मायबोलीवर तुतानखामूनवरचा लेख वाचल्यावर प्राचीन इजिप्तचा इतिहास यावर काल उत्सुकतेपोटी थोडे वाचन केले. हा खूप मोठा व्याप्तीचा विषय आहे व जगभरात अजूनही त्यावर संशोधन सुरूच आहे. पण जे काही वाचले ते नोंदवून एका दृष्टिक्षेपात धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
प्राचीन इजिप्तमधल्या फॅरोंच्या (राजे) राजवटीच्या परंपरेला इ.स.पूर्व ३१५० मध्ये सुरवात झाली, ती इ.स. पूर्व ३० पर्यंत सुरु होती. म्हणजे आजच्या काळापासून साधारणत: पाच हजारहून अधिक वर्षांपूर्वी सुरु झालेली हि परंपरा तब्बल ३१२० वर्षे सुरु होती. या काळात साधारणपणे १७० फॅरोंनी इजिप्तवर राज्य केले असा उल्लेख आढळतो. पण ते एकसंधपणाने नव्हे. यात सुद्धा बरेच (तेहतीस) राजघराण्यांचे (Dynasties) कालखंड आहेत. आणि या कालखंडांच्या मधून मधून तब्बल तीन वेळा आलेले अराजकतेचे कालखंड.
यातले वेधक/रंजक कालखंड खालीलप्रमाणे.
सुरवातीचा राजकीय कालखंड:
इसपू ३१५० पासून ४६४ वर्षांचा काळ. यात नार्मर (Narmer) हा पहिला फॅरो होऊन गेला (इ.स.पूर्व ३१५०)
पहिला फॅरो नार्मर
अखंड इजिप्तवर राज्य करणारा हा पहिला फॅरो. याच्या पूर्वीच्या इतिहासाचे फारसे तपशील उपलब्ध नाहीत. पण राजकीयदृष्ट्या इजिप्त अखंड नव्हते असे आढळते. छोटी राज्ये आणि त्यांचे राजे/प्रमुख होते. इजिप्तभर पसरलेल्या या छोट्या टोळीवजा राज्यांना नार्मरने एकत्र आणले. पुढे मेनेस याने मेम्फीस येथे (सध्याच्या कैरोजवळ) इ.स.पूर्व ३००० च्या दरम्यान राजधानी स्थापून अखंड इजिप्तचा तो पहिला फॅरो बनला. नार्मर आणि मेनेस हे एकच असावेत असे काही इतिहासतज्ञ सांगतात.
जूना कालखंड (पिरॅमिड्सचा कालखंड असेही म्हणतात):
इसपू २६८६ पासून ५०५ वर्षांचा हा कालखंड. याच काळात बहुतेक पिरॅमिड्स बांधले गेले. जोसेर (Djoser) या फॅरोने पहिला पिरॅमिड बांधला जो आजही अस्तित्वात आहे.
पहिला पिरॅमिड इसपू २६३० मध्ये बांधलेला जोसेरचा पायरी पिरॅमिड
याच कालावधीत खुफू हा फॅरो होऊन गेला. त्याने इजिप्तमधला सर्वात अवाढव्य व सर्वात उंच असा गीझाचा ग्रेट पिरॅमिड बांधला. चारशे ऐंशी फूट उंचीचा (म्हणजे साधारणपणे ४५ मजली उंच इमारतीइतका) हा पिरॅमिड बांधल्यानंतरच्या पुढच्या चार हजार वर्षांच्या काळात ही जगातील सर्वाधिक उंचीची मानवनिर्मित रचना होती.
गीझाचा ग्रेट पिरॅमिड
इतका अवाढव्य पिरॅमिड बांधणाऱ्या खुफूची मात्र एक छोटासी मूर्ती वगळता बाकी कोणतीही ओळख आजच्या काळात शिल्लक नाही. त्याच्या नंतरच्या काळातील शतकांत त्याच्या मोठ्या पुतळ्यांची नासधूस झाली. इतकेच काय तर त्याच्या या महाकाय पिरॅमिड मधून लुटारूंनी लूट केली, त्यात धनसंपत्ती सोबत त्याचा जतन केलेला मृतदेह (ममी) सुद्धा चोरून नेला.
खुफूचा पुतळा
पहिला मध्यंतरीचा कालखंड:
इसपू २१८१ ते इसपू २०६० हा काळ इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता होती. राजांमध्ये उत्तर आणि दक्षिण अशी राजकीय विभागणी झाल्याने बराच गोंधळ होता. दंगली, धार्मिक स्थळांची व पुतळ्यांची तोडफोड, लुटालूट, नासधूस असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. म्हणून या काळाला "काळा कालखंड" असेही म्हणतात. पण यात अखेरीस दक्षिणेकडील थिबन राजांनी वर्चस्व मिळवून पुन्हा एकवार अखंड इजिप्त अस्तित्वात आले.
मध्ययुगीन कालखंड:
इसपू २०६० नंतर इसपू १६५० पर्यंत अनेक फॅरोज होऊन गेले. इजिप्तची पहिली महिला फॅरो सोबेनेफेरू याच कालावधीत होऊन गेली.
दुसरा मध्यंतरीचा कालखंड:
इसपू १६५० ते इसपू १५५० याकाळात पश्चिम आशिया मधून काही टोळ्या इजिप्तमध्ये घुसल्याने पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली.
नवे साम्राज्य:
इसपू १५५० पासून पुढे ४७३ वर्षांचा काळ. प्राचीन इजिप्तच्या इतिहासातीत हा सर्वात भरभराटीचा कालखंड. अनेक महान व आजच्या घडीला सुद्धा प्रसिद्ध असणारे फॅरो याच काळात होऊन गेले. विशेषतः अठराव्या राजघराण्यातील फॅरो जास्त प्रसिद्ध आहेत. त्यातील काहींची ओळख:
१. पहिला एमोसीस (Ahmosis I):
याने इजिप्त मधला अखेरचा पिरॅमिड बांधला (ज्याचे आज फक्त अवशेष शिल्लक आहेत). यानंतर पिरॅमिडची पद्धत बंद झाली.
२. हॅतशेप्सूत (इसपू १५०७ - १४५८):
इजिप्तची दुसरी महिला फॅरो. सर्वात यशस्वी फॅरो म्हणून हिच्याकडे पाहिले जाते. त्या काळातील प्रथेनुसार तिने भावाशीच लग्न केले होते. आपल्या जन्माच्या वेळी आपल्या आईला दैवी साक्षात्कार झाल्याचे पटवून देण्यात ती यशस्वी ठरल्याने जनमानसात ती अत्यंत आदराचे स्थान बाळगून होती. पती निधनानंतर देवालाच तिने आपला पती मानले होते. आणि कागदोपत्री वास्तविक तिचा दोन वर्षाचा सावत्र मुलगा हा फॅरो होता व ती त्याच्यासोबत काम पाहत होती.
हॅतशेप्सूत
३. अखनाटेन व नेफेर्तीती:
प्राचीन इजिप्तच्या सर्वाधिक सुबत्ता आणि भरभराटीच्या काळात अखनाटेन या फॅरोने त्याची पत्नी नेफेर्तीती समवेत राज्य केले. पण त्यांनी राजधानी अखेतातन या नव्या ठिकाणी हलवली (आज या जागेचे अमर्ना असे नाव आहे). त्याने एकाच म्हणजे अटेन (सूर्यदेव) या देवाला पूजण्याचे फर्मान काढले. त्याआधी इजिप्तमध्ये सूर्य हा देव मानला जायचा, पण एकाच देवावर श्रद्धा ठेवण्याचा प्रघात नव्हता. हा बदल इजिप्शियन जनतेला रुचला नाही. अखनाटेन व नेफेर्तीती यांच्या मृत्यूबाबत नक्की पुरावे सापडत नाहीत. पण अखनाटेन च्या मृत्यूनंतर त्याचे पुतळे आणि इतर स्मृती नष्ट करण्यात आल्या. याचा मुलगा म्हणजेच तुतानखामून.
अखनाटेन व नेफेर्तीती
४. तुतानखामून (इसपू १३४२ - १३२५):
हा अवघा अठरा-एकोणीस वर्षाचा राजकुमार फॅरो. इ.स. १९२२ साली सापडलेल्या त्याच्या ममी मुळेच तो अधिक प्रसिद्ध झाला. जिवंत असताना सुद्धा जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली नसेल तितकी प्रसिद्धी तब्बल तीन हजार दोनशे सत्तेचाळीस वर्षांनी या त्याच्या ममीला मिळाली असे म्हटले जाते.
तुतानखामूनची ममी
५. रॅमेस्सेस दुसरा (इसपू १३०३ - १२१३):
प्राचीन इजिप्तच्या सर्व फॅरोज मध्ये वादातीतपणे सर्वाधिक गाजलेला व महान फॅरो जर कोणाला मानले जात असेल तर तो म्हणजे रॅमेस्सेस दुसरा. निष्णात लढवय्या असलेल्या रॅमेस्सेसने फॅरो झाल्यांनतर स्वत:ला देवाचा अवतार घोषित केले होते. हा इतका प्रभावशाली आणि शक्तिशाली होता कि याच्यानंतरच्या अनेक फॅरो नी स्वत:ला रॅमेस्सेस म्हणवून घेतले (जसे कि रॅमेस्सेस तिसरा चौथा इत्यादी). याने धर्मस्थळे, पुतळे आणि प्रार्थनास्थळे उभारण्यावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला. इजिप्तवर सर्वाधिक म्हणजे तब्बल सदूसष्ठ वर्षे रॅमेस्सेसने राज्य केले. आणि वयाच्या एक्क्याण्णव (९१) व्या वर्षी त्याचे निधन झाले (त्या काळात सरासरी आयुर्मान हे चाळीसच्या आसपास होते). रॅमेस्सेसच्या पश्चात त्याच्या कित्येक बायका आणि नव्वदहून अधिक मुले होती.
रॅमेस्सेस दुसरा
मृत्युनंतर रॅमेस्सेसच्या मृतदेहाचे जतन (ममी) करून तो व्हॅली ऑफ किंग्स (जिथे अनेक फॅरोजच्या ममीज जतन आहेत) मध्ये ठेवण्यात आला. पण नंतरच्या काळात लुटारूंपासून रक्षण करण्यासाठी या ममीचे अनेकदा स्थलांतर करण्यात आले. आज हि ममी कैरोच्या म्युझियममध्ये जतन करून ठेवली आहे.
१९७४ साली या ममीचे विघटन होत आहे असे लक्षात आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ती फ्रांसमध्ये पॅरीस येथे न्यावी लागली. तेंव्हा इजिप्तच्या सरकारने तेथील कायद्यानुसार या ममीसाठी पासपोर्ट बनवला होता. परदेशात ममीची तस्करी होऊ नये हा सुद्धा त्यामागचा उद्देश होता असे मानले जाते. रॅमेस्सेस हा एकमेव फॅरो आहे ज्याला मृत्यूनंतर तीन हजार वर्षांनी इजिप्तचा पासपोर्ट दिला गेला आहे.
रॅमेस्सेस दुसरा याच्या ममीचा पासपोर्ट
तिसरा मध्यंतरीचा कालखंड:
यानंतर तिसरा अराजकतेचा कालखंड येऊन गेला. याच कालावधीत मूळ इजिप्तच्या फॅरोंच्या दीर्घकाळ साम्राज्यांचा कालखंड अस्ताला गेला असे मानले जाते. कारण पुढे पर्शियन लोकांचे आक्रमण झाले व तिथून पुढचे इजिप्शियन फॅरो अल्पकाळ राज्य करणारे ठरले. एमासीस दुसरा (Amasis II) हा पर्शियन आक्रमणाआधी दीर्घकाळ राज्य केलेला शेवटचा इजिप्शियन फॅरो मानला जातो.
एमासीस दुसरा
अखेरचा कालखंड:
इसपू ५२५ मध्ये पर्शियाच्या सायरस या सम्राटाने (Cyrus the Great) आक्रमण करून इजिप्तवर पहिल्यांदा ताबा मिळवला. पण इजिप्तच्या पूर्वीच्या एका राजघराण्याशी संबंधित असलेल्या एमिरटेस (Amyrtaeus) याने इसपू ४०४ मध्ये पर्शियन आक्रमण उलथून टाकले आणि तो इजिप्तचा फॅरो बनला. पण त्यानंतर इसपू ३४३ मध्ये पर्शियनांनी पुन्हा आक्रमण करून इजिप्तवर दुसऱ्यांदा ताबा मिळवला. तेंव्हा तिथे दुसरा नेक्तनेबो (Nectanebo II) या फॅरोची सत्ता होती. या युद्धात तो हरला व पळून गेला. त्यानंतर त्याचा थांगपत्ता लागलाच नाही.
नेक्तनेबो दुसरा
नेक्तनेबो दुसरा हा मूळ इजिप्शियन असलेला अखेरचा फॅरो ठरला. नार्मर पासून सुरु झालेली तब्बल अठ्ठावीसशे वर्षांची इजिप्शियन फॅरोंची परंपरा कायमची संपुष्टात आली. कारण त्यानंतरचे इजिप्तचे सारे फॅरो हे एकतर मूळचे पर्शियन, ग्रीक किंवा रोमन किंवा त्यांचे वंशज होते.
ग्रीकांचा कालखंड:
दुसऱ्या आक्रमणानंतर इजिप्शियन प्रजेने पर्शियन राजवटीला कधीच आपले मानले नाही. पण त्यानंतर काहीच वर्षांत म्हणजे इसपू ३३२ मध्ये ग्रीक सम्राट अलेक्झांडर (उर्फ सिकंदर) याने इजिप्तवर आक्रमण केले. तेंव्हा फारसा विरोध न करता पर्शियन राजाने अलेक्झांडरपुढे शरणागती पत्करली व इजिप्त त्याच्या हवाली केले. अलेक्झांडरने इजिप्शियन प्रजेचा विश्वास आधीच संपादन केला होता. त्यांना तो मसीहा वाटत होता. किंबहुना, अलेक्झांडर हा दुसऱ्या नेक्तानेबोचाच मुलगा असल्याची वदंता पसरली होती. पर्शियन आक्रमणात युद्धात हरलेला दुसरा नेक्तनेबो हा ग्रीसला पळून गेला व तिथे त्याने जादुगाराचे सोंग घेऊन ग्रीसची राणी ऑलिम्पियास (राजा फिलीप दुसरा याची पत्नी) हिच्याशी संबंध प्रस्थापित केले व त्यातून अलेक्झांडरचा जन्म झाला, अशी दंतकथा इजिप्तमध्ये प्रचलित झाली होती. आपल्याच पूर्वीच्या फॅरोचा वंशज असल्याचा समज झाल्याने प्रजेला अलेक्झांडर विषयी आपुलकीच वाटत राहिली.
सम्राट अलेक्झांडर
टॉलेमी कालखंड:
इसपू ३२३ मध्ये अलेक्झांडरचा मृत्यू झाला आणि ३०५ मध्ये अलेक्झांडरचा जवळचा मित्र असलेल्या जनरल टॉलेमीने स्वत:ला इजिप्तचा फॅरो घोषित केले. तिथून टॉलेमी वंशाची राजवट सुरु झाली. ती इसपू ३० पर्यंत म्हणजे पावनेतीनशे वर्षे. यात सर्वात रंजक आणि चर्चिली गेलेली वर्षे आहेत ती अखेरची उणीपुरी एकोणीस वर्षे. अर्थातच क्लिओपात्राची!
क्लिओपात्रा (इसपू ६९ - ३०):
आतापर्यंत उल्लेख केलेले तीन हजार एकशे वर्षांचे फॅरोंचे कालखंड एकीकडे आणि अखेरचा वीस वर्षाचा क्लिओपात्रा या सुंदर फॅरोचा कालखंड एकीकडे.
क्लिओपात्रा
क्लिओपात्रा हि टॉलेमीच्या वंशातील टॉलेमी सातवा याची कन्या. खरेतर हि सुद्धा क्लिओपात्रा सातवी. कारण टॉलेमी वंशात त्या आधी क्लिओपात्रा नावाच्या सहा राजकन्या होऊन गेल्या होत्या. पण तिच्या सौंदर्यामुळे, तिच्या आयुष्यात घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे आणि तिच्या एकंदर धाडसी, कारस्थानी व राजकीय वर्चस्व राखून इजिप्तला रोमन साम्राज्यापासून वाचवण्याच्या धडपडीमुळे ती इतिहासात खूप प्रसिद्ध झाली.
क्लिओपात्रा हि जितके वर्णन केले जाते तितकी सुंदर नव्हती असाही एक मतप्रवाह आहे, त्याबाबत मतभिन्नता आहे. सौदर्याच्या व्याख्या काळानुसार बदललेल्या आहेत. कदाचित आताच्या तुलनेत ती तितकी सुंदर नसेलही. सौदर्यापेक्षा हुशारी आणि धूर्तपणासाठी ती जास्त प्रसिद्ध होती असेही महते जाते. काही असेल ते असेल. पण तिच्या काळात तिच्यावर दोन बलाढ्य रोमन नेतृत्व भाळली होती आणि तिसऱ्यालाही ती आपल्या जाळ्यात गुंतवू शकत होती हे मात्र कुणीही नाकारत नाही.
क्लिओपात्रा हि इजिप्तची अखेरची फॅरो ठरली. तिच्या वडीलांच्या (इजिप्तचा फॅरो टॉलेमी सातवा) काळात रोमन साम्राज्य बरेच बलाढ्य झाले होते. ज्युलियस सीझर रोमन सम्राट होता. प्रत्यक्षात त्यांने इजिप्तवर आक्रमण केले नसले तरी हल्ला न करण्याच्या बदल्यात टॉलेमीकडून भरपूर द्रव्य घेऊन इजिप्तला आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते. टॉलेमीच्या सातवाच्या मृत्यूनंतर तत्कालीन प्रथेनुसार क्लिओपात्रा व तिच्या भावाकडे (टॉलेमी आठवा) इजिप्तची सत्ता आली. तरीही इजिप्तवर अद्याप अप्रत्यक्षपणे ज्युलियस सीझरचेच नियंत्रण होते. पण या दोघा बहिण भावांत मोठा बेबनाव झाल्याने यादवी माजली आणि त्यातून पुढे इजिप्तच्या राजकीय पटलावर प्रचंड नाट्यमय व तितक्याच गुंतागुंतीच्या अशा घटना घडत गेल्या. सत्ता वाचवण्यासाठी क्लिओपात्राने जंगजंग पछाडले. त्यासाठी तिने सीझरशी प्रेमाचे संबंध जोडले. त्यातून त्यांना एक मुलगाही झाला. पण नंतर ज्युलियस सीझरची हत्या त्याच्या सिनेटर्सकडूनच झाली. आणि रोमवर सीझरचा जवळचा मानला जाणारा जनरल मार्क एंटोनी याचे वर्चस्व वाढू लागले. क्लिओपात्राने त्याच्याशीही प्रेमाचे संबंध जोडले. त्यातून त्यांना तीन मुले झाली. पण सीझरचा पुतण्या व दत्तकपुत्र ऑक्टॅव्हियन याला हे सहन झाले नाही. कारण मार्क एंटोनीचे त्याच्या बहिणीशी लग्न झालेले होते. तसेच सीझरची हत्या घडवण्यामागेसुद्धा क्लिओपात्राचा हात असल्याचा त्याला संशय होता. सीझर, एंटोनी यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून क्लिओपात्रा इजिप्त व रोमवर वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे असा दाट संशय ऑक्टॅव्हियनला होता. परिणामी एंटोनी व ऑक्टॅव्हियन यांच्यात जुंपली. अखेर ऑक्टॅव्हियनने रोमवर आपली पकड मजबूत करून इजिप्तवर हल्ला केला. हे कळताच मार्क एंटोनी क्लिओपात्राच्या बाजूने युद्धात उतरला. पण क्लिओपात्राने आपली नेहमीची चाल खेळून आपल्या सौंदर्याच्या बाणाने घायाळ करत ऑक्टॅव्हियनला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढायला सुरवात केली. ऑक्टॅव्हियनने प्रेमात पडल्याचे नाटक केले खरे पण इजिप्तविरोधात आक्रमण आणखीन तीव्र केले. आपला पाडाव लागत नाही हे क्लिओपात्राच्या लक्षात आले. पुढे काही गुंतागुंतीच्या नाट्यमय घटना घडत गेल्या. त्यातच क्लिओपात्राची हत्या झाली आहे अशी बातमी कळल्याने एंटोनी याने आत्महत्या केली (काही ठिकाणी क्लिओपात्रा ऑक्टॅव्हियनच्या प्रेमात पडल्याचे कळल्याने एंटोनीने आत्महत्या केली असा उल्लेख आहे, तर काही ठिकाणी हे सगळे कारस्थान ऑक्टॅव्हियनने घडवून आणल्याचा उल्लेख आहे).
क्लिओपात्रा आणि ऑक्टॅव्हियन: लुईस गौफिर (Louis Gauffier) यांनी १७८७/८८ च्या दरम्यान काढलेले पेंटिंग
ज्यूलियसचा खून झाला, एंटोनीने आत्महत्या केली आणि ऑक्टॅव्हियन आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत नाही. सर्व बाजूने ती निराश झाली होती. इजिप्त वाचण्याची शक्यता तिला दिसत नव्हती. अशा परीस्थीतीत आपण जिवंत राहिल्यास ऑक्टॅव्हियन रोम मध्ये आपली धिंड काढेल, आपली प्रचंड विटंबना करेल हे तिला कळून चुकले. सर्व बाजूनी कोंडी झालेल्या क्लिओपात्राने मग अखेरीस विषप्राशन करून (कि सर्पदंश करून घेऊन) आत्महत्या केली. अशा रीतीने, अभिजात सौंदर्याची सम्राज्ञी असलेल्या इजिप्तच्या अखेरच्या फॅरोचा इ.स. पूर्व तीस मध्ये वयाच्या अवघ्या एकोणचाळीसव्या वर्षी अंत झाला.
तिथून पुढे इजिप्त हे ऑक्टॅव्हियन म्हणजेच सम्राट ऑगस्टसच्या नियंत्रणाखाली आले. बलाढ्य अशा रोमन साम्राज्याचा एक भाग बनून राहिले.
(लेखातील प्रचि आणि संदर्भ विकिपीडिया तसेच इतर विविध संकेतस्थळांवरून साभार)
एक विनम्र सूचना: विषयाचा आवाका प्रचंड असल्याने काही उल्लेख व नोंदीमध्ये चुका राहू शकतात. तेंव्हा आपणास जर असे काही जाणवल्यास ते कृपया प्रतिसादांतून दाखवून द्या. खातरजमा करून लेखात योग्य ती सुधारणा करेन.
छान आवडले.
छान आवडले.
इजिप्तच्या माहितीसाठी अॅमेझॉनवर एक छान व्हिडीओ आहे.
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
छान ! आवडले.
छान !
आवडले.
इजिप्तचा इतिहास प्रचंड आहे.
इजिप्तचा इतिहास प्रचंड आहे.
छान लेख
छान लेख
आढावा आवडला.. मस्त लेख...
आढावा आवडला.. मस्त लेख...
सखोल माहितीसह सुंदर लेखन.
सखोल माहितीसह सुंदर लेखन.
छान आढावा.
छान आढावा.
सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद! _/
सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद! _/\_ अधिक वाचनानंतर जाणवले कि काही महत्वाच्या फॅरोंचा उल्लेख आवश्यक होता. तो केला आहे. त्याचबरोबर लेखामध्ये इतरही आवश्यक माहितीची भर घातली आहे.
छान लेख.फोटोंमुळे जास्त छान.
छान लेख.फोटोंमुळे जास्त छान.
इजिप्तचा इतिहास वाचायला आवडते.
अतुलजी,
अतुलजी,
छान माहिती दिलीयं लेखात..
आवडला लेख...
माहितीपूर्ण लेख आवडला!
माहितीपूर्ण लेख आवडला!
आवडले लिखाण
आवडले लिखाण
पासपोर्ट मजेदार आहे. छान लेख.
पासपोर्ट मजेदार आहे. छान लेख.
@mrunali.samad, रूपाली विशे -
@mrunali.samad, रूपाली विशे - पाटील, मंजूताई, हर्पेन, सीमंतिनी
सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद.
@जेम्स बॉन्ड: धन्यवाद. लिंक मिळेल का त्या व्हिडीओची?
माहितीपर लेख!
माहितीपर लेख!
माहितीपूर्ण लेख, छान.
माहितीपूर्ण लेख, छान.
चांगली माहिती आणि फोटोज
चांगली माहिती आणि फोटोज