चंदर गेल्याचवर्षी एका सहकारी बँकेत नोकरीला लागला होता. मनमिळावु स्वभाव आणि प्रत्येक कामामध्ये झोकुन देण्याची तयारी या गुणांमुळे तो बँकेत चांगलाच लोकप्रिय होता. बँकेने नुकत्याच एका गावात उघडलेल्या शाखेसाठी सर्वोत्तम कर्मचारीवृंद नेमण्याचा संचालक मंडळाचा मानस होता. चंदरचीही या नव्या शाखेची घडी बसवण्यासाठी निवड करण्यात आली. एकटा जीव असल्याने चंदरने फारशी खळखळ केली नाही उलट आपलं काम पाहूनच आपली निवड झाल्याचे समजताच गडी जरासा फुशारुन गेला. सोमवारी नवीन ठिकाणी कामावर हजर व्हायचे होते म्हणुन चंदर रविवारीच आई बाबांचा निरोप घेऊन बदलीच्या गावी जाण्यासाठी निघाला. भर दुपारी खडखडाट करत धुळीचे लोट उडवत बस बदलीच्या गावी पोहचली. आपली कर्मभुमी आलेली पाहुन चंदर आपली भली मोठी बॅग ओढत घाम पुसत बसमधुन उतरला. त्याला पाहुन 'परग्रहावरचा कोणी प्राणी दिसतो' अशा कुतुहलाने बस थांब्यावर टाईमपास करत बसलेली रिकामटेकडी मंडळी माना मोडतील इतक्या वळवुन पहायला लागली. क्षणभर गोंधळुन कपड्यांवरची धुळ झटकत चंदर तिथेच उभा राहिला. आजुबाजुला पहात असतांना बस थांब्यावरील 'हॉटेल फायस्टार' अशी पाटी मिरवणाऱ्या एकमेव कळकट हॉटेलने त्याचं लक्ष वेधुन घेतलं. हॉटेलबाहेर लटकत असलेल्या फोटोत विराजमान झालेले मिथुनदा चहाचा कप हातात घेऊन गालातल्या गालात हसत होते. त्यांना पाहुन आपणही घोटभर चहा घ्यावा असं त्याला वाटलं आणि त्याने हॉटेलकडे मोर्चा वळवला. गिऱ्हाईक हॉटेलकडे येतय हे पाहुन गल्ल्यावर माशा उडवत बसलेला मालक सावरुन बसला आणि बाकड्यावर पेंगणाऱ्या बारक्याला "ए सुकळीच्याss.." अशी दणदणीत हाक मारली.
हॉटेलच्या दारात पाय ठेवणारा चंदर आपलं असं स्वागत पाहुन दचकलाच, पण हे आपलं स्वागत नसुन आपल्या स्वागताची तयारी आहे हे त्याला "बाकड्यावर फडका मार, पंखा लाव फुल स्पीडवर, थंडगार पाणी दे, काय पायजे ते इचार सायेबांना" या मालकाच्या सूचना ऐकुन कळलं. "काय पायजे सायेब? चाय, मिसळ, भजीपाव, शेव, जलेबी?" जलेबीपाशी बारक्याचं मेनुकार्ड संपलं होतं तरी काही राहिलं तर नाही ना, यासाठी तो बुध्दीला ताण देत होता.
"चहा आण स्पेशल" चंदर थकल्या सुरात म्हणाला तसा "किती कप सायेब?" असं विचारुन बारक्याने आपला स्मार्टपणा दाखवल्यावर चंदर काही बोलायच्या आतच गल्ल्यावरचा मालक खेकसला "ए रताळ्या, येक मानुस धा कप चा पितो का? गिऱ्हायकाला चा प्यायला इचारुन रायला का आंगोळ करायला? व्हय की नाई सायेब?" आता चंदरला कळेना की हा आपलं कौतुक करतो आहे की, भर दुपारी हॉटेलमध्ये येऊन फक्त एक कप चहा मागवल्याबद्दल चिडलाय. त्याने फक्त निमुटपणे मान हलवली.
चहा येईपर्यंत बस थांब्यावरचे चार रिकामटेकडे चंदरची चौकशी करायला हॉटेलात येऊन बसले. गावात आलेला पाव्हणा ज्याच्याकडे जायचं त्याचा पत्ता न विचारता सरळ हॉटेलमध्ये जाऊन बसतो हे त्यांना फारच इंटरेस्टींग वाटत होतं. बाजुच्या टेबलावर बसत त्यांनी "राम राम पावणं, इकडं कुणीकडं?" अशी चंदरकडे विचारणा केली. तो पर्यंत चहा आला होता, म्हणुन त्यांच्या प्रश्नाला उत्तर काही उत्तर देण्याऐवजी चंदरने त्यांना चहा विचारला.
"तसा या टायमाला आमी चा घेत नस्तो पण तुमी इतका आग्रह करुन रायले तर.." असं रिकामटेकड्यांपैकी एक जण म्हणत नाही तोच मालकाने बारक्याला 'चार कप चा वाढीव रे' अशी सूचना केली.
नमस्कार चमत्कार करुन झाल्यावर चंदरने त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि गावात रहायला भाड्याने चांगली खोली मिळेल का, अशी विचारणा केली.
आतापर्यंत रिकामे चकाट्या बसलेले ते चौघे एकदम नवीन जबाबदारी अंगावर पडल्याने तावातावाने आपसात चर्चा करायला लागले.
"त्या सदुमामाची खोली हाय ना रिकामी" एकाने विचारल. "नाव नगं काढु त्याचं, त्याचा आज्जा लय कंजुस व्हता. पावण्यानं भाडं दिलं नाही तर रातच्याला छातीवर बसुन गळा पकडेल त्याचा." दुसऱ्याने चहाचा सुर्रकन भुरका घेत मुद्दा मांडला तेव्हा चंदरच्या अंगावर काटाच आला.
हो नाही करता करता चौकातल्या जगनआबाची खोली पाहुण्यासाठी बेस्ट आहे यावर चौघांच एकमत झालं. चहा पिऊन झाल्यावर चंदरने चहाचे पैसे मालकाला देताच, "आवो तुम्ही गावचे पावणे, तेभी ब्यांकवाले, अडीअडचणीला तुमच्याकडेच येणारेत सगळे. मालक काय चा चे पैसे घेईल का तुमच्याकडुन?" एकाने गल्ल्यावर ठेवलेल्या डब्यातुन मुठभर बडीशेप तोंडात टाकत चंदरला अडवलं पण मालकाच्या कपाळावरच्या आठ्या पाहुन चंदरने त्याचं न ऐकता पैसे चुकते केले.
चहापान झाल्यावर आता सगळ्यांच्या अंगात चांगलीच तरतरी आली होती. एकाने जगनआबाला फोन लावुन बँकवाल्या साहेबाला खोली हवी आहे, खोली साफ करुन ठेव म्हणुन निरोप पण कळवला आणि बारक्याला "तुझी सायकल दे रे" अशी विनंतीवजा ऑर्डर सोडली.
"नाही, मला नाही सायकल चालवता येत." बारक्याच्या सायकलची अवस्था पाहुन चंदर चाचरत म्हणाला.
"आवो तुमाला कोण सायकल चालवायला लावतय इथं. आणी तुमी सांगशाल तर सायकल काय इमान पण चालवायला शिकवु आपण. भारीच गमते आहात बुवा तुमी." एकजण खिदळत म्हणाला आणि चंदरची बॅग उचलुन सायकलवर ठेवली.
अशा प्रकारे मोठी कामगिरी फत्ते करुन आल्यागत ते चौघे बहाद्दर रस्त्यात भेटेल त्याच्याशी चंदरची ओळख करुन देत "काही कर्जबिर्ज लागलं तर सांगा सायबाला" अशी प्रेमळ सुचना करत जगनआबांच्या घरी पोहचले. आबा वाटच पहात होते, ते कुटुंबासहित शेतावर रहायचे म्हणुन गावातल्या घराकडे कोणाचे तरी लक्ष रहावे म्हणुन एक खोली त्यांना भाड्याने द्यायची होती. जागा नीटनेटकी होती आणि तिथुन बँक जवळच आहे हे कळल्यावर चंदरला खोली पसंत पडली. सोबत आलेल्या मंडळीचा अजुन काही वेळ चंदरबरोबर घालवायचा विचार होता पण "आता सायबाला आराम करु द्या" असं जगनआबाने सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी चंदरचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवसापासून चंदरचे काम सुरु झाले. नवीन शाखा असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. दिवसभर भरपुर काम करुन खोलीवर परतल्यावर चंदरला गाढ झोप लागायची, तो थेट सकाळीच जागा व्हायचा. पण आजकाल कामावर जाता येतांना समोरच्या घरातुन दोन टपोरे डोळे त्याच्यावर लक्ष ठेवुन आहेत, त्याची वाट बघत आहेत असं जाणवत होतं आणि ते त्यालाही आवडायला लागलं. हा देखिल जातायेतांना क्षणभर अंगणात रेंगाळु लागला, मोबाईलवरुन बोलताना अंगणात येऊन उभा रहायला लागला. तो घरी असला की, तिच्याही अंगणातल्या फेऱ्या वाढायच्या. चोरटे कटाक्ष, स्मित हास्याच्या देवाण घेवाणीस सुरुवात झाली..आणि थोड्याच दिवसात मोबाईल नंबरची देवाणघेवाण होऊन दोघांचेही मोबाईल एकाचवेळी बीझी यायला लागले. ती चंदरच्या समोरच्या घरात रहाणारी संगीता होती, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी.
लहान गावात अशा गोष्टींचा सुगावा गावातल्या रिकामट्यांना लवकर लागतो. सपन्या, मोठ्या बापाचा पोरगा, कामधंदा एकच तो म्हणजे संगीताच्या मागेमागे फिरणं, त्याचा ही बातमी ऐकुन थयथयाट चालला होता.
"भावा टेन्शन कशाला घेतोस तु. पायजे तर धरु त्याला." एका मित्राने बाह्या वाळत सल्ला दिला.
"गप रे तु. त्याच्याच बँकेतुन कर्ज काढुन टॅक्टर घेतलाय. दोन महिने झाले हप्ता थकला आहे. त्याने गल्लीतुन टॅक्टर ओढुन नेला तर गावात काय इज्जत राहिल आपली." सपन्याने आपली मजबुरी सांगितली पण दुसऱ्याच क्षणाला तिथे बसलेल्या दोघांकडे वळत "तुम्हीच आबाची खोली दाखवली ना बँकवाल्याला?"
असा प्रश्न करत "काय करायचे ते करा, पण तो बँकवाला गावातुन पळाला पायजे." असा दमही दिला.
"तु लय टेन्शन घेतो सपन्या. आपण आसं करु बँकवाल्याला त्याची खोली झपाटलेली आहे, हे पटवुन देऊ. मग बघ तो कसा पळतो ते." एकाला नको तेव्हा अक्कल चालवण्याची बुध्दी सुचली.
"हिकडे ये रे. कोण म्हणतं माझ्या घरात भुताटकी आहे?" मघापासुन त्यांच्या गप्पा ऐकत बसलेला जगनआबा त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. "लाजा वाटल्या पायजे तुमाला. तुमच्याच वयाचं ते पोरगं ब्यांकेत दिवसभर मान मोडुन काम करतं, गावातल्या अडल्यानडल्याला घरच्या मानसासारखी मदत करतं आणि तुम्ही त्यालाच पळवुन लावायच्या बाता करता. आपल्या गावचा जावई होणारे तो. तुमची संगीता ताई पसंत आहे त्याच्या घरच्यांना. तिची परीक्षा झाल्यावर मुहर्त काढलाये लग्नाचा. काही गडबड कराल तर याद राखा. बरोबर ना हो आण्णा?" जगनआबाने एका दमात सगळं सांगुन बाजुला मिशा पिळत उभ्या आण्णा पैलवानला विचारले.
"ते काय त्यांच्या 'बा'ची तरी हिंमत आहे का गडबड करायची. लग्नात वाढायचं काम तुमचं रे पोराहो." सपन्याच्या पाठीवर जोरदार थाप मारत आण्णा हसत म्हणाला आणि पोरांचे चेहरे पहाण्यासारखे झाले.
बँकवाला पाहुणा
Submitted by वीरु on 19 September, 2020 - 22:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त आहे... अचानक संपली...
मस्त आहे... अचानक संपली...
छान लिहिली आहे..सपन्याने मधेच
छान लिहिली आहे..सपन्याच्या टेन्शनने, त्याने मधेच काही कट कारस्थान करायच्या आधीच सुखासुखी लग्न ठरवून संपली....
वीरुजी.. मस्त कथा ..
वीरुजी.. मस्त कथा .. विनोदनिर्मिती उत्तम आहे कथेत...
छान.
छान.
साठ सत्तरच्या दशकांतले गावाकडची चित्रं रंगवणारे मराठी चित्रपट आठवले.
पण कथा झटक्यात संपवलीय.
छान लिहिलीय.
छान लिहिलीय.
कथा मस्त!
कथा मस्त!
कथा मस्त!
कथा मस्त!
कथा मस्त!
कथा मस्त!
मस्त कथा. मला वाटलं आता पुढे
मस्त कथा. मला वाटलं आता पुढे काहीतरी भूताटकी होऊन शेवटला ट्विस्ट येणार इतक्यात संपली.
मस्त
मस्त
वा, आवडली!
वा, आवडली!
मस्त. भरत +१
मस्त. भरत +१
सुरुवातीचा एसटीतून उतरल्यावरचा प्रसंग वाचून 'एक डाव भुताचा' आठवला.
छान कथा
छान कथा
अचानक संपली...
अचानक संपली...
Submitted by च्रप्स >> मला वाटलं जास्त लांबली तर कंटाळवाणी होईल. धन्यवाद.
---
त्याने मधेच काही कट कारस्थान करायच्या आधीच सुखासुखी लग्न ठरवून संपली... >>
म्हटलं कशाला बिचाऱ्यांना जास्त त्रास द्यावा धन्यवाद मृणालीजी.
---
मनापासुन धन्यवाद रुपालीजी.
---
धन्यवाद भरतजी
धन्यवाद मानवजी.
धन्यवाद परागजी.
---
मला वाटलं आता पुढे काहीतरी भूताटकी होऊन शेवटला ट्विस्ट येणार इतक्यात संपली.
Submitted by बोकलत >> खरं सांगायचं तर भयकथाच लिहायची होती.
---
धन्यवाद किल्लीताई.
धन्यवाद तेजोजी
---
सुरुवातीचा एसटीतून उतरल्यावरचा प्रसंग वाचून 'एक डाव भुताचा' आठवला.
Submitted by वावे >> बऱ्याच वर्षांपुर्वी बघितला होता. फारसा आठवत नाही. पुन्हा एकदा बघावा लागेल. धन्यवाद.
---
छान कथा
Submitted by Sparkle >> धन्यवाद.
जमलीये
जमलीये
फार लवकर संपली. आवडली पण.
फार लवकर संपली. आवडली पण.
मस्तच कथा.. आमच्याकडे पण
मस्तच कथा.. आमच्याकडे पण बँकेवालाच पाहुणा आहे म्हणून जास्त मजा आली वाचताना..
छान लिहिली आहे. सुरवातीची
छान लिहिली आहे. सुरवातीची काही वाक्ये थेट "चांदोबा" मधल्या कथांसारखी. त्यामुळे चांदोबात असते तसे रेखाचित्र पण सोबतीला आहे अशी कल्पना केली
>> साठ सत्तरच्या दशकांतले गावाकडची चित्रं रंगवणारे मराठी चित्रपट आठवले.
+१
मस्त आवडली
मस्त आवडली
छान लिहीताय तुम्ही. आवडली कथा
छान लिहीताय तुम्ही. आवडली कथा.
मस्त आहे
मस्त आहे
धन्यवाद विनिताजी.
धन्यवाद विनिताजी.
---
फार लवकर संपली. आवडली पण.
Submitted by अंकु >> धन्यवाद.
--
आमच्याकडे पण बँकेवालाच पाहुणा आहे म्हणून जास्त मजा आली वाचताना..
Submitted by अमृताक्षर >> धन्यवाद.
बँकवाल्या पाहुण्यांना नमस्कार सांगा.
---
छान लिहिली आहे. सुरवातीची काही वाक्ये थेट "चांदोबा" मधल्या कथांसारखी. >> धन्यवाद अतुलजी.
लहान असताना चांदोबाचा अंक भेटल्यावर खजिना मिळाल्याचा आनंद व्हायचा.
---
मस्त आवडली
Submitted by Kranti Deshpande >> धन्यवाद.
--
धन्यवाद अस्मिताजी.
--
मस्त आहे
Submitted by लावण्या >> धन्यवाद.
छान वातावरणनिर्मिती...
छान वातावरणनिर्मिती...
पण फुकट घालवलीत याची हळहळ वाटली. अगदीच नाट्य वा ट्विस्ट नाही पण काही घटना प्रसंग टाकून फुलवत शेवटाकडे न्यायला हवे होते. फ्लो मस्त जमला होता कथेचा. पण थोडी दिर्घकथा लिहितानाचा आळस नडला असे वाटले
पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत...
जयशील कांचनमाला
कथा आवडली पण वरती म्हटल्याप्रमाणे पटकन संपली. थोडा मिरासदारांचाही फील आला
फ्लो मस्त जमला होता कथेचा. पण
फ्लो मस्त जमला होता कथेचा. पण थोडी दिर्घकथा लिहितानाचा आळस नडला असे वाटले >> मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋन्मेषजी.
--
धन्यवाद चिकुजी.