पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा 5 वाढदिवस म्हणजे मोठे होणे

Submitted by नादिशा on 13 September, 2020 - 01:04

काल स्वयम चा 9वा वाढदिवस होता , ह्या वेळचा त्याचा वाढदिवस आमच्यासाठी खूपच स्पेशल होता , कारण आम्ही तो पूर्णपणे त्याच्या आयडिया नुसार साजरा केला .

सगळ्याच लहान मुलांना आपल्या वाढदिवसाचे आकर्षण असते . दरवर्षी गणपती आले , की आमच्या घरात स्वयमच्या वाढदिवसाचे वारे वाहू लागतात . अधूनमधून सारखा तो आम्हाला आठवण करून देत राहतो. त्याच्या मित्रांना सांगत राहतो, "आता माझा वाढदिवस आलाय.." कुणाकुणाला बोलवायचे , केक कसला आणायचा , असे प्लॅनिंग करत राहतो .

यावर्षी मात्र त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते . सप्टेंबर महिना उजाडताच त्याने आम्हाला सांगितले, "यावर्षी माझा वाढदिवस साजरा नाही करायचा आपण . "
आम्ही विचारले "का रे ? "
स्वयम -"यावर्षी कोरोना मुळे कित्ती लोकांचे प्रॉब्लेम्स झाले ना.. कित्ती लोकांना नोकऱ्या नाही , पैसे नाही , त्यांच्या मुलांचे कित्ती हाल होत असतील.. "
अमचा ऊर भरून आला होता , त्याचे बोलणे ऐकून , आत्ता या वयातच त्याची समज , त्याचे विचार पाहून .
तो पुढे बोलतच होता, "त्यामुळे आपण यावर्षी माझा बर्थडे नाही साजरा करायचा . कुणीच काहीच गिफ्ट नाही आणायचे मला . माझ्याकडे सगळे आहे . आपण ते पैसे वाचवूया आणि कोरोना योध्यांना काहीतरी देऊ या . " त्याला त्याच्या आजी आजोबानी - दोन्ही मावश्यांनी खूप लालूच दाखवायचा प्रयत्न केला , त्याच्या आवडत्या खेळण्यांची नावे सांगून पाहिली , नवीन स्टाईल चे ड्रेसेस घेऊ म्हटल्या , पण तो बधला नाही . स्वतःच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ फक्त प्रत्येकाला बनवायला सांगितले आणि बाकी काहीच घेणार नाही मी कुणाकडून , हेही ठणकावून सांगितले .

मग त्याची आयडिया आम्ही पुर्णत्वात आणली . आमच्या या भागात 4 अंगणवाड्या आहेत , त्यात सगळ्या मिळून 7 ताई काम करतात . प्रत्येकीकडे 150 घरे आहेत . प्रामाणिकपणे रोज प्रत्येक घरी जाऊन त्या चौकशी करतात . आजारी , वयस्कर , प्रवास करून आलेले , सर्वांची नोंद ठेवतात . या भागात 2 आशा पण आहेत , ज्या home quarantine लोकांकडे लक्ष पुरवतात . गेली कित्येक दिवस अथकपणे त्यांचे काम चालू आहे . या सर्व जणींना घरी बोलावून आम्ही स्वयमच्या हस्ते साडी देऊन सत्कार केला , आभार मानले त्यांच्या कामाबद्दल . दुर्दैवाने त्यातील दोघींच्या घरीच पेशंट असल्याने येऊ नाही शकल्या , त्यांना मागाहून देणार आहोत . उपस्थित सर्व जणींच्या आणि स्वयमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता .

b4cb4af5-fcb6-443d-9dea-cd160c917985.jpgbf5c6d05-73cf-41bb-a4cf-6b7bd27f1bfd.jpg

स्वयम लहान असल्यापासून आमचे वागणे पाहत असतो . आम्ही कायमच आम्हाला जमेल तसे समाजकार्य करत असतो . आपण "आहे रे "वर्गातील आहोत आणि "नाही रे "वर्गासाठी काही करणे , हे आमचे कर्तव्य आम्ही मानतो , संधी मिळेल तेव्हा गरजू लोकांना आपापल्या परीने मदत करतो . हे सारे त्याच्यासमोर चालू असते , त्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे देत . त्याला त्यामागची भूमिका विशद करत .
पण आम्ही पेरलेल्या विचारांना एवढ्या लवकर धुमारे फुटलेले पाहून आम्हाला त्याचे कौतुक आणि अभिमान नाही वाटला , तरच नवल.
"वाढदिवस म्हणजे मोठे होणे ! वयाने , विचाराने , अनुभवाने , ज्ञानाने, समृद्धीने , प्रगतीने ! सर्वांगीण मोठेपणासाठी हार्दिक शुभेच्छा !!" ही माझी वाढदिवसाची व्याख्या आणि कायमची लाडकी शुभेच्छा आहे वाढदिवसाची . याच शुभेच्छा मी नेहमी सर्वाना देत असते .
आणि माझा मुलगा खरोखरच अशा रीतीने वाढतो आहे , याचे पुरावे त्याने या वर्षात 3 वेळा दिले आहेत .

यावर्षीचा उन्हाळा चांगलाच कडक होता . नेहमीच माझ्याकडे याकाळात dehydration चे पेशंट खूप असतात . यंदा त्या काळात कडक लॉकडाऊन असल्याने तशी संख्या कमी होती . पण काही पेशंट होतेच . अमितचे वर्क फ्रॉम होम चालू असल्याने आमची चर्चा चालायची घरात...वाढलेला उन्हाळा , सलाईन , ors, फ्रुटस वगैरे.. सगळे स्वयमलाही कळत होतेच . उकाड्यापासून बचावासाठी आमच्याही घरात सब्जा , वाळा , फळे वगैरे गोष्टी चालू होत्या . एक दिवस स्वयम आम्हाला म्हणाला , "मम्मापप्पा , आपण घरात असूनही आपल्याला एवढा त्रास होतो आहे उन्हाळ्याचा . ते बिचारे पोलीस एवढ्या कडक उन्हात रस्त्यावर ड्युटी करताहेत . त्यांना कित्ती त्रास होत असेल ना !"
आम्ही म्हटले, "हो ना रे , बिचारे एवढे उन्हातान्हात ड्युटी करताहेत आणि हे वेडे लोकं विनाकारण बाहेर फिरून त्यांचे काम वाढवतात . त्यांचे कौतुक करायचे लांबच राहिले , उलट त्यांना त्रास देतात . "
स्वयम -"मला त्यांना थँक यू म्हणायचे आहे मम्मा . मी चित्र काढणार आहे , त्यांना थँक यू म्हणायला . तू त्यांना नेऊन देशील का ? "(मी डॉ. असल्याने मला त्या काळात सुद्धा बाहेर जायला परमिशन होती . )
मी म्हटले, "ठीक आहे , तू काढ तर आधी . मग आपण पाहूया . "
स्वयम -"आणि पप्पा , यावर्षी आपण कुठे गावाला जाणार नाहीये . त्यामुळे आपले पैसे वाचलेत ना ! मग त्या पैशातून ORS आणा ना , सगळ्या पोलिसांना देऊया आपण आपल्या फॅमिली कडून ."
आम्हाला कौतुक वाटले , ही गोष्ट स्वयमच्या डोक्यात आली याचे . आपल्याला का नाही सुचले , असेही क्षणभर वाटून गेले .
मग स्वयमने काढलेले चित्र आम्ही त्याच्या वतीने पोलीसांपर्यंत पोचवले . ड्युटी वर असणाऱ्या सर्व पोलिसांना liquid ORS दिले . घरी येऊन त्याला फोटो दाखवले .

police.jpg20200427_174344.jpg20200427_174416.jpg

दुसरी घटना घडली गणपतीमध्ये . आमच्या गावातले घंटागाडीवाले काका (स्वच्छता कर्मचारी )खूप चांगले आहेत स्वभावाने . ग्रामपंचायत वेळेवर पगार देत नाही , तरीही प्रामाणिकपणे काम करतात . कचरा गोळा करून घेऊन जाणे आणि गावाबाहेर ठरलेल्या ठिकाणी जाळून टाकणे , हे त्यांचे काम ! पण त्यांना काहीच protection पुरवले नाहीये ग्रामपंचायतीने , ना हँडग्लोव्हस , ना फेस शिल्ड , ना गमबूट काहीही नाही... असा अमितचा आणि माझा विषय चालू होता , शेजारी drawing करणारा स्वयम ऐकत होता , तर क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला , "आपण एक काम करूया का ? यावर्षी आपण गणपती डेकोरेशन साधे simple करूया आणि त्या पैशातून घंटागाडीवाल्या काकांना गमबूट , हँडग्लोव्हस , प्रतिकारशक्तीची औषधे असे सगळे देऊया . "
आम्ही दोघांनी त्याच क्षणी एकमेकांकडे पहिले . अगदी हम दोनोंकी मुहं की बात छीन ली थी हमारे बेटेने !
पण त्याच्या या बोलण्यात नुसतेच कुणाला मदत करणे नव्हते , तर आपल्याकडे लिमिटेड पैसे असतात याची जाणीव पण होती . त्यातूनच इकडचे पैसे वाचवू आणि तिकडे खर्च करू , हे त्याचे बोलणे आले .
मग आम्ही त्याप्रमाणे सगळे आणून दिले त्या काकांना .

a7f0db4b-4e43-4d08-9e21-6135efb0b780.jpg

आणि आता कालचा हा तिसरा प्रसंग ! स्वयमच्या सहृदयतेची पावती देणाऱ्या घटनांची हॅटट्रिक करणारा ! तो मोठा होतोय, चांगल्या पद्धतीने घडतोय आणि एक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने त्याचा प्रवास चालू झालाय, याची खूणगाठ बांधणारा...
यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी आणि व. पु. म्हणतात तसे चांगल्या गोष्टींची लागण व्हावी, यासाठी हा सारा लेखनप्रपंच !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच मस्त स्वयम.
मुलगा चांगली जाण ठेवून वाढतो आहे.
चित्र वयाच्या मानाने प्रचंड प्रो आहे.असे चेहरे, प्रपोर्शन मलाही काढता येणार नाही.

ग्रेट !
खूप आवडला हा लेख.. आणि स्वयमचे विचार जे समजूतदारपणाच्याही पलीकडले आहेत.... त्यावर तुम्ही केलेले संस्कार .. आणि हो त्याचे चित्र.. सारेच !

छान, सगळेच मस्त... किती समजुतदार ह्या वयात..? मला अक्षर खुप आवडले ह्या वयात ले

चांगलं पेरलं की चांगलं उगवतं त्याचं सुरेख उदाहरण आहे तुमच्या घरात. स्वयंमचे खुप कौतुक आहेच, पण तुम्हां आईबाबांचे पण कौतुक!