कधी बेरजा कधी वजावट आयुष्याचे हिशोब चुकले
व्यवहाराच्या दलदलीत या माणुसकीचे पीक वाळले
मतभेदावर घालुन पडदा, तकलादू शांतीस पोसले
गुदमर सोसत जगावयाचे, आयुष्याचे सूत्र जाहले
एकदुज्यावर भाळायचे दिवस सुखाचे पटकन सरले
सांभाळायाचे क्षण येता दोघांचेही दिवस लांबले
तत्वांचा देवून मुलामा, संधी दिसता पक्ष बदलले
जमावात या आज कळेना, कोण कुणाला कधी खेटले
ओलावा शोधून दिसेना, प्रेमाचा अन् घामाचाही
उच्चभ्रू वस्तीस पाहुनी, कोरडवाहू शेत वाटले
मॉलमधे मालाची किंमत जी मागितली, चुकती केली
भाजी घेताना घासाघिस करून पैसे कमी करवले
एकुलत्या एका बाळाचे पालन पोषण सुखात होते
पण त्याला ना दादा, ताई, तेच धाकटे तेच थोरले
नैराश्याच्या वातावरणी, आस जागली मनात जेंव्हा
वादळातही शांतीसाठी लुकलुकणारे दिवे भेटले
आज नको "निशिकांत" काळजी सांजवेळच्या आयुष्याची
देव बघाया समर्थ आहे, ज्याने तुज जन्मास घातले
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---वनहरिणी. मात्रा-३२--८ x ४
वाह!! आवडली.
वाह!! आवडली.
छान कविता
छान कविता