Submitted by वैभव जगदाळे. on 3 September, 2020 - 07:58
तुझ्यात गुंतल्या माझ्या मनाला तू थोडसं आवर ना
माझ्या न राहिल्या भावनांना तू थोडसं सावर ना
एकदा तू बोलली तरी जन्म वाटे सार्थ हा
तू दिलेल्या एका क्षणाला युगांचा वाटे अर्थ हा
जीवनाच्या स्मृतींना तू अजून थोडसं वाढव ना
खोटं खोटं प्रेम जरी तू अजून थोडसं पाठव ना
मधुर तुझ्या हास्याने वाटे दुःख विश्वाचे उडाले
राहिले जरी खाली काही तुझ्या डोळ्यांत बुडाले
सुखदुःखांचं गणित अडलंय तू थोडसं सोडव ना
माझ्या विखुरल्या आयुष्याला तू थोडसं जोडव ना
जाणतो मी व्यर्थ आहे खेळ हा मी मांडलेला
पण हतबल जीव माझा तुझ्या प्रीतीत सांडलेला
तीळ तीळ तुटत्या या जीवाला तू थोडसं बोलव ना
माझ्या प्रेमाला जगाच्या प्रेमाशी तू थोडसं तोलव ना
-वैभव जगदाळे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा