निवांत होतो घेत अढावा आयुष्याची काय कमाई
शुन्यच हाती, जीवन होते श्वासोश्वासाचीच लढाई
आत्मवृत्त मी मोठे लिहिले माराया माझीच बढाई
सत्कर्माची नोंद कराया पुरली होती एक रुबाई
स्वार्थ साधणे जरी मुळाशी, आव आणती उपकाराचा
अंगरखा का शिवेल कोणी? शिंप्याला मिळण्यास शिलाई
दोष स्वतःचा कबूल करणे अवघड जाते भल्याभल्यांना
चेहर्यावरती डाग तरी का व्यर्थ दर्पणाचीच सफाई
धावपळीचे जीवन झाले, वेग जगाया हवा एवढा !
गायन सरता गाण्यामधली मंद भासते शिघ्र तिहाई
एक कोपरा मला न दिसतो जिथे सुरक्षित जीवन आहे
जिथे आसरा घेण्या गेलो तिथे भेटला क्रूर कसाई
गांधीजींना कुठे विसरले! राजकारणी करती सारे
ऑक्टोबरच्या दुसर्या दिवशी फोटोसाठी सूत कताई
छू छू करता भुंकभुंकती, छापे पडती घरोघरी पण
एक इशारा, शेपुट घालुन शांत, हरवते कुठे धिटाई
वारकरी "निशिकांत" असूनी जीवन जगणे अवघड झाले
तुझी सावली हवीहवीशी कृपा असू दे माय विठाई
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
क्या,बात!
क्या,बात!