प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत. सामान्यपणे प्रौढ व्यक्तींमध्ये सूक्ष्मजीवांचे वैविध्य आढळते तर तान्ही बाळे व मुले यांच्यामध्ये कमी वैविध्य आढळते. बाळांना हे सूक्ष्मजीव आईकडून गर्भावस्थेत व जन्म होताना मिळतात. त्यामुळे ज्या बाळांचा जन्म सिझेरियनने झाला व ज्या बाळांचा जन्म योनिमार्गाद्वारे झाला त्यांच्या पोटातील सूक्ष्मजीवात फरक आढळतो. विशेषतः सिझेरियनने जन्म झालेल्या बाळात Lactobacillus, Bifidobacterium, and Bacteroides सारख्या प्रजाती आढळत नाहीत. हा फरक एक महिन्यापर्यंत टिकतो. त्यामुळे सिझेरियनने जन्मलेल्या बाळांना काही विशिष्ट विषाणूंच्या इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. (अर्थात डॉक्टर/नर्स योग्य ती स्वच्छतेची काळजी नवमातांना शिकवतात त्यामुळे हा धोका कमी होतो).

पुढे बाळांना दूध कोणते दिले जाते - स्तन्य किंवा फॉर्म्युला - ह्यानुसार मायक्रोबायोम बदलतो. स्तनपानावर वाढणाऱ्या बाळात bifidobacteria आणि Lactobacillus अधिक आढळतात तर फॉर्म्युलावर वाढणाऱ्या मुलांमध्ये हे जीवाणू कमी असतात. याचे दूरगामी परिणाम जसे एलर्जी, बाळदमा होऊ शकतात का ह्यावर संशोधन चालू आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार स्तनपानामुळे एलर्जीची शक्यता कमी होते असे दिसून येते. वरचे अन्न सुरू झाल्यावर दोन वर्षाच्या मुला-मुलीचा मायक्रोबायोटा प्रौढ व्यक्ती सारखा भासू लागतो.

आपण जे जेवतो किंवा जसे वागतो त्यानुसार प्रौढ व्यक्तीत ही मायक्रोबायोटा बदलतो. उदा: दात दोन वेळा घासतो की नाही किंवा आठवड्यातून लोणचे कितीवेळा खातो अशा अनेक दैनंदिन निर्णयांमुळे एकाच घरातील दोन व्यक्तींचा मायक्रोबायोटा सारखा असू किंवा नसू शकतो. हे सूक्ष्मजीव आपल्यावर जसे अवलंबून असतात तसेच आपण ही त्यांच्यावर अवलंबून असतो. उदा: ब जीवनसत्व आहारातून काही प्रमाणात मिळते पण याशिवाय मोठ्या आतड्यातील जीवाणू ब जीवनसत्त्व तयार करतात आणि आतड्यात स्रवतात. हे जीवनसत्व शोषले जाते व आपण वापरतो. तिच गोष्ट ड व क जीवनसत्वाला लागू होते. ऊन आहार इ मार्फत ही जीवनसत्त्वे शरीरात आली तरी त्यांचे वितरण, साठवण ह्या मध्ये जीवाणू मोलाचे कार्य करतात.

अगदी सरधोपट विधाने करायची असतील तर सूक्ष्मजीवांचे वैविध्य जितके जास्त तितके ते आरोग्याकडे नेणारे. हे वैविध्य टिकवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात (उदा: जनुके. hsa miRNA-515-5P असल्यास विशिष्ट प्रकारचे जीवाणू Fusobacterium अधिक वाढतात). आपल्या ताब्यातील दोन घटकांकडे शास्त्रज्ञांनी विशेष लक्ष दिले आहे - काय जेवतो व कसं जेवतो. उदा: आहारात पूर्ण धान्ये व फायबर असणे हे वैविध्यासाठी फायद्याचे आहे. या उलट मैदा किंवा साखरेचे पदार्थ यामुळे कमी वैविध्य आढळते. वैविध्य नसण्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात जसे वजन वाढणे किंवा मधुमेह होणे. तसेच मधुमेह इ आजार झाले असता पुन्हा जीववैविध्य स्थापन करण्यासाठी उपचार केले जातात. हे वैविध्य टिकवण्याच्या अट्टाहासापायी हल्ली प्रोबायोटीक्स, प्रीबायोटिक्स इ पदार्थांची चलती आहे. मात्र अमेरिकेत आता यू.एस.फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनीस्ट्रेशन (USFDA) ह्या संस्थेने प्री/प्रोबायोटीक्सचे औषधांसारखे नियमन करावे अशी मागणी वाढत आहे.

आपण कसं जेवतो ह्यावरही जैववैविध्य अवलंबून असते. शांतपणे जेवल्यास व्हेगस नर्व्ह मार्फत सर्व पेशींना योग्य ते संदेश मिळतात, पचन व्यवस्थित होते व योग्य वेळी स्रवणाऱ्या स्रावांमुळे जैववैविध्य टिकून राहते. हा दुमार्गी रस्ता आहे म्हणजे आपण जसं त्यांच रक्षण करतो तसेच तेही आपल्या मनाला लाभदायक आहेत. स्मरणशक्ती, एकाग्रता इ गोष्टी मायक्रोबायोमवर अंशतः अवलंबून असाव्यात. उदा: अल्झायमर्स सारख्या आजारात Ruminococcus and Butyricicoccus ह्या जीवाणूंचे प्रमाण कमी झालेले आढळते. उंदीरावरती केलेल्या प्रोबायोटिक्स प्रयोगात नैराश्याची व आतुरतेची (depression and anxiety) लक्षणे कमी झालेली आढळले आहे व याला कारण जिवाणूची आतड्यातील उपस्थिती आहे. माणसांवरती अशा पद्धतीचे प्रयोग होणे गरजेचे आहे. थोडक्यात, उपमा म्हणून डोनट सारखे असलो तरी आपण किती गोड हे आपल्या शरीरावरच नाही तर मधल्या पोकळीवर म्हणजे मायक्रोबायोमवरही अवलंबून आहे.

खरंतर मायक्रोबायोम या विषयाचा आवाका फार मोठा आहे - लेखमाला होईल इतका. मात्र विस्तार भयास्तव इथे फक्त काही सहज किंवा ढोबळ मुद्दे लिहीले आहेत. इथले कुठलेही विधान वैद्यकिय सल्ला नाही. वाचून आहारात काय बदल करता येईल अशी उत्सुकता निर्माण झाल्यास आपल्या डॉक्टर किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे योग्य. मंडळी, हे नवीन वर्ष तुम्हाला व तुमच्या मायक्रोबायोमला सुखाचं आणि भरभराटीचे ठरू दे हीच सदिच्छा!

संदर्भ -
https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK154091/
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6313131/
https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK154093/
https://www.frontiersin.org/articles/10.3389/fped.2019.00047/full#:~:tex...(22%2C%2064).
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6855943/
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6699480/#:~:text=There%20ar...)%20
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5980218/
https://pixabay.com/photos/donuts-pastries-kringel-cake-candy-4633039/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहितीपूर्ण लेख.
डोनटच्या फोटोसाठी 5 मार्क अधिक. पण खरंच या उदाहरणामुळे विषय समजायला मदत झाली.

मी अगदी घरी दही लावते आणि रोजच्या जेवणात असतंच. पण थंडीत , स्नो पडत असताना दही खाववत नाही. अशा वेळी काय करावं?

@अस्मिता, autism असलेल्या व्यक्तीत बॅक्टेरिया प्रमाण वेगळे असते हे बरोबर आहे. त्यामुळे बरेच डॉक्टर autism असलेल्या व्यक्तीस प्रोबायोटीक्स सुचवतात. पण त्याचा आणि लसीकरणाचा कार्यकारणभाव सिद्ध झालेला नाही. प्रवाद आहे, शास्त्र नाही Happy . शास्त्रानुसार सिद्ध होत नाही तोवर लसीकरण चालू ठेवण्यास हरकत नाही. @रमड, धन्यवाद Happy .
@सनव - दही आवडत नसेल किंवा शक्य नसेल तर इतर पूर्ण धान्यावर आंबवलेले पदार्थ जसे इडली-डोसा, ढोकळा, ताकातील उकड, किंवा मुरलेले लोणचे/किमची/सावरक्राऊट इ पदार्थांचा उपयोग होतो. ब्रेड आंबवलेला असला तरी त्याबद्दल संशोधन संमिश्र आहे.

योगर्ट पेक्षा दही आणि दह्यापेक्षा केफिर चान्गले असा प्रवाद आहे.
केफिर बद्दल कोणास काही माहिती, अनुभव, वापरले आहे का?

Pages