एक स्फुट
अनुभूतींची वजाबाकी-स्पर्श
परवा युवल हरारेंचं ’सेपियन्स’ वाचत होतो. त्यात मानवजातीच्या उत्क्रांतीची रोमहर्षक, विचारप्रवर्तक आणि सखोल माहिती दिलेली आहे.
वाचतांना वेगवेगळ्या ठिकाणी विविध भावना आणि अभिव्यक्तींचा उत्क्रांतीवजा लेखाजोखा त्याने घेतला आहे.
भूक, क्रोध, ममता, असूया, लोभ अशा अनेक भावना मानवाने उत्क्रांतीच्या आपल्या प्रवासात हजारो वर्षात विकसित केल्या. वैज्ञानिक प्रगती तर झालीच पण हा भावनात्मक विकास आणि अभिव्यक्तीसाठी त्याने वेगवेगळे अविर्भाव विकसित केले. देहबोली, पूरक स्वर व त्या बरोबरच काही घटनांच्या संदर्भात व्यक्त करण्यासाठी विविध संकेत; उदा: काळा किंवा संपूर्ण सफेद पोशाख- याच दीर्घ प्रवासात विकसित झाले. काही संकेत व अविर्भाव प्रदेश व समूह सापेक्ष होते तर काही सर्व जमातींसाठी समान होते. परंतु या सर्वात बर्याच भावना व त्यांच्या अभिव्यक्तीचे मार्ग किंवा संकेत समूह सापेक्ष नव्हते.
त्यातील एक म्हणजे विजय, हर्ष, ममत्व किंवा प्रेम तसेच संघभावना यांची अभिव्यक्ती आणि या दोन्हींशी घनिष्ट्पणे निगडित असणारा स्पर्श.
हा विचार माझ्या मनात का आला आणि आता तो का सतावत आहे? कारण स्पर्श ही अभिव्यक्ती अचानक धोक्यात आली आहे किंवा तिचे अस्तित्व मर्यादित होऊ घातले आहे.
विजय, हर्ष, ममत्व किंवा प्रेम तसेच संघभावना यांची अभिव्यक्ती करण्याचा संकेत स्पर्श आहे. हस्तांदोलन,आलिंगन, ओष्ठ-अभिवादन, एकमेकास टाळी देणे यात आपपरभाव क्वचितच येत असे, यांना परिचित-अपरिचित, . हे संकेत व्यक्त करण्यासाठी केवळ आतून तशी भावना उचंबळून येणे आवश्यक असे. हस्तांदोलनासारख्य़ा काही अभिव्यक्तींत काही औपचारिकता असू शकते हे मान्य आहे.
समोर सुंदर मूल दिसले की आपण साहजिकच त्याला पाहून स्मित करतो, कधी कधी जाऊन त्याचे चिमुकले बोट आपल्या हातात घेतो, त्याच्या गालावर स्पर्श करतो. रस्त्यावर कोणा अनोळखी व्यक्तीला अपघात झालेला असला तर धावत जाऊन त्याला आधार देतो. इतरही धावत येत त्याला पाणी आणून देतात,कोणी वाहनात बसवून दवाखान्यात घेऊन जातात. आणि हे सर्व करत असतांना सर्वात महत्त्वाचा भाग असतो -स्पर्श जाणिवपूर्वक किंवा अनवधानाने. आणि स्पर्श केल्याशिवाय मदत करणे अशक्य असते, नाही का?
कोणीतरी काळजीत किंवा दु:खात असतांना त्याचा हात हातात घेऊन सांत्वन करणे, डोक्यावरून हात फिरवत गोंजारणे यात अगदी नैसर्गिक क्रिया आहेत आणि यांत आपपरभावास जागाच नसते.
काही व्यवसायात तर स्पर्शाचे अनन्य महत्त्व आहे. एका शिक्षकाने होतकरू, हुशार विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप देत कौतुक करणे, शाबासकी देणे किंवा हस्तांदोलन करणे हा तर त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. फूटबॉल, बास्केट्बॉल सारख्या अनेक सांघिक खेळात स्पर्शाचे मोहक रूप गोल झाल्यावर त्यांच्या विविध देहबोलीतून अन अविर्भावांतून व्यक्त होते नव्हे अन्य अभिव्यक्ती कमीच पडतात.
प्रेक्षक वर्ग एकमेकांच्या निकट सान्निध्यात असतांना त्यांचा जयघोष आणि त्यांचे प्रोत्साहन सामन्यात रंग आणण्यात किती महत्त्वाचे असते ते मी वेगळे लिहिण्याची गरज नाही?
प्रणयाराधनात पहिला स्पर्श, पहिले आलिंगन या बद्दल मी वेगळे लिहायचे गरज नाही. नुकतेच उमलत असणारे किशोरवयातील प्रेम चोरट्या स्पर्शातून फुलते. तो वर दोघेही अपरिचित किंवा अल्प-परिचितच असतात. मग पुढे ते उष्ण श्वास आणि..... या बद्दल मी पामर काय लिहू??? सर्वकाही स्पर्शाचेच गारुड आहे.
अनेक वर्षांच्या भेटीनंतर आजीने थरथरत्या हातात घेतलेला आपला हात, वृध्द शिक्षकांच्या भेटीतील त्यांची पाठीवरील शाबासकी, अफाट यश प्राप्त केल्यानंतर गावकर्यांनी केलेल्या स्वागताच्या वेळी कोचने दिलेले आलिंगन, मध्य-पूर्वेतील अभिवादन पध्दतीतील ओष्ठ अभिवादन, अनेक धर्मातील रीतीरिवाजाप्रमाणे करण्यात येणारे कपाळाचे चुंबन, आपल्या भारतीय संस्कृतीत घरी कोणीतरी आल्यानंतर त्यातील स्त्रीला परत जाताना लावण्यात येणारे हळदी-कुंकू या आणि अशा अगणिक प्रघातात स्पर्श हा भावनेची अभिव्यक्ती किंवा रिवाज म्हणून विकसित झाला आहे.
मी तरी मोठ्या प्रेक्षक समूहाशिवाय संगीताची मैफिल, क्रिकेट वा फूटबॉलचा सामना, सहज गंमत म्हणून एकत्र सहल, संपूर्णत: अनोळखी लोकांबरोबर केलेला प्रवास, कोणत्याही यश साजरे करणे-त्या बरोबरच तारस्वरात केलेला जयघोष अनेक शोकसभा किंवा स्मशान यात्रा देखील; यांची कल्पनाच करू शकत नाही. शारिरीक सान्निध्य आणि स्पर्श हे सामूहिक दाद, सानुभूती, विजयसमारंभ यांचे अविभाज्य घटक आहेत- की होते.
“स्पर्श होता तुझा”, “हात तुझा हातात, धुंद ही हवा”, “साथी हात बढाना” अशा भावपूर्ण स्पर्शसंगत गीतांनी आपले साहित्य समृध्द आहे.
या शिवाय मनोवैज्ञानिकांनी म्हणतात-.
‘From the time we are in the womb through our elderly years, touch plays a primary role in our development and physical and mental well-being. New studies on touch continue to show the importance of physical contact in early development, communication, personal relationships, and fighting disease”
आपण गर्भाशयात असतो तेव्हापासून वयस्क होईपर्यंत आपल्या शारिरीक आणि मानसिक आनंद व खेद यांत स्पर्श महत्त्वाची भूमिका निभावतो. संवाद, वैयक्तिक नातेसंबंध अन व्याधींशी झगडण्यात तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. स्पर्श सुरक्षित असल्याचा अनुभव देतो, तो दु:खावर हळूवार फुंकर मारतो, एक साधा स्पर्श प्रेमाचा हार्मोन-ऑक्सिटॉसिन निर्माण करतो
आज कोरोनामुळे घातलेले निर्बंध तत्कालिक किंवा लघुकालिक नसून ते ’न्यू नॉर्म’चे भविष्यातील अंग बनतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. भविष्यात एकमेकांपासून सहा फूट अंतर, अनोळखी व्यक्तीस स्पर्श न करणे आणि त्या बरोबरच गर्दी न टाळणे हे व्याधीमुक्त अन मृत्यूचा धोका टाळण्यासाठी अनिवार्य असल्याचे भाकित करण्यात येत आहे. शतकानुशतकांपासून मानवी संस्कृतीचा भाग असणार्या स्पर्श संलग्न अभिव्यक्ती धोक्यात आहेत. अन हो! आमच्या संस्कृतीत हस्तांदोलन नव्हते, नमस्कार होता आणि सोवळेओवळे हे तर आधी पासूनच आम्ही पाळत होतो असा अविर्भाव कोरोना संकट आल्यानंतर आणणार्यांना माझी एवढीच विनंती आहे की आलिंगन, साष्टांग अभिवादन;ज्यात तुम्ही केलेला चरणस्पर्श व त्या वडिलधार्यांनी पाठीवर हात ठेवून दिलेला आशिर्वाद या स्पर्शसापेक्ष अभिव्यक्ती देखील आपल्या संस्कृतीचा भाग आहेत हे देखील मान्य केलेच पाहिजे.
स्पर्श ही अभिव्यक्ती खरोखरच धोक्यात आहे! निदान अनोळखी लोकांच्या सान्निध्यात व्यतीत केलेल्या विविध सामाजिक घटनांच्या बाबतीत, मग ते सामने, मैफिली किंवा शोकसभा असोत, की एखाद्या अनोळखी हतबल, अपघातग्रस्त व्यक्तीची मदत असो!
कदाचित काही वर्षांनी एखादे बाबा आपल्या मुलाला सांगत असतील,
“आमच्या वेळी ना आम्ही असे एका स्टेडियम नावाच्या जागी एकत्र जायचो अन क्रिकेट पहायचो. आता तू लॅपटॉप( किंवा त्या काळी भिंतीवर नुसताच प्रोजेक्ट करणारे एखादे गिझ्मो असेल तर) पाहतोस ना तोच खेळ त्या चारी बाजूला लोक बसलेल्या मैदानात आम्ही पहायचो. आमच्या आवडत्या विरुध्द बाजू असायच्या अन मग आम्ही खूप जोरजोरात जल्लोष करायचो. आपली बाजू जिंकू लागली की एकमेकांशी हात मिळवायचो. बहुतेक जण अनोळखीच बरं का”..किंवा “तुला टाऊक आहे का, तू जन्म घेण्याच्या काही वर्षे आधी आम्ही एका बस मध्ये सत्तर लोक प्रवास करायचो.. अगदी उभे राहून सुध्दा” आणि, “ रस्त्यावर कोणी अनोळखी आजाराने अचानक चक्कर येऊन पडला तर आम्ही धावत जाऊन त्याला बसवायचो, डॉक्टरकडे घेऊन जायचो” असे सांगितल्यावर.”खरं सांगताय का बाबा??” डोळे विस्फारून मग तो मुलगा विचारत असेल.
का कुणास ठाऊक? जग खरच एवढे बदलेल? शतकानुशतके उत्क्रांत पावलेले संकेत असे अस्तंगत होतील? बदलतील? अन तेवढेच आल्हाददायक, परोपकारी, सहृदय स्पर्शावर आधारित संकेत विकसित व्हायला किती शतके जातील कोण जाणे? खंत वाटते स्पर्श या संकेतवजा नैसर्गिक अनुभूतीच्या अस्तंगत होण्याची ! उबदार स्पर्श, प्रेमळ स्पर्श, थरथरता स्पर्श, उन्मादक स्पर्श, उष्ण स्पर्श, थंड स्पर्श, प्रोत्साहनाची अन शाबासकीची थाप, प्रेमाचे आलिंगन, दीर्घ हस्तांदोलन, ओष्ठ अभिनंदन आणि असे अनेक स्पर्श, हे निर्भेळ आनंद कदाचित केवळ परिचितांसाठी सीमित असतील. या अभिव्यक्तींचा तितकाच प्रभावी पर्याय विकसित होण्यास किती शतके लागतील?
परिवर्तन, परिवर्तन .... हाच सृष्टीचा नियम आहे हे खरे .... म्हणूनच पुन्हा कालाय तस्मै नम:
आणि पुन्हा अनेक अनुत्तरित प्रश्न!!
इति
प्रतिसादांच्या अपेक्षेत
प्रतिसादांच्या अपेक्षेत
छान लिहिलय. पटतंय.
छान लिहिलय. पटतंय.
त्या बरोबरच गर्दी न टाळणे हे व्याधीमुक्त अन मृत्यूचा धोका
ईथे गर्दी टाळणे, असायला हवे का?
गर्दी आणि सामाजिक वृत्ती या
गर्दी आणि सामाजिक वृत्ती या बाबी प्रसंग संगत असतात... उदा: मैपिलीतील प्रचंड मोठा समुदाय अन क्रिकेट वा फूटबॉल मॅच मधील प्रेक्षक वर्ग ही गर्दी असूनही वांछित आहे..... यावर आता संकट आले आहे.
मृत्यू टाळण्यासाठी गर्दी टाळणे ही नविन परिस्थिती आता निर्माण होत आहे जी उत्क्रांतीच्या इतिहासाविरुध्द आहे असे मला वाटते
ओह के, समजले आता.
ओह के, आता समजले.

धन्यवाद
धन्यवाद
संपूर्ण अखंड वाक्य वाचल्यावर
संपूर्ण अखंड वाक्य वाचल्यावर कळलं.

मी मराठी पासून जरा दूर आहे..माबोवरच काय ते लिहायला वाचायला मिळते.म्हणून दोनदा वाचल्यावर कळले.
सर, मध्ये तुम्ही आणखी लेख
सर, मध्ये तुम्ही आणखी लेख लिहिले होते. शोधतेय ते पण सापडत नाहिएत.
गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर निवांत वाचायचे ठरवलं होतं.
मला भुभु लोकांचे गार गार नाक
मला भुभु लोकांचे गार गार नाक कपाळाला लावायला फार आवडते. सुखद स्पर्श असतो.
छान लिहिलंय. खरं तर कोरोनाची
छान लिहिलंय. खरं तर कोरोनाची लस येईल अन त्यानंतर सर्व पहिल्यासारखे होईल अशी भाबडी म्हणा किंवा वेडी आशा रोजची लढाई लढायला मला बळ देतेय. अज्ञानातच सुख असते म्हणतात, ते तसेच असू दे असे वाटते.
धन्यवाद
धन्यवाद
>>सर, मध्ये तुम्ही आणखी लेख
>>सर, मध्ये तुम्ही आणखी लेख लिहिले होते. शोधतेय ते पण सापडत नाहिएत.>>
https://www.maayboli.com/node/75895
https://www.maayboli.com/node/75905
https://www.maayboli.com/node/75868
https://www.maayboli.com/node/75867
https://www.maayboli.com/node/75866
https://www.maayboli.com/node/75840
https://www.maayboli.com/node/75786
https://www.maayboli.com/node/75784
https://www.maayboli.com/node/71408
https://www.maayboli.com/node/71407
https://www.maayboli.com/node/61648
https://www.maayboli.com/node/61673
https://www.maayboli.com/node/58830
https://www.maayboli.com/node/56563
https://www.maayboli.com/node/44214
https://www.maayboli.com/node/25080
https://www.maayboli.com/node/24514
https://www.maayboli.com/node/24533
https://www.maayboli.com/node/24537
धन्यवाद.
धन्यवाद.
निवांत वाचेन.
आकुर्डीत असताना एका लायब्ररीची मेम्बर होते.
दरवेळी नवीन पुस्तक वाचायला आणले की, वाटायचे नवीन ट्रिट(मेजवानी) मिळणार.
हे नऊमहिन्यांपूर्वेी लिहिले
हे नऊमहिन्यांपूर्वेी लिहिले होते....पुन्हा तीच स्थिती आली आहे... कालाय तस्मै नम:
आज साधारण दोन वर्षांनंतर ही
आज साधारण दोन वर्षांनंतर ही भिती फोल ठरण्याच्या मार्गावर आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे ना? I am glad to be proved wrong !
आज साधारण दोन वर्षांनंतर ही
आज साधारण दोन वर्षांनंतर ही भिती फोल ठरण्याच्या मार्गावर आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे ना? I am glad to be proved wrong !
सुरेख स्फुट!
सुरेख स्फुट!