पाचवी सहावीला असतांनाची गोष्ट. आमच्या शाळेचे संस्थापक थोर समाजसेवक कै.आण्णासाहेब बाळसे यांची जयंती दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहात साजरी व्हायची. सालाबादाप्रमाणे यावेळी देखील जयंतीची तयारी जोरात सुरु होती. पताका, तोरणं, रांगोळ्या यांनी शाळा सजवली होती. चित्रकलेचे सर शाळेबाहेरच्या फळ्यावर आण्णांची जीवनगाथा मन लावुन रेखाटत होते. कार्यक्रमाला स्वच्छ गणवेशातच येण्याबद्दल हेडसरांनी आठवणीने तर पी.टी.च्या सरांनी डोळे वटारुन सांगितले असल्याने त्यानुसार आमचीही तयारी सुरु होती.
कार्यक्रमाच्या दिवशी शाळेत वेळेवर हजर झालो. मराठीच्या बाईंनी आण्णांवर रचलेल्या काव्याच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. भाषणांना सुरुवात होताच शाळेतली स्कॉलर पोरंपोरी 'अध्यक्ष महाशय,पुज्य गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो..' अशी घडाघडा सुरुवात करत दोन शब्द शांततेने ऐकण्याची विनंती करुन दोनदोनशे शब्दांची भाषणे ठोकत होती. जसजशी भाषणे पुढे सरकत होती तसतशी आमची चुळबुळ वाढली होती. एकुणच वातावरणाचा उत्साहाकडुन कंटाळ्याकडे प्रवास सुरु झाला होता. प्रमुख पाहुणे म्हणुन गावातले चळवळे पुढारी श्री.आबासाहेब आगलावे हे वेळातवेळ काढुन कार्यक्रमाला उपस्थित होते. गावात लग्न, मुंज, बारसं, वाढदिवस, श्राध्द असा सुखदुखाचा कोणताही कार्यक्रम असो आबांचे भाषण ठरलेले असायचे. भाषणामध्ये आबा राजकारण, देशाची प्रगती, अमेरिका,रशिया, पाणी टंचाई अशा सगळ्या विषयांवर बोलायचे. एकदा बोलायला उभं राहिल्यावर सुचत नव्हतं म्हणुन आबाने पिक्चरची स्टोरीच सांगितली असं माझे वडील, दादा सांगायचे. दोघे एकाच वर्गात शिकलेले. दादांनीपण भाषणं करावी, शाळेत प्रमुख पाहुणं म्हणुन यावं असं मला खुप वाटे. एकदा तसं बोललो तर दादा उठुन बाहेर निघुन गेले. तेव्हा आईने मला गप केलं अन् तुझ्या शिक्षणासाठी दादांनी पुढारपण सोडुन वावरात मन रमवलं असं सांगितलं. मोठी मानसं काय वागतात तेच कधी समजत नाही.
आज आबांना तातडीने तालुक्याच्या गावाला जायचे असल्याने विद्यार्थ्यांची भाषणे आटोपती घेऊन हेडसरांनी त्यांना चार शब्द बोलण्याची विनंती केली. एरव्ही आबांचे भाषण म्हणजे तासाभराची निश्चिंती असे. पण आज 'ज्याप्रमाणे अण्णासाहेबांनी आयुष्यभर अन्यायाविरुध्द आंदोलन केले, त्याचप्रमाणे तुम्हीदेखिल जेव्हा अन्याय दिसेल तेव्हा आंदोलन करा' असा मोलाचा संदेश देऊन त्यांनी भाषण आटोपते घेतले. आबांनी पाचच मिनिटात सुटका केल्याने टाळ्यांचा कडकडाट करत आम्हीही त्यांना मनापासुन धन्यवाद दिले. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाल्यावर आम्ही गावभर उंडरायला मोकळे झालो.
लवकर कार्यक्रम संपल्याने आणि समारोपाच्या वेळी भेटलेल्या लिमलेटच्या गोळीने अंगातली मरगळ जाऊन एकदम तरतरी आली होती. त्या आनंदातच आम्ही म्हणजे मी, प्रकाश आणि बबल्या पाय नेतील तिकडे भटकत होतो. घरी गेलो तर पुन्हा बाहेर पडायची चोरी म्हणुन घरची वाट टाळलीच होती. आता उन वाढायला लागल्याने चांगलाच चटका बसत होता अन काय करावे तेही सुचेना. फिरता फिरता एका बाभळीखाली कोणीतरी एक बकरा बांधुन ठेवलेला दिसला. झाडाच्या तोकड्या सावलीत तो मुका जीव कासावीस होऊन ओरडत होता. बिचा-याला पाणीही पाजलेलं दिसत नव्हतं. त्याची ही दशा पाहुन आमच्या पोटात कालवाकालव झाली. सकाळचा आबांचा 'अन्यायाविरुध्द आंदोलन करा' हा संदेश होताच डोक्यात.
"मंग र गड्या हो, करायचं का आंदोलन?" असं मी विचारताच प्रकाश लगेच तयार झाला. पण "म्हंजी काय करायचं?" हा बबल्याचा प्रश्न ऐकुन त्याला आम्ही समजावलं की त्या बक-याला मदत करायची, त्याला सोडुन द्यायचं. त्यावर बबल्याने "आरं पण आसं कसं सोडुन द्यायचं. त्येचा मालक आसेल ना कोणी" ही शंका उपस्थित करताच प्रकाशने त्याच्या पाठीत एक बुक्का घातला आणि मी त्याच्यासारख्या लोकांमुळे बाकीच्यांना अन्यायाविरुध्द आंदोलन करता येत नाही हे पटवुन दिलं. शेवटी हो नाही करता करता बक-याला सोडुन देण्यावर एकमत झालं. कोणी बघत नाही याची खबरदारी घेऊन आम्ही त्याला मोकळ केलं. बंधनातुन मुक्त झालेला तो मुका जीव वाट फुटेल तिकडे उड्या मारत पळुन गेला.
पहिलच आंदोलन एकशेएक टक्के यशस्वी झालेलं पाहुन आम्ही भलतेच खुश झालो. आता पुढे काय करायचे हे ठरविण्यासाठी निवांतपणे पारावर जाऊन गावात कोणाकोणावर अन्याय होतो आहे याचा विचार सुरु केला.
"पारुआत्या तिच्या सुनेला लय छळते. माझी माय सांगत होती." बबल्याने माहिती पुरवली. हे ऐकताच "तुला कशाला पायजेत रे मोठ्यांच्या पंचायती?" असं म्हणत प्रकाशने पुन्हा हात उचलला. पारुआत्याच नाव ऐकताच मागच्या टायमाला आमच्या मळ्यात घुसलेली तिची म्हैस हुसकावुन लावल्यावर पारुआत्याने आमच्या घरासमोर उभं राहुन गल्ली डोक्यावर उचलुन घेतली होती याची आठवण झाली आणि मी पण बबल्याच्या प्रस्तावाला ठाम विरोध केला. आता बराच उशीर झाला होता अन् भुकाही लागल्या होत्या. तेव्हा संध्याकाळी भेटायच ठरवुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
घरात पाय ठेवताच "गावभर कुठं बोंबलत हिंडत व्हता रं?" या शब्दात दादांनी माझे स्वागत केले. "आवो घरात तर येऊ द्या पोराला. आला नाही तोच उलटतपासणी सुरु. त्यानं काही केलं तरी तुम्हाला तरास नाही केलं तरी तरास. काय करावं बया तुमचं. सकाळपास्न लेकरु उपाशी हाये." असं बोलुन आईने माझी बाजु घेतली. "मस शाळा झाडुन आलय तुमच पोरगं. इचारा त्याला काही भाषणबिषण केलं का त्यानं. कार्यक्रम सकाळीच संपला. आबा भेटला व्हता मला." दादा वैतागुन म्हणाले. दादांना कोण कुठं भेटेल काही नेम नाही असं पुटपुटत मी हातपाय धुतले अन पाटावर जावुन बसलो. पोटात पडल्यावर झोप कधी आली समजलच नाही.
संध्याकाळी बाहेरचा कालवा ऐकुन जाग आली. काय झाले ते पहायला बाहेर आलो तोच दादांनी हाक मारली. दादांचा चेहरा गंभीर दिसत होता. "भैया नीट उत्तर दे.
दुपारी तुम्ही काय केलं? खरं सांगशिल तर तुझ्याच फायद्याचं राहिल." दादा शांतपणे म्हणाले. दादांनी गंभीर चेहरा केल्यावर खरं सांगायचं असतं हे अनुभवाने मला माहित होतं. त्यामुळे आबांचा "अन्यायाविरुध्द आंदोलन करा" हा संदेश ऐकुन आम्ही उन्हात बांधलेला बकरा सोडुन दिला हे ऐकल्यावर दादा खो खो हसायला लागले. "येडे झाले का तुम्ही. तो आबा कायबी सांगेल. आरं तो गप रायला तर गावातले निम्मे भांडणं मिटुन जातील." दादा हसत हसत म्हणाले. दादांना हे कसं कळले याबद्दल मला काहीच कळेना तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सोडवलेला बकरा पारु आत्याने नवस फेडायला आणला होता. त्याची सुटका झाल्यावर त्याने आबांच्या खळ्यात घुसुन तेथे वाळत टाकलेल्या बाजरीमध्ये तोंड घातल्याने गड्याने त्याला बांधुन ठेवला होता. त्यामुळे आबा परतल्यावर पारु आत्याबरोबर त्यांची चांगलीच जुंपली होती. हा आमचाच पराक्रम असेल असा अंदाज आल्याने दादांनी खडा टाकुन पाहिला आणि तो बरोबर लागला. "जा, पळ आता. खेळुन ये. रातच्याला पारु आत्याकडं जेवायला जायचं आहे." दादा माझ्या पाठीत धपाटा घालत म्हणाले अन् मी सुसाट बाहेर पळालो.
आंदोलन
Submitted by वीरु on 20 August, 2020 - 17:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असे एक आंदोलन सुफल संपुर्ण
असे एक आंदोलन सुफल संपुर्ण झाले.
सुंदर. पुलेप्र.
भारीय
भारीय
मस्त
मस्त
असे एक आंदोलन सुफल संपुर्ण
असे एक आंदोलन सुफल संपुर्ण झाले.>>
धन्यवाद पाफाजी.
धन्यवाद अनंतनी.
धन्यवाद अनंतनी.
धन्यवाद म्हाळसाजी.
मस्त.
मस्त.
अध्यक्ष महाशय,पुज्य गुरुजन
अध्यक्ष महाशय,पुज्य गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो..' >> शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या..
छान कथा लिहितायेत ..
छान !
छान !
आमच्या ही शाळेत १५ ऑगस्ट आणि
आमच्या ही शाळेत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला असणारे, पताका, तोरण, रांगोळी, पाहुणे आणि त्यांची बोरींग भाषणे आठवले.
छान लिहिले आहे.
धन्यवाद बोकलत.
धन्यवाद बोकलत.
धन्यवाद अस्मिताजी
शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.
शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या..>> धन्यवाद रुपालीजी.
पाहुणे आणि त्यांची बोरींग
पाहुणे आणि त्यांची बोरींग भाषणे आठवले. >>
धन्यवाद मृणालीजी.
छान गोष्ट.
छान गोष्ट.
अजून आंदोलनं करताय का?
भारी
भारी
मला तो अध्यक्ष महाशय वाला पूर्ण मायना आठवला.
भारी
भारी
अजून आंदोलनं करताय का?>>
अजून आंदोलनं करताय का?>>
धन्यवाद अरिष्टनेमि.
धन्यवाद अनुजी. धन्यवाद हाआ
धन्यवाद अनुजी.
धन्यवाद हाआ
हा हा भारी
हा हा भारी