ए क्रश ऑन गौरी देशपांडे..

Submitted by पाचपाटील on 21 September, 2020 - 08:34

माझ्या ज्या अनेक 'क्रश' होत्या आणि अजूनही आहेत,
त्यातलीच एक गौरी देशपांडे..!
पूर्वीच्या सिलॅबसमध्ये तिची 'कलिंगड' म्हणून एक कथा होती.. तेव्हाच जराशी ओळख झाली होती.
मग नंतर बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा 'विंचुर्णीचे धडे' वाचलं, तेव्हापासून हा त्रास सुरू झाला.
नंतर कारावासातून पत्रे, तेरुओ, गोफ, उत्खनन, आहे हे असं आहे, दुस्तर हा घाट, थांग, निरगाठी, चंद्रिके गं आणि सर्वांत अप्रतिम म्हणजे एकेक पान गळावया...असा हळूहळू प्रवास होत गेला.
तिची पुस्तकं तथाकथित बेस्टसेलर नाहीत, हे बरंच आहे...! कारण सगळेच जर तिच्याबद्दल असोशीनं बोलायला लागले असते, तर तिनंही नाक मुरडलं असतं कदाचित.. अर्थात, तिचं ते भलतंच लांब नाक मुरडायचं म्हणजे, जरा कठीणच गेलं असतं तिला.. पण ते एक असोच.

तर महत्त्वाचं म्हणजे, तिचं वाचताना तिच्याशी 'रेझोनेट'
व्हायला आपल्यालाच स्वत:ला थोडासा वेळ देऊन नीट बसावं लागतं..म्हणजे असं की ज्या भावनेनं तुम्ही 'सिमॉन द बोव्हार'कडं जाता, त्याच भावनेनं तुम्हाला गौरी देशपांडेंकडं जायला लागतं.. म्हणजे समजा तुम्ही कधी तिचं काही इंटेन्स आणि कोंदवून टाकणारं काही नुकतंच वाचून संपवलं असेल, तर लगेचच उठून तुम्ही भांडी वगैरे घासायला लागू शकत नाही.. नंतरही तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो.. अर्थात तरीही ते बॅकमाईंडला शिल्लक राहतंच..

तिचे नायक-नायिकाही तिच्यासारखेच... बुद्धिमान प्लस भावनिकदृष्ट्या प्रगल्भ तरीही 'हँडल विथ केअर' कॅटॅगरीमधले..!

आपल्याकडे वर्षाला सरासरी तीनच्या हिशेबाने दणादण
पुस्तकं ओतणारे, बहुप्रसवा लेखक/लेखिका काही कमी नाहीत..! आख्खं नेहरू स्टेडीयम हाऊसफुल्ल होऊन जाईल एवढे लेखक तर एकट्या पुण्यातच असतात म्हणे.! आता बोला..!

पण गौरीचं तसं नाही... मोजकं लिहिते, मुद्द्याचं लिहिते, फारच पर्सनल लिहिते आणि तरीही आव न आणता लिहिते, हे विशेष.

तिच्या नायिका, समाज की काय म्हणतात, त्याला फाट्यावर मारून बिनधास्त अनोळखी लोकांमध्ये जगभर वावरणाऱ्या.. पण उगीचच बालिश प्रवासवर्णनं करून डोक्याला वात आणणाऱ्या नसतात, हे फार फार महत्वाचं..!
आमटीत मीठ जास्त झालं म्हणून नैराश्यग्रस्त होत नसतात.. किंवा जरा काही झालं की हंबरडा फोडून रडायला टपलेल्या नसतात त्या..!
तर स्वत:ला इतरांवर न लादता, आपल्या टर्म्सवरच पुढच्याला आपला स्वीकार करायला लावणाऱ्या असतात..!
त्या उगाच इतर नायिकासांरख्या छोट्या छोट्या उड्या मारत नाहीत, तर थेट पंख पसरून झेपावतात..!
आणि अजून एक विशेष म्हणजे, त्या एकटेपणावर एवढा
दांडगा रिसर्च करतात की जे वाचल्यानंतर तुम्हालाच दुखत राहतं आणि मग शांत झोप लागणं अवघड होऊन बसतं, आणि वेगळाच एक प्रॉब्लेम होऊन बसतो.

तिची भाषा काही फार भरजरी आणि अलंकारांनी लगडलेली नसते, पण गाफील राहिलात तर, तुमच्यावर एक खतरनाक अँबुश करायला पुरेशी समर्थ असते ती..!
आणि हे सगळं असूनही तिच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये एक नर्मविनोद किंवा अचूक जागी तीर मारणारे टोमणे
पानांपानांवर विखुरलेले असतात, जे मी अधूनमधून मिटक्या मारत वाचत असतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अनया >> लिंकसाठी धन्यवाद.. तुम्ही खूपच सही लिहिलंय ते.. आवडलं. Happy

@ टवणे सर .. तुम्ही दिलेल्या धाग्यांवरती काही प्रॉब्लेम आहे बहुतेक.. सगळं इंग्रजीमधून दिसतंय ते.

सुरेख परिचय.
आवडती लेखिका.सर्वच कळले असे नाही.पण काहीतरी दमदार वाचल्याची अनुभूती मिळते हे मात्र खरे.

तेव्हापासून हा त्रास सुरू झाला.

पण ते एक असोच.

एकटेपणावर एवढा दांडगा रिसर्च

खटॅक्क.

सगळं काही आवडलं.

खूप छान लिहीलयं. मी दुर्दैवाने एकही पुस्तक वाचले नाही अजून. एकदा भारतवारीत घ्यायला गेले तर मिळाले नाही. पण यादीत आहे. त्यांच्याबद्दल बरंच वाचून My kind of लेखिका वाटतात...

तुम्ही कधी तिचं काही इंटेन्स आणि कोंदवून टाकणारं काही नुकतंच वाचून संपवलं असेल, तर लगेचच उठून तुम्ही भांडी वगैरे घासायला लागू शकत नाही. >>>>
.... अगदी अगदी.
भारावून टाकले पाहिजेच...ही अट माझीही असते वाचन हा एक अनुभव असावा फक्त रंजन नव्हे Happy
नंतरही तुम्ही म्हणता तसे रेसिड्यू कायम राहिला पाहिजे.

आमटीत मीठ जास्त झालं म्हणून नैराश्यग्रस्त होत नसतात.. किंवा जरा काही झालं की हंबरडा फोडून रडायला टपलेल्या नसतात त्या..!>>>> बालिश प्रवासवर्णनं करून >>>> इतका कंटाळा आलायं सांगू.. हे लिहील्याबद्दल आभार. Happy नुसतं आपला शब्दच्छल... आशयघन आणि सकस वाचायला तरसले आहे मी तर.

एकटेपणावर एवढा दांडगा रिसर्च
खटॅक्क.
सगळं काही आवडलं. +1

@ मी_अस्मिता<आशयघन आणि सकस वाचायला तरसले आहे मी तर.>>. Happy
गौरी देशपांडेंची तर वाचाच पण अजून काही पुस्तकं सुचवू शकतो.. मिळाली तर जरूर ट्राय करून बघा.
वन हंड्रेड ईयर्स ऑफ सॉलिट्यूड-- गार्सिया मार्क्वेझ
मादाम बोवारी-- फ्लॉबर्ट
द सेकंड सेक्स-- सिमॉन द बोव्हुआर
द फांऊटनहेड- आयन रॅंड
ॲटलास श्रग्ड- आयन रॅंड
अॅना कॅरेनिना-- टॉलस्टॉय
हंस अकेला, नातिचरामि -- मेघना पेठे

सगळं काही आवडलं. +1>>> तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. Happy

खूप वाचते मी पण असं bang on वाचून बरेच दिवस झाले. विपूसाठी धन्यवाद.
Bang on books यादीसाठी मनापासून धन्यवाद. Happy वाचणारच. Happy

गौरी देशपांडेची २ च पुस्तक वाचली आहेत , तेरुओ आणि अजून एक कोणततरी .

पण तुमचं लिखाण जास्त आवडलं. इतकं समरसून वाचणं आणि वाचल्यावर काय वाटलं ते इतकं छान लिहिता येणं - भारीये बॉस .
कोसला बद्दल चा पण लेख आवडला होता

परिचय आवडला. अरेबियन नाईटस चा त्यांनी केलेला अनुवाद सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तब्बल सोळा भाग आहेत. खूपच वाचनीय आहे ते सुद्धा.

गौरीची सगळी पुस्तकं अधूनमधून वाचतेय गेली वीसहून जास्त वर्षं, अजूनही दर वेळी नवीन काही तरी सापडतच!
तिचं पहिलं पुस्तक वाचलं तेव्हा जे वाटलं त्याच्याबद्दल बोलायला तेव्हा कोणी सापडलं नव्हतं म्हणून झालेला त्रास अज्जून आठवतो.

सहेली, हे अगदी पटलं. मीदेखील कितीतरी वर्षे वाचते आहे. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी मिळतं आणि इतक्या वेळा वाचून हे कसं काय दिसलं नाही, ह्याचा अचंबा वाटतो.

सुंदर परिचय..
द सेकंड सेक्स-- सिमॉन द बोव्हुआर ह्या पुस्तकाचे PDF मला काही दिवसांपूर्वीच एका मित्राने दिले.. अजून वाचायला सुरुवात केली नव्हती.. आता नक्की वाचेन..☺️

+१