हेरगिरीचं अज्ञात जग.

Submitted by Charudutt Ramti... on 20 September, 2020 - 11:03

'राजीव शर्मा' नावाच्या फ्री-लान्स पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीस दिल्ली पोलिसांनी, भारतीय सैन्यातील हालचालींनबाबत अत्यंत गोपनीय माहिती चीन च्या गुप्तहेर संघटनेशी संलग्न लोकांना देत असल्याच्या संशयावरून काल अटक केली. थोडक्यात राजीव शर्मा हा चीन चा भारतातील " गुप्तहेर" म्हणून कार्यरत आहे किंवा त्याच्यावर पोलिसांचा तसा किमान संशय/आरोप आहे. ह्या घटनेची न्यायालयीन प्रक्रिया सुरु होईलच. भारत आणि चीन दरम्यान सीमेवरील अत्यंत तणावग्रस्त परिस्थिती पहाता, भारतात हेरगिरी (espionage) करणाऱ्या देशद्रोह्यांचं हे एक मोठं जाळं चीननं विणलं असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय. मुळांतच कोणत्याही दोन शत्रू राष्ट्रांच्या दरम्यान आकाशात युद्धाचे काळे ढग जमू लागल्यावर हेरगिरीस उधाण येणार ह्यात नवीन काहीच नाही. परंतु ह्या बातमीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाचं कुतूहल जागं करणाऱ्या "हेरगिरी" ह्या विषया संदर्भात कधी काळी वाचनात/पाहण्यात आलेल्या उपलब्ध संदर्भांतून लिहिलेला हा एक लेख.

हेरगिरी हाच मुळी जगाच्या इतिहासात अत्यंत प्राचीन काळापासून ज्ञात असलेला पेशा (Profession) आहे. अगदी इसवीसना पूर्वी साडेतीनशे वर्षं आधी सुद्धा, "राजसत्तेने, परराज्यात धर्म गुरूंच्या वेषात गुप्तहेर पेरून, शत्रू राज्यातील हालचालींची इत्यंभूत माहिती जमा करणे आणि युद्धाबाबत चे निर्णय घेणे" असे कौटिल्याचं राज्यशास्त्र सांगत. गोपनीय माहिती गोळा करणे, खोट्या अफवा पसरवणे, फितुरी निर्माण करणे ही ह्या प्राचीन/इतिहास कालीन गुप्त हेरांच्या प्रमुख जवाबदाऱ्या.

आधुनिक काळात राष्ट्रा-राष्ट्रात होत असलेल्या हेरगिरी मध्ये तंत्र (आणि तंत्रज्ञान) बदललेलं असलं तरी, हेरांच्या जवाबदार्यांच्या बाबतीत बदल झालेला नाही. हेरगिरीचं संबध विश्व् हे अत्यंत जटिल, क्लिष्ट, अविश्वासार्हतेच, आणि मुख्य म्हणजे प्रचंड जोखमीचं. खरा यशस्वी हेर तोच जो कधीच प्रकाशात येत नाही! निदान त्याची मोहीम सुरु असेस्तोपर्यंत तरी. कारण तो जर मोहिमेवर असेल हेर म्हणून परकीय मुलखात, आणि तो जर प्रकाशझोतात आला तर याचाच अर्थ मोहीम फसली. उदाहरणार्थ अर्थातच "राजीव शर्मा" भारता विरुद्ध चिन्यांसाठी साठी हेरगिरी करताना पकडला गेला आणि तो प्रकाशझोतात आला पण ती मोहीम मात्र चांगलीच फसली. ही गुप्तता इतकी असावी लागते, की कित्येक वेळेस हेरांच्या निकटवर्तीयांनी सुद्धा माहिती नसते की आपला हा जवळचा नातलग परदेशी सैन्याचा किंवा सरकारचा "हेर" आहे हे.

वर करणी हे विधान कितीही सिनेमॅटिक वाटत असलं तरी ते निर्विवाद पणे सत्य आहे. हेच पहा. भारताच्या "रिसर्च अँड ऍनालिसिस विंग" ह्या गुप्तहेर संस्थेने ( भारताच्या गुप्त हेर संस्थेस बरेच लोक "रॉ" ह्या संक्षिप्त वचनाने संबोधत असले तरी ते फारसं योग्य नाही. ह्या संस्थेला सरकार दफ्तारि 'आर. अँड ए. डब्लू.' असं म्हंटल जातं कारण ही गुप्तहेर संघटना अजिबात "रॉ" नाही चांगली धूर्त आणि तयारीची आणि आपल्या दोन्ही कपटी आणि कारस्थानी शत्रुंना पुरून उरणारी आहे ). तर ह्या आर. अँड ए. डब्लू. ने पाकिस्तानात १९७५ आपला एक हेर पेरला. पुढे १९७९ साली ह्या हेराने पाकिस्तान आर्मी मध्ये "मेजर" ह्या मोक्याच्या हुद्द्यावर नबी अहंमद शाकीर ह्या नावाने शिरकाव केला. आणि पुढील चार वर्षे हा भारतीय हेर भारताला पाकिस्तान च्या सैन्यातील महत्वाच्या हालचालींची सूचना देत असे १९८३ साला पर्यंत. "त्याने पाकिस्तानात 'अमानत' नावाच्या मुलीशी विवाह सुद्धा केला". ह्या गुप्त हेरास भारतीय गुप्तहेर संस्थेनं आणि प्रशासनातील काही मंडळींनी ह्या हेराची एकंदरच अनन्य साधारण कामगिरी पाहून त्याचं ब्लॅक टायगर हे पदवी वजा टोपण नांव सुद्धा दिलं होतं. ह्या हेराचं मूळ नाव रवींद्र कौशिक. पुढे हे नाव बरंच उशिरानं प्रकाशात आलं. झालं असं की दुसऱ्याच एका भारतीय हेराच्या चुकीमुळे तो पाकिस्तानी सैनिकांच्या कैदेत सापडला गेला आणि त्या दुसऱ्या हेरानं रवींद्र कौशिक चं नावं त्याची उलट तपासणी करणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्या पुढं उघड केलं, रवींद्र कौशिक पाकिस्तान सैनिकांच्या नजरेत आला आणि त्याला पकडलं गेलं आणि ही मोहीम संपुष्टात आली. सांगण्याचा मुद्दा हा की त्यांच्या बायकोला म्हणजे अमानतला सुद्धा आपला नवरा शत्रू देशातील गुप्त हेर आहे हे माहिती नव्हतं, एवढी गुप्तता एक यशस्वी हेर आपल्या अस्तित्वा संदर्भात पाळत असतो.

आत्यंतिक गुप्ततेचं पराकोटीचं उदाहरण म्हणजे "सहमत खान" ही भारताची अशीच एक अत्यंत यशस्वी गुप्तहेर. हे अर्थातच तिचं खरं नाव नाही. तिचं खरं नाव उघडकीस येऊ दिलं गेलं नाही. परंतु सहमत खान म्हणजे Calling Sehmat ह्या पुस्तकांवर आधारित "राज़ी" ह्या गाजलेल्या चित्रपटाची नायिका. INS विक्रांत ह्या भारतीय विमानवाहू नौकेस नष्ट करण्यासाठी म्हणून बंगालच्या उपसागरात खोल समुद्रात फिरत असलेल्या पाकिस्तानच्या 'गाझी' नावाच्या पाणबुडीस भारतीय सागरी क्षेपणास्त्राने जलसमाधी दिली आणि भारताचे होणारे प्रचंड मोठे नुकसान टळले आणि १९७१ च्या भारत आणि पाकिस्तान च्या युद्धास भारताच्या बाजूने प्रचंड कलाटणी मिळाली. सेहमत खान ही काश्मीर मधून लग्न करून पाकिस्तानातील आर्मी जनरल ह्या सेनेतील अत्यंत महत्वाच्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातच ह्या आर्मी जनरल ची सून म्हणून “सासरी” लग्न करून राहिली होती. म्हणजेच तिच्या सासरच्यांनाही पत्ता नव्हता की आपल्या घरात एक शत्रू सैन्याचा गुप्त हेर आपल्या बरोबर रहात आहे. आणि ती चक्क आपली सून आहे. ह्या एका सूनेचा वेष घेतलेल्या ह्या धाडशी भारतीय हेरा मुळे पाकिस्तानची एक संबंध पाणबुडी बंगालच्या उपसागरात (शब्दश:) रसातळाला जाऊन मिळाली.

हे झालं आपल्या भारताच्या शत्रू देशातील हेरगिरीविषयी. पण पाश्चात्य देशात हेरगिरी तर प्रचंड मोठया प्रमाणात आणि त्याहून कितीतरी गुप्त रीतीने केली गेली. मग त्यात फ्रांस मध्ये हेरगिरी करणारी स्वतःच स्वतःच्या पायावर गोळी मारून घेतलेली आणि आयुष्यभर कृत्रिम रित्या बनवलेला एक पाय बसवून घेऊन हेरगिरीच्या जगात वावरणारी Virginia Hall ही अमेरिकेची अत्यंत धाडशी महिला गुप्त हेर असो किंवा वंशाने जर्मन असूनही इतर वंशातील कैद्यांच्या छळ करण्याच्या नाझिंच्या विकृती मनोवृत्ती मुळे नाझिंच्या बद्दल निर्माण झाल्यामुळे राजकीय घृणे मुळे जर्मनीच्या शत्रू राष्ट्रांना अत्यंत गोपनीय माहिती पुरवणारा Klauss Fuchs हा जर्मन अणू शास्त्रज्ञ् असो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर युरोपात हेरांचा चौफेर सुळसुळाट होता. आणि त्याविषयी कित्येक चित्रपट सुद्धा बनले आणि गाजले.

मुळात ह्या गुप्त हेरांची "हेर" म्हणून नेमणूक कशी केली जाते हे एक कधीच न उलगडणारं कोडं असतं. पण साधारण पणे हेरांची भरती आणि नेमणूक दोन वेगवेगळ्या प्रकारे आणि विविध स्तरांमध्ये केली जाते. मुळात कुणा धड धाकट व्यक्तीला "हेर बनायला म्हणून तयार करणं" हे वाटतं तितकं सोपं नाही. हेर म्हणून काम करणं आणि ते सुद्धा शत्रू देशात जाऊन आणि वेषांतर करून वर्षानुवर्षं तिथं राहून तिथली गुप्त माहिती आपल्या देशात पाठवणं हे (जेम्स बॉंड च्या ) सिनेमात दाखवतात तितकं सोपं मुळीच नाही. तो विस्तवाशी आणि जीवाशी खेळ असतो. पकडले गेले की शत्रूकडून ज्या क्रूर पद्धतीने ह्या हेरांचा मनोशारीरिक छळ केला जातो ते पाहता हेर म्हणून काम "करण्यास" एखाद्या व्यक्तीचा होकार मिळवणे ही तितकी सरळ साधी सोपी गोष्ट नाहीये.

इथे दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. हेर म्हणून काम करण्यास काही जण केवळ पैश्याच्या प्रलोभनाने होकार देतात. कारण हेर परदेशात शत्रू राज्यात एकाकी जरी काम करत असला तरी सुद्धा ती एक भूमिगत मानवी साखळी असते. आणि त्या साखळीत सर्व पातळ्यांवरचे ( शिक्षण, बौद्धिक क्षमता वगैरे ) उमेदवार असावे लागतात. अगदी साधे निरोप इकडून तिकडे करणारे इसम (कुरिअर) ते प्रचंड बौद्धिक कौशल्य / स्मरण शक्ती / दुसऱ्यावर छाप पाडणायची कला वगैरे असलेले लिंच पिन एजेंट्स.

पण मग हे हेर, ह्या गुप्त हेर संघटना शोधून आणतात कुठून? आता जर तुम्हाला निरोप आणि महत्वाच्या वस्तू (पासपोर्ट, हत्यारं, इलेक्ट्रॉनिक कंमूनिकेशन डिव्हायसेस वगैरे ) इकडून तिकडे नेणारे ऍजेंट्स हवे असतील तर कधी अगदी तुरुंगात जन्मठेप भोगत सडत पडलेल्या कैद्यांपासून ते बेरोजगार तरुणांपर्यंत, ज्यांना केवळ पैसे हे साधन पुरते अश्या लोकांना गाठले तरी काम भागते. पण जर तुम्हाला एखाद्या मोहिमेवर नजर आणि त्या संदर्भातील इत्यंभूत आणि ठोस माहिती गोळा करून ती त्याच्या हँडलर्स कडे पाठवणारा विश्वासू एजेंट नेमायचा असेल तर मग मात्र "आपल्या विचारसरणी (ideology) करिता" आणि "जाज्वल्य देशभक्ती" करीता हेरगिरी करणाऱ्या प्राण पणास लावणारे देशभक्त गाठावे लागतात (आणि कधी कधी देश भक्ती प्रमाणे "धर्मं" सुद्धा इथे मोठी भूमिका वठवू शकतो ). अर्थात दुसऱ्या प्रकारचे “हेर” म्हणजे देशभक्तीसाठी "हेरगिरी" करणारे हेर हे नक्कीच आदरास आणि सन्मानास प्राप्त आहेत. पण केवळ पैश्याच्या मोबदल्यात हेरगिरी करण्यास मान्य झालेल्या हेरां मध्ये आणि ideology किंवा देशभक्ती साठी हेरगिरी करणाऱ्या हेरांमध्ये जीवन/मरणाच्या जोखीमीचे प्रमाण मात्र अजिबात कमीजास्त नसते. फरक एवढाच राहतो की पैश्यांच्या प्रलोभनासाठी परकीय मुलुखात जाऊन आयुष्य पणाला लावण्यास तयार झालेले हेर जर पकडले गेले तर किंवा नाही जरी पकडले गेले तरी ( "विचार-सरणी" किंवा देशभक्ती च्या अभावी ) केवळ पैश्याच्या प्रलोभनामुळे हेरगिरीच्या पेशा स्वीकारल्या मुळे दोन्ही कडची माहिती गुप्त पणे दोन्ही राष्ट्रांना देऊन शत्रू साठी सुद्धा काम करायला तयार होण्याचा धोका असतो. अश्या हेरांना "डबल एजंट" असं संबोधलं जातं. देशभक्त आणि तत्वनिष्ठे साठी हेरगिरी करण्यास तयार असलेल्या गुप्तहेरां मध्ये हा धोका नसतो. (किंवा नगण्य असतो). प्रत्येकी एका classified information करिता चायनीज हँडलर्स कडून ५०० ते १००० अमेरिकन डॉलर घेणारा हा काल दिल्ली पोलिसांनी पकडला गेलेला राजीव शर्मा अश्याच केवळ पैश्याच्या प्रलोभनापोटी शत्रू देशा साठी काम एक करणारा देशद्रोही हेर. त्याला आयडियॉलॉजि किंवा विचार सरणी ह्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही. आणि असलाच संबंध त्याचा "चायनीज communism च्या आयडियॉलॉजि शी तरी त्यामुळे त्याचा हा देशद्रोहाचा गुन्हा (आणि मुख्य म्हणजे जन्म भूमीशी प्रतारणा केल्याचं पाप) यत्किंचितही कमी होत नाही.

"केम्ब्रिज स्पाय रिंग" हा असाच १९३० साला पासून ते दुसरं महयुद्ध संपून पुढे १९५० सालापर्यंत, ब्रिटन मध्ये कार्यरत असलेला सोव्हियेतच्या के जी बी ह्या गुप्तहेर संघटने साठी हेरगिरीचं काम करत असणारा एक पाच हेरांचा समूह. डोनाल्ड मॅक्लीन, गाय बर्जेस, अँथनी ब्लांट, हेरॉल्ड किम फिल्बी आणि जॉन केर्नक्रॉस हे ते पांच चाणाक्ष हेर. ह्या पाचही जणांचा "जगाच्या कल्याणासाठी सोव्हियेत कम्युनिझम, मार्क्सवाद हेच विचारप्रवाह योग्य आहेत" असा ठाम विश्वास होता. दुसऱ्या महायुद्धात ह्या संघटित हेरांनी प्रचंड माहिती सोवियेत च्या KGB ला दिली. त्यातील हेरॉल्ड किम फिलबी हा डबल एजन्ट होता असं नंतर बरेच उशिरा उघडकीस आलं.

हेरगिरी हा वर म्हंटल्या प्रमाणे जसा ऐतिहासिक आणि प्राचीन असा पेशा आहे तसाच तो पुढील हजारो वर्षे सुरूच राहणार. हेरांमुळे कित्येक युद्धाची पारडी पलटली तर कित्येक युद्धे टळली सुद्धा, आणि पर्यायाने जीवितहानी सुद्धा. फक्त ह्या हेरगिरीचा चेहरा मात्र झपाट्याने बदलतोय. म्हणजे मानवी बुद्धिमत्ता वापरून हेरगिरी जशी इतके वर्षं सुरूच आहे तशीच आता कृतरीम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरून हेरगिरी केली जाणार, किंबहुना ती सुरु झालेली आहे/असावी, अति प्रगत राष्ट्रांच्या कडून. मग त्यात कॉम्पुटर प्रोग्रामिंग करून शत्रू देशातील classified इन्फॉर्मशन संकलित करून त्याचं पृथथकरण करणं आलं किंवा उपग्रह आणि Unmanned Aerial Vehicles (UAVs) म्हणजेच ड्रोन चा वापर करून शत्रुदेशात सीमेवर हेरगिरी किंवा टेहळणी करणं आलं. हे कितीही खरं असलं तरी सुद्धा नैसर्गिक मनुष्य बुद्धीची हेरगिरीसाठी लागणारी गरज मात्र कायमच राहणार.

एकंदरच, भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यात धन्यता मानणारी पाकिस्तानची कुख्यात आय.एस.आय. असो अथवा जर्मनीतील म्युनिक मधील ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशातील निरपराध खेळाडूंना ओलीस धरून ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांना, परदेशात जाऊन पुढे तीस वर्षं सतत शोधून टिपून टिपून ठार मारणाऱ्या इस्त्रायल ची जगतविख्यात मोसाद ही गुप्तचर संघटना असो. झालंच तर ज्या अमेरिकेच्या सी. आय. ए. ने सोविएत विरुद्ध उभा केलेला लादेन नावाचा राक्षस, शेवटी अमेरिकेच्याच जीवावर उठल्यावर मात्र त्याला पाकिस्तानच्या आबोटाबाद मधून शोधून काढणारी गुप्तचर संस्था सुद्धा सी. आय. ए. च होती. आधुनिक जगाच्या इतिहासात गुप्तहेरांचे काम हे अनन्यसाधारण महत्वाचे राहणार हे निश्चित. आणि त्यातले बरेचसे गुप्तहेर हे कधीच प्रकाशात न येता अज्ञात खोल अंधाऱ्या कृष्णविवरात काळाच्या अलिखित इतिहासाच्या पडद्याआड दडून राहणार - हे ही एक शाश्वत सत्य.

चारुदत्त रामतीर्थकर
२० सप्टें. २०२० (पुणे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लेख आहे.
असेच इंटरनेटवर माता हरी आणि एजंट विनोद बद्दल वाचलेली माहिती ही आठवली.
हेराला तो जिथे हेरगिरी करतो आहे तिथे सापडल्यास तुरुंगात कश्या प्रकारे ट्रीट करावे,करू नये,शारीरिक छळावर मर्यादा याचे काही नियम आहेत का?(म्हणजे डिप्लोमॅट ना असतात तसे?)

लेख आवडल्याच्या अभिप्राया बद्दल धन्यवाद "मनिम्याऊ", "mi_anu" आणि "मामी".

@mi_anu >>>> हेराला तो जिथे हेरगिरी करतो आहे तिथे सापडल्यास तुरुंगात कश्या प्रकारे ट्रीट करावे,करू नये,शारीरिक छळावर मर्यादा याचे काही नियम आहेत का? <<<<

हेरगिरी करण्यासाठी शत्रू देशात पाठवलेले हेर पकडले गेल्यावर, त्यांच्यावर 'त्या' 'त्या' देशातील न्यायालयीन प्रक्रिये प्रमाणे आणि तेथील कायद्याप्रमाणे खटला चालतो. पकडल्या गेलेल्या परदेशी नागरिकांवर जागतिक मानवाधिकार परिषदे च्या मूल्यांना अनुसरून आणि आंतरराष्ट्रीय करारांनुसारच सर्व कायदेशीर प्रक्रिया केली गेली पाहिजेअसे नियम आहेत , परंतु बहुतेक वेळेस ते फक्त कागदावरच उरतात प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत. हेर आणि डिप्लोमॅट किंवा राजदूत ह्यांच्यात मूलभूत फरक असा की राजदूत हे नेहमी सरकारी नोकर असतात. परंतु हेर हा बहुदा सरकारी नोकर नसतो तो फक्त एक "एजेंट" असतो. त्यामुळे त्याला ज्या देशाच्या गुप्तहेर संघटनेनं पाठवलं आहे त्या गुप्त हेर संघटनेने त्या हेराशी "आपला काहीच संबंध नाही!" असा का एकदा पवित्रा घेतला ( Denial Strategy ) तर मात्र हेर त्या देशात एकाकी पडतो.

रवींद्र कौशिक शी आपला काहीच संबंध नाही असा पवित्रा भारतानं घेतला ( कारणं वेगवेगळी असू शकतील - ते योग्य की अयोग्य आणि नैतिक की अनैतिक हा वादाचा आणि आणि चर्चेचा मुद्दा निश्चितच आहे ). परंतु अलीकडेच भूषण जाधव ह्यांची पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपांखाली धरपकड झाली तेंव्हा मात्र भारत सरकारने हा खटला आंतर राष्ट्रीय न्यायालयीन पातळीवर लढवत भूषण जाधव ह्यांचा हेरगिरीशी काही संबंध नाही आणि त्यांच्यावर ठेवलेलं आरोप चुकीचे आहेत अशी ठोस भूमिका घेतली आहे. पुढे हा खटला न्यायालयीन पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय वळण घेतो हे पाहणं नक्कीच चित्तवेधक असेल.

सरबजीत सिंग ह्याच्या बाबतीत सुद्धा ( तो हेर होता की नाही , हा पुन्हा वादाचा विषय ) तो तुरुंगात पाकिस्तानच्या शिक्षा भोगत असताना आजारी पडला आणि आणि उपचाराविना अक्षरश: खितपत पडलेला असताना, त्याच्या विषयी कणव असलेल्या भारतीय (सरकारी / गैर-सरकारी) संस्थांनी, अंतर-राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या मदतीने त्याच्यावर उपचार व्हावा म्हणून औषधे पोचवण्याचा प्रयत्न केला पण ती औषधे त्याच्या पर्यंत पोचली का नाही हे शेवट पर्यंत कुणालाच माहिती नाही.

तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात, "नाही"! मानवाधिकार संघटनेनं दिलेल्या संरक्षणा व्यतिरिक्त ( आणि त्याचं पदोपदी उल्लंघन होत असल्यामुळे , त्याला काहीच अर्थ नसल्यामुळे ) डिप्लोमॅट्स किंवा युद्धकैदी ( प्रिझनर ऑफ वॉर्स ) ह्या सरकारी नोकरांना ज्या प्रमाणे जिनेव्हा कराराच्या अंतर्गत "डिप्लोमॅटिक इम्युनिटी" असते तशी कोणतेही विशेष "न्यायालयीन संरक्षण" हेरांना पकडले गेल्यावर मिळत नाही. त्या त्या भूमीच्या संविधान आणि कायद्याप्रमाणे ( आणि मुख्यत्वे राजकीय संस्कृती प्रमाणे ) त्यांना वागणूक दिली जाते. (दुर्दैवाने बहुदा अमानुषच).

मला वाटतं की, मी माझ्या परीने तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण मा.बो. वर कुणी ह्या विषयाचे अंतर-राष्ट्रीय कायद्याचा अभ्यास असलेले वाचक असतील तर ते ह्या तुमच्या प्रश्नावर अधिक समर्पक आणि सखोल तसेच कायदेशीर भाषेत उत्तर देऊ शकतील.

लेख चांगला आहे. जगातील आजवरच्या गाजलेल्या गुप्तहेरांबाबत माहिती दिली आहे. गुप्तहेरांबाबत आणि त्यांनी केलेल्या अथवा त्यांच्याबाबत होणाऱ्या गोष्टी एकंदरच कितपत नैतिक/अनैतिक हा वादाचा आणि आणि चर्चेचा मुद्दा होईल. कारण ते क्षेत्रच तसे आहे.

नोव्हेंबर २००६ मध्ये अलेक्झांडर लीत्वीनेन्को नावाच्या KGB/FSB या रशियन गुप्तचर संस्थांमधल्या माजी अधिकाऱ्याच्या ब्रिटन मध्ये अत्यंत विचित्र पद्धतीने खून झाला होता व त्यामुळे ती घटना जगभर गाजली होती. लीत्वीनेन्को हा रशियामध्ये पूतीन यांच्या कट्टर राजकीय विरोधकांसाठी काम करत होता. पुतीन सत्तेत आल्यावर त्याने पळून जाऊन ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. काही वर्षांनी म्हणजे नोव्हेंबर २००६ मध्ये रशियातून आलेल्या दोन व्यक्तींनी पोलोनियम२१० या अत्यंत घातकी विषारी किरणोत्सर्गी पदार्थाचा अत्यंत सूक्ष्म कण चहाच्या कपात टाकून त्याची हत्या केली होती. (पोलोनियम२१० हे सायनाईडच्या २५० अब्ज पटीने विषारी असते. एक ग्रॅम पोलोनियम२१० मुळे पाच कोटी लोक मरू शकतात व तितकेच आजारी पडू शकतात) हा कण इतका सूक्ष्म होता कि या दोन व्यक्ती पुन्हा रशियाला परत निघून गेल्या व त्यानंतर कित्येक दिवसांनी लीत्वीनेन्को आजारी पडून वेदनादायक अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.

लीत्वीनेन्को ने पूर्वी KGB/FSB साठी काम केल्याने त्याच्याकडे बरीच महत्वाची माहिती होती. व तो ती ब्रिटीश गुप्तचर संस्थाना पुरवत असल्याच्या पुतीन यांना संशय होता. त्यातून पुतीन यांनीच या दोन व्यक्तींना ब्रिटन मध्ये पाठवून त्याची हत्या करवली असल्याचा दाट संशय व आरोप स्वत: लीत्वीनेन्कोने मृत्युशय्येवर असताना केला होता.

मानव पृथ्वीकर आणि atuldpatil , प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

atulpatil : तुम्ही दिलेली बरीचशी माहिती मी वर दिलेल्या लिंक्स मधून wikipedia वर वाचतोय , खूपंच धक्कादायक तरीही रोचक आहे.

पोलोनियम बद्दल मात्र खरं आहे, खूप कमी प्रमाणात हे विष प्रचंड बाधक आणि जीवघेणं असल्यामुळे ह्याचा वापर सायनाईड पेक्षाही घातक आहे. पोलोनियम बद्दल प्रथम कळलं ते "सुनंदा पुष्कर" च्या केस मुळे , सुनंदा पुष्कर चा खून पोलोनियमचा वापर करून विषप्रयोग केल्यामुळे झाला असा एक संशय आहे त्या खुनाचा तपास करणाऱ्यांना , अर्थात ह्याचा हेरगिरीच्या विषयाशी संबंध नाही , पण पोलोनियम किंवा सायनाईड सारखे विष मात्र हे फक्त "हायप्रोफाईल" लोकांनाच हस्तगत करता येते हे ही तितकेच सत्य.

भारताने बाहेरदेशी केलेल्या हेरगिरी सारखे इतर देशांनी भारतात केलेली हेरगिरी सुध्दा बघा.
मद्रास केफे मूवी मधे बालकृष्णन हे केरेक्टर के व्ही उन्नीकृष्णन या खऱ्या रॉ ऑफिसर वर घेतले आहे. त्याला सी आय ए ने सुंदर स्त्रीचा वापर करून जाळ्यात पकडले. त्याचा वापर करून घेतला. नंतर तो पकडला गेला.
रविंदर सिंग हा सुध्दा रॉ मधे सी आय ए साठी हेरगिरी करत होता. त्याच्यावर संशय येऊन आय बी ने पाळत ठेवली तेव्हा रातोरात सी आय ए ने त्याला अमेरिकेत पळवून नेले. हे सगळे घडुन सुध्दा तेव्हाच्या भारत सरकारने याचा मोठा इश्यू का केला नाही याची कारणे आहेत. एक म्हणजे तेव्हाचे परराष्ट्र राजकारण. काँडी राईस यांच्या भारत फेरीच्या जस्ट आधी हे प्रकरण झाले. सरकारला त्या व्हिजिट वर कुठले मळभ नको होते. अजुन एक संभावित कारण म्हणजे रॉ ला तो नको असणे कारण त्याला पाळतीची टीप कोणी दिली हे कळेल आणि त्यातुन अजुन भानगडी निघतील.
रवी नायर या रॉ ऑफिसरला चीनने जाळ्यात पकडले - मेथड सुंदर स्त्री. सेम गोष्ट मनमोहन शर्माची. त्याला त्याच्या चायनीज भाषा शिकवणाऱ्या शिक्षिकेने हनी ट्रॅप केले. रतन सहगल या आय बी च्या काउंटर इंटेलिजन्स च्या खुद्द बॉसलाच एका स्त्री सी आय ए हेराने जाळ्यात पकडले. त्याना तर पालम विमानतळाच्या रन वे जवळ पार्क केलेल्या गाडीतून खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो अवस्थेत पकडले. अमेरिकेन डिप्लोमॅट रेबेका मिंच्यु हिने भारताच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल च्या एका ऑफिसरला जाळ्यात घेतले. तो पकडला गेला.
रॉ च्या अधिकाऱ्यांना फितवण्याचा एक ओब्व्हीयस पॅटर्न दिसतोय

विषावरून पुतीन चे प्रतिस्पर्धी यांच्यावर 'योगायोगाने' रशियात झालेला विष प्रयोगही आठवला.
बॉलिवूड पिक्चर आणि बातम्यांवरून हनी ट्रॅप ही खूप जुनी आणि कॉमन पद्धत आहे असं दिसतं.इतकं असूनही लोकांना संशय येत नाही.किंवा असे काही होण्याचा धोका पत्करूनही नाते जोडले जात असेल इतका एकाकीपणा आयुष्यात आला असेल.

The Fist of God नावाचे एक अनुवादित पुस्तक आहे . मस्त आहे . त्यात सद्दाम हुसेन कसे खरेच अणू बॉम्ब आहे का? किंवा तो बनवण्याची तयारी कुठपर्यंत आली आहे हे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना हवी असते . इराकी सैन्यदलात मोठ्या हुद्द्यावर असलेला एक अधिकारी अमेरिकेसाठी माहिती पुरवत असतो. मोसाद एक हेर बगदाद मध्ये पाठवतो आणि त्याला कॉन्टॅक्ट करून अजून माहिती मिळवतो आणि ज्या ठिकाणे सद्दाम अणू बॉम्ब बनावट असतो ती जागा आणि तो बॉम्ब नष्ट करतात.

छान आहे लेख! हेरगिरीच्या कथा खूप आधीपासून आवडायच्या! वेगळंच जग आहे या गुप्तचरांचं!
मिसळपाववर , मोसाद वर एक जबरदस्त लेखमालीका मागे येऊन गेली! वाचून भारावल्यासारख झालं होतं.
https://www.misalpav.com/node/34116

चारुदत्त यांनी खूपच अभ्यासपूर्ण लिहिले आहे आणि ते लिखाण सध्याच्या भारताच्या परदेशी धोरणास अत्यंत पूरक आहे .
खलिस्तानी अतेरिकी निज्जर मारल्या जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी मारले गेले होते .
या क्षेत्रातील जाणकारानुसार भारताची रॉ संघटना भाड्याचे हल्लेखोर घेवून या कारवाया करत आहे तर काहीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची आय एस आय त्यांना संपवत आहे .
एक मात्र नक्की जागतिक आर्थिक मदती कडे नजर लाऊन बसलेल्या पाकिस्तानला FATAF ग्रे लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी लावल्या गेल्या होत्या त्यात अतेरिक्यांच्या मुसक्या आवळण्याची देखील होती .
म्हणून कदाचित आय एस आय ने पाकिस्तान मधील अतेरीकी संपवण्यास हाथ भार लावला असावा !
खरं खोटे कोणास ठाऊक , पण कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये आश्रयास असलेल्या अतेरिक्यांना आपल्या कोर्टात आणून शिक्षा देणे भारतासाठी अवघडच झाले होते .
पण त्यांचा कोणीतरी काटा काढतय ते चांगलंच आहे .......