मीच माझा मार्ग आहे शोधलेला

Submitted by निशिकांत on 4 August, 2020 - 23:17

मीच माझा मार्ग आहे शोधलेला
दोष माझा, आज जो आहे भुकेला

जन्मलो मी वाट बघण्या शेवटाची
भार मी नुसताच झालेला धरेला

शोधले तुजला सखे दाही दिशांना
आज मी शोधेन अकराव्या दिशेला

मंदिराची रामलल्ला का टिका रे!
हाड का नसते कुणाच्याही जिभेला

संसदेचे सत्र असुनी बंद, नेता
भेटण्या लोकांस गावी का न गेला?

मैफिलीच्या शेवटी विझली तरीही
सोस परवान्यात जळण्याचा शमेला

अंगणी लाऊन रोपे झेनियांची
गंध नाही, दोष का द्यावा हवेला

रत्न असुनी भारताचे, ना मिळाला
आजवर सावरकरांना रत्न शेला

का नशा "निशिकांत" करुनी दु:ख सरते?
एक सरला! का पुन्हा भरलास पेला?

निशिकांत देशपांडे. मो,क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ...