ती आई होती म्हणूनी...

Submitted by ज्येष्ठागौरी on 28 November, 2020 - 01:50

ती आई होती म्हणूनी...
लहानपणी सगळ्यांनीच बिरबलाची "माकडीण आणि तिचं पिल्लू "ही गोष्ट ऐकली आहे आणि मला ती तेंव्हाही पटली नव्हती आणि आजही ती पटत नाही..
आमच्याकडे Labrador जातीची jet black श्वान सम्राज्ञी होती.तिचं नाव राणी!जेट ब्लॅक मुद्दाम लिहिलं कारण श्वान प्रेमींना समजेल की एकही ठिपका इतर रंगाचा नसलेल्या ह्या रंगाचं आणि highly pedigreed ह्या शब्दाचं अगदी घट्ट जवळचं नातं आहे. आमच्या घरी त्या दहा वर्षाच्या काळात एकदा आलेला माणूसही तिला विसरु शकणार नाही,इतकी देखणी आणि सुस्वभावी.तिला पिल्लं होणार होती त्यावेळचा ही गोष्ट आहे.तिला क्रॉस केलं होतं कर्नल शिधये यांच्या गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्याशी. त्यामुळे पिल्लं गोल्डन किंवा जेट ब्लॅक होणार हे निश्चित होतं.अनेक लोकांनी पिल्लू पाहिजे अशी बापूंकडे शिफारसही करुन ठेवली होती,केनल क्लबमध्येही खबर लागली होती.ह्या सगळ्या योजनेला आईचा तसा विरोध होता.कारण बापू त्यांच्या स्वभावाप्रमाणे सगळी पिल्लं ठेवून घेतील , ह्याची भीति तिच्या मनात होती.पण कदाचित साधारण एक ठेवून घेतील इथपर्यंत तिची तयारी झाली होती.ती खूप प्राणिप्रेमी नव्हती आणि घरी असल्यामुळे तिला करावं लागायचं ,बापूंचं टोकाचं प्राणिप्रेम तिच्या पोटात अनेकदा गोळा उठवून गेलं होतं.
तर आमची श्वानसम्राज्ञी आई होणार होती.बापूंनी आधीच संपूर्ण माहिती घेतली होती. तिला वारंवार दवाखान्यात नेऊन आणून निगराणी राखली होती.आईनी तिची खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली होती.कुत्र्याचं बाळंतपण कसं होतं, तिथपासून पिल्लांना काय पोषक द्यायचं इथपर्यंत त्यांची तयारी पूर्ण होती.ह्या सगळ्यातून त्यांना असं कळलं की प्राणी नेहमी अडचणीच्या ठिकाणी म्हणजे जिथे सहजी कोणी पोचणार नाही अशा ठिकाणी पिल्लांना जन्म देतात.आमच्या घरचा खालचा माळा हा तिथल्या परिसरातल्या यच्चयावत मार्जरसुंदरींनी काबीज केलेला होता पण त्याला आमच्या बाजूंनी कुलूप होतं त्यामुळे राणी तिथं जाऊ शकणार नाही ही खात्री होती मग बापू तिनं कुठं खबदाडीत पिल्लं घालू नयेत आणि तिला अगदी आपली वाटावी अशी जागा म्हणून आमच्या वरच्या बेडरूम्सपैकी पहिली खोली ही बाळंतिणीची असणार असं ठरलं.तिला आपलंसं वाटावं म्हणून तिचं नेहमीचा झोपायचा बिछाना तिथं हलला.तिची तक्रार नव्हतीच.मुळात ती इतकी गोड स्वभावाची होती की बापू जे करतील त्यावर तिचा अखंड विश्वास होता.आता तिला एकटं वाटू नये म्हणून तिच्या गर्भारपणाच्या शेवटच्या दिवसात बापू तिला सोबत म्हणून ,तिच्यावर लक्ष म्हणून तिथं झोपायला लागले.ती बापूंच्या पायावर डोकं ठेवून झोपलेली असायची. गर्भारपणाच्या शेवटच्या दिवसांमुळे आलेलं जडत्व आणि अवघडलेपण हे सांभाळत हिंडत असायची घरभर हळुहळू. बापू तिच्याशी रात्री बोलत असायचे.
कुत्र्यांचा गर्भारपणाचा काळ हा साधारण ५८ ते ६८ दिवसांचा असतो.एक दिवशी सकाळी बापू आईला म्हणाले ,ती रात्रभर अस्वस्थ होती ,कदाचित तिची डिलीव्हरी होईल लवकर. आईच्या पोटात गोळा उठला,ती म्हणाली अहो तुम्ही रजा घेणार आहात ना?बापू म्हणाले अगं तीच करणार तिचं,सगळं फक्त आपण लक्ष ठेवायचं.पण अजून खरंतर अवकाश आहे आत्ता कुठे ५५ दिवस होताहेत.आई थोडी शांत झाली.बापू ऑफिसला गेले.आईचं तिच्यावर लक्ष होतं. ती अस्वस्थ होती हे आईला जाणवत होतंच. स्वयंपाक करताना आई एक नजर तिच्यावर टाकून जायची, जरा तिला धीर देणार वाक्यही बोलायची.मधला थोडा वेळ गेला आणि आई बघायला आली तर बाई गायब.आईची शोधाशोध सुरु झाली आणि आई बापूंच्या खोलीत पलंगाखाली ट्रंकांच्या मागे आईला ती दिसली.एक पिल्लू झालं होतं.आईनं बापूंना फोन केला.त्या खोलीत बसून राहिली पण तिचं धाडस होईना.मग बापू आले तोपर्यंत चार पिल्लं झाली होती.आणि ती दमून झोपली होती.बापूनी पाहिलं तर सगळी बालके चाटून पुसून साफ करुन ठेवली होती.बापूंनी आईला पिल्लं दाखवली. दोन काळी आणि दोन सोनेरी अतीव गोड पिल्लं जन्माला आली होती.आईपण एकदम खूश. तिच्या अंगावरुन आईनं हात फिरवला.खाली जाऊन साजूक तुपातला शिरा केला,गरम चहा केला.पण तिनं फक्त दोन भांडी भरुन पाणी पिऊन डोळे मिटून झोप काढायचं ठरवलं होतं. पिल्लांना तिच्या कुशीत देऊन बापू ऑफिसला रवाना झाले.साधारण एक तासात आईचा परत फोन,तुम्ही लगेच घरी या.बापू आले तर अजून पाच पिल्लं तिला झाली होती.आईला घाम फुटला होता एकूण नऊ पिल्लं!पाच वडिलांवर गेलेली आणि चार आईवर.आता मात्र ती धापा टाकत होती!आई तिच्या पाठीवरुन हात फिरवत राहिली डोळ्यातून धारा वाहत राहिल्या.थोड्या वेळानं ती शांत झाली,आईनं केलेला शिरा खाल्ला आणि बापूंच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली.आता आम्हाला पिल्लांना बघायची परवानगी मिळाली.आमच्या सगळ्यांच्या आनंदानी निथळणाऱ्या चेहऱ्याकडे बघत शांत झोपली.आता आमचं सगळं लक्ष पिल्लांकडे.आपण सोनेरी ठेवून घ्यायचं का काळं, मुलगा की मुलगी ह्यावर चर्चा सुरु झाली.ती मध्येच डोळे उघडून कुशीतल्या बाळांकडे बघायची आणि समाधानी डोळे मिटून पडून राहिली होती..दुसऱ्या दिवशी सकाळी वेटर्नरी डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की ती लवकर बाळंत झाली म्हणजे आपल्या भाषेत सातोळी आणि कुत्री बहुप्रसवा असली तरी नऊ पिल्लं हे तिच्यासाठी खूप झालं होतं.तिची चण लहान होती आणि पिल्लं जास्ती!पिल्लं लहान होती आणि त्यांची तोंडं लहान होती,तिचे सड मोठे होते. त्यांना तिचं दूध पिता येत नव्हतं.आम्ही ड्रॉपरनी त्यांना दूध पाजत होतो.मग त्यातून डॉक्टरांनी मार्ग काढला की एका गवळीबुवांना बोलवून तिचं दूध काढून ते ड्रॉपरनी पाजायला सुरुवात केली.ते तिला खूप दुखायचं पण ती कधी चावली नाही किंवा अंगावर गेली नाही.आता त्या पिल्लांपैकी काही पिल्लांना आकडी यायला सुरुवात झाली,परत डॉक्टर आले त्यांनी औषधं दिली आणि सांगितलं की पिल्लांना अजिबात थंडी वाजता कामा नये.मग एक मोठा टब त्यात खाली हॉट वॉटर बॅग्स त्यावर ब्लॅंकेट मग एक पिल्लू त्याच्याशेजारी गरम पाण्याची बाटली आणि वरून २००चा दिवा म्हणजे साधारण incubator असतो अशी व्यवस्था एक तासात केली.पिल्लं थोडी बरी दिसली.आम्ही मुलं आणि बापू पिल्लांच्या तैनातीत आणि आई तिच्या.कुठं खीर करुन दे.गरम पाण्याच्या बाटल्या भर अशी बरीच कामं आईच्या मागे लागली.पूर्ण दिवस तसा गेला.रात्री बापू तिच्याजवळ बिछाना टाकून झोपले.त्यांचा जरा डोळा लागला तोपर्यंत तिच्यातल्या आईला इतकं प्रेम दाटून आलं की तिनं सगळी पिल्लं टबातून बाहेर काढून चाटून काढली.बापूंना जाग आली तोपर्यंत पिल्लं परत गारठली.बापूंनी आम्हाला हाका मारुन बोलवून पिल्लांना पुसून परत उबदार करेपर्यंत धावाधाव झाली.ती मात्र आमच्याकडे निरागस नजरेनी बघत होती.तिला ते समजलं नव्हतं,तिच्या दृष्टीनं मातृत्व सोपं होतं. दुर्दैवानं पुढच्या चार दिवसात सर्व पिल्लं एकामागून एक गेली.प्रत्येक पिल्लू मागच्या बागेत पुरताना संजय रडत रडत त्यांच्यासाठी आणलेल्या कॅलशिअमच्या गोळ्या आणि सँटीनच्या रिबीनीसारख्या छोट्या छोट्या गोष्टी पुरायचा.ते पिल्लू तिला न दाखवता न्यायचं म्हणजे कसरत होती.पण तिचा आमच्या सगळ्यांवर इतका विश्वास होता की तिला ते कळलंच नाही बहुतेक.आमच्या सगळ्या धावपळीत ती संपूर्ण विश्वासाने आमच्याकडे बघत असायची.तिच्याजवळ पिल्लं दिली की किती समाधानी दिसायची.पिल्लं कमी व्हायला लागली तशी कावरी बावरी व्हायला लागली.she was a very good mother ... चांगल्या आईचे सगळे गुण तिच्याकडे होते.पण तिचं काही चाललं नाही..
पण नंतर जेंव्हा संख्या भरपूर कमी झाली तेंव्हा तिला संशय यायला लागला आणि ती खूप लक्ष ठेवून बसली.पण शेवटचंही पिल्लू गेलं ,संजय त्याला घेऊन गेला आणि मी तिला घट्ट मिठी मारुन बसले होते.तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.दुपारभरात तिनं तिची एक उशी फाडून पूर्ण खोलीभर कापूस केला.तिची हतबलता अशी बाहेर आली.तिच्या संपूर्ण आयुष्यात तिनं केलेलं एकमेव नुकसान आणि तेही वियोगात!तिला तसंही कधीच कोणी काही रागवायचं नाही पण आता तर तिचा मूक आकांत सगळ्यांना हलवून जात होता.प्राण्यांचं मातृत्व हे नैसर्गिक असतं आणि त्यामुळे ते सहज असतं पण राणीच्या वाट्याला मातृत्व आलं पण अल्प काळाचं!
राणीच्या मातृत्वाची सगळी तयारी,काळजी आई बापूनी घेतली पण आई म्हणून जे प्रेम होतं ते संपूर्णपणे तिचं होतं. तिच्या सगळ्या भावना ह्या अगदी खऱ्या होत्या.तिचा विलाप खरा होता कारण ती आई होती...पण तो मूक होता..
संध्याकाळी आई बापू दोघेही तिच्याशेजारी बसले त्या तिघांचं काय "बोलणं"झालं माहिती नाही.पण तिनं काही नंतर गडबड केली नाही.नियतीला आणि औट घटकेच्या मातृत्वाला तिनं इतकं शांतपणे स्वीकारलं. पण त्या काळात तिनं असाधारण धैर्य,सोशिकता आणि विश्वास दाखवला. त्यानंतर ती आणखी शांत सोशिक झाली.मला अजूनही आम्ही त्या पिल्लांना आकडी आल्यावर डॉक्टरांनी दाखवल्याप्रमाणे हलकेच चोळून त्यांची आकडी घालवायचो ते बघत असलेली ती आठवत राहते.काय नजर होती ती, मातृत्वाचा झळाळ, मुलांची काळजी,एक हतबलता आणि तरीही आमच्यावर संपूर्ण विश्वास.आजही ती नजर आठवली की डोळ्यात पाणी येतं.
त्यानंतर माझ्याकडे मांजरी होत्या. त्यापण उत्तम माता असतात. प्रेमळ आणि शिस्तप्रिय.तो संपूर्ण काळ फक्त बालसंगोपन सोडून काही करत नाहीत.
मघा म्हणल्याप्रमाणे बिरबलाच्या गोष्टी आवडत असल्या आणि कदाचित खऱ्या असल्या तरी माकडीण आणि तिचं पिल्लू ही गोष्ट कधी पटली नाही आणि प्राण्यांचं हे सगळं डोळ्यानी पाहिल्यावर तर नाहीच नाही.पिलांसाठी मऊ घरटं विणणारी पक्षीण(पक्षीही), पिल्लाला पोटाला चिकटवून उडया मारणारी माकडीण,ह्या कुठंच, उत्क्रांत मानवाच्या आईपणापेक्षा कमी नसतात.किंबहुना जास्त सरस असतात कारण त्यांच्या कुठल्याच भावना ह्या सशर्त नसतात,अगदी शुद्ध,अस्पर्श असतात.
नुकत्याच झालेल्या केरळमधल्या घटनेनं मन इतकं विद्ध झालं!माणुसकी हजारदा मृत्यू पावली असं वाटलं.मनातून कितीही वेळा माफी मागितली तिची, तरी कढ थांबत नव्हते.
एक होऊ घातलेली आई आपल्या बाळासाठी स्वतःचं जीव देऊ शकते हेच खरं!इतकं खरं असणं हे केवळ स्वर्गीय आहे.आपण माणूस असल्याची शरम वाटली, अजूनही वाटतेय.
राणीचं आई होणं आणि सगळी पिल्लं जाणं हाही फार चटका लागणारा अनुभव होता.ह्या घटनेनंतर आई आणि ती फार जवळ आल्या.
प्राणिप्रेमी नसणाऱ्या आईला तिचं आईपण पुरेपूर समजलं आणि घरच्या बाईचं करावं इतकं प्रेमानं आणि काळजीकाट्यानं आईनं तिचं बाळंतपण केलं आणि कूस रिकाम्या झालेल्या तिला आपल्या प्रेमाच्या उबेत सामावून घेतलं.
ती नंतर आणखी शांत झाली,समजूतदार,आईनीही नंतरच्या आयुष्यात तिच्यापदरी आलेला पुत्रवियोग खोल दडवून ठेवला शांतपणे..आज इतकी सरसरुन दोघींची आठवण आली......
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख पुर्न वाचल्यानंतर जेव्हा मी पुन्हा वरचा फोटो पाहिला, माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले.
खुप सुंदर , ओघवत लिहले आहे.

फारच हृदयस्पर्शी कहाणी आहे तुमच्या राणीची आणि तसंच तुमचं लिखाणही. तुमचं आजवरचं इथे लिहीलेलं सगळं लिखाण वाचलं आहे. खूप संस्कारसंपन्न आहात तुम्ही!
राणीबरोबरचा तुमचा फोटोही सुंदर आहे.

खूप सुंदर लिहिले आहे. पिल्लांचे वाचून वाईट वाटले.
किती देखणी दिसते राणी!
आमच्या घरी मांजरीचे बाळंतपण झाले होते. मांजरीने पिलाला तोंडात पकडून उचलले तेव्हा माझी छोटी भाची ती पिलाला चावली म्हणत घाबरून रडली होती.

बापरे...खूपच टचिंग लिहिलंय. तुमची ओघवती लेखनशैली चित्रदर्शी आहे. डोळ्यात पाणी आलं.

त्या काळी तशी पद्धत नसणार पण अमेरिकेत आता अशा कठीण परिस्थितीत डॉग मॉम्सना पेट हॉस्पिटलमध्ये नेतात. लेबर इंडयुस करणं, गरज पडल्यास अगदी सी सेक्शनही करतात. काळाचा महिमा.

खूप छान लिहिलंय.
आमच्याकडे Doberman होती .. तिचंही नाव राणीच !!
अतिशय तल्लख आणि चपळ .. तिला सांभाळता सांभाळता नाकीनऊ आले माझ्या आई बाबांच्या .. शेवटी एक मित्राला देऊन आले !!

Pages