डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३० - पुन्हा पुलावरचा घात?)

Submitted by निमिष_सोनार on 16 October, 2020 - 02:03

भाग २९ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77023

भाग ३० - पुन्हा पुलावरचा घात?

पुणे: तारीख 7, सकाळी 7 वाजेच्या सुमारास
पुण्यातील विश्रांतवाडी, लोहगांव, येरवडा, विद्यानागर वगैरे परिसरातील लोक सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते, तेव्हा त्यांनी आकाशात दोन भव्य आणि वेगळीच हेलिकॉप्टर्स उडत असतांना पाहिले. नेहमीच्या फायटर जेट विमानांच्या आवाजाची सवय असतांना हा आवाज जरा वेगळाच वाटत होता.

"हे काय? आज लोहगांव विमानतळावरून सकाळी 8 ऐवजी लोकांच्या कानठळ्या बसवायला एकदम 7 वाजता जेट प्रॅक्टिस सुरू केली की काय?
"अरे, नीट बघ. ते फायटर प्लेन नाहीत. आतापर्यंत न पाहिलेले वेगळेच हेलिकॉप्टर दिसत आहेत. त्यावर लिहिलेले कंपनीचे नाव पण वेगळेच दिसतेय, स्वागत!"
"मला वाटते मागे तो व्हीडिओ नव्हता का आला टीव्हीवर? ज्यात चार मुखवटेधारी माणसांनी शास्त्रज्ञ डॉक्टर का कोण ते त्यांना मारायची धमकी दिली आहे ती तारीख उद्याची आहे!"
"हो ना! आधीच आपल्या शहरात नाकाबंदी आणि सुरक्षा वाढवली आहे. मला वाटते त्या व्हीडिओनंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीतरी हालचाल होतेय!"
"युद्ध तर नाही ना होणार? ते व्हीडिओ मधले पाच मास्कवाले आपल्या शेजारच्या देशातील दहशतवादी असावेत. त्या लोकांचे हे षडयंत्र असावे! अनेक देशांतील बरीच स्मारके नाहीशी झालीत. ते लोक म्हणे माणसांना एक लिक्विड खायला देऊन किंवा शरीरात टाकून छोट्या पेशीत रूपांतर करतात!"
"हो ना, अरे! आणि त्यात बदल करून पुन्हा त्यातून मेंदू माणसाचा आणि शरीर प्राण्यांचे असे सजीव ते तयार करत आहेत किंवा त्यातून पुन्हा माणूस तयार झाला तर तो त्या वाईट संस्थेच्या आज्ञेनुसार कार्य करतो!"

"हो. मी तर माझ्या जवळचा पाळीव कुत्रा एके दिवशी सकाळी सकाळी अंधारात झेड पुलावर जाऊन सोडून आलो. कोण जाणे तो प्राणी नसून एखाद्या गुंड माणसाचा मेंदू असलेला कुत्रा असावा?"

पुण्यात ठिकठिकाणी अशाच पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्या होत्या.

विविध न्यूज चॅनेलवर या दोन हेलिकॉप्टर्सची तीच तीच दृश्यं वारंवार दाखवली गेली! जगभरातील अनेक न्यूज चॅनेल्स हे प्रक्षेपण लाईव्ह दाखवायला लागले.

"काय सांगशील अनघा, काय वाटते तुला? तू आता लोहगांव विमानतळाबाहेर उभी आहेस! काय एकंदरीत स्थिती आहे तिथली? कोणती हेलिकॉप्टर्स आहेत ती?"
"किशोर, इथे पत्रकारांना आतमध्ये जाऊ देत नाही आहेत. पण विमानतळावर असलेले लष्करी अधिकारी म्हणतात की त्या दोन अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणार्थ असलेल्या एका मोहिमेचा हा एक भाग असून स्वागत या एका नव्या संस्थेच्या चार स्पेशल एजंट्सना घेऊन हे हेलिकॉप्टर आले आहेत. त्यांच्या सोबत इतर स्वागत-फायटर्स आहेत! चौघे एजंट म्हणे सुपरहिरो आहेत. त्या चार जणांपैकी दोन जण पुण्यात आणि दोन मुंबईत जाणार आहेत. एकाचे नाव डिटेक्टीव्ह निगेटिव्ह असे कळाले असून इतर तिघे एजंट त्याचे साथीदार आहेत, असे कळते!"
"म्हणजे अनघा? एका साध्या डिटेक्टीव्हला एवढे मोठे काम दिले आहे? आणि आपल्याला चक्क सुपरहिरो ची मदत घ्यावी लागते आहे? काय गंमत चालवली आहे यांनी? प्लब्लिकला वेडे समजतात की काय हे? असे सुपरहिरो खऱ्या आयुष्यात असतात तरी का कुठे? "

"हो ना किशोर! मलाही काही कळेनासं झालंय, मी आणखी काही प्रश्न येथील अधिकाऱ्यांना विचारते!"

अनेक न्यूज चॅनेल्सचे प्रतिनिधी, कॅमेरामेन आणि त्यांच्या व्हॅन्स यांची तिथे गर्दी झाली होती.

तेवढ्यात तिथे आतमधून विमानतळाबाहेर काळा कोट आणि हॅट घातलेला माणूस, त्याच्या बाजूला आणखी एक जण आणि मागे दोन लेडीज होत्या. त्यांनी विशिष्ट प्रकारचे पोशाख घातले होते असे न्यूज चॅनेल वाल्यांना जाणवले.

अचानक विमानतळाबाहेर एक अग्निशमन दलाची गाडी आवाज करत आली.

अनघा डिटेक्टिव्हला प्रश्न विचारू लागली.
"तुम्हीच का ते डिटेक्टीव्ह निगेटिव्ह?"
"होय मीच तो! कृपया जास्त प्रश्न विचारू नका, मला लवकरच त्या अग्निशमन दलाच्या गाडीच्या शिडीवर चढायचे आहे!"
"काय? तुम्ही आग विझवायला आलेत? एवढ्या दुरून हेलिकॉप्टरमधून? कुठे लागली आहे आग? आणि त्या दोन VIP चे काय होणार? काय चाललंय काय?"
"सध्या मला जास्त काही सांगायला वेळ नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की हा त्या मोहिमेचाच भाग आहे. आग वगैरे लागलेली नाही. या गाडीच्या शिडीवर चढून मी संपूर्ण पुणे शहर नजरेखाली घालणार आहे. गाडी दिवसभर पुण्यात फिरणार! मला आपोआप आधीच समजतं की शहरात कुठे काही गुन्हा होणार आहे का ते! आणि त्या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे RH अक्षरानुसार चार जण आहेत. दोन डॉक्टर आणि दोन अणु शास्त्रज्ञ! त्यापैकी दोन पुण्यात तर दोन मुंबईत आहेत. त्या चौघांचेही संरक्षण आम्हाला करायचे आहे! त्यापैकी पुण्यातील दोघांपैकी एक गणेशखिंड रोडवर राहतात तर दुसरे मनपा भवनच्या मागे. त्यांचे संरक्षण आम्ही दोघे करणार तर मुंबईतील दोघेजण नरिमन पॉईंट परिसरात राहतात त्यांचे रक्षण दोन्ही लेडीज एजंट करतील!! "
कॅमेराकडे बघत अनघा म्हणाली, "हे बघ किशोर! एकंदरीत असा प्रकार आहे! एकीकडे हे असे आहे आणि दुसरीकडे सर्व लोक आधीच घाबरलेत कारण आता कोणताही प्राणी, कीटक, पक्षी हा माणसाचा मेंदू असलेला स्मार्ट आणि म्हणून घातक असलेला असू शकतो. तसेच जगभरातील अनेक महत्वाची ठिकाणे गायब झालीत त्यामुळे लोकांत घबराट आहे! "
"खरं आहे अनघा! कदाचित ही जगाच्या अंताची सुरुवात तर नसेल? एकेक करून सर्व मानव छोट्या पेशीत किंवा त्यांना प्राण्यात रुपांतर करून तसेच महत्वाची ठिकाणे गायब होतील आणि पृथ्वीवर काहीच उरणार नाही, कदाचित फक्त प्राणी, कीटक, पक्षी हेच उरतील?"
"मलाही तसेच वाटते आहे किशोर! पण आता आपण ही चर्चा नको करायला नाहीतर लोक आणखी घाबरतील!"
"ठीक आहे अनघा! बरं त्यांना विचार की ते इतर तिघांची नावे काय आहेत?"
डिटेक्टीव्ह निगेटिव्ह आणि अजून एक जण तोपर्यंत अग्निशमन दलाच्या गाडीवर चढला होता आणि दोन लेडीज एका काळ्या निळ्या भक्कम कारमध्ये मागे बसल्या, पुढे दोन गार्ड आणि गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
"डिटेक्टीव्ह जी, तुमच्या इतर तिघा साथीदारांची नावे काय आहेत? आणि अशा पद्धतीने शिडीवर चढून तुम्ही काय सिद्ध करणार आहात?"
शिडीवर चढता चढता थांबून डिटेक्टीव्ह म्हणाला, "हा माझा साथीदार हाडवैरी! त्या दोन जणी होत्या त्यांची नावे आहेत निद्राजीता आणि मेमरी डॉल! त्या मुंबईला जात आहेत. आणि शिडीवर चढून मी काहीही सिद्ध करणार नाही तर साध्य करणार आहे! आता आम्हाला आमचे काम करू द्या!"
कॅमेराकडे बघत अनघा म्हणाली, "हे बघ किशोर! एकंदरीत असा मूर्खपणा सुरु आहे! दर्शकांना आम्ही सांगू इच्छितो की दिवसभर आम्ही आपणासमोर या फिरत्या डिटेक्टीव्ह गाडीचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार आहोत!"

डिटेक्टीव्ह निगेटिव्ह बराच उंच शिडीवर चढला होता, तो म्हणाला, "प्लीज, आमच्या मागे येऊ नका. तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो!"
अनघा म्हणाली, "नाही आम्ही काळजी घेऊ. आम्ही तुमच्या मागे येणारच! आणि तुम्ही स्वतःला सुपरहिरो म्हणवता मग आमची रक्षा नाही करू शकत तुम्ही?"
डिटेक्टीव्ह म्हणाला, "तुमच्याशी मला जास्त वाद घालायचा नाही! तुम्हाला वाटेल ते करा! जशी तुमची मर्जी!"

विमानतळावरील अधिकारी आणि बंदूकधारी फायटर्स तिथून निघून गेले आणि नंतर दोन्ही हेलिकॉप्टर्स लोहगांव विमानतळावरच कव्हर्ड एरियात पार्क करण्यात आले.

मग अग्निशमन दलाची गाडी वेगाने शहराकडे निघाली. 509 चौक आणि तिथून येरवडा भागातून ती संगमवाडी पुलाकडे जाऊ लागली. न्यूज चॅनेल वाल्यांच्या मागे मागे पोलिसांची व्हॅन पण येत होती. तोपर्यंत निद्राजीता आणि मेमरी डॉल ची गाडी खडकी बाजार मार्गे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली होती.

अग्निशमन दलाच्या गाडीच्या शिडीवर उंच चढलेला आणि हातातल्या दुर्बिणीतून टेहळणी करणारा काळा कोट हॅट घातलेला डिटेक्टिव्ह त्यांच्या मागे धावणाऱ्या न्यूज चॅनेल्सच्या गाड्या असे दृश्य पुणे शहरात सकाळी सकाळी दिसत होतं. सगळयांना हे टीव्हीवर लाईव्ह दिसत होते.

संगमवाडी पुलाच्या खाली तोंडावर हातरुमाल बांधलेला एक माणूस उभा होता. त्याच्या एका हातात साखळी होती ज्याच्या दुसऱ्या टोकाला एक रागीटपणे गुरगुरणारी रानमांजर बांधलेली होती. दुसऱ्या हातात मोबाईलवर तो माणूस बातम्या बघत होता. ती अग्निशमन दलाची गाडी संगमवाडी पुलावर येण्याची तो वाट बघत होता. न्यूज चॅनेलवाले आयतेच त्याला गाडीचा ठावठिकाणा सांगत होते. त्याला कालपासूनच सूचना मिळाल्या होत्या की आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तो तयार होताच. त्या एरियातला वाईट टीमचा इंचार्ज तोच होता. अग्निशमन गाडी संगमवाडी पुलावर आली आणि त्या माणसाने रानमांजराच्या पुढच्या दोन पायांपैकी उजव्या पायात बंदूक दिली आणि सांगितलं, "तो शिडीवर चढलेला माणूस आहे ना, त्याला गोळी मार. लागलीच मेला पाहिजे तो. त्याच्या चेहऱ्यावर डायरेक्ट गोळी मार!"

रान मांजर गुरगुरत पुलावर धावत आलं. त्याच्या पायातल्या पिस्तूलकडे कुणाचं लक्ष नव्हतं. ते वेगाने पळत जाऊन अग्निशमन गाडीकडे धावत आलं आणि त्याने एक उंच उडी मारली. त्याने पुढचा उजवा पाय माणसाच्या हातासारखा वर करून पिस्तूलचा ट्रिगर दाबला. गोळी वाचवायच्या नादात डिटेक्टिव्ह निगेटिव्ह तोल जाऊन शिडीवरून खाली रस्त्यावर पडला आणि बेशुद्ध झाला. पोलीस व्हॅन मधील एका जणाने रान मांजराच्या हातात बंदूक पाहिल्याने व्हॅनच्या टपावर चढून रान मांजराला गोळी मारली. त्यात रान मांजराचा मृत्यू झाला. प्लॅन चुकला पण कमीत कमी डिटेक्टिव्ह निगेटिव्हला बेशुद्ध करण्यात पहिल्याच दिवशी यश आलं या आनंदात त्या पुलाखाली असलेल्या माणसाने काढता पाय घेतला आणि तो त्याच्या घरात गेला आणि पुन्हा न्यूज चॅनेल बघू लागला.

जखमी डिटेक्टिव्हला संचेती हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते. वाईट टीम आनंदात होती. त्यांचा प्लॅन विफल करायला आलेल्या प्रमुख व्यक्तीलाच त्यांनी पहिल्याच दिवशी बेशुद्ध केले होते. कदाचित तो मरेल सुद्धा! त्याच्या बरोबर असलेला तो हाडवैरी? त्याला संपवायला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल! त्यासाठी प्लॅन करायला पुण्यातील वाईट टीमच्या आणखी एका व्यक्तीला त्या रानमांजरवाल्या माणसाने कॉल केला.

या प्रकाराने हाडवैरी सुद्धा हादरला कारण मोहिमेतील पहिल्याच प्रयत्नाला असे वाईट घडले. तोही हॉस्पिटलमध्ये इतर पोलिसांसोबत डिटेक्टिव्हची काळजी घ्यायला थांबला.

काही वेळाने पोलिसांनी न्यूज चॅनेल वाल्यांना परत पाठवले. डिटेक्टिव्हच्या प्रकृतीबद्दल त्यांना पोलिसांकडून वेळोवेळी सांगण्यात येईल या आश्वासनानंतर ते परत गेले.

पण प्राणीमित्र संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला. अनेक वाद, विवाद, चर्चा, कुचर्चा सुरू झाल्या. काही अधिकाऱ्यांना यासाठी धारेवर धरण्यात आले.

"हे बरोबर नाही. तुम्ही असे प्राण्यांना गोळी नाही मारू शकत. क्रौर्य आहे हे!"
"अहो पण, तुम्ही स्वतः लाईव्ह बघितलं की ते रानमांजर मानवी मेंदू असलेला वाईट टीम चा वाईट प्रयोग होता. त्याला नसतं मारलं तर त्याने स्वागत च्या एजंट ला गोळी मारली असती!"
"हे बघून सगळे लोक प्राण्यांची कत्तल करायला मागेपुढे बघणार नाहीत!"
"असे होणार नाही मॅडम. खात्री बाळगा. स्वागत टीम आणि लष्कर विनाकारण कोणत्या प्राण्यांवर हल्ला करणार नाहीत!"
"पण मॅडम, काही प्राणी हे यांत्रिक आहेत तर काही मानवी मेंदू असलेले कृत्रिम पद्धतीने वाईट टीमने तयार केलेले प्राणी आहेत!"
"होय, आम्हाला माहीत आहे पण म्हणून खऱ्या निष्पाप प्राण्यांना मारण्याचे लायसेन्स तुम्हाला मिळत नाही हे लक्षात ठेवा!"
"नक्की मॅडम, आम्ही काळजी घेऊ!"
"आम्हाला आश्वासन हवे, लेखी आश्वासन!"
"ठीक आहे. ए! लेटरहेड आण. आम्ही लिहून देतो. काही ठोस कारण सापडल्याशिवाय स्वतःहून कुणीही कोणत्याच प्राणी, पक्षी, कीटक, जंतू वगैरे यांच्यावर हल्ला करणार नाही! समोरून त्यांनी हल्ला केल्यास स्वतःच्या जीवाच्या बचावासाठी कृती करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे! "
थोड्या वेळानंतर-
"हे घ्या मॅडम!"
"हे सगळीकडे प्रसारित करा. पत्रकार परिषद घेऊन जाहीर करा सगळीकडे!"
^^^

Group content visibility: 
Public - accessible to all site users