माझे उपनेत्रपुराण (माझे उनेपु)

Submitted by वाट्टेल ते on 10 November, 2020 - 11:19

तुम्ही लहानपणापासून उपनेत्र म्हणजेच चष्मा लावण्याचे भाग्य लाभलेल्या वर्गापैकी असाल तर तुम्हाला ही तुमचीच कथा आहे असे वाटेल. तुम्ही तसे नसाल तर आयुष्यातील एका मोठ्या अनुभवाला पारखे झाला आहात याबद्दल शंका नाही. चष्मा असूनही, तो जाण्यासाठी हिरवळीवर चालणे, गाजराचा रस पिणेपासून Lasik वगैरे भानगडी करून शेवटी स्वतःचे style statement करण्यासाठी branded glasses लावणाऱ्या वर्गातले असाल तर उपनेत्र लावणारा वर्ग तुमच्याकडे दयार्द्र नजरेने बघत आहे असे समजा. दरवर्षी नेत्रतपासणीसाठी डोळ्यांच्या डॉक्टरच्या इथे अत्यंत मंद सांद्र वगैरे प्रकाशात ताटकळत एका खोलीत बसण्याची वेळ, ही या अशा चिंतनासाठी योग्य असते आणि तिथेच माझ्या उपनेत्रपुराणाचा एक नवीन अध्याय लिहिला जातो. यापुढे या उपनेतत्रपुराणाला मी उनेपु असेच संबोधणार आहे. Branded glasses साठी हे एक झकास नाव आहे असे कोणाला वाटेल, तर माहितीकरता : माझ्याकडे अगोदरच या नावाचे पेटंट आहे.

या माझ्या उनेपुची सुरुवात सातवी आठवीत असताना झाली. एक काकाच डोळ्यांचा डॉक्टर असल्याने मला विशेष चिंता नसे. खेळताना किंवा असाच कधीही उने उर्फ चष्मा फुटला तर दुसऱ्या दिवशी सकाळी पडेल चेहऱ्याने रडत त्याच्याकडे जायचे व जराशी चिडचिड करायची इतकेच माझे काम असायचे. त्या जराशा चिडचिडीला इतरांकडून काय आकांडतांडव चालू आहे अशा प्रतिक्रिया आल्या की तोच (त्यालाही माझ्यासारखाच चष्मा अतिआवश्यक असल्याने) माझी बाजू सावरून घ्यायचा. क्चचित माफक टर उडवली तरी संध्याकाळी स्वतः:च्या दवाखान्यात नेणे , तपासणे आणि नवीन चष्मा करायला टाकणे वगैरे तोच करवून घ्यायचा. मग ४ दिवसांनी नवीन चष्मा घरपोच. ही आणि अन्य सगळ्याच सेवा मोफत असायच्या हे सांगणे नलगे.

माझे उने खरंतर लांबचे बघण्यासाठी होते पण हळूहळू ते सतत जवळ असण्याची इतकी सवय झाली की काही वेळा रात्रीसुद्धा लावून झोपले जायचे. त्या वेळी स्वप्ने अधिक चांगली दिसत असतील यात संशय नाही. आणि अंघोळीच्या वेळी.....जाऊ दे. शाळेत किंवा अन्य ठिकाणीही ‘ढापणे’ वगैरे चिडवण्याचा प्रकार अजिबात झाला नाही. उलट त्यात मी जास्तच cool आणि बरेच काही दिसते असे काही समवयस्क भिन्नलिंगी हितचिंतकांचे म्हणणे होते. चष्मा लावून लोक बरे दिसू शकतात असे फारसे ऐकण्यात नव्हते. परंतु प्राप्ते तु षोडशे वर्षे गदर्भी अप्सरा भवेत हे संस्कृत वचन शिकल्यावर माझ्या चष्मा लावूनही चांगले दिसण्याच्या कोड्याचा उलगडा झाला. माणसे त्यांच्या चष्म्याचा इतका तिरस्कार का करतात यावर विचार केल्यावर काही कारणे लक्षात आली. भविष्यात तुम्हाला उने लागणार असतील तर पुढील गोष्टी लक्षात घ्या.

१. चष्मा हे मराठीत अगदीच हेsss वाटणारे नाव - पण याचा उगम चष्म या सुंदर उर्दू शब्दापाशी आहे. मराठीतल्या डोळा या अगदीच बटबटीत शब्दापेक्षा तो अनंतपटीने चांगला. तेव्हा तो तशाच उर्दू आदब आणि लहेजाने म्हणा. मराठीप्रेमी असलात तर उपनेत्र म्हणा.

२. सौन्दर्यात बाधा - हे अत्यंत सापेक्ष आहे हे वर सोदाहरण सांगितलेच. तरीही लोक सुंदर सुंदर चष्मे लावून जी style फेकत असतात त्याचा बारकाईने अभ्यास करा व अमलात आणा. आपल्या न्यूनाला आपले बलस्थान बनवण्याच्या मार्गातला हा एक मोठा टप्पा आहे. त्यातून कोणी उगीच भोचकपणे काही बोलल्यास तुमचा जो अवयव बरा असेल आणि तुमच्या टीकाकाराचा तसा नसेल त्याला त्या अवयवांवरून टोचण्यास विसरू नका. चष्म्याची एक गम्मत म्हणजे वय वाढेल तसतसा तो तुम्हाला जास्त शोभिवंत करतो.

३. खेळ आणि अन्य गोष्टींमध्ये तो मध्ये मध्ये येणे - पुन्हा एकदा, चष्मा नसल्याने खेळण्यापेक्षा चष्मा लावून समीक्षकांच्या भूमिकेत शिरणे खूप सोपे आहे. चष्मा लावून खेळायचेसुद्धा काही खेळ असतात ते शिकून त्यात प्राविण्य मिळवा.

आमच्या वेळी असं नव्हतं या कधीही न संपणाऱ्या यादीत, Lasik च काय contact lens ही जास्त प्रचलित नव्हते हे नुसते नमूद करून ठेवते.

या सर्व पार्श्वभूमीवर, अमेरिकेत आल्यानंतर माझ्या उपनेत्रपुराणाचा पुढचा अध्याय सुरु झाला. भारतात head to toe साठी काकाचीच सेवा डॉक्टर म्हणून घेत असल्याने डॉक्टर्सची जातीनिहाय विभागणी करण्याचा फारसा प्रसंग आला नव्हता. पण इथे Optometrist आणि Ophthalmologist अशा २ जाती होत्या. Optometrist, चष्म्याचे दुकान आणि माझा vision plan यांची कुंडली जुळवताना प्रथम एक आजोबांच्या वयाचा डॉक्टर भेटला. माझे डोळे तपासल्यावर त्याचे डोळे पांढरे झालेले मला उने काढूनही स्वच्छ दिसले. माझा डावा डोळा कसा कामातून गेला आहे, त्याला cylindrical eyesight च कशी आहे, stigmatism च कसा आहे वगैरे यथेच्छ निंदा त्याने अगम्य शब्दांत केली. एक तर माझ्या डोळ्याचे हे जे काही पाप उभे राहिले होते ते मी स्वतः केले नव्हते. ज्यांना यासाठी जबाबदार धरता आले असते ते माझे जन्मदाते मात्र कसे कोण जाणे चष्म्याविना सुखनैव या जगात वावरत होते. काकाने, तुला जन्मभर चष्मा लावावा लागणार आहे या एका वाक्यात तपासणीचा समारोप केला होता. आजोबांच्या सरबत्तीने मी गांगरले. मला फक्त नवीन नंबर हवा होता. बाकी भानगडीत, विशेषतः माझ्या डोळ्यांचा असा धडधडीत अपमान करून घेण्यात रस नव्हता. अचानक मला पुलंच्या अपूर्वाई मधला त्यांचे सूट शिवणारा शिंपी आठवला. आजोबांना मी माझ्या मगदुराप्रमाणे त्या प्रसंगाचे भाषांतर करून सांगितले. ते सर्व त्यांच्या डोक्यावरून गेलेच आणि असे काही होईल अशी अपेक्षा नसल्याने त्यांनी फरकन नवीन नंबर खरडून मला वाटेला लावले. तेव्हापासून इथे एका मराठी Optometrist च्या शोधात आहे, कोणाला माहीत असल्यास तडक संपर्क साधा.

आपले द्रव्य खर्चून आपणच कसे कामातून गेलेलो आहोत हे हमखास ऐकून घेण्यासाठी जाण्याची ठिकाणे म्हणजे डॉक्टर आणि केस कापायचे सलून. आजोबांच्या नंतर मात्र जो डॉक्टर मिळाला आहे तो आजवर टिकून आहे . चष्मा सोडला तर माझे डोळे तसे बरे आहेत हे तो मला प्रेमाने सांगतो, आणि खरंच ते बरेच आहेत. यालाच positive thinking म्हणतात.

तर वार्षिक तपासणीसाठी गेले की प्रथम एका मशिनला डोळे आणि नाक लावून बसावे लागते. त्यात हिरवेगार मैदान आणि टोकाला एक फार्महाऊस असा देखावा दिसतो.
one.JPG
या मशीनचा शोध लागल्यापासून आजतागायत हा देखावा बदललेला नाही. कधी त्यात हिमालय, amazon जंगल वगैरे दिसेल तर शपथ. आणि अहो आश्चर्यम ! साधारण तसाच देखावा माझ्या घरापासून १५ मिनिटांवर असलेल्या Sylvan Lake Park च्या वाटेवर आहे. गरजूंनी जाऊन खात्री करून घ्या. रोज बदलणाऱ्या जगातील हे कधी न बदलणारे चित्र बघून माझे डोळे हमखास भरून येतात. त्यामुळे फरकन ओढून एक tissue माझ्या हातात देण्यात येतो. भारतात general कोणीही हे मशीन चालवायचा पण इथे त्यावर एक उंचनिंच आणि टंच बाई असते. आजवर एखाद्या पुरुषाला या ठिकाणी पहिले नाही. बाई तिचा मूड असेल तशी कळ फिरवून तो देखावा कधी स्वच्छ तर कधी अंधुक करते. हा सगळा प्रकार माझा नंबर अदमासे किती असावा हे ठरवण्यासाठी असतो असे वाटते. आजवर त्या मशीनवर कोणी कोणी ज्या काही चुका केल्या असतील त्यांच्या चुकीचा परिणाम म्हणून मला भलभलत्या नंबरांचे चष्मे घालावे लागले असावेत आणि शेवटी माझेच डोळे आहेत, त्यांनी घेतलं असेल जरा adjust करून अशी शंका इथे मला येऊन जाते. नंतर अजून ३-४ मशीन आणि बाईंनी स्वतः: केलेली तपासणी संपते. माझी रवानगी सुरुवातीला म्हटले होते तशा मंद वगैरे प्रकाश असलेल्या खोलीत करून मुझे मेरे हालपे छोडके बाई अदृश्य होतात.

त्या खोलीतला काही मिनिटांचा एकांत हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा वेळ असतो. सर्वप्रथम, मी समोरच्या भिंतीवरच्या आरशात बघून मुद्राभिनयाची माफक तालीम करून घेते. त्या खोलीतला प्रकाश त्यासाठी सर्वार्थाने योग्य असतो. अभिनयाची आवड असेल तर त्याचा लाभ अवश्य करून घ्या. स्वतःचे तोंड बघून लवकरच कंटाळा आल्याने दुसऱ्या तितक्याच महत्वाच्या गोष्टीवर माझे लक्ष जाते. ती म्हणजे माझ्या पाठचा reading chart. तो साधारण असा दिसतो
two.JPG
मी ते जमेल तसे भराभर पाठ करते. हा चार्ट म्हणजे एक दरवर्षी तोच आणि कायमचा फुटलेला पेपर आहे असे माझे ठाम मत आहे. हे सर्व एकदाचे पाठ करून डॉक्टरने सगळ्यांत खालची चांगली दिसणारी ओळ वाचायला सांगितली की शेवटची ओळ त्याला घडाघडा म्हणून दाखवायची आणि फसवायचे असा मी निश्चय करते. खोलीतून बाहेर पडेपर्यंत मला त्याचा विसर पडतो आणि दरवर्षी डोळे फाडफाडून ते वाचण्याचे दिव्य करावे लागते. तुम्ही माझ्यासारखे कसलेले उपनेत्री असाल तर तुम्हाला हे माहीत असेलच पण जाता जाता गरजूंसाठी : या चार्टवर प्रत्येक ओळीत शेवटचे अक्षर म्हणजे एक अंक असतो जो ओळीगणिक वाढत जातो. तेव्हा ते उत्तर तरी निश्चित बरोबर येईल. शेवटच्या मिनिटाला अभ्यास करून काय उपयोग असे म्हणून तो नाद सोडते. मग उरलेला वेळ आजूबाजूला डोळ्याचे भाग, आजार यांची चित्रे, मी बसलेली खुर्ची आणि तिला जोडलेल्या गोष्टी वगैरे बघण्यात बरा जातो. डोळे - माणूस - उत्क्रांती - विश्व वगैरे विचारांची डुलकी येत असतानाच कधीतरी एकदाचा डॉक्टर येतो आणि मी वर्तमानात येते.

काही कारणाने का असेना पण एक पुरुष माझ्या डोळ्यांत खोल खोल बघणार वगैरे कल्पनेने मला एक क्षण poetic वगैरे वाटतं. गरजूंनी बाई optometrist ही शोधून ठेवा. तो, ‘अपनी आँखोंके समुंदरमे डूब जाने दे’ वगैरे म्हणेल असे वाटते. असे तो म्हणाला तर दिवसातून १० वेळा त्याला समुद्रात गटांगळ्या खाव्या लागतील, त्यामुळे असले काही न म्हणता, I am going to take a deep look at your optic nerve’ वगैरे म्हणतो. अर्थात माझी निराशा होते. तेव्हा सध्या मी उर्दू जाणणाऱ्या Optometrist च्या शोधात आहे, कोणाला माहीत असल्यास तडक संपर्क साधा.

मग सर्वबाजूंनी डोळ्यांची रुक्ष तपासणी केल्यावर, आधीच अधू असलेल्या माझ्या डोळ्यांवर लोखंडी फ्रेममधले उने ठेऊन मणामणांचे ओझे लादले जाते. त्यावर बाईंनी भिंगे आधीच लावून ठेवलेली असतात. परीक्षेच्या आधीच माझ्या डोळ्यांचा साधारण निकाल त्यांनी लावलेला असतो, फक्त शेवटच्या १-२ टक्क्यांसाठी मारामारी असते. त्यासाठी मी, डॉक्टर आणि तो reading chart असा तिरंगी सामना चालू होतो. नुसती एक दोन भिंगे इथे तिथे फिरवून हे बरं दिसतंय का ते बरं दिसतंय, एक का दोन, पाच का सहा, उन्नीस या बीस असे multiple choice question तो देत जातो. मी none of the above वगैरे म्हणते. त्याच्या सहनशक्तीची परीक्षा बघते. अखेर सारख्या भिंगबदलामुळे आणि वाचून कंटाळा आल्याने मी शरणागती पत्करते. एकदाचा नवीन नंबर ठरतो. नवीन नंबर आणि जुना नंबर यात जवळजवळ काहीच फरक नाही हे वृत्त कळते. नंबर वाढला नाही म्हणून आनंद करावा की एवढ्या खटाटोपातून काहीच निघालं नाही म्हणून दु:ख हे मला कळत नाही.
three.JPG
तसा सध्याचा माझा डॉक्टर शहाणा आहे. म्हाताऱ्या आजोबांप्रमाणे माझ्या डोळ्यांच्या स्थितीसाठी मलाच बोल न लावता नवीन उने किंवा contact lens त्याच्याच दुकानातून लवकरात लवकर घ्यावेत म्हणून आग्रहवजा सल्ला शक्य तितक्या निर्विकार चेहऱ्याने देतो. इकडच्या तिकडच्या ४ गोष्टी प्रेमाने बोलून माझा मासा बरोबर गळाला लावतो.

आता माझी रवानगी बाहेरच्या दालनात होते. त्याचे ते उनेंचे दुकान आणि भारतातील सराफांची दुकाने यात काहीही फरक नाही , अगदी किंमतही तशीच. शेकडो फ्रेम बघूनही त्यातल्या एक दोनच मला डोळ्यांवर चढवण्याच्या लायकीच्या वाटतात. त्या डोळ्यांवर चढवून आरशात बघितल्यासारखे करून त्यातली एक मी पसंत करते. आपण किती sorted वगैरे आहोत असे स्वप्नरंजन करकरेपर्यंत माझ्या vision plan शी मी निवडलेल्या फ्रेमच्या किमतीचे सूत जुळत नाही किंवा माझा नंबर लक्षात घेता विकणाऱ्या बाईला ती फ्रेम पसंत पडत नाही. पुन्हा एकदा शोधाशोध सुरु होते. चष्मा काढलेल्या आणि बुबुळे dilate केलेल्या अवस्थेत मला फारसे काही काम आणि मत नसते. एकदाचा माझा नंबर, vision plan आणि समोरच्या बाईची सौन्दर्यदृष्टी यांची कुंडली जुळली की मी मम म्हणते. फ्रेम ठरली की मी पुढील गोष्टींसाठी जास्त अडवणूक न करता, त्यातील भिंगांच्या अधिक कलाकुसरीसाठी vision plan च्या ऐपतीबाहेर भरपूर द्रव्य वेचून पुढच्या वर्षीच्या उनेंची सोय करते आणि एक गड सर केल्याच्या आनंदात style मध्ये काळे उने लावून dilate केल्याने दारुड्यासारखी गाडी चालवत विजयोन्मादाने घरी येते.

वर्षानुवर्षांच्या वापराने उनेला एखाद्या अवयवाचा दर्जा मिळाला आहे आणि तसा तो कायम राहील. Contact lens घालाव्या असा क्वचित विचार होतो पण अनेक वर्षांच्या या मित्राशी प्रतारणा करण्याचा धीर होत नाही. मध्यंतरी Lasik चे नवीनच खूळ लोकांनी डोक्यात भरवल्याने मी चौकशी केली तेव्हा माझ्या डॉक्टरने, “ You can if you want to, but I am a chicken, I won't do it if I was you” असा स्वच्छ अभिप्राय दिला. यालाच गिऱ्हाईक बांधून ठेवणं म्हणतात. तो स्वतःही उने लावतोच. त्याने केले की मी ही करेन असा विचार आहे. तोवर तरी, सर्व उपनेत्रधारी बंधू भगिनींना अधिकाधिक cool दिसण्यासाठी शुभेच्छा. ज्यांनी उपनेत्रे न घालता अन्य काही प्रस्ताव स्वीकारला आहे आणि तो ते सतत इतरांना खपवण्याचा प्रयत्न करत असतात अशांना सस्नेह नमस्कार. डॉलरशॉपीपासून जिकडे तिकडे मिळणाऱ्या साध्या reading glasses साठी तासंतास शोधाशोध करणाऱ्यांना तर कोपरापासून नमस्कार आणि ज्यांना २० - २० vision आहे अशा सर्वांनी उगीचच संशयाची उपनेत्रे घालून, तिरक्या दृष्टीने, सत्य आणि कल्पनेची सरमिसळ झालेल्या वरच्या पुराणातील वांग्यांना (वानग्यांना) पाहू नये अशी विनंती करून माझ्या या उपनेत्रपुराणाला इथेच पुढील वर्षापर्यंत एक अर्धविराम ; .....

आमच्या इथे (FL) निघणाऱ्या वार्षिकातला लेख पुनःप्रकाशित

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय Lol

जिज्ञासा +१ , खरंच बर्‍याच दिवसांनी उपनेत्र हा शब्द वाचण्यात आला.

छान Happy
असा अनेकोनेक वर्षे चश्मा लावला की कधीतरी तुमच्या फ्यामिली डॉक्टरला तुमचा एक डोळा मोठा दिसतो किंवा आणि काही तरी होतं आणि तुम्हाला ऑप्टोमेट्रिस्ट सोडून ऑप्थेल्मोलॉजिस्टची अपॉईनमेंट घ्यायला लागते. तिकडे किमान चार वेगवेगळ्या खोल्यांत वेगवेगळ्या मशिन मध्ये डोकं खुपसल्या शिवाय जो टिपिलली म्हातारा डॉक्टर असतो तो तुम्हाला बघत नाही. मग चार वेगवगळ्या टेक्निशिअन बरोबर उगाच हसून काहीतरी स्मॉल टॉक करा, दोन चार जोक मारा अशात दोन तास खर्ची करावे लागतात. त्यात तुम्ही म्हटलंय तसा डायलेटेड डोळ्याने डॉक्टरची फ्रेम केलेली सर्टीफिकिटं वाचणे सोडून काहीही विरंगुळा नसतो.

मग व्हिजन फील्ड टेस्ट म्हणून आपल्या हातात एक बटण दिलं जातं आणि एका डोम शेप्ड पांढर्‍या पडद्यावर दिवा लागलेला दिसला की ते बटण दाबायचं असं सांगतात. सुरुवातीला कुठेच दिवा दिसत नाही. आपल्याला वाटतं आपण ठार आंधळे झालोय, इतका वेळ एकही दिवा दिसू नये!!! आता एकदा तरी ते बटण दाबलंच पाहिजे, नाही तरी केटी लागेल. मग आपण जरा कुठे खुट वाजलं की ते बटण दाबू लागतो, आणि काय आश्चर्य आता क्षणाक्षणाला दिवा दिसू लागतो. एकदा वरती, एकदा खालती, उजवीकडे, डावीकडे, समोर ... मुरारबाजी गत ठो ठो तलवारबाजी नुसती! बटण दाबू दाबू हात दुखेल वाटतं. पण दिवा दिसल्या क्षणी बटण दाबायचा पोरखेळ काही आपण सोडत नाही. मग परत एक लाँग पॉज येतो. परत हृदयाची धडकन वाढते. चायला हातातोंडाशी आलेली टेस्ट फेल जाणार बहुतेक. मग परत गोळ्यांचा वर्षाव. बरं टेस्ट झाली की टेक्निशिअन काय झालं कसं झालं... काही म्हटल्या काही बोलत नाही. डॉक्टर प्रेशर आलंय का बघताना आपण त्याला ही विचारायचं विसरतो. आणि मग गाडी हायवेला लागली की आपण १०० पैकी किती मार्क मिळतील याची अर्धोन्मिलित डोळ्याने फोल त्रैराशिके मांडत बसतो. बरं या सगळ्या उपद्व्यापात डोळ्याचा नंबर वाढलाय का विचारावं तर ते आम्ही नाही सांगणार जा! सांगतातं. त्याच्यासाठी ऑप्टोमेट्रिस्ट परत गाठा!

भारीच
मला 7 वी पासून चष्मा आहे
एक भोचक आजी म्हणली होती की ह्यामुळे लग्न जमताना अडचणी येतील म्हणून
(टीप: आमच्या ह्यांना चष्मा नाही,goggle आहेत खूप)

मस्त खुसखुशीत लिहिलंय , Lol नुकताच नंबर काढायला अशीच सगळी दालनं ओलांडून तपासण्या करत गेलेय . त्यामुळं रिलेट झालं. ते उपनेत्र घालून कूल दिसणं भारीच असतं. मला जवळचा चष्मा लागलाय, तो घालून फोटो काढायचा तर लांबच सगळं धूसर दिसतं . तरी कूल लुकसाठी तो घालून मी फोटो काढते Lol
उपनेत्र शब्द फार आवडला.

@अमितव
उपद्व्यापात डोळ्याचा नंबर वाढलाय का विचारावं...>>>
That is so old fashioned बरंका, दहा पेजेसचे pdf दिलंय या वेळेस , आता डायलेट केलेल्या डोळ्यांनी धृतराष्ट्रागत शोधणे आले !! Lol

@वाट्टेल ते
आता घराऐवजी hot air balloon आलायं आमच्याकडे.
मी तर सारखं ब्लिंक करते , super active रिफ्लेक्सेस मुळे सळोकीपळो करते. उनेला मिचमिच दातांना वँक वँक ..... Biggrin
दरवेळी भराभर ती भिंगं टाकून विचारतात , उजवं बरं आहे की डावं , मला कधीच काहीच फरक दिसत नाही. येड्यागत होतं.

Vision field test >> घेतली नाहीये पण मुलाची चालू असताना पाह्यलंय ते प्रकरण. मला मुलगा १० वी बोर्डाला बसल्यासारखं tension आणि त्याला तो एक बऱ्यापैकी गेम वाटलेला
अमितव - पुढच्या संभाव्य धोक्यांची कल्पना दिल्याबद्दल thanks. आता ophthalmologist शोधायला लागते

>>>>एक भोचक आजी म्हणली होती की ह्यामुळे लग्न जमताना अडचणी येतील म्हणून>>>> फार भोचक आणि नकारात्मक असतात काही जण. म्हणजे तसं असण्याला हरकत नाही पण मग बोलून तरी दाखवु नका ना.
माझ्या उंचीवरुन , लग्न झाल्या झाल्या आणि विचारलेले नसताना, ओळखीची एक गोल्डमेडलिस्ट गायनॅक म्हणालेली नक्की सीझेरिअन. कसचं काय बाळंतपण आणि प्रसुती अगदी मजेत पार पडली.

>>hot air balloon आलायं >> हो हो! हॉट एअर बलून आलंय. असेल लेटेस्ट टेक्नॉलॉजी! Wink Biggrin

>> उजवं बरं आहे की डावं , मला कधीच काहीच फरक दिसत नाही. येड्यागतं होतं. >> अगदी अगदी. दोन चारदा एकदा हे एकदा ते असं कॉईन टॉस उत्तर देऊन झालं की 'पंगतीत वाढताना आपल्या आधीच्या सलग १० लोकांनी नको म्हटलं की त्या वाढणारीला काय वाटेल?' असा विचार करुन ती जे काही वाढत असेल ते मी आपलं थोडं घेतो त्यागत तो टेक्निशिअन नवनव्या लेन्सेस टाकायला लागला की उगाच त्याला वाईट नको वाटायला म्हणून मग मी भलत्या भलत्या लेंसेंसना हो म्हणू लागतो. मग गेल्यावेळेला ह्याला ही बरी वाटत होती आता तीच बेकार म्हणतोय वाटून तो सिलेंड्रिकल, ऑप्टिकल असे भलभलते नॉब ट्युन करायला लागतो.
वत्सा तुला डोळ्याचा नाही डोक्याचा आजार आहे हे तो एकदा ऐकवणारे मला!

छान लेख.
असं ऐकलं आहे की मातुल घराण्यातील (आई, मामा वगैरे) कुणाला उपनेत्र असतील तर ते पुढे संक्रमित होतात. काही शास्त्रीय आधार आहे की निरीक्षण आहे माहीत नाही.

छान खुसखुशीत लेख आहे Happy

अनुभव नसल्याने रिलेट नाही झाले. पण मला आवडतो चष्मा. फक्त लहान वयात तेवढा लागू नये. आताही मी जातो अध्येमध्ये जवळचा नंबर चेक करायला. पण मेला लागत नाही अजून. तरी नवीनच जॉब लागलेला आणि दिवसभर कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसून काम सुरू झालेले तेव्हा निमित्त साधून ॲंटी ग्लेअर चष्मा घेतलेला आणि स्टाईल मारत काम करा, सेल्फी काढा वगैरे धंदे करायचो. पण सध्या गॉगलवरच समाधान मानावे लागते. पण त्यात चष्म्याच्या स्टुडीअस ॲण्ड डिसेंट लूकची मजा नाही.

@अमितव - अक्खी पोस्ट तुफान
@अस्मिता - बलूनची वाट बघते
बाकी चष्मेवाल्या लोकांना लग्नात अडचडी हा प्रकार कालातीत झाला असेल अशी आशा आहे. हा एक वेगळाच angle.