टंकबोली

Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 September, 2020 - 09:00

बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य. शब्दयोजना,आवाजाचे चढ उतार,विराम,चेहर्‍यावरचे हावभाव,अंगविक्षेप यातही एक परस्पर संवाद असतो. तो सुसंवाद आहे कि विसंवाद हा भाग नंतरचा. आपल्या सुसंस्कृतपणाच्या कल्पनेपोटी काही औपचारिकता आपल्या मेंदुने विचारपुर्वक स्वीकारलेल्या असतात.पण भावनिक पातळीवर दुसरी एक प्रक्रिया त्याच वेळ मेंदुत चाललेली असते. ती या औपचारिक प्रक्रियेपेक्षा वेगळीच असते. ती देहबोलीतून नकळत प्रतिक्षिप्त क्रियेसारखी व्यक्त होत असते. आपण एखाद्याकडे गेलो तर तो सामाजिक प्रथेचा भाग म्हणून तुमचे शब्दांनी स्वागत करेल पण मनातून त्याला तुमचे येणे काही ना काही कारणाने आवडले नसेल तर शब्दोच्चारातील कोरडेपणा वा कपाळावर न लपवता येणारी आढी ही प्रतिक्षिप्तपणे प्रकट होते. समोरच्या पाहुण्याला ते जाणवावे असा सुप्त हेतु मनात असतो त्याचा तो परिपाक असेलही कदाचित. तुमचे आणि त्या पाहुण्याचे ऋणानुबंध कसे आहेत याचेही गणित तुमच्या मेंदुत चालू असते. कुठल्या गोष्टीसाठी किती किंमत मोजायची हे गणितही साईडबाय साईड चालु असते. समोरचा सूज्ञ असेल व त्याच्या हे जर लक्षात आले तर तो काढता पाय घेतो. तुमचा मूड, त्याचा मूड, परिस्थितीचा प्राधान्यक्रम याही गोष्टी प्रभाव पाडणारे घटक असतात. तुम्ही ज्याला कटवताय तो तुमचा हितशत्रू असतो अशातला अजिबात भाग नाही. तो तुमचा मित्र, हितचिंतकही असतो. त्याचा तुमच्यावर काही नैतिक अधिकारही असतो. तुम्हीच त्याला तो बहाल केलेला असतो. तो त्याला कुठपर्यंत बजावू द्यायचा हे गणित ही तुमच्या मनात चालू असत.
जालीय व आभासी जगात तुम्ही प्रत्यक्ष एकमेकाच्या परिचयाचे असता किंवा नसताही. तुमचा संवादाचे संभाषणाचे व्यासपीठ हे एखादा जालीय धागासत्र, फेसबुकची भिंत असते. आता झूम, फेसबुकलाईव्ह, मीट आलय पण ते सार्वजनिक कार्यक्रमाला पर्याय म्हणुन. या सगळ्यात खाजगीपणा व सार्वजनिकपणा यांचे एक मिश्रण असते. व्यक्ती आयडी बनते.तुमचे बोली हे टंकन बनते. ज्यात भावनिका व लिखित मजकूर यांच्या द्वारे तुमच्या भावनांचे प्रकटीकरण होते. ही ती टंकबोली. इथे तुमच्या टंकबोलीतून आभासी व्यक्तिमत्व तथा आयडी तयार होते. कधी समूह टंकसंवाद तर कधी आयडी टू आयडी असा टंकसंवाद होतो. वास्तव जगात एखाद्या भाषणात त्या विशिष्ट माहोल मधे देहबोलीतुन निघणारा अर्थ व नंतर शब्दांकन करुन टंकलिखित दस्ताऐवजीकरणातून निघणारा अर्थ यात काहीच्या काही अंतर असू शकते. प्रत्यक्ष भाषण ऐकताना भावणार अर्थ व काही कालांतराने दस्तैवजातून वाचताना वाचकाला भावणार अर्थ प्रसंगी अगदी उलट असू शकतो. इतिहासात दस्तैवज म्हूणून शेवटी लिखितच राहाते पण मौखिक परंपरेतुन त्याचे पसरणारे अर्थ विपरित असतात. आभासी जगात तर हे अर्थांतर अजूनच गहन होते. फेबुवरील लाईक हा मजकूरावर माझी नजर फिरली अशी पोचपावती स्वरुपाचाही असतो. कधी मी हे वाचलय तू व्यक्त झालास हे आवडल. अशा अर्थाचे असते. पटले आवडले असा त्याचा अर्थ नसतो. कधी वाचले व जाम पटलय असा अर्थ असतो. कधी काय लिहितोयस अगदी जीव ओवाळून टाकावा हा घे माझा हृदयरुपी बदाम असाही असतो. आपण लिहिलेला मजकूर समोरच्याने वाचला आहे की नाही हे समजण्याची सोय नसते.काही संकेतस्थळांवर किती वाचने झाली हे समजते पण कोणी कोणी वाचन केले हे समजत नाही. शिवाय क्लिक झाला कि काउंट होतो त्यामुळे खरोखर वाचन केले आहे कि नाही हे समजण्याचा मार्ग नाही. मग तो प्रतिकिया दिली तरच समजते. बरेचदा ट्रोल्स एखाद्याला उचकवण्यासाठी काहीतरी लिहितात जेणेकरुन भडकून जाउन त्याने काहीतरी प्रतिक्रिया द्यावी. अशावेळी जर समोरच्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर ट्रोलभैरवाला हे समजत नाही कि समोरच्याने वाचलेच नाही कि तो अनुल्लेखाने मारतोय. मग त्या ट्रोलभैरवाची चिडचिड होते. शब्द वापरणे हे जस एक शस्त्र आहे तस ते न वापरण हे ही एक शस्त्र असते. त्यामुळे संयतपणे एकतर्फी लेखन करत राहणारे लोक ही जालावर दिसतात.आपल्या लेखनाचा काही उपयोग होतो कि नाही हे समजत नसल्याने कधी कधी अशा लेखकांना निराश वाटते. आपण एवढ जीव तोडून लिहितोय पण समाज बदलत नाही ही भावना प्रबळ व्हायला लागते.
टंकबोलीत बोलताना तुम्हाला एडिट करण्याची सोय असते.डीलीट करण्याचीही सोय असते. काही सजग जालवीर वाचक तुमच्या वादग्रस्त वाटणार्‍या टंकबोलीचा स्क्रिनशॉट काढून ठेवतात. त्यामुळे मी असे बोललोच नव्हतो असे म्हणण्याची सोय नसते.आपण जे लिहितो ते त्या त्या वेळची भावस्पंदने वा विचारस्पंदने असतात.त्याला त्याच संदर्भ चौकटीत पाहिल पाहिजे.नंतर त्याकडे पाहिले तर कदाचित ते अर्थहीन वाटु शकते. अगदी आपणच आपले लेखन नंतर पाहिले तरी ते निरर्थक वाटू शकते. मध्यंतरी हरी नरके यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलेले काही आंबेडकरवादी लोकांच्या व्यसनाधीनतेबद्दल होते पण अन्वयार्थ बदलतील हे लक्षात आल्यावर ते एडीट केले गेले व नंतर चक्क डिलिट केले गेले. पण काही सजग जालवीरांनी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. खरतर त्यात काही गैरलिखाण नव्हते. सामाजिक कळकळीतूनच ते केले गेले होते. पण नाराजी नको म्हणून ते काढून टाकले गेले. समूहा पुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ते असेच काहीसे असते. काही लेखक टंकबोली इतक्या प्रभावाने वापरतात की तो उपहास आहे की कौतुक हे समोरच्याच्या लक्षातच येत नाही.जर भावदर्शिका वापरल्या तरच त्याचा अर्थ काही अंशी लागू शकतो. लेखकाचे जालीय व्यक्तिमत्व ज्यांना माहित आहे त्यांनात्यातल्या खाचाखोचा पटकन कळतात. कधी कधी टंकलेखनातून जाणवून दिली जाणारी भावना ही तत्कालीन वा अल्पकालीन असते, प्रासंगिक वा मूडस्थितीजन्य असते. ते टंकलेखकाचे सरासरी व्यक्तिमत्व नसते. पण आंतरजालावरील वाचकापुढे येणारा साहित्य लेखन वगैरे अभिव्यक्तिंचा लोंढा फार वेगाने येत असतो. तुमच्या सारखे अनेक टंकलेखक येतात अन जातात. त्या अल्पकाळात त्याची जी टंकलेखनातून व वाचकांच्या आकलनातून प्रतिमा बनते ती फार विचारपुर्वक बनलेली नसते. पण त्याचे आकलन लेखकाला होत नाही.कधी कधी वाचकांची दुखरी नस छेडली जाते मग तुमचे कृष्णचित्र त्याच्या मनात तयार होते. वाचक हा प्रत्येकवेळी प्रतिक्रिया देत नसतो. पण त्याचा मानवी संबंधांवर परिणाम होत असतो. मग त्याची लाभ किंवा हानी लेखकाच्या वाट्याला येते. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य बजवताना अपरिहार्य बनते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यवस्थित टंकलय सर्व तुम्ही.
"त्या अल्पकाळात त्याची जी टंकलेखनातून व वाचकांच्या आकलनातून प्रतिमा बनते ती फार विचारपुर्वक बनलेली नसते. पण त्याचे आकलन लेखकाला होत नाही.कधी कधी वाचकांची दुखरी नस छेडली जाते मग तुमचे कृष्णचित्र त्याच्या मनात तयार होते" >> +१

मस्त लेख आहे. खूप आवडला.
>>>>अशावेळी जर समोरच्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर ट्रोलभैरवाला हे समजत नाही कि समोरच्याने वाचलेच नाही कि तो अनुल्लेखाने मारतोय.>>>> हे तर अनेकदा अनुभवले आहे. कधी कधी तर एखाद्या प्रतिक्रियेने आपण ओव्हरव्हेल्म होतो व काय मांडावे ते सुचत नाही. तेव्हाही काही न बोलता मुकाट बसतो. काही लोकांचा स्वभावच नसतो वादावादी वाढवायचा. निष्फळ व निरर्थक सव्यापसव्य वाटतो त्यांना. पण हे असं गप्प बसलं की काही लोक अधिक पिसाळतात.