अपराधी
आज सकाळीच एक पोस्ट वाचनात आली...एका आजोबांनी आपल्या मुलासाठी केलेल्या
त्यागा विषयी होती...आपण ज्याच्या साठी त्याग करतो त्याला त्याची जाणीव नसते अशा अर्थाची ..त्या
आजोबांनी मुलासाठी अनंत कष्ट केले त्यांना स्वतः ला गायनाची आवड होती पण मुलानी गाणं शिकावं
म्हणून स्वतः ची आवड बाजूला ठेऊन मुलाला शिकवलं..मुलगा मोठा गायक झाला..अनेक पुरस्कार
मिळवले आणि वडिलांना विसरला...हा त्या पोस्ट चा थोडक्यात सारांश..
सुरवातीला मी त्या पोस्ट कडे विशेष लक्ष दिलं नाही..वाचून थोडस वाईट वाटलं पण ते
तेवढ्यापुरतच..आणि तो विषय बाजूला ठेऊन परत माझ्या कामाला लागले…
कॉलेज नुकतच सुरू झालं होतं त्यामुळे अभ्यास, सबमिशन हे प्रकार सुरू झालेले नव्हते...संध्याकाळी
खूपच कंटाळा आला...एखादी चक्कर टाकून येऊ या विचारात बाहेर पडले... गणपतीच्या मंदिरात
गेले...मंदिरात खूप छान प्रसन्न वाटत नाही का? आपला कंटाळा अस्वथपणा कुठल्याकुठे पळून
जातो…या मंदिरात कधीही गेलं तरी खूप प्रसन्न वाटत... मागच्या बाजूला नदी आहे.... बाहेर बसायला छान
जागा आहे..तिथे खूप लोक अथर्वशीर्ष वगैरे म्हणत बसतात...काही लोक नुसतेच तिथला निसर्ग
अनुभवत बसतात... नुसत बसल किंवा अथर्वशीर्ष म्हणत बसल तरी तेवढच शांत वाटत…
मी सुद्धा तिथे थोडा वेळ बसू म्हणून जागा बघत होते..इतक्यात एक जागा रिकामी दिसली ..एक
आज्जी बसल्या होत्या त्यांच्या शेजारी रिकामी जागा होती… साधारण सत्तर च्या आसपास वय असेल
त्यांच..पूर्ण पांढरे झालेले त्यांचे केस त्यांनी किती पावसाळे बघितलेत याची जाणीव करून देत
होते..एकंदरीत त्यांच्या कडे पाहून त्या चांगल्या घरातील आहेत हे लगेच ओळखू येत होत...मी तिथे
जाऊन बसले..सहज म्हणून त्या आज्जींकडे नजर गेली..त्यांच्या डोळ्यात पाणी जाणवलं...रडू आवरण्याचा
कसोशीन त्या प्रयत्न करत होत्या...आजूबाजूला असणाऱ्या माणसांना कदाचित ते जाणवत नव्हत…
किंवा त्या जाणवू देत नव्हत्या...इतक्यात एक माणूस तिथे जागा शोधत आला..त्या माणसाच्या हातात
फोन होता..तो फोन बघून त्या आज्जीना अचानक काहीतरी सुचलं….त्यांनी हळूच डोळे पुसले.. मनाशी
काहीतरी निश्चय केला..आणि त्या माणसाला म्हणाल्या..
दादा एक फोन लावता का ?
हो सांगा नंबर..त्या माणसानही लगेच हो म्हटल..
पण दुर्दैवानं नंबर स्विच ऑफ आला...त्या माणसानं सहानुभूती, मी इथून जाऊ...का परत एकदा नंबर
ट्राय करू हे कनफ्यूजन.. असे शक्य तितके सगळे भाव चेहऱ्यावर एकत्र आणले आणि चेहरा पाडून
तिथून निघून गेला…
हा सगळा प्रकार मी त्या आज्जींच्या शेजारी बसून बघत होते...फोन स्विच ऑफ येतोय हे कळल्यावर
त्यांच्या डोळ्यात परत पाणी जमा झालं होतं… मला नक्की काय प्रकार आहे हे कळलं नसल तरी त्या
आज्जी कोणाची तरी वाट बघतायत एवढं कळाल होत...आकाशात काळे ढग दाटून आले होते आधीच
तिन्हीसांजे ची वेळ..एकंदरीत त्या सगळ्या वातावरणामुळे एकदम उदास वाटायला लागलं..
इतक्यात मंदिरातील एक दोन लोक प्रसाद वाटत आले..त्या आजींना एक पेढा दिला आणि माझ्या
हातावर ही एक पेढा ठेवला... आज्जीनी निमूटपणे पेढा घेतला..आणि शून्यात नजर लावून बसल्या..मी
थोडा वेळ काढायचा म्हणून उगीच फोन काढला….पाच एक मिनट झाली असतील…
आजीबाईंचं माझ्या फोन कडे लक्ष गेलं..पुन्हा एकदा त्यांनी उसन अवसान आणून मला विचारलं
बाळा एक फोन लावून देशील का?
हो लावते की..मला या प्रकाराची बॅकग्राऊंड माहीत असल्यानं मी त्यांना हो म्हटल..त्यांनी परत एकदा
तो नंबर सांगितला ..आणि परत एकदा तेच उत्तर आल..मी हताशपणे त्यांना सांगितलं आज्जी नंबर बंद
आहे ..
आता मात्र त्यांचा धीर सुटला होता..त्यांनी माझ्या विरुद्ध दिशेला तोंड फिरवलं आणि डोळ्यातून
येणारे अश्रू लपवण्याचा प्रयत्न सुरू केला...पण त्या रडत आहेत हे मला कळाल…
मला काय करावं कळेना..त्यांना विचाराव का काय झालं म्हणून..पण विचारणार तरी कस..ओळख ना
पाळख...आणि विचारल तरी त्या काही सांगतील अस वाटत नव्हत...थोडा वेळ मी तिथेच घुटमळले... त्या
माणसासारखी च माझी अवस्था झाली होती...शेवटी मनाचा हिय्या करुन मी तिथून उठले..एकदा त्या
आज्जींकडे पाहिलं...आणि माझ्या मार्गाला चालायला सुरुवात केली इतक्यात त्यांचा आवाज आला…
ए बाळा...मी माग वळून पाहिलं...त्या माझ्याकडेच बघत होत्या..काय झालं? मी त्यांना विचारल..काही
नाही हा पेढा घे तुला..मला एवढं गोड खायचं नाही म्हणून…
आणि परत विरुद्ध दिशेला तोंड फिरवून बसल्या..मला एकंदरीत तो सगळा प्रकार सहन झाला नाही
आणि मी ही माझ्या मार्गाला लागले…
किती तरी वेळ त्या आज्जिंचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता...घरी येऊन आपण त्यांना काय झालं हे
विचारायला पाहिजे होत असं वाटायला लागल..पण आता वेळ निघून गेली होती...तो नंबर फक्त ट्रू
कॉलर वर चेक केला..नंबर ग्वाल्हेर चा होता…
कदाचित तो त्यांच्या मुलाचा नंबर असेल..तो त्यांना तिथे सोडून गेला असेल...कदाचित त्या आज्जीना
कोणाची आठवण येत असेल...नक्की काय गूढ आहे ते कळत नव्हतं पण एकंदरीत त्या प्रकारावरून
त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला होता असाच वाटत होत...आणि हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा खूप उशीर
झाला होता…
त्या आज्जिनी त्या मुलासाठी जो काही त्रास सहन केला जे कष्ट केले जो त्याग केला त्याची जाणीव
त्याला नव्हती...त्याची परतफेड त्यानी अशी केली होती...अगदी मी सकाळी वाचलेल्या लेखातल्या
आजोबांच्या मुलानी केली तशीच…
सकाळी सहजपणे वाचनात आलेली पोस्ट तितक्याच सहजपणे जिवंत होऊन संध्याकाळी मला
भेटली होती...