शरलॉक होम्सच्या 'द अॅडव्हेंचर ऑफ द सॉलिटरी सायक्लिस्ट' ह्या गोष्टीवर आधारित हे लिखाण आहे. ह्यात ह्या गोष्टीचे आणि इतर काही मामुली स्पॉयलर्स असण्याची शक्यता आहे, हा इशारा आधीच देऊन ठेवतो.
ह्या गोष्टीत व्हायलेट स्मिथ नावाची सुंदर तरूणी आहे. कामावरून घरी जाताना सुनसान रस्त्यावर तिचा पाठलाग करणारा एक आगंतुक सायकलवाला आहे. दुष्ट ड्रॅगनसारखा एक अक्राळविक्राळ गुंडही आहे, आणि 'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती' म्हणणारे आपले व्हाईट नाईट्स शरलॉक आणि वॉटसन आहेत. डेमझल इन डीस्ट्रेसचं हे शरलॉक कथेतलं रूपांतर एकदम झकास जमलंय.
ही सुरस कथा वाचल्यावर पूर्वी मी लगेच पुढच्या गोष्टीकडे वळलो असेन किंवा काय, पण कथेतल्या रहस्यापलीकडे फार काही विचार केला नाही. पण आता कथेच्या रहस्याचा विचार मनात आला. गंमत म्हणजे ह्या गोष्टीमध्ये मिस व्हायलेट स्मिथला एक भावी नवरा आहे. सिरील मॉर्टन त्याचं नाव. त्याच्या उल्लेखापलीकडे तो ह्या गोष्टीत काहीही करत नाही. मग आर्थर कॉनन डॉईल साहेबांनी तिला हा 'फियॉन्से' कशाला ठेवला असेल? हा जाणीवपूर्वक निर्णय असेल का? की डॉईलला नेणीवेतूनच लग्नाळू तरूणीची गोष्ट सुचली असेल? ती तशी का असेल?
ह्या माणसाचं नाव गोष्टीत प्रारंभीच येतं. व्हायलेट स्मिथ जेव्हा होम्सला एकंदर माहिती देत असते तेव्हा. ती होम्सला पाठलाग करणार्या सायकलवाल्याबद्दल सांगते. पण ही मुलगी स्वतःच्या भावी जोडीदाराकडे मात्र मदतीसाठी जात नाही. सगळं प्रकरण आटपल्यावर ती त्याच्याशी लग्न करून मोकळी होते, पण त्याआधी तो ह्यात काहीही करत नाही.
अर्थात, होम्सच्या गोष्टीमध्ये होम्सनेच लोकांना वाचवणं वगैरे भाग आहे. पण काही गोष्टींमध्ये बायकांचे प्रेमिक होम्सच्या मार्गात लुडबूड करत असतात. 'डिसअॅपीअरन्स ऑफ लेडी फ्रान्सेस सर्फॅक्स'मध्ये तसं आहे. पण तिथे तो 'फियॉन्से' नव्हता. 'ठिपक्याठिपक्यांचा पट्टा' गोष्टीमध्येही होम्स आणि वॉटसन ज्या मुलीला वाचवतात, तिचंही लवकरच लग्न होणार असतं. पण तिथेही तो जोडीदार 'असण्या'पलीकडे काही करत नाही. 'कॉपर बीचेस'मधल्या मुलीला शेवटच्या क्षणी तिचा वाग्दत्त वर येऊन वाचवतो खरा, पण ते थोडं अपघातानेच आलंय, असं वाटतं. त्यामुळे डॉईलचं आणि ह्या संकल्पनेचं काही बरं नाही, असं काही असेल का?
वाग्दत्त वधू असणं म्हणजे ती इतरांसाठी उपलब्ध नाही, असं एक साधं समीकरण असतं. तो पुरूष आयुष्यातल्या नांगरासारखा असतो, आणि हे इतर लोकांनी जाणून तसं वागणं अभिप्रेत असतं. अर्थात, हे नातं लग्नापूर्वीच तुटूनही जाऊ शकतंच. त्यामुळे 'म्हटलं तर खूप आहे, पण काही बाबतीत फार नाही' अश्यासारखं हे नातं आहे. ह्या गोष्टीमध्येही ते तश्याच अंगानं येतं. व्हायलेट स्मिथच्या सौंदर्याच्या मोहात जवळपास सगळेच आहेत. तिच्या संपत्तीवर डोळा असणारा कॅरूथर्ससुद्धा तिच्या शुद्ध प्रेमात वगैरे पडतो. वूडलीसारखा गुंड माणूस तर तिच्या अंगचटीला यायला टपलेला असतो. विधुर असलेला वॉटसनही तिचे गोडवे गाताना थकत नाही. इतकंच काय, होम्ससारखा यंत्रवत भासणारा माणूसही तिच्या गारूडाखाली असल्यासारखं वाटतं! तो तिचा हात हातात घेतो, तिच्या 'स्पिरिच्युअल' सौंदर्याबद्दल बोलतो, आणि 'इस हसीन चेहरे के पिछे तो काफी चाहनेवाले होंगे' असा बॉलीवूडी डायलॉग मारतो! पण व्हायलेट स्मिथ विवाहबंधनात अडकणार असल्याने ती कॅरूथर्सचा लग्नाचा प्रस्तावही स्वीकारू शकत नाही. वूडलीच्या जंगली भावना तर जाऊच दे, आणि वॉटसन-होम्सच्या मनातल्या गोष्टींना तर वाचा मिळणं शक्यच नाही.
इथे आर्थर कॉनन डॉईलच्या वैयक्तिक आयुष्यातली दु:खद म्हणावी अशी घटना डोक्यात येते. त्याच्या पहिल्या बायकोशी त्याने २१ वर्षे संसार केला. ती क्षयाने बराच काळ आजारी असायची. शेवटच्या काळात तर ती अंथरूणाला खिळलेली होती. तिच्या मरणाच्या २ वर्षे आधी प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. तिच्या मरणानंतर पुढील वर्षी त्याने त्याच्या दुसर्या बायकोशी लग्न केलं. तिच्याशी त्याची ओळख आणि प्रेमात रूपांतर हे जवळपास १० वर्षे आधीच झालं होतं, पण त्याच्या प्रथम पत्नीशी निष्ठेमुळे त्यांनी ती असेपर्यंत हे नातं 'प्लेटॉनिक' ठेवलं होतं. त्याकाळच्या इंग्लंडमध्ये व्यभिचार कायदेही बरेच कडक असावेत. काय असेल ते असो. पण हे पुस्तक लिहिण्याच्या काळात डॉईलच्या मनात ह्या सर्व भावना होत्या हे नक्की.
त्यामुळे ही गोष्ट फक्त एक साहसकथा म्हणून आपल्याशी बोलण्यापलीकडे जाऊन पोचते. दबलेल्या भावनांचा एक लोलकच आपल्याला होम्स, वॉटसन, कॅरूथर्स ह्या पात्रांमधून चमकताना दिसायला लागतो. डॉईलच्या स्वतःच्या भावनांमधून तर ही गोष्ट आली नसेल? असून नसलेल्या लग्नामध्ये असताना आणि दुसर्या व्यक्तीकडे आपण स्वतःला झोकून देऊ शकत नाही, ह्या भावनांचं प्रतिबिंब तर त्या असून नसलेल्या जोडीदारामधून आणि ह्या दबलेल्या भावनांमधून दिसत नसेल? लेखकाच्या स्वतःच्या मनाचा हिंदोळा कधीकधी गोष्टीमध्ये हेलकावे खातो तो हा तर नसेल?
पुरूषी इच्छेचं आणि निराशेचंही चित्र ह्या गोष्टीतून दिसतं. लग्नाचा प्रस्ताव ठोकरूनही व्हायलेटची काळजी घेणारा, तिला जपणारा कॅरूथर्स ह्यात आहे. पण तोही जेव्हा तिचं रक्षण करायला जातो, तेव्हा तिला संकटच वाटतं. पण ती जाते ती डिटेक्टिव्हकडे, भावी जोडीदाराकडे नाही. पण ह्या जोडीदाराचं नुसतं असणं ही एकच गोष्ट त्या पुरूषी इच्छेचं व्यक्त होणंही गप्प करून टाकते. इथे पुन्हा डॉईलच्या आयुष्याकडे आपली नजर जाणं क्रमप्राप्त आहे. त्याउलट वूडलीसारखी राक्षसी आकांक्षा ही मात्र अर्थातच हे असलं काही बघत नाही, आणि जवळपास मिस स्मिथवर बलात्कार करायला जाते. पण इथे एक डोळ्यात भरण्यासारखी गोष्ट म्हणजे कॅरूथर्स आणि वूडली ह्यांच्या आकांक्षांमध्ये फरक अधोरेखित करताना डॉईल हेही आपल्याला सांगू पाहतो, की कॅरूथर्स स्वतःच्या इच्छेमुळे शक्य असूनही व्हायलेटला खरंखुरं सांगून टाकत नाही. वॉटसन त्याला 'तू स्वार्थी आहेस' असं सरळ म्हणतो, आणि कॅरूथर्सही ते कबूल करतो, आणि वर आपल्याला ऐकवतो, 'love often goes together with selfishness'. आता खरंच असं असतं का, हा वादाचा मुद्दा आहे. पण इथे मात्र डॉईलची दबलेली आकांक्षा, निराशा आणि बहुधा अपराधी भावना जणू एकत्र येऊन त्याच्या मनातला 'सगळीच पुरूषी आकांक्षा कुठे ना कुठेतरी सारखीच असते' असा कल्लोळ आपल्याला ऐकवतायत, असं वाटतं. सारं प्रेम स्वार्थी आहे, रक्षण करायला आलेला पण मनात इच्छा असलेला पुरूषही राक्षसी असलेल्या माणसासारखाच वाटतो ... डॉ. जेकिलच्या दबलेल्या भावना आणि मिस्टर हाईडच्या राक्षसासारखं हे डॉईलला वाटलं असेल का?
ह्या सर्वांवर एखाद्या स्त्रीच्या मनात अजून काहीतरी वेगळे विचार येऊ शकतात. कदाचित त्यांना गेल्या परिच्छेदात माझ्या नजरेतून सुटलेलं अजून काहीतरी जाणवेल. ही गोष्ट नक्कीच आत्ताही आपल्याला काहीतरी सांगून जाईल. पण डॉईलच्या अनुषंगाने मला जाणवलं ते हे सगळं. फियॉन्से का आला, हे उमगल्यासारखं वाटलं. साहसकथा म्हणून तर ही छान आहेच, पण महत्त्वाची रूपलक्षणं ह्यात दडली आहेत. लेखकाच्या मनोव्यापारांचा गोष्टींवर कसा परिणाम होतो, हेही इथे दिसतंय असं वाटतं. मी आज ही गोष्ट बर्याच दिवसांनी पुन्हा वाचली. आणि मला ती वेगळ्याच अंगांनी 'भेटली' असं वाटलं.
इंजिनियर्स थंब आणि रिटायर्ड
इंजिनियर्स थंब आणि रिटायर्ड कलरमॅन चे व्हिडीओ रूपांतर मिळाले नाही.रिटायर्ड कलरमॅन च्या बऱ्याच लिंक आहेत पण सर्व ऑडिओ बुक्स.
इंजिनियर्स थंब मध्ये शेरलॉक ला यश मिळत नाही,पण ती एक जबरदस्त नाट्यमय गोष्ट आहे.
अमेरीकन टेलिव्हिजनवर
अमेरीकन टेलिव्हिजनवर एलिमेंटरी नावाचा होम्स व्यक्तिरेखा आधारित शो आहे.
बीबीसीच्या शेरलॉक प्रमाणेच हा शो ही आधुनिक काळाला अनुसरून बनवला आहे. फरक इतकाच आहे की ह्यातली डॉ व्हॉटसनची व्यक्तिरेखा स्त्री आहे . ते ही एक आशियाई . ह्यातला होम्स हा मानवी भावनांनी परिपूर्ण , चुका करणारा असा आहे. कित्येकदा होम्सपेक्षा वॉटसन भारी पडतो अस दाखवलं आहे. वेगळा प्रयत्न म्हणून बघता येईल.
प्राईमवर ही सिरीज उपलब्ध आहे
इंजिनिअर्स थंब येस!
इंजिनिअर्स थंब येस!
रिटायर्ड कलरमॅन हे नाव माझ्या लक्षात येत नाहीये.
माझ्या नवऱ्याने नुकतंच थॉमस पिकेटीचं Capital in the 21st century हे पुस्तक वाचलं. त्यात लेखकाने असं लिहिलंय की जुन्या काळातील नाटकं, कादंबऱ्या, कथा यांमधून त्या त्या काळातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती, रचना यांची कल्पना येते. उच्च वर्गाची राहणी कळते. त्याने जेन ऑस्टिन, ऑस्कर वाईल्ड वगैरे उदाहरणं दिली आहेत. आर्थर कॉनन डॉयलचं नाव त्याने घेतलंय की नाही ते माहिती नाही, पण शेरलॉक होम्सच्या गोष्टींंमधूनही त्या काळातल्या इंग्लंडमधल्या काही रोचक बाबी कळतात हे खरंच आहे. मला गंमत वाटते ती तिथल्या खोल्यांच्या नावांची. सिटिंग रूम, लिव्हिंग रूम तर झाल्याच, पण स्मोकिंग रूमपण? नोकरांचे किती प्रकार. कपड्यांचे किती प्रकार.
आपल्याकडचं उदाहरण म्हणजे तुंबाडचे खोत. पेशवाई बुडाल्यापासून ते पार १९७०-८० सालापर्यंतचा विशाल कालखंड त्यांनी उभा केला आहे, त्यामुळे बदलत गेलेली राहणीही त्यात दिसते. कात्री, घड्याळ, ग्रामोफोन या वस्तूंंचं आगमन दिसतं. अर्थात, ही कादंबरी काही त्या काळात लिहिलेली नाही. त्यामुळे हे वेगळं.
मुळात नवरा बायको वेगवेगळ्या
मुळात नवरा बायको वेगवेगळ्या खोल्यात का झोपायचे हेही कळत नाही.त्याकाळी मेणबत्त्या होत्या.म्हणजे अगदी नवरा लाईट लावून वाचत बसला, मोबाईलवर वेब सिरीज बघत बसला म्हणून बायको ची झोपमोड अशीही केस नसेल
स्पेकल्ड बँड मध्ये 2 बहिणी पण वेगवेगळ्या खोल्यात झोपायच्या.
पण अश्या काही गोष्टींमुळे कथा रंजक बनल्या आहेत.
सेकंड स्टेन पण तशीच. होम्स ने गुपचूप नवऱ्याच्या कागदपत्रात सारून दिलेले पत्र आधीपासूनच तिथे होते आणि तीनदा शोधून आपल्याला त्या पेटीत सापडले नाही यावर सर्वांचा विश्वास बसतो.
ग्रॅनडा चा सेकंड स्टेन एपिसोड, विशेषतः शेवटचे म्युझिक बघण्या ऐकण्या सारखे आहे.
अर्थात कथा एन्जॉय करायच्या असतील तर असा काथ्याकूट करण्याचा वात्रटपणा करू नये.
Pages