हे खरे की ते खरे?

Submitted by निशिकांत on 9 August, 2020 - 23:20

प्रश्न पडतो वेष्टनातिल पाहिल्यावर चेहरे
हे खरे की ते खरे अन ते खरे की हे खरे?

सुख क्वचित काळीच येते पण तरीही साजरे
दु:ख देते साथ अविरत, वाटते का बोचरे?

लोकशाही भार झाली, आणि जनता खेचरे
संविधानी वाचले हाती जनाच्या कासरे

धनगरांनो आमदारांचे कळप का लपविता?
शोधती ते, कोण देते खावया गुळ खोबरे

का असे म्हणतात सारे वेड मजला लागले?
फक्त त्यांना सांगतो, होऊ नका हो हावरे

मागण्या गेलो तिकिट मी सर्व पक्षांच्यापुढे
खानदानी शोधती ते, ना सुशिक्षित पामरे

वादळांच्या कनवटीला बांधला विध्वंस का?
शोधती नुकसान करण्या फक्त गरिबांची घरे

जिंकल्यावरती पुढारी परतुनी आले कुठे?
फक्त दिल्लीचेच नेते आज त्यांचे सोयरे

नांदते "निशिकांत"खदखद केवढी अंतरमनी
काळजीने काळजाचे वाढतिल अजुनी चरे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users