शारक्या

Submitted by वीरु on 5 September, 2020 - 16:01

बारावीचा निकाल लागला. पदरात पडलेल्या मार्कांवरुन आपल्यासाठी मेडीकल इंजिनेरींगची दारं धाडकन बंद झाल्याची जाणीव लगेच झाली. तसही अकरावी बारावी वाह्यातपणा करण्यातच घालवलं होतं म्हणा, त्यामुळे घरच्यांचं बोलणं खाली मान घालुन दोन्ही कानांनी ऐकुन घेतलं आणि कोणालाही दोष न देता निमुटपणे गावातल्याच कॉलेजमध्ये बीएस्सीला प्रवेश घेतला. आमचं तालुक्याचं गाव, पण शिक्षणाच्या सगळ्या सुविधा असल्याने शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थांनी गाव नेहमी गजबजलेलं असायचं.
कॉलेज सुरु होऊन दोन महिने झाले असतील, कॉलनीतल्या तांबडेकाकांनी त्यांच्याकडे शिकायला आलेल्या पवनशी माझी ओळख करुन दिली. पवन त्यांच्या जवळच्या नातलगाचा मुलगा, माझ्याच वयाचा. नीट विंचरलेले केस,साधेच पण नीटनेटके टापटीप कपडे, पायात चपला असा अवतार, एकंदरीत साधारण व्यक्तिमत्व, पण लक्षात राहतील असे पाणीदार डोळे. गावात पुढच्या शिक्षणाची चांगली सोय नसल्याने तो इकडे आला होता. "हुशार आहे हो आमचा पवन. स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत पण त्याच्या गावात सोय नाही म्हणुन आपल्याकडे आणलं आहे. तुझ्याच वर्गात आहे. काही लागल तर मदत कर त्याला. दोघं मिळुन अभ्यास करा चांगला" ओळख करुन देताना काका म्हणाले.
"हो काका." मी नम्रपणे म्हणालो. का कुणास ठाऊक पण तेव्हा अशा ध्येयवेड्या मंडळीबद्दल मनात आदर दाटुन यायचा. पुढे काय करायचे याबद्दल माझं काहीच ठरलं नव्हतं म्हणुन असेल कदाचित...
यथावकाश पवनचं कॉलेज सुरु झालं. एका वर्गात असलो तरी तो फारसा कुणाशी बोलायचा नाही. वेळेवर कॉलेजला यायचा आणि तास संपल्यावर सरळ लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचत बसायचा. कॉलेजला उशीरा प्रवेश घेतला असल्याने राहिलेला अभ्यास भरुन काढण्यासाठी कधीतरी माझ्या वह्या, जर्नल्स न्यायचा. हळुहळु त्याचा सुरुवातीचा बुजरेपणा कमी होत असल्याचे जाणवत होतं. जेव्हा भेटायचा तेव्हा त्याच्या ध्येयाबद्दल भरभरुन बोलायचा त्यावेळी त्याच्या पाणीदार डोळ्यात वेगळीच चमक यायची. पवनची तयारी पाहुन तो नक्कीच मोठा अधिकारी होईल असं मला नेहमी वाटायचं. त्याचं बोलणं ऐकुन मलाही थोडाफार का असेना अभ्यास करायला हवा असं वाटायला लागले होते. कधीकधी त्याने सांगितलेली स्पर्धा परीक्षांची पुस्तकं कॉलेजच्या लायब्ररीतुन आणुन त्याची पारायणं करायचो मी. कट्टयावर टाईमपास करण्यात, चकाट्या पिटण्यात मजा नाही असं वाटायला लागलं होतं. पण दोस्त मंडळी काय म्हणतील या भीतीने कट्टा सोडवतही नव्हता.
‌नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्टयावर बसुन टिवल्याबावल्या करत असताना गृपमधल्या सतिशने अचानक "तो शारक्या तुझ्याच कॉलनीत रहातो ना?" असा मला प्रश्न केला. सतिश आमच्या गृपमधला सिन्सीयर मानुस, त्याने प्रत्येक लेक्चरला बसुन नोटस् काढाव्यात, जर्नल कंप्लीट करावे आणि आम्हा गरजुंना पुरवावे इतकीच आमची माफक अपेक्षा.माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह पाहुन याला काहीच माहित नसते या अर्थाने मान हलवत त्याने हात झटकला आणि पवनचं 'शारक्या' असं नामकरण झाल्याची माहिती दिली. शारक्या वर्गातल्याच पायल बुधवानीच्या प्रेमात पडल्याची सनसनाटी बातमी मला कट्यावर कळली. पायल, मोठ्या बापाची मुलगी.. पैश्याची, बुध्दीची, रुपाची सगळीच श्रीमंती होती तिच्याकडे. आमच्या कॉलेजमधलीच नाही तर कॉलेज बाहेरचीही बरीच मंडळीही वेळात वेळ काढुन तिच्या येण्याजाण्याच्या वाटेकडे डोळे लावून असे.
"माझ्या‌ वह्या नेतो तो नेहमी, पण कधी बोलला नाही तो." असं मी आश्चर्याने सांगताच मघापासुन आमचं बोलणं ऐकणारा मन्या माझ्यावर खवळला "डोक्यावर पडला आहेस का रे तु? अरे तो काय या गोष्टीची दवंडी पिटणार आहे का आहे का सगळीकडे?" मन्या घुश्यात म्हणाला. मन्याचही बरोबर होते म्हणा, शारक्या कशाला त्याची लव्हस्टोरी मला सांगत बसेल.
हळुहळु शारक्याशी बोलणं कमी होऊ लागलं. नेहमी लायब्ररीमध्ये सापडणारा शारक्या आता रस्त्याच्या कडेला उभा राहुन पायलची वाट पहातांना, तिच्या मागोमाग जातांना दिसायला लागला. त्याचं वागणं पाहुन कॉलेजमधल्या टवाळखोरांना तर त्याची मस्करी करायला भलताच चेव चढायचा. तसेच बाकीच्या कॉलेजमध्ये असते तशी एकाच वर्गात दोन-तीन वर्षे काढुन सखोल शिक्षण घेणारी दादा भाई मंडळी आमच्याही कॉलेजमध्ये होती. अभ्यास सोडुन बाकी सगळ्या विषयांचा यांचा दांडगा अभ्यास. आत्मविश्वास तर इतका की मार्चमधल्या पेपरसाठी लिहिलेल्या कॉप्या ऑक्टोबर मधल्या परीक्षेसाठी राखुन ठेवायचे. शिक्षकांपासुन ते शिपायांपर्यंत यांचे मैत्रीचे संबंध. आम्ही त्यांच्यापासुन चार हात दुरच रहायचो. या दादा भाई लोकांच्या लक्षात येताच त्यांनीही शारक्याला दोन रट्टे देत नीट वागण्याबद्दल दम भरला पण शारक्याला पायलशिवाय कोणाशीच काहीच घेणंदेणं राहिलं नव्हतं. दिवस असेच पुढे सरकत होते. शेवटी हे सगळं पायलच्या घरी समजल्यावर तिच्या भावांनी सगळ्यांसमोर शारक्याला काळानिळा होईपर्यंत मारहाण केली. हा आता तरी सुधरेल असं वाटत असतानाच दुस-या दिवशी सुजल्या तोंडाने पायलच्या मागोमाग शारक्या कॉलेजमध्ये हजर. सगळं कॉलेज अवाक होऊन पहात राहिलं. त्यानंतर‌ चार दिवस कॉलेजच्या कट्टयापासुन कॅण्टीनपर्यंत आणि लायब्ररीपासुन लेडीज रुमपर्यंत याच गोष्टीची चर्चा सुरु होती. पायलने मात्र त्याच्याकडे पुर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत होते, पण त्याच्या या वागण्यामुळे तीही कंटाळली असावी असं कुठेतरी वाटायचं.
एक दिवस गृपमधल्या सोनीने माझ्याकडे रागाने पहात "ए पशा, तुझ्या शारक्याला समजावून सांग जरा. त्या माकडतोंड्याच्या त्रासामुळे पायल पुढच्या वर्षी कॉलेज सोडुन चाललीये." असं सांगत आमच्यावर बॉम्बच टाकला. सोनीचे अर्धा डझन चुलत मावस भावंडं कॉलेजमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये शिकत होते. त्यामुळे सोनीकडे सगळ्या कॉलेजची खबर असायची.
"अय सोने, मी काय वकील आहे का त्याचा? आपला काय बी संबंध नाय त्याच्याशी. एखाद्या दिवशी फुकट मार खाऊ घालशील मला." असं मी म्हणालो खरा, पण पुढच्या वर्षी पायल वर्गात नसेल ही गोष्टच मनाला पटत नव्हती.
शेवटी मनाचा हिय्या करुन त्याच दिवशी संध्याकाळी भेटलो शारक्याला. पायलचा नाद सोडुन अभ्यास करण्याबद्दल हात जोडुन‌ विनंती केली.. त्याचं एकच म्हणणं होतं की एक ना एक दिवस ती नक्कीच हो म्हणेल. "तु बघच मग, ती सांगेल ती परीक्षा मी पास होतो की नाही ते." शारक्या आत्मविश्वासाने सांगत होता तेव्हा त्याच्या पाणीदार डोळ्यात वेगळीच चमक दिसली मला.
"अरे पण तिला नाही आवडत तुझं हे वागणं. कशाला बरबाद करुन घेतोस स्वत:ला? तु इथे कशासाठी आलास हे तरी आठवतं का तुला?" त्याला हे तळमळीने सांगितलं खरं पण समजावण्या पलीकडे गेलेल्या शारक्याला समजावण्यात काही अर्थ उरला नव्हता.
तो ज्यांच्याकडे रहात होता त्या तांबडे काकांच्या कानावरही गेलंच होतं हे सगळं. त्यांनीही त्याला समजावून पाहिलं होतं. पण शारक्या ऐकत नाही हे दिसल्यावर आपल्याकडे ही ब्याद नको म्हणुन त्याला लगेचच रहाण्याची दुसरीकडे व्यवस्था करायला सांगितली. परीक्षा तोंडावर आल्या होत्या आणि शारक्याची रहाण्याची सोय होत नव्हती तेव्हा मीच गृपमधल्या रुमवर रहाणा-या मन्याला परीक्षा होईपर्यंत शारक्याला त्याच्या रुमवर राहु देण्याची विनंती केली तेव्हा मन्या भयंकर चिडला, "पशा ×××, त्या शारक्याने सगळं कॉलेज डोक्यावर उचलुन घेतलं आहे. तु एक सोडला तर कोणी बरं म्हणतं का त्याला? तुझ्या कॉलनीतल्या तांबड्यानेपण हाकलुन दिलं ना त्याला? मग माझ्या रुमवर ती भानगड कशाला पाठवतोस? तुला थोडी तरी अक्कल आहे का?" मन्याच्या तोंडाचा पट्टा चांगलाच सुरु झाला. मन्याचा तापट स्वभाव आणि पैलवानकीची आवड त्यामुळे त्याच्या नादाला कोणी लागायचं नाही, पण तसा मोकळ्या मनाचा होता तो. शेवटी त्याने 'पायल प्रकरण रुमवर आणायचं नाही' या अटीवर परवानगी दिली. शारक्याला हे कळल्यावर तो पाणावलेल्या डोळ्याने पुन्हापुन्हा हात जोडुन माझे आभार मानत होता.
परीक्षा सुरु झाल्यावर त्या गडबडीत कसलाच विचार करायला वेळ नव्हता. पेपर अपेक्षेपेक्षा सोपे गेले. शेवटचा पेपर संपल्यावर संध्याकाळी अचानक मन्या घरी आला. "बाहेर चल.‌ तुझ्याशी जरा बोलायचं आहे." मन्या दारातुनच म्हणाला आणि जवळजवळ ओढतच मला बाहेर घेऊन गेला.
"शारक्या कॉलेज आणि शहर सोडुन गेला." मन्या माझ्याकडे रोखुन पहात म्हणाला. तो काय सांगत होता हेच माझ्या लक्षात येईना.
"परीक्षेच्या दोन दिवस आधी शारक्याला पायल रस्त्यात दिसली. आजुबाजुला कोणी नाही हे पाहून याने तिला थांबवलं आणि धीर एकवटून आपलं प्रेम व्यक्त केलं. पायल त्याच्या वागण्याला कंटाळलीच होती. तिने त्याच्या गालावर थप्पड मारली अन् पुन्हा कधी समोर येऊ नको असं सांगुन ती रागाने निघुन गेली. शारक्या खांदे पाडुन रडत रुमवर आला, खोदुन विचारल्यावर काय झालं ते सांगितलं पण तुला परीक्षा संपेपर्यंत काही न सांगण्याचे वचन घेऊन" मन्याने एका दमात घडला प्रकार मला सांगितला.
"अरे पण मला हे आधी का नाही सांगितलं. आपण समजावलं असतं ना त्याला" मी मन्यावर चिडलो खरा पण आता काही उपयोग नव्हता. शारक्याचं वर्ष तर वाया गेलंच पण त्यानंतर तो कधीच कॉलेजला दिसला नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा, हसणारे हसायचे, अभ्यासु मुलगा वाया गेला म्हणुन काही हळहळ व्यक्त करायचे. हळुहळु सगळेच विसरले त्याला.. कॉलेजचे दिवस भरकन कसे निघुन गेले समजलंच नाही.
आता कॉलेज संपुन वर्ष लोटली आहेत. सगळे आपापल्या उद्योगाला लागलेत, सतीश एका बँकेत मॅनेजर आहे तर मन्याने वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत बांधकाम व्यवसायात जम बसवला, आजकाल बोलतांना तोंडात साखर असते त्याच्या. सोनी आमच्याच कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, कोणी लेक्चर सोडुन कट्यावर टाईमपास करतांना दिसलं की सरळ जावुन फटकवते त्यांना. जाम वट आहे तिची कॉलेजमध्ये. बाकीच्यांचही बरं चाललय.. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, शिकतांना माझे पायलशी सुर कधी जुळले ते समजलंच नाही. तिच्या प्रोत्साहनामुळेच पुढचं शिक्षण पुर्ण करुन आज मी एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर काम करतोय. पायलच्या रुपाने घरात लक्ष्मी आली असे माझे आईबाबा म्हणतात आणि माझ्यासारखा सुशिक्षित, समंजस जावई मिळाला म्हणुन तिच्या घरचेही खुष आहेत. पायलने स्वर्ग बनवलाय माझ्या संसाराचा...
...आणि मी.. मला का शारक्या आठवत रहातो??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.. एकदम इश्कवाला लव्ह स्टोरी आहे ओ..
बाय द वे शारक्याची आठवण येत असेल तर फेसबुकवर शोधा त्याला..नक्कीच सापडेल Happy

छान आहे कथा...
तो येणार एक दिवस नक्की परत...
तू किसी और कि हो न जाना.. कुछ भी कर जाऊंगा मै दिवाना करत...

बाई दवे, एकेकाळी मी एका मुलीला फॉलो करायचो तेव्हा तिनेही माझ्या जवळजवळ कानाखाली मारलेलीच... हवेत हात उगारलेला आणि म्हणालेली की पुन्हा माझ्या मागे आलास तर एक सणसणीत कानाखाली खाशील Sad जर नुसते डायलॉग न मारता खेचलीच असती कानाखाली तर किती पंचनामा झाला असता माझ्या ईज्जतीचा.. भर गर्दीची संध्याकाळची वेळ आणि स्थळ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ ... मी समजू शकतो कथानायकाच्या भावना.. त्या क्षणाला कसे वाटते अनुभवले आहे

म्हाळसाजी धन्यवाद.
<<शारक्याची आठवण येत असेल तर फेसबुकवर शोधा त्याला..>>आवो एक दिवस फेसबुकनेच विचारलं "याला ओळखताे का" म्हणुन, फोटो पाहिल्यावर आठवलं हा तर आपला शारक्या. मग काय टाकली दणादण ष्टोरी लिहून.

ऋन्मेषजी धन्यवाद.
<तो येणार एक दिवस नक्की परत...> तुम्ही तर शारक्या पार्ट-२ ची आयडीया दिलीत. थँक्यु.
<<बाई दवे, एकेकाळी मी एका मुलीला फॉलो करायचो तेव्हा तिनेही..>> एकदा सविस्तर लिहाच हा अनुभव. Happy

औरत का चक्कर विरुभैया. औरत का चक्कर.
माझपण बराच काळ एका मुलीमुळे वाया गेलाय.
शारक्या झाला होता माझा. लिहीन कधीतरी.

माझपण बराच काळ एका मुलीमुळे वाया गेलाय.>> चला.. “दिल जले” म्हणून एक धागा काढा आणि येऊ द्यात तुम्हा सगळ्यांचे अनुभव Happy

खूप छान कथा लिहिलीये विरु तुम्ही.. सगळी कथा डोळ्यांसमोर घडतेयं असचं वाटलं. कॉलेजमध्ये अभ्यास सोडून मुलींच्या मागे लागणारे ' शारक्या ' बघण्यात आहेत.

<शारक्या झाला होता माझा. लिहीन कधीतरी.> कटप्पा नक्की लिहा. हवं तर इथंच मन मोकळे करा. Happy
----
<सगळी कथा डोळ्यांसमोर घडतेयं असचं वाटलं.> धन्यवाद रुपालीजी.

छान लिहिलय.
बिच्चारा शारक्या.
लोक प्रेमात वेडे,आंधळे आणि काय काय होतात.

शारूख वरून शारक्या Lol

कॉलेजमध्ये नाही पण ट्रेनी म्हणून जॉईन झालो तिथे असाच एक शारक्या भेटलेला, विदर्भ साईडचा, मुलगी आमच्याच डिपार्टमेंट्ला. एकत्र काम करताना हा अगदी पागल झालेला तिच्यासाठी अन तीच्या मनात काही नाही याच्याबद्दल.

किती समजाऊन, रागावून सांगितलं तरी याच्यावर ढीम्म परिणाम नाही. याच एकच “ती माझीच हौ“

पायलला दिला का लेख वाचायला ? काय म्हणाली?
>>>>
किती चटकन गृहीत धरले गेले की सारे संदर्भ खरेच असावेत..
यातूनच ऋन्मेष जन्माला येतात Happy

दिल जले” म्हणून एक धागा काढा आणि येऊ द्यात तुम्हा सगळ्यांचे अनुभव Happy
>>>>>

लेखमाला लिहावी लागेल..
कारण सतत कुठल्या ना कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलेले असणे ही माझी जगण्याची एक मूलभूत गरज होती.

मी वीरू ला विचारलं...

ऋ, जसं त्यांनी सत्यकथा आहे असं म्हणलं नाहीये तसंच सत्यकथा नाहीये असं ही म्हणलं नाहीये. त्यांनी फेसबुकवर तो सापडला म्हणलंय म्हणजे खरी असेल असं गृहीत धरलं

शरक्या बद्दल वाईट वाटले Sad
Submitted by किल्ली>> सहमत. मलाही शारक्या हे पात्र लिहिताना वाईट वाटले.
म्हणुन शेवटी कथानिवेदकाच्या मनात खंत दाखवली आहे.
----
धन्यवाद मृणालीजी.
---
शेवटचा ट्विस्ट आवडला.
Submitted by धनुडी>> धन्यवाद.
---
पायलला दिला का लेख वाचायला ? काय म्हणाली? >> रियाजी, शारक्या ही व्यक्तीरेखा काही अंशी जरी खरी असली तरी पायल आणि अन्य काल्पनिक आहेत. Happy
---
याच एकच “ती माझीच हौ“
Submitted by आसा. >> भारी. Lol
---
मस्त लिहिली आहे कथा!
Submitted by वावे>> धन्यवाद.

त्यांनी फेसबुकवर तो सापडला म्हणलंय म्हणजे खरी असेल असं गृहीत धरलं
>>>>

जर पायल खरी कोणाची आताची पत्नी असती तर त्यांनीच तिच्या आयुष्यातील शाहरूखबद्दल असे लिखाण करण्याची शक्यता अगदीच धूसर होते Happy

गंमत म्हणजे मी जो वर माझ्या अनुभवाचा उल्लेख केला आहे तो मी लिहीला तर तो खरा असूनही त्याला मात्र खोटं समजले जण्याची शक्यता जास्त असेल Happy

त्यांनी विचारले कटप्पा ला , उत्तर तुम्ही देताय...
अशानेच ड्यु आयडी गैरसमज पसरत जातात Happy
>>>

च्रप्स कोणी कटप्पाला काय विचारले ज्याचे मी उत्तर दिले??
काहीतरी चुकतेय आपले बहुधा..
बाकी मला आवडतात डु आयडी गैरसमज पसरलेले Happy

तुम्ही तर शारक्या पार्ट-२ ची आयडीया दिलीत. >>
वीरू लवकर येऊ द्या पार्ट-२ .. शारक्याची पर्सनॅलिटी बदललीए का तो अजूनही तसाच आहे हे वाचायला उत्सुक.

त्यांनी विचारले कटप्पा ला , उत्तर तुम्ही देताय>>अहो च्रप्स.. ते मी सगळ्यांना उद्देशून लिहीले होते Happy

गंमत म्हणजे मी जो वर माझ्या अनुभवाचा उल्लेख केला आहे तो मी लिहीला तर तो खरा असूनही त्याला मात्र खोटं समजले जण्याची शक्यता जास्त असेल >> खरं किंवा खोटं..मस्त तिखट मीठ लाऊन लिहा तुम्ही

दिल जले” म्हणून एक धागा काढा आणि येऊ द्यात तुम्हा सगळ्यांचे अनुभव Happy
>>>>>

लेखमाला लिहावी लागेल..
कारण सतत कुठल्या ना कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलेले असणे ही माझी जगण्याची एक मूलभूत गरज होती.

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2020 - 09:49

>> ऋन्मेष याबद्धल म्हणत होतो... म्हाळसा नी कटप्पा ला विचारले/सांगितले होते हे...

च्रप्स बघा असे गैरसमज पसरतात.
मुळात मी पहिल्यांदा लिहिलेले की मला तसा अनुभव आलाय.
मग कटप्प्पा यांनी आपल्यालाही तसा अनुभव आल्याचे नमूद केले.
मग म्हाळ्सा यांनी मी, कटप्पा आणि आमच्यासारखे ईतर कोणी असतील असा अनुभव घेतलेले तर सगळ्यांनी लिहा असे म्हटलेले.

असो,
जरूर लिहेन या अनुभवावर
अश्या शाहरूख लोकांची दुसरी बाजू आणि ते ज्या मुलींच्या मागे लागतात त्यांची तिसरी बाजूही जगासमोर यायला हवी.