जळू....!

Submitted by ASHOK BHEKE on 22 December, 2020 - 11:03

कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो हत्ती जवळ येईल. तसतसे कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. परवा एक हत्ती रस्त्याने चालला होता. हत्तीवर माहूत बसला होता. त्याचा रुबाब पाहून रस्त्यावरची कुत्री भुंकत होती. साहजिक आहे भुंकणारच. हत्तीसारखं डौलदार चालणे हे त्यांच्या डोळ्यात भरणारे कदाचित असावे. पण अशी किती कुत्री भुंकत असतात, पण हत्तीने कधी मागे वळून बघितले नाही. एखाद्याच्या स्वभावाला औषध नसते ते तंतोतंत खरेच. कुणाचं भलं करायचा साधा प्रयत्न कोणी केला तर त्याला कमी लेखणारे गल्लीबोळात दिसून येतात. मानवी विकृती म्हणजे तिरस्कार, चेष्टा, विडंबन, उपहास, निंदा नालस्ती या व्यतिरिक्त समाजात शेखी मिरविणारे जळू....! त्यांच्या चेहऱ्यावर पटकन डोळ्यात, नाकावर, ओठांवर दिसून येते. पण एक मात्र खरे असे निंदक सभोवताली असले तर आपली प्रगती हमखास होते. या जळूच्या बाबतीत एक सांगावेसे वाटते, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना.... कुणाच्याही बाबतीत आपले नाक खुपसण्यात त्यांना प्रसन्नता वाटते. खरंतर जळू नावाचा एक कीटक आहे. तो निसर्गातल्या सर्व जणांचे रक्त शोषण करून आपले उदरभरण करीत असतो. पण मानवी जळू एकाच मेंदूचे असले तरी सुसाट वळू प्रमाणे समाजाचे शोषण करीत असतात. या जळूवर एक दृष्टीक्षेप टाकताना घडणाऱ्या घडामोडी महाभयानक
असतात, हे दिसून आले.
आमचे एक समाजसेवी मित्र आहेत. त्यांच्यावर श्रीकापरेश्वर बाबांची भलीमोठी कृपा आहे. बाबा त्यांना समाजाची सेवा करण्यास उद्युक्त हे ते जाहीरपणे म्हणतात. ज्येष्ठांची असो वा कोण्या गरजूची... त्यांच्याकडून कोणी रीत्या हाताने परतलेला अद्यापतरी ऐकिवात नाही. पण तो सढळ हाताने देतो, आपली प्रतिभा १००% फुलविण्याचे स्वातंत्र्य व संधी चालून आलेली असताना डोळ्यात केर गेलेले जळू त्यांच्या कानात फुंकर मारताना कुई कुई करून स्वामी विवेकानंदाच्या ‘उठा, जागे व्हा आणि आपले उदिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.... या विचारांचा बट्याबोळ केला आहे. यांच्या नशिबी जैसे कर्म तैसेची फळ वाट्याला आले तर त्या भगवंताला दोष देण्यात अर्थ नाही. तोंडात बाबा बाबा आणि म्हणे बाकड्यावर आमचाच ताबा. साहेबांनी एक शिडी काय चढायला सुरुवात केली तर स्वकीयांच्या पोटात विरोधकांच्या अगोदर का दु:खायला लागते....! अगदी माणूस घाणेरडी माणसं असतात.चांगलं करता येत असेल तर करा नाहीतर आपल्या तोंडाला कुलूप तरी लावा. तोंड बंद असले तर मासाही अडचणीत येत नाही.
एखाद्याने नवीन वस्तू घेतली तर दुसऱ्याने घ्यायलाच हवी, पण आपली आवक जावक पाहून...! पण आपले मन जाळून जळून तरी काय कामाचे. चांगल्या कामात काळ्या मांजराने आडवे जाणे, अपशकून मानले जाते. पण हत्ती ज्या रस्त्याने चालत असतो. त्याला घाबरूनच हि मांजरे इकडून तिकडे धूम ठोकत असतात. विशेष म्हणजे हत्तीला अपशकून काय असतो, हे मुळात ठाऊकच नाही. त्याने दहा लाखाची गाडी घेतली तर आपल्या पोटात मळमळ का होऊन द्यायची. त्याने बंगला बांधला किंवा नवे घर घेतले तर का जळायचे....! सर्वसामन्य माणसं असा क्वचित विचार करत असतील. पण समाजात रस्त्यावर उभे राहून निंदानालस्तीचे धडे गिरविणारे ‘लोकां सांगे ब्रम्हज्ञान, स्व:त कोरडे पाषाण’ या फुकटच्या सल्ला देणाऱ्या विकृतीला तुम्ही आम्ही कोणी आळा घालू शकत नाही. कारण दुसऱ्याला कमी लेखून, निंदानालस्ती, थट्टा करून स्व:ताचे समाजातले महत्व कमी करून घेत असतात. कुणाला यश मिळाले, आपल्याला नाही, पण दुसर्या्ला ती संधी मिळतेय, दुसऱ्याची जास्त प्रसिद्धी होते तेव्हा मनाची जळजळ होते. पण जळणारा स्वत:च जळत असतो. शेवटी काय, आयुष्यभर कोरडे पाषाणच’ जळणे हा प्रकार अहंकाराशी जोडला गेला आहे. सुनेने नवीन दागिना घेतला तर सासू जळत नाही. सासूला घरात लक्ष्मी आली याचा आनंद असतो पण जळूअण्णा त्याला वेगळेच रूप देतात. एका विचारवंताने आपल्या व्याख्यानात सांगितले होते, जळणाराला जळू द्यावे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल करावी. जळणारा जळून खाक होतो. त्याला मानसिक आणि व्यक्तिमत्व विकासाची साथ लाभत नाही. हा एक विकार त्यांचा विनाश करीत असतो. तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलले तरी त्यांचा चेहरा नेमके काय ते सांगत असतो. पण निंदा करताना त्याची स्तुती करीत असतो, हे त्यांच्या लक्षात येतच नाही.
एका गावात घडलेली गोष्ट. एकाने शेतकऱ्याने आपल्यात जागेत सुंदरसा बंगला बांधला.नजर लागावी अशी ती वास्तू. परंतु नेमके त्या बंगल्याच्या बाजूला आपल्याच चुलत भावाचे एक पडके घर होते. तेथे जळूनी प्रवेश केला. बंगला मालकाला “त्या पडक्या घरामुळे बंगल्याची शोभा गेली.तुझे लाख रुपये पाण्यात गेले रे.....” बंगला मालक पण विचारात पडला. खरोखर या पडक्या घरामुळे आपल्या बंगल्याला उठाव दिसून येत नाही. त्या चुलतभावाशी जळूनी संधान साधून दिले. तोंडावर एक आणि पाठीमागे एक.... काही हजाराचे घर
ते. पण लाखो रुपयात गाडले बंगला मालकाला. ज्याने घर विकले त्याने माळरानावर त्याच्या पेक्षा टूमदार बंगला बांधला आणि पडक्या घराची कृपा असे त्या प्रदर्शनी भिंतीवर ठळक अक्षरात लिहिले. यात जळूचा काय फायदा झाला, कळत नाही. पण बिच्चारा बंगला मालक जळूचा हकनाक शिकार झाला. चुलत भावाने यावर छान म्हटले आहे....!

*जलने वालों की दुआ से ही सारी बरकत है वरना*
*अपना कहने वाले लोग तो याद भी नही करते....!*

आयुष्यात एक चांगली वेळ येत असते. त्या वेळेचे सोनं करून घ्यायचे असते. पण जळू या चांगल्या संधीच्या शोधात कधीच आढळणार नाहीत. ते दुसऱ्याच्या घरात काय जळते आहे का...! नाक हुंगवून शोष घेत असतात. तिरस्कार आणि निंदा हे दोस्तीचे प्रकार आहेत. मनाला तिरस्काराने शिवले की, निंदा करायची उबळ आपोआप येते. तुम्ही किती श्रीमंत आहात, सुंदर आहात की कुरूप आहात. हे लोक पाहत नाहीत. तर तुमचा स्वभाव पाहत असतात. ती श्रीमंती ज्याच्या अंगी असेल त्याने सुखाचा सदरा हमखास परिधान केला आहे, असेच जगाला वाटणार. किंतु शरीराप्रमाणे मनाला कुबड आलेल्या या विकृती स्व:प्रगतीची लक्षणे खुंटीला टांगून घरात अवदसा आणण्याचा जर चंगच बांधत असतील तर.... सांगा तुम्ही आम्ही यावर काय करू शकतो. अत्यंत शिताफीने भल्याभल्यांना बुचकळ्यात ढकलणाऱ्या या आडवळणी लोकांच्या स्वभावाला औषध देणारा कोणी वैद्य अवतरेल का...?

*अशोक भेके*

Group content visibility: 
Public - accessible to all site users