शिवधनुष्य
काही वर्षांपूर्वी कामात बदल मागून घेतला आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचं काम हातात आलं, आई नुकतीच गेली होती आणि बापू जाऊन पाच वर्षं झाली होती.येणाऱ्या प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांच्या ठिकाणी आई आणि बापू हटकून आठवायचे.अगदी हळवं वाटायचं. पण हळुहळू त्या भावना कमी झाल्या आणि जास्त संतुलित मनानी काम जमायला लागलं.भावनांची गुंतागुंत न करता पण खूप सहृदयतेनं काम करता येतं हे कळलं.त्या सर्व निवृत्तींनाथांना माझ्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला.मी मुद्दाम इथे निवृत्त कर्मचाऱ्यांचा उल्लेख निवृत्तीनाथ करते आहे कारण ही सर्व मंडळी माझ्यापेक्षा वयानं,अनुभवानं,विचारांनी,अधिकारानं मोठी आहेतच त्यामुळे गुरु ह्या अर्थानी निवृत्तीनाथ हा शब्द मी वापरते आहे आणि मला त्यांनी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. माझे वरिष्ठ म्हणून किंवा सहकारी म्हणून हसत खेळत काम केलेले हे ज्येष्ठ जेंव्हा नोकरी संपल्यानंतर ऑफिसात येतात तेंव्हा वेगळेच असतात. बहुतेक वेळा त्यांच्यात एक प्रकारची असुरक्षितता दाटून आलेली असते.खूप वर्षं काम केल्यानंतरचं एक अपरिहार्य रिकामपण आलेलं असतं.काही कौटुंबिक समस्या असतात. काहींना शारीर व्याधी ग्रासतात.आपल्याला कोणी ओळखेल का नाही ही सूक्ष्म भीति असते.आत्मविश्वास कमी झालेला असतो.
काही अगदी आनंदी ,प्रसन्न असतात.मुळात ज्यांना अधिकाराची सवय असते त्यांना हे आणखी जड जातं. ज्यांनी आपल्या कर्तबगारीनं आणि सहकाऱ्यांशी मिळून काम केलेलं असतं त्यांना हे सोपं जातं पण एकूणात निवृत्तीनंतरचं आयुष्य हे वेगळं असतं.
Tuesdays with Morrie नावाचं एक सुंदर पुस्तक आहे, जे मृत्यूच्या समीप असणारे एक वृद्ध प्रोफेसर आणि त्यांच्या शिष्यातल्या सुंदर नात्याचं चित्रण त्यात आहे.मृत्यू, वृद्धत्व, वेळ ,पैसा अशा अनेक विषयांना स्पर्श करुन जाणारं हे पुस्तक अतिशय हृद्य आहे. वृद्धत्वाला सामोरं जातानाची अनोखी वाट वाचताना खूप छान सकारात्मक वाटत राहिलं.ज्या बोटीत कदाचित(परमेश्वराने संधी दिली वृद्ध होण्याची) बसायला लागेल त्याची काही पूर्व तयारी होईल का असा विचार करायला उद्युक्त करणारं पुस्तक आहे हे.(कदाचित)म्हातारपण आल्यावर ह्या गोष्टींचा विसर पडायला नको अश्या गोष्टी.
पण एकंदरच आई वडिलांचं किंवा घरातल्या ज्येष्ठांचं वृद्धत्व सांभाळणं ही खूप विशेष गोष्ट आहे.माझ्या सासूबाई आमच्या लग्नाआधीच खूप कमी वयात गेल्या आणि सासरे अगदी हिंडते फिरते,एका क्षणात गेले.पण आजी,आई आणि बापू ह्या जिवलगांचं आणि काही नात्यातल्या, मैत्रीतल्या मंडळींच्या घरातल्या ज्येष्ठांचं वृद्धत्व आणि आजारपण फार जवळून बघितलं.आई आजी आणि बापू यांच्या बाबतीत "केलं किंवा करावं लागलं"ह्या संज्ञा मुद्दाम वापरत नाहीये इथे कारण त्या अजिबात खऱ्या नाहीयेत. माझ्या आपल्या माणसांसाठी काहीतरी करावं लागणं ही अपरिहार्यता कधी मला नव्हतीच.पण कधीतरी चिडचिड झाली आणि ती त्यांच्या काळजीपोटी होती हेही नक्की.
सगळ्यात मोठं शिवधनुष्य पेलायचं असतं ते आपली आई किंवा वडिल किंवा सासू सासरे ह्यांना वृद्ध होत जाताना पाहणं, त्यांचा आलेख बदलता पाहणं म्हणजे त्यांच्या वृद्धत्वाच्या सगळ्या पायऱ्या आपण त्यांच्याबरोबर चढणं.आत्तापर्यंत अगदी खंबीर असणारे बापू मी संध्याकाळी भेटून निघाले की मायेनं डोक्यावरुन हात फिरवून, उद्या मला भेटशील ना असं विचारायचे तेंव्हा ते आपल्यावर अवलंबून आहेत ह्या कल्पनेनेच थरकाप व्हायचा.ज्यांच्यावर सगळा भार आपण टाकत होतो ती माणसं आपल्याकडे डोळे लावून बसली आहेत ही कल्पना सांभाळणं अवघड बनायचं. बापूंचं प्रदीर्घ आजारपण आणि आईचा कॅन्सरशी आणि संधीवाताशी लढा ह्या दोन्ही गोष्टीत ते दोघेही खंबीर आहेत हे माहिती असून मी मात्र आतल्या आत ढासळले होते.कुठंतरी मनाला ठाऊक होतं , काहीतरी अटळ असं समोर येणारे पण मनाची तयारी अजिबात नव्हती,ती कधीही झाली नाही आणि आज इतकी वर्षं लोटली तरी त्याची धार कमी नाहीये, अटळ गोष्टींना यथाशक्ती सामोरं जाऊनसुद्धा.हे निसर्गक्रमानुसार होणार हे ठाऊक असूनसुद्धा. म्हातारपणाची तयारी म्हणजे बहुतांशी आर्थिक तयारी, माणसं करुन ठेवतात पण बाकी तयारी कुठं असते! जरा किंवा वृद्धत्व येतं म्हणजे काय ह्याची कल्पना आपण फक्त शारीर करत असतो. पण ते त्याच्यापलीकडे खूप काही असतं. म्हणजे शारीर आणि आर्थिक बाबींपलीकडे आपली मजल जातंच नाही.
पण लांब कशाला माझी कुठं तयारी होती माझ्या आईवडिलांच्या ज्येष्ठत्वाचं आणि आजारपणाचं शिवधनुष्य पेलायची.मी खूप धडपडले हे आव्हान पेलताना.कारण तिथं माझं सगळं आत्मन गुंतलं होतं. माझ्या आयुष्याचे धागे विणले गेले होते.मला खूप अवघड गेलं त्यांना वृद्ध होताना बघणं.त्यांचं थकत जाणं हे स्वीकारताना फार कठीण झालं.
छान पिकत जाणारं म्हातारपण हे पुलंनी लिहलं आहे त्यासारखं जगणारी माणसं एखाद्या आजारपणानी किंवा धक्क्यानी एकदम बदलून जातात.हे मी अनुभवलं आहे.हे सगळं खूप वेगळं आहे.माझी पणजी म्हणायची जास्त जगू नये कारण दुःख फार बघायला लागतात आणि लगेच म्हणायची पण हातात नाही ना काही!माझ्या सासूबाईंची एक मैत्रीण वाढदिवसाला 'काढदिवस' म्हणायची.अत्यंत सुंदर गाणं म्हणणाऱ्या ह्या बाई हळुहळू दुःखी बनत गेल्या.
पण सुदैवानं आमच्या घरात आणि माझ्या आसपास आपापल्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना आणि घरातल्या इतर ज्येष्ठांना खूप प्रेमानं सांभाळणारी मंडळी आहेत.त्यांच्या तब्बेती, मनस्थिती आणि मर्जी सांभाळणारी आहेत. दुसऱ्या बाजूचीही मंडळी आहेत ह्याची पूर्ण कल्पना आहे आणि अनुभवही आहे.क्वचित मतभिन्नता असली तरी ज्येष्ठांच्या उतरत्या काळात त्यांची काळजी घेणारी मंडळी जास्त परिचयाची आहेत.
माझ्या मैत्रिणीच्या आजोबांची काळजी तिच्या अतिशय व्यग्र आणि उच्च पदस्थ वडिलांनी अशी प्रेमानं घेतली की ज्यांना होत नाही किंवा वेळ होत नाही असं म्हणतात त्यांच्यासाठी वस्तूपाठ ठरावा. दिवसभर त्यांना मदतनीस होता कारण ह्यांना काम असे पण संध्याकाळ ते सकाळ आजोबांचं सगळं ते करायचे. कुठल्याही गोष्टीची काडीमात्र कमतरता नसताना. केवळ माझ्या वडिलांचं मी करणार ह्या भावनेतून.
माझा एक सहकारी खूप वर्षं बदलीची वाट बघत होता, बदली मिळाली आणि त्याच्या वडिलांची तब्बेत बिघडली आणि सहा आठ महिन्यात वडिल निवर्तले पण तो अजून म्हणतो त्या काळात मला जी त्यांची सेवा करता आली त्यासाठी परमेश्वराचा ऋणी राहीन.आत्ताच्या कोरोनाच्या काळात आपल्या घरातल्या पण दूर रहात असलेल्या ज्येष्ठांच्या काळजीनं किती जणांच्या काळजाचं पाणी झालं होतं.
माझ्या सासूबाई फार लवकर अचानक गेल्याने माझ्या नवऱ्याला फार दुःख आहेच पण त्यांची काहीही सेवा न करता आल्याची खूप खंत राहिली.परदेशी असलेल्यांना तर किती गोष्टींची दडपण असतं ह्या सगळ्यांचं.माझ्या एका मैत्रिणीला दुसऱ्या गावी माहेर असल्यानं तिच्या अंथरुणाला खिळलेल्या आईची ज्या पद्धतीनं करायची होती तशी देखभाल नाही करता आली.आईच्या जाण्यानंतर ती माझ्याशी बोलताना म्हणाली हे मला कुठंतरी फेडायचं आहे मला एकदम घाव बसल्यासारखं झालं,तिची समजूत काढली मी, पण मला लक्षात आलं की करणाऱ्याइतकंच, इच्छा असून करु न शकणाऱ्या व्यक्तीचं सोसणं तितकंच असतं.
बदलत चाललेली सही,सहज विसरल्या जाणाऱ्या गोष्टी, कमी ऐकू येणं, कमी दिसणं, कोणाचा तरी आधार लागणं,कमी होत चाललेला आत्मविश्वास,वेगळाच येणारा हट्टीपणा,असुरक्षिततेची भावना ह्या सगळ्या गोष्टी अगदी वर येतात आणि आत्तापर्यंतच्या व्यक्तित्वाशी विसंगत अशी व्यक्ती आपल्या आसपास वावरतीये असं वाटायला लागतं.
एरवी कोणीतरी आपल्यावर भावनिकरीत्या अवलंबून आहे ही गोष्ट सुखद असते पण इथे नाही.त्यांचे आयुष्याचे पट उलगडताना बघणं, त्यांचे भोग त्यांनी भोगताना बघणं आणि त्यांचं अवलंबित्व पाहणं ही मुलांसाठी किती पिळवटून टाकणारी गोष्ट असते.कोणीतरी आपल्याकरता आयुष्यभर जीव टाकला त्या व्यक्तीसाठी वेळ देऊ शकत नाही ही गोष्ट फार खोल जखमा करते.त्यांच्या अनुभवांचा आणि प्रेमाचा खजिना सांभाळून आपल्यापुरता ठेवताना,त्यांची ती थकलेली कुडी बघताना, त्यांचे राहिलेले क्षण धरुन ठेवायचा प्रयत्न करताना,त्यांचे थरथरणारे हात हातात आपल्या हातात घेताना,त्यांच्या विझत चाललेल्या डोळ्यात आपल्याला ओळखीची असलेली चमक शोधताना, थकलेल्या सुरकुतलेल्या हातापायांवर हात फिरवताना एक अनामिक थरकाप होत राहतो आतल्या आत.मन अश्रू ढाळत राहतं.खूप वर्षं झाली आईबापूंना जाऊन!भेटतात अनेकदा,माझ्या विचारात, माझ्या कृतीत,त्यांनी विणलेले धागे मी जपत बसते. पण त्यावेळचं ते शिवधनुष्य आठवलं की काळजात अगदी गलबलतं.त्यांच्या आणि माझ्या आयुष्यातल्या आठवणींच्या उजळण्या करताना गळा दाटून येतो आणि महानोरांच्या वाचलेल्या कवितेचे शब्द मनाच्या दारात येऊन उभे राहतात..
गुंतलेला जीव मायेच्या फुलाशी
पांगले सारे नभासम दूर देशी
ऐकताना रुद्ध कंठाची कहाणी
पापणीला पेलवेना चंद्रपाणी...
ज्येष्ठागौरी
https://youtu.be/mdBYpYczK10
शिवधनुष्य
Submitted by ज्येष्ठागौरी on 12 December, 2020 - 03:00
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच भावस्पर्शी लेखन...खूप
खूपच भावस्पर्शी लेखन...खूप गलबलून आले वाचताना..
Relat होतय..
नेहमीप्रमाणे सुंदर... तुमचे
नेहमीप्रमाणे सुंदर... तुमचे सगळेच लिखाण खूप हृदयस्पर्शी असते.
मनाला स्पर्शणारे लिखाण असते
मनाला स्पर्शणारे लिखाण असते तुमचे..आपोआप भावनिक व्हायला होतं वाचताना... खूप छान लिहिलय!
नेहमीप्रमाणे ह्रुदयस्पर्शी ..
नेहमीप्रमाणे ह्रुदयस्पर्शी ... गलबलले ... शेवटच्या ओळी वाचताना डोळे वहायला लागले ...
आईवडील दोघांचीही थोडीफार सेवा करता आली .. स्वत:ला भाग्यवान समजते.
खूपच भावस्पर्शी लेखन...खूप
खूपच भावस्पर्शी लेखन...खूप गलबलून आले वाचताना..
Relat होतय..>>>>> सेम हिअर !!
नेहमीप्रमाणे सुंदर... तुमचे सगळेच लिखाण खूप हृदयस्पर्शी असते.>>>>>> +११११
.......निःशब्द......
.......निःशब्द......
तुमचे सगळेच लिखाण खूप हृदयस्पर्शी असते. >>> +९९९९
____/\____
तुमचे लिखाण अगदी गाभ्याला
तुमचे लिखाण अगदी गाभ्याला स्पर्श करते. पुन्हा कधी तक्रारीचा सूर नसतो. त्यामुळे वाचायचा खराखुरा आनंद मिळतो.
सासू-सासऱ्यांचं होईल तेवढं केलं. सगळं केलं असं म्हणायला मन धजावत नाही. कारण कधी कंटाळून गेले. चिडचिडही झाली.
आता आई वडील थकायला लागले. त्यांचंही होईल तेवढं करते आहे.
तशी मनाची, पैशाची आणि शरीराची शक्ती शाबूत रहावी अशी देवाकडे प्रार्थना आहे.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
धन्यवाद ! सगळ्यांना मनापासून
धन्यवाद ! सगळ्यांना मनापासून धन्यवाद! माझ्यासारखेच विचार खूप जणांच्या मनात आहेत हे वाचून पुन्हा भरुन आलं.अनया, तुझा प्रतिसाद वाचून आत लक्क झालं! तो सगळा काळ कठीण असतो हेच खरं! तू नक्कीच चांगलं माणूस आहेस,ते महत्वाचं,बाकी होत राहतं!
ज्येष्ठागौरी, काळ कठीण तर
ज्येष्ठागौरी, काळ कठीण तर होताच. तेव्हा सगळ्यांच गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन किती बदलला होता, हे आठवून आता आश्चर्य वाटतं.
तुमचे आभार
गलबलाट.
गलबलाट.
त्यांचे आयुष्याचे पट उलगडताना
त्यांचे आयुष्याचे पट उलगडताना बघणं, त्यांचे भोग त्यांनी भोगताना बघणं आणि त्यांचं अवलंबित्व पाहणं ही मुलांसाठी किती पिळवटून टाकणारी गोष्ट असते.कोणीतरी आपल्याकरता आयुष्यभर जीव टाकला त्या व्यक्तीसाठी वेळ देऊ शकत नाही ही गोष्ट फार खोल जखमा करते>> अगदी मनातलं लिहिलयं ...
तुमचा हा लेख वाचून आज भावनावेग नाही आवरता आला. कुठेतरी आतपर्यंत पोहोचलं!!
हे फारच रिलेट झालं सगळं. जे
हे फारच रिलेट झालं सगळं. जे आपले भरभक्कम खांब आहेत आयुष्यातले अशा व्यक्तींना वृद्धत्वाकडे जाताना आणि रोल रिव्हर्सल होतानाच्या भावना खूप छान मांडल्यात! तुम्ही फार छान शब्दात लिहीता सारं!
फार छान लिहिलं आहे, काळजी
फार छान लिहिलं आहे, काळजी,आठवणी..सगळंच दाटून आलं.
नेहमीप्रमाणे भावस्पर्शी
नेहमीप्रमाणे भावस्पर्शी लिहिलंय तुम्ही!
दोन्ही आज्यांची म्हातारपणं आठवली. बाबांनी आणि मामाने केलेली त्यांची सेवा आठवली. थकायचे, पण करायचे.
एक लिहायचं राहिलंच. Tuesdays
एक लिहायचं राहिलंच. Tuesdays with Morrie हे माझंपण खूप आवडतं पुस्तक आहे
हे फारच रिलेट झालं सगळं. जे
हे फारच रिलेट झालं सगळं. जे आपले भरभक्कम खांब आहेत आयुष्यातले अशा व्यक्तींना वृद्धत्वाकडे जाताना आणि रोल रिव्हर्सल होतानाच्या भावना खूप छान मांडल्यात! तुम्ही फार छान शब्दात लिहीता सारं! +१
धन्यवाद!
धन्यवाद!
थकत जाणारे आप्त आणि त्या
थकत जाणारे आप्त आणि त्या प्रवासातली आपली हतबलता , "जणू काहीच झालेलं नाहीये" हे आपण आणि त्यानी एकमेकांना फसवत रहाणं.....सगळंच अटळ !
"पांगले सारे नभासम दूरदेशी" इथे ऐका
https://youtu.be/mdBYpYczK10
पशुपत धन्यवाद! ऐकलं आणि
पशुपत धन्यवाद! ऐकलं आणि पुन्हा डोळे भरले!
योग्य वाटल्यास youtube link
योग्य वाटल्यास youtube link मूळ लेखात प्रविष्ट करुशकता ..
नेहमीप्रमाणेच सुंदर !
नेहमीप्रमाणेच सुंदर ! परदेशात रहात असल्याने आईवडीलांसाठी प्रत्यक्षात काही करता येत नाही. रोज स्वतःचीच समजूत घालते. आजोबांची मात्र थोडीफार सेवा करता आली. तेव्हा 'मी जाईन मदतीला' असे म्हणत मी आईची समजूत घालत असे, आता कुणीतरी माझी समजूत घालते.
गलबलुन आलं.
गलबलुन आलं.