इतरांवर विश्वास असावा पण अति विश्वास नसावा. आणि एकदा एखाद्याचा वाईट अनुभव आला तरीही पुन्हा पूर्वीसारखाच संपूर्ण विश्वास त्या व्यक्तीवर ठेवतांना स्वतःला हजार वेळा प्रश्न विचारला पाहिजे.
दुधाने जीभ पोळली की ताकही फुंकून प्यायला हवे अशी म्हण आहे पण इथे तर दुधाने जीभ पोळल्यावर परत दूध पीतांनाच जर सावध नाही राहिले (फुंकर मारली नाही) तर पुन्हा जीभ पोळेल. नुसती पोळेल नाही तर जळेल.
समोरची व्यक्ती आपल्यासारखीच साधी भोळी आहे, आता ती बदलली आहे असे स्वतः साध्या भोळ्या असलेल्या व्यक्तीला वाटत राहाते आणि तसेच गृहीत धरून समोरची व्यक्ती पुन्हा पूर्वीसारखे आता करणार नाही असे वाटून आपण पुन्हा समोरच्यावर पूर्वीसारखाच विश्वास ठेवतो. पण नेमका समोरचा त्याचाच वापर करून आपला पुन्हा घात करतो. किंबहुना समोरच्याला आपला साधा स्वभाव माहिती असतो त्यामुळेच तो असा डाव साधू शकतो.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे युधिष्ठिर किंवा पांडव. लहानपणी शकुनीच्या मदतीने दुर्योधनाने भीमाला खिरीतून विष देऊन आणि पाण्यात ढकलून मारण्याचा प्रयत्न केला हे नंतर माहीत पडूनही कौरवांनी बनवलेल्या लाक्षागृहात राहण्याचे आमंत्रण स्वीकारून पांडव फसले आणि पांडवांना कुंतीसहित मारण्याचा प्रयत्न झाला. त्यातूनही ते वाचले.
तरीही युधिष्ठिराने पुन्हा एकदा समोरच्यातील चांगुलपणावर अतिविश्वास ठेवला आणि दुर्योधनाचे द्यूताचे आमंत्रण स्वीकारलेच आणि पर्यायाने स्वतःचा आणि पांडवांचा घात करवून घेतला.
नंतरही कौरवाना दिलेल्या शब्दाला जागून निमूटपणे वनवास भोगत असतांना जेव्हा पांडवांचा अज्ञातवास सुरू व्हायला एक दिवस बाकी होता तेव्हा दुर्योधनाच्या सांगण्यावरून जयद्रथने द्रौपदीचे अपहरण केलेच. तिथेही पांडवांनी जयद्रथला न मारता त्याला फक्त डोक्यावर टक्कल करून पाच शेंड्या ठेऊन सोडून दिले आणि तोच जयद्रथ अभिमन्यूच्या मृत्यूला कारण बनला. (चक्रव्यूह तोडणे फक्त अभिमन्यूला माहिती होते म्हणून तो चक्रव्यूहात शिरला आणि मागोमाग अर्जुन वगळता इतर पांडव पण चक्रव्यूहात शिरत होते पण जयद्रथने त्यांना चक्रव्यूहाच्या प्रवेशद्वारालाच रोखून धरले आणि अभिमन्यूच्या मदतीला जाऊ दिले नव्हते आणि कौरवांकडील महारथींनी एकट्या अभिमन्यूला घेरून घात केला. कौरवांनी "अर्जुन मुद्दाम इतर ठिकाणी लढण्यात व्यस्त राहील" अशी आधी व्यवस्था केली आणि मग अर्जुनाच्या पश्चात चक्रव्यूहाचा घाट घातला नाहीतर अर्जुन चक्रव्यूहाच्या ठिकाणी उपस्थित असता तर अभिमन्यू वाचला असता, असो!)
तेव्हा तर कलियुगपण सुरू झाले नव्हते आणि प्रत्यक्ष कृष्ण भगवंतसुद्धा पांडवांच्या बाजूने होते तरीही कौरव पांडवांना फसवण्यात यशस्वी झाले आणि आज तर कलियुग सुरू आहे.
केवळ विश्वासच ठेवला म्हणून नव्हे तर द्यूत खेळतांना शकुनीच्या शब्दांच्या जाळ्यात पण युधिष्ठिर अडकला आणि एकेक संपत्ती आणि स्वतःच्या नात्यातील जिवंत व्यक्ती डावात पणाला लावून तो द्यूतात हरवून बसला.
स्वतः आपण शब्दांचे पक्के असलो, दिलेले वचन निभावणारे असलो तरी युधिष्ठिराने हे लक्षात घेतले नाही की शब्दांचे पक्के असणे आणि वचन निभावणे या गोष्टींना तेव्हाच अर्थ रहातो जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या लेखी पण शब्दांना तेवढेच महत्व आहे.
युद्धाच्या नियमांच्या बाबतीत पण तसेच! पांडवच फक्त सुरुवातीला नियम पाळत राहिले आणि कौरव मोडत राहिले. अशा एकतर्फी नियमांना काय अर्थ उरतो?
कौरवच काय, स्वतः भगवंत श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांना फसवण्यासाठी युधिष्ठिराचा खरे बोलण्याच्या वचनाचा किंवा सवयीचा फायदा घेऊन अश्वत्थामा नावाचा हत्ती भीमाकडून मारवला आणि "अश्वत्थामा मेला" असे द्रोणाचार्यांना युधिष्ठिराकरवी सांगवून घेतले (आणि जेव्हा युधिष्ठिराने नंतर म्हटले की, "पण तो हत्ती होता!" तेव्हा त्याचे बोलणे द्रोणाचार्यांना ऐकू जाऊ नये म्हणून कृष्णाने मोठ्याने शंख वाजवला!)
जेव्हा भीमाला लहानपणी मारण्याचा प्रयत्न झाला आणि ते शकुनी आणि दुर्योधनाने केले हे माहिती पडल्यावर कुंतीने पण युधिष्ठिराला अनेक वेळा सावध राहा, कौरावांवर विश्वास ठेवू नको म्हणून बजावले होते, पण त्याने तिचा इशारा मानला नाही.
आर्य चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे नेहमी सरळ झाडेच कापली जातात, वाकड्या झाडयांच्या वाटेला कुणी जात नाही. युधिष्ठिराचे तेच झाले.
इतरांना तो "स्वतःसारखे सरळ" समजत राहिला आणि सरळ वागत राहिला. जर वाकड्यात शिरला असता तर कौरव "सुतासारखे सरळ" झाले असते. बरोबर ना?