तुझ्याजवळ मी पुन्हा परतते तुझ्या बळावर

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 August, 2020 - 07:26

अंधारावर विजय मिळवते तुझ्या बळावर
वादळातही तेवत असते तुझ्या बळावर

खांब जणू तंबूचा तू, मी विरले कापड
अस्तित्त्वाला उचलुन धरते तुझ्या बळावर

छंदबद्ध ना वृत्तबद्ध पण मी गुणगुणते
आयुष्याला चाल लावते तुझ्या बळावर

उन्ह तळपते, दुर्गम वाटा, खराब रस्ते ..
टायर पंचर ..तरी धावते तुझ्या बळावर

तऱ्हे तऱ्हेची लेबले जरी जग चिकटवते
आरशात मी मला शोधते तुझ्या बळावर

दरवेश्यागत दैव फिरवते गावोगावी
तुझ्याजवळ मी पुन्हा परतते तुझ्या बळावर

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users