*शेवट की प्रारंभ? *
गेले नऊ दिवस आपण घटस्थापना ते विजयादशमी, आपल्यातील शक्ति जागवण्याचा मागोवा घेतला. या सगळ्याचा केंद्रबिंदू कोण? तर आपण स्वतः ! आपल्यातच दिव्यतेचा अंश आहे. आपल्यातच सर्व शक्ती आहेत. आपल्यातच सौंदर्य आहे आणि आपल्यातच आनंद आहे. ते शोधण्यासाठी आपल्याला बाह्य जगातून आपल्या अंतर्मनात जावे लागेल.
कस्तुरी मृगासारख आपणही आयुष्यभर आपली कस्तुरी बाहेरच शोधत फिरत असतो. पण आता मात्र आपल्याला जाणीवपूर्वक ती कस्तुरी आपल्या आतच शोधायची आहे.
सूफी संत कवी रुमी म्हणतात,
'And You? When will you start your journey inwards?'
आपण एखाद्या झाडाकडे बघतो तेव्हा त्याच्या फांद्या, पानं, फुलं, फळं त्याच्यावरचा मोहोर हे सगळा आपल्या डोळ्यात भरतं. पण हा सगळा बहर येण्यासाठी मुख्य काम चालू असतं ते जमिनीच्या आत मध्ये. झाडाची मुळं जितकी घट्ट राहतात खोलवर रुजतात तितकं झाड वर जास्त बहरुन येतं.
आपल्यालाही आपलं खरं काम असंच आपल्या आत मध्ये करायचं आहे आणि जर ते केलं तर आपलं बाह्य जीवन सुद्धा बहरून येईल.
मग यावर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण आपला प्रवास सुरु करायचा का? आपल्यात काय काय दडले आहे हे शोधायचं का? स्वतःवर प्रेम करायचं का?
स्वतः स्वतःचा मित्र झालो तर आपल्याला कधी एकटेपणा येईल का? स्वतः स्वतःचा आनंद असलो तर दुःख आपल्या जवळपास फिरकेल का? स्वतःच्या शक्ती स्वतःच जागवल्या तर आपल्याला कधी दुबळे किंवा असहाय वाटेल का?
तुझा तू चि गुरु तुझा तू चि शिष्य
तुझा तू चि उपदेश घेई नामा
या सगळ्या केवळ साहित्यामध्ये वाचायच्या, तत्त्वज्ञानाच्या गोष्टी नाहीत. हे सगळं करता येण्यासारख आहे. फक्त त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. कठीण आहे, कळतय पण वळत नाही अशा सबबी सांगून स्वतःला टाळू नका. करून बघा. स्वतःचा शोध हा आयुष्यभराचा प्रवास आहे. तो जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर, कुठल्याही वयामध्ये सुरू करता येतो. आपण स्वतःचं तेवढ देणं नक्कीच लागतो.
गीतेच्या सहाव्या अध्यायात मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: |
आपण स्वतःच आपला उद्धार करू शकतो. आपण स्वतःला हीन किंवा कमी दर्जाचे मानू नये. आपणच आपला सर्वात श्रेष्ठ मित्र आणि आपणच आपला सर्वात मोठा शत्रू.
================
आम्ही जेव्हा नवरात्रीमध्ये ही लेखमाला लिहिण्याचा संकल्प केला त्यावेळी आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती की आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद मिळेल. पण तुम्ही सगळ्यांनी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून रोज लेख वाचलेत,आमचं कौतुक केलं आणि प्रतिसाद दिलात त्याबद्दल आम्हा दोघींतर्फे आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आज आमच्या लेखमालेचा शेवट असला तरी तुमचा स्वतःशी संवाद आतापासून सुरू होऊ दे. त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
भारती दंडे - पूजा जोशी
पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105
दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108
तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ
https://www.maayboli.com/node/77109
चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)
https://www.maayboli.com/node/77111
पाचवी माळ- संतुलन , समन्वय (Balance)
https://www.maayboli.com/node/77112
सहावी माळ- स्वतःची ओळख, स्वतःचा स्वीकार स्वयंपूर्णता (self awareness, self acceptance)
https://www.maayboli.com/node/77113
सातवी माळ- स्मितहास्य, प्रसन्नता, आनंद (Joy, Smile, Happiness)
https://www.maayboli.com/node/77114
आठवी माळ- स्थिरता, शांतता (Stillness, calmness)
https://www.maayboli.com/node/77115
नववी माळ- प्रेम, दया, सहानुभूती (Love, Compassion)
https://www.maayboli.com/node/77116