डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग २२ - परिवर्तन)

Submitted by निमिष_सोनार on 14 October, 2020 - 06:55

भाग २१ ची लिंक: https://www.maayboli.com/node/76990

भाग २२ - परिवर्तन

त्या दरम्यान एका स्त्रीने नेत्रावर खालच्या मजल्यावर हल्ला केला होता. हे कळले तरी डेकवरील सुनिल च्या संरक्षणार्थ असलेले दोन्ही फायटर तिथेच सुनिल जवळच राहिले होते...

त्याचे झाले असे की, नेत्रा पहिल्या मजल्यावरील हवेशीर कॉरिडॉरमध्ये समुद्राकडे बघत उभी होती तेवढ्यात पाण्यातून वर सूर मारत एक स्त्री डायव्हरच्या पोशाखात जहाजावर उडी मारून आत आली आणि सरळ नेत्रावरच तिने अनपेक्षितपणे हल्ला केला. एका हाताने त्या हल्लेखोर स्त्रीने नेत्राच्या मानेभोवती विळखा घातला. त्यावेळेस निद्राजीता जवळच होती. ती पळतच आली. त्या हल्लेखोर स्त्रीच्या एका हातात एक दंडगोलाकार वस्तू होती आणि तिला दोन्ही बाजूनी झाकणे होती. तिच्या अविर्भावावरून असे वाटत होते की तिला ती दंडगोलाकार वस्तू उघडून त्याच्या आधारे काही करायचे होते. निद्राजीताने हल्लेखोर स्त्रीवर वेगाने उडी मारली आणि तिच्या हातांचा नेत्राच्या मानेभोवती असलेला विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला. स्वागतचे इतर फायटर्स तिथे जमा झाले पण हल्लेखोर स्त्रीला जिवंत पकडायचे म्हणून तिला गोळी मारायची नाही असे खुणेने नेत्राने त्यांना बजावले.

निद्राजीता ही द्वंद्वयुद्धात पारंगत होती. तिच्यात अशी शक्ती होती की समोरचा जसा फाईट करेल त्या प्रकारच्या फाइट्स लगेच समोरच्याकडून आत्मसात करून ती लगेच तसे वार आपोआप क्षणार्धात शिकून परतवून लावू शकत होती. नेत्राच्या मानेभोवतीचा विळखा सुटताच नेत्रा खाली पडली आणि इतर दोघींमध्ये जुंपली.

तोपर्यंत आपले काम संपवून सुनिल आणि ते दोन्ही फायटर्स डेकवरून खाली आले होते. डेकवरच्या सारंग सोबत दृष्टीने केलेल्या पाठलागातून पाहिलेल्या विचित्र दृश्याचा धक्क्यातून सावरत नाही तोवर त्याला आता हे बघावे लागले.

नेत्राला जहाजावरील एका सुरक्षित रूममध्ये हलवण्यास इतर फायटरनी सुरुवात केली, तोवर निद्राजीताशी लढतांना त्या लाल ड्रेसमधील फायटर स्त्रीने अचानक निद्राजीताला पायात पाय अडकवून खाली पाडले आणि स्वतःच्या पॉकेटमधून एक छोटा विषारी चाकू काढला आणि वेगाने नेत्राकडे मानेवर फेकून मारला. त्यामुळे नेत्राच्या मानेला जखम होऊन नेत्राला वेदना होऊ लागल्या...

यामुळे निद्राजीता विचलीत झाली आणि सावरणार, तोवर फायटर्सनी बंदुकीतून हल्लेखोर स्त्रीवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पण त्या चुकवत त्या स्त्रीने वेगाने कॉरिडॉरकडे धावायला सुरुवात केली. तिला पकडण्यासाठी निद्राजीता तिच्या दिशेने वेगळ्या मार्गाने पळाली. मग हेल्लेखोर स्त्रीच्या खांद्याला आणि मानेला एक गोळी लागली. पण त्या स्त्रीने जहाजावरुन वेगाने पाण्यात उडी मारली आणि समुद्राच्या खोल पाण्यात दिसेनाशी झाली. पाण्यात उडी मारण्याआधी वेगाने पळण्याच्या गडबडीत तिच्या हाताचा धक्का जहाजाच्या एका दरवाज्याला लागून तिच्या हातातील ती दंडगोलाकार वस्तू तिची पकड सुटून जहाजावरच पडली आणि घरंगळत एके ठिकाणी कोपऱ्यात जाऊन थांबली. ती वस्तू परत घ्यावी की न घ्यावी याचा विचार करून ती क्षणभर थांबली पण मग लगेच तिने विचार बदलून पाण्यात उडी मारली.

या घटनेच्या वेळेस बरेच जण जहाजाच्या त्या मजल्यावर नव्हते. तिथे हाडवैरीसुद्धा पळतच आला.

सायली, सुनिलच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या लोकांना गाडीसहित स्फोटात मारल्याचा बदला म्हणून त्यांनी त्या स्त्रीला नेत्राला मारण्यासाठी पाठवले असावे की आणखी दुसरा कोणता उद्देश होता?

एखाद्या छोट्या पाणबुडीतून किंवा जवळपास असलेल्या एखाद्या छोट्या बेटावरून किंवा कुठूनतरी पोहत ही स्त्री अचानक जहाजावर आली असल्याची शक्यता होती पण हे सर्व अंदाज होते.
त्या स्त्रीचा समुद्रात पाठलाग करण्यासाठी निद्राजीताने डायव्हरचा पोशाख खालून रक्ताच्या रंगाच्या पाण्याच्या दिशेने तिचा समुद्रात पाठलाग करायचा प्रयत्न केला पण ती कुठे दिसली नाही. कारण तोपर्यंत ती दृष्टीआड निघून गेली होती. दोन गोळ्या लागल्यानंतर तिचे जिवंत असणे आता शक्य नव्हते असा अंदाज तिने बांधला. मग निद्राजीता थोड्या वेळाने परत जहाजावर आली.

जहाजावर घरंगळत एके ठिकाणी कोपऱ्यात स्थिर झालेल्या त्या दंडगोलाकार वस्तूला सुनिलने उचलले. ती कोणत्यातरी वेगळ्याच धातूपासून बनलेली होती. त्या वस्तूच्या प्रत्येक टोकाला एकेक लाल वर्तुळ सुनिलला दिसायला लागले. आतापर्यंत सजीवांच्या विचारांतील नकारात्मक लहरी त्याला लाल वर्तुळाच्या स्वरूपात दिसायच्या पण आता या सिलिंडरमध्ये असे काय आहे की ज्याच्या भोवती लाल वर्तुळ त्याला दिसते आहे?

सुनिलने ती वस्तू उचलली आणि जहाजावरील त्याच्या रुममधल्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली आणि धावतच नेत्राला जिथे नेले होते त्या रूममध्ये पोहोचला. तेवढ्यात ओली झालेली निद्राजीतापण तिथे आली.

सायलीने डॉक्टरी ज्ञानाचा वापर करून नेत्राला वाचवण्याचे हर प्रकारे प्रयत्न केले. जहाजावरील त्यांच्या टीममधील डॉक्टर्स पण काही करू शकले नाहीत. पण त्या चाकूतील विषारी द्रव्य नेत्राच्या शरीरात पसरले होते. एका वेगळ्याच प्रकारचे ते विष होते आणि शरीरावर जलद गतीने वाईट प्रभाव टाकत होते. नेत्रा काळी निळी पडली आणि मग तिचा मृत्यू झाला. ही बातमी स्वागतच्या शहरातील कार्यालयांत आणि नेत्राच्या घरी कळवण्यात आली. आता माघारी फिरणे शक्य नव्हते, त्यामुळे प्रेत जहाजावरील शवागारात सांभाळून मग घरी परत नेणे शक्य नव्हते त्यामुळे आता घरच्यांच्या परवानगीने त्याचे जहाजावर इलेक्ट्रिक दहन करण्यात आले.

यातून सर्वजण लवकरच सावरले आणि सर्वांनी शहरांतील कार्यालयातील महत्त्वाच्या व्यक्तींशी सल्ला मसलत करून नंतर जहाजावर तातडीची मीटिंग बोलावली आणि एकमताने सुनिलला स्वागत संस्थेचा तात्पुरता अध्यक्ष नियुक्त केले. सुरुवातीला सुनिल नाही म्हणाला कारण अचानक आलेली ही फार मोठी जबाबदारी कशी पेलवेल याबद्दल तो कमालीचा साशंक होता पण शेवटी परिस्थितीची आणि काळाची गरज म्हणून त्याने शेवटी ही जबाबदारी स्वीकारली. नंतर मीटिंगमध्ये सर्वांना त्याने जहाजाच्या डेकवर उभे राहून नेत्रावर हल्ला होण्याआधी आपल्या दृष्टीने काय काय पाहिले होते ते सांगितले. सारंग आणि बीचवरील त्या प्रसंगबद्दल सांगितले. नेत्राचे पासवर्ड आणि फक्त तिच्याच फिंगर प्रिंटने उघडणारी सर्व उपकरणे आणि इतर गोष्टी आता मास्टर की ने अनलॉक करुन मग त्याचा तात्पुरता ताबा सुनिलकडे देण्यात येणार होता. त्यातील एका लॉकर मध्ये नेत्राने लिहिलेले मृत्युपत्र सापडले, ज्यात तिने अलाईड सिक्रेट फोर्सेसबद्दल जहाजावर स्पष्टीकरण दिलेल्या अनेक गोष्टी होत्या, अनेक खुलासे होते, काही खासगी गोष्टी होत्या ज्या वेगळ्या पानांवर लिहिल्या होत्या ज्या फक्त तिच्या कुटुंबासाठी होत्या. संस्थेसाठी लिहिलेल्या एका पत्रात असेही लिहिले होते जे सर्व जणांनी वाचले:

"सुनिलला मी लहानपणापासून ओळखते. त्याला मिती जीवांकडून मिळालेल्या शक्तीमुळे आणि त्या शक्तींचा नैतिकतेने वापर करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयाच्या आधारे तसेच आतापर्यंत त्याने पोलीस डिपार्टमेंटला केलेल्या अतुलनीय मदत आणि योगदानामुळे, त्याच्या अंगी असलेल्या हुशारीमुळे, व्यवहार ज्ञानामुळे आणि त्याने रणजित यांच्या हाताखाली ट्रेनिंग घेऊन कमावलेल्या शारीरिक ताकदीमुळे तसेच अनेक लोकांना त्याने निराशेतून बाहेर काढले या त्याच्या सामाजिक योगदानामुळे मला असे निश्चितपणे वाटते की यदाकदाचित मला काही झाले तर आपल्या संस्थेचा पुढचा प्रमुख म्हणून सुनिलच योग्य आहे!"

मुंबईत असलेल्या नेत्राच्या वकिलांशी संपर्क साधून या संदर्भात कायदेशीररित्या त्याचा सल्ला घेण्यात येऊनच मग सगळे निर्णय घेण्यात आले होते. या संस्थेबद्दल आवश्यक तेवढी गुप्तता कशी ठेवायची हे त्या वकिलांना माहिती होते. नेत्राच्या त्या पत्रानंतर आता सुनिलला स्वागत संस्थेचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. सगळे अधिकार त्याला बहाल करण्यात आले.
^^^

Group content visibility: 
Public - accessible to all site users