माझा अनुभव- कोविड -१९- लॉकडाऊन- रूपाली विशे- पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 31 August, 2020 - 08:56

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु होण्याच्या बारा दिवस आधी आमच्या घरात दुःखदायी घटना घडली. धुलिवंदनाच्या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने सासूबाईंचे अकस्मात निधन झालं. २१ तारखेला त्यांचे उत्तरकार्य थोड्या धाकधुकीतच पार पडलं कारण २२ तारखेला असलेल्या संचारबंदीची घोषणा आधीच झालेली होती आणि २१ तारखेपासूनच आम्ही राहत असलेल्या वसाहतीच्या गेटवर येणाऱ्या - जाणाऱ्यांची कसून चौकशी सुरक्षा अधिकारी करत होते. २२ तारखेला संपूर्ण भारतात एक दिवसासाठी संचारबंदी लागली आणि दुसऱ्या दिवसापासून ध्यानीमनी नसताना लॉकडाऊन चालू झाले. बारा दिवस घरात दुःखी व सुतकी वातावरणात राहिल्यामुळे जरा ताज्या हवेत बाहेर जावं म्हटलं तर कोरोनारूपी राक्षसाने लॉकडाऊन च्या निमित्ताने चार भिंतीत बंदिस्त करून टाकलं. आयुष्यात कधीही न अनुभवलेला काळ प्रत्येकाच्या आयुष्यात अचानक उसळी मारून वर आला. टि.वी. आणि वृत्तपत्रातील करोनाच्या बातम्यांमुळे काळजीने मन झाकोळून गेले. मग मनात असंख्य भावकल्लोळ माजू लागले. आपले जीवन जणू मृगतृष्णे सारखे भासू लागले.

मृगतृष्णा परि भासते
जीवन हे अपुले
जीवघेणे अरिष्ट ते
मानवापुढे उभे ठाकले...

खरचं अगदी अश्याच भावना मनात दाटल्या.एरव्ही घड्याळ्याच्या काट्यावर चालणारं आयुष्य क्षणात थांबल्यासारखं वाटलं. पुढे काय होईल याची यत्किंचितहि कल्पना येत नव्हती.

आम्ही राहत असलेली केंद्र सरकारी वसाहत असल्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध कडक होते. आम्हाला बिल्डींगच्या गच्चीवर जाण्यावरसुद्धा बंदी होती. CISF च्या सुरक्षा अधिकाऱ्यांची तसेच पोलीसांची गस्त मोठ्या प्रमाणात वसाहतीत वाढली होती अर्थात ती लोकांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीकोनातूनच होती ह्याची जाणीव आम्हां सर्वांना होती आणि आहे. मला रोज सायंकाळी मैत्रिंणीसोबत गप्पा मारत चालायला जायची सवय असल्यामुळे त्या वेळेत घरात बसून अगदी करमेनासं झालं.
बापरे..किती दिवस असं घरात बसून राहायला लागणार ? डोक्यात फक्त विचार आणि विचारच चालू होते.

चंद्रावरती अमुचे पाऊल पडे
किती असे आम्हां त्याचा अभिमान
पण... पण..आज अमुच्या त्याच
पावलांना उंबरठा ना देई मान...

सांगा बरं.... खरं आहे ना हे ? अशीच परिस्थिती होती ना
लॉकडाऊनमध्ये?

खरंतर घरून ऑफीसचे काम हि संकल्पना माझ्यासाठी नविन नव्हती. ऑफीसचं बरचसं काम मी घरूनच करते. ऑफीस मुंबईला असल्यामुळे मला नियमितपणे ऑफीसला जाणे शक्य होत नाही त्यामुळे मी महिन्यातून दोन ते तीन वेळाच ऑफिसला जाते. मी ऑफीसमध्ये नसले तरीही ऑफीस स्टाफ काम व्यवस्थित सांभाळतो. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये सुद्धा माझं ' वर्क फ्रॉम होम ' नेहमीप्रमाणे चालू राहिलं. पण पतींची नोकरी अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांना नियमितपणे कामावर हजर राहणं आवश्यक होतं. त्यामुळे बाहेर जरी लॉकडाऊन असले तरी घरात फार काही त्याचा परिणाम आम्हांला जाणवला नाही.परंतु लॉक डाऊनचा खरा फटका
बसला तो मुलांना कारण दिवसभर एका जागी स्थिर न बसणाऱ्या मुलांची अवस्था घररूपी तुरुंगात अडकल्यासारखी झाली. रोज सायकल चालवणे, गार्डनमध्ये खेळायला जाणे ह्या सर्वांवर बंधने आली. परंतु करोनारूपी दैत्याच्या भीतीने घरात अडकून राहण्याची शिक्षा त्यांनीही आनंदाने स्विकारली. मुलांनी घरातच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. मुलांचा अभ्यास आणि शाळा यातून माझीसुद्धा तात्पुरती सुटका झाल्याने रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून मलाही फावला वेळ मिळू लागला. तो फावला वेळ पुढे सत्कारणी लागला असं आता जाणवतयं.

मला लेखन आणि वाचनाची लहानपणापासून आवड होतीच त्यात मायबोलीचा आधार मिळाला. मायबोलीवर वाचक म्हणून सक्रीय होते परंतु सदस्य नव्हते. लॉकडाऊनच्या या कालावधीत मी मायबोली परिवाराची सदस्य बनले आणि मायबोलीवर पहिली कविता लिहिली. पहिल्या कवितेवर कृपाळू मायबोलीकरांनी दिलेल्या प्रतिसादाने माझा आत्मविश्वास दुणावला आणि मग जसे शब्द सुचत गेले तश्या कविता लिहित गेले. ह्या कालावधीत मला माझी स्वतःशीच नव्याने ओळख झाली. आपण आपल्या मनातील भावना लेखनाद्वारे मांडू शकतो हा नवा आत्मविश्वास मनात जागा झाला त्याबद्दल मी मायबोली परिवाराचे मनापासून आभार मानते.

दिवस पुढे सरत होते त्या कालावधीत एकही करोनाचा
रुग्ण आमच्या वसाहतीत सापडला नव्हता. पण लॉकडाऊन चे नियम शिथिल झाल्यानंतर लोकांनी घराबाहेर पडणं सुरु केलं आणि अचानक शेजारील बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीला आणि तिच्या कुंटूंबियांना करोनाची लागण झाल्याची बातमी कानावर आली आणि त्यावेळी खरोखर मनात खूप भीती दाटून आली. तर ह्या अदृश्य राक्षसाने आपल्या आजूबाजूला धडक शेवटी मारलीच !

अज्ञाताच्या तीरावर जणू
नश्वर जीवन उभे ठाकले
वर्तमान भासे अंधारी डोह अन्
भविष्याचे मळभ मनी दाटले..

नैराश्याची अशी हलकीशी भावना मनामध्ये येऊ लागली. पतींना तर नोकरी निमित्त बाहेर जावं लागतयं न जाणो कधी कुठल्याही रुपाने हा दानव घरात घुसला तर? नको.. ..नको.... असले नकारात्मक विचार मनात नकोच शेवटी मग स्वतःची स्वतःच समजूत घालण्याची वेळ आली.

सुदैवाने मैत्रिण व तिचे कुटूंबीय करोनाला हरवून त्या संकटातून बाहेर आले. आता हळूहळू करोनाने आजूबाजूला चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. बाजूच्या दोन बिल्डींगमध्ये करोनाचे रुग्ण सापडल्याने सदर बिल्डींग सील केल्या आहेत. पण हे सारं आता अंगवळणी पडलयं. घरात नकळतपणे येऊ शकणाऱ्या करोनारूपी संकटाला तोंड द्यायची मानसिक तयारी झाली आहे मनाविरुद्ध का असेना पण ती तर करावीच लागणार.

हा लॉकडाऊन चा कालावधी व त्यामध्ये आलेले चांगले वाईट अनुभव आपल्यापैकी कुणीही कधीही आपल्या आयुष्यात
विसरू शकणार नाही कारण ' न भूतो न भविष्यती' अशी परिस्थिती जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच निर्माण झाली असावी. एरव्ही हसत भेटणारी, मनमोकळ्या गप्पा मारणारी माणसं शेजारी राहत असूनही शंभर कोसावर गेल्यासारखी जाणवली. मग मात्र त्या करोनाचा भयंकर तिरस्कार वाटतो
आणि मनातल्या मनात त्याला बोल लावत म्हणते..

तुझ्यापायी उसवली रे
नात्यांची ती घट्ट वीण
भावकल्लोळ बघ उरी दाटला
विचारांचा ना जाई शीण...

परिस्थिती कधी पुन्हा एकदा पूर्ववत होईल? कधी एकदा
तो तोंडावरला मास्क फेकून आपण मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकू? सहा महिनापूर्वी जो भूतकाळ आपण जगलो तो कधी आपला वर्तमान आणि भविष्य काळ होईल? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालतात आणि नकळतपणे मनातल्या मनात देवापुढे हात जोडले जातात आणि त्याची आळवणी सुरु होते आणि मग एक प्रकारची चैतन्यमय सकारात्मकता मनामध्ये
जागी होते आणि त्या अंतर्ज्ञानी द्वारकाधिशाला मनात आळवत म्हणते..

मुरलीधरा फुलविलेस तू
नवचैतन्य जे रम्य वृंदावनी
दारी रेंगाळणाऱ्या ह्या दानवाला
धाड ना रे तू यमसदनी...

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख
मायबोलीने खरेच चांगला आधार दिला
आता पुर्वव्रत कधी होणार याची वाट बघण्यापेक्षा येणारा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला असेल असे समजून पुढे जायचे

छान लिहीलयं , मी पण मार्चपासून लिहीती झाले नाही तर आधी आठ वर्षे नुसती वाचनमात्र होते मायबोलीवर Happy
मध्ये मध्ये असलेल्या कविताही खूप आवडल्या.

मायबोलीने खरेच चांगला आधार दिला...सहमत.

धन्यवाद किशोरजी, सामो आणि वीरुजी ..
तुमचा नियमित प्रतिसाद माझा लेखनाचा उत्साह वाढवायचा..

छान लिहलंय Happy
लवकर जाऊ दे हा कोरोना!

खूप छान लिहिलेय. अधूनमधून केलेल्या कवनांच्या पेरणी मुळे लेख खूप परिणामकारक झालाय.

>> लॉक डाऊनचा खरा फटका बसला तो मुलांना कारण दिवसभर एका जागी स्थिर न बसणाऱ्या मुलांची अवस्था घररूपी तुरुंगात अडकल्यासारखी झाली

अगदी अगदी खरे आहे !!!

छान लिहीलंय
गणराया सर्वांना निरामय आयुष्य देवो
ह्या विघ्नातून सुटका होवो