भेटावयाला दु:ख येता, ना कधी धास्तावले
जे जे मिळाले जीवनी त्यालाच सुख मी मानले
ध्यानात येता सुरकुत्यांना सर्व घर कंटाळले
वृध्दाश्रमाची वाट धरली, आपुल्यांना सोडले
झुंडीत मीही वेदनांच्या सोबतीने चालता
संपूर्ण झाली जीवनाची सफल यात्रा वाटले
स्वप्नी पहाटे भेटले जेंव्हा मला मी कालची
त्या कागदी नावा, नि भिजणे, बालपण रेंगाळले
जावे कुठे? हे ना समजले पण तरीही चालते
जाऊ नये कोठे परंतू पाहिजे हे जाणले
स्वप्ना तुझे उपकार, स्वप्नी दावसी मज जे हवे
औकात माझी काय आहे? वास्तवाने दावले
मृगजळ अताशा प्यावयाचा छंद आहे लागला
तृष्णा न शमली, पाठलागी सर्व कांही संपले
ओझे मणाचे वाटते माझ्या मनाला आजही
गझलेतुनी जे सांगतो ते मीच नाही पाळले
येवून मृत्यू ठेपला पण बेफिकिर "निशिकांत"तू
जन्मायचे आहे पुन्हा हे कैकदा मी वाचले
निशिकांत देशपांडे, पुणे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्तः मंदाकिनी
लगावली--- गागालगा X४