नव्याने प्रश्न उदभवला

Submitted by निशिकांत on 19 October, 2020 - 00:32

नव्याने प्रश्न उदभवला

गळ्याचा फास जेंव्हा सैल झाला, श्वास गदमरला
कशी पोसायची पोरे? नव्याने प्रश्न उदभवला

कधी? केंव्हा? मरायाचे असे स्वातंत्र्य का नाही?
जरी मी कैकदा मृत्यू तसा जगण्यात अनुभवला

जगाला अन् मलाही मी असा फसवीत जगलो की!
दिखाऊ हास्य वरती पण उसासा आत भळभळला

तुझी चाहूल आली अन् कधी नव्हतेच ते घडले
मनाचा कोपरा अन् कोपराही लख्ख लखलखला

नवा सत्संग पाहोनी नवे ऐकावया गेलो
बसोनी व्यासपीठावर नवाही तेच बडबडला

उगा सावरकरांची का अशी हेटाळणी करता?
विरोध्यांनो निखारा घ्या, पुजा जो काल धगधगला

उद्याचे विश्व आहे फक्त तुमचे, या चिमुरड्यांनो
भरारी घ्या, म्हणू द्या विश्व सारे, देश झगमगला

तिरंगाही नको त्यांना न वंदेमातरमही पण
फुटिरवाद्या तुझा मुखडा किती रक्तात बरबटला?

मुले "निशिकांत "आता स्पष्ट म्हणताहेत बाबांना
नको इतिहास, तुमचा काळ आहे आज मावळला

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users