अंबाजोगाईच्या दासूच्या आभाळभर कविता...

Submitted by Prasad Chikshe on 29 July, 2020 - 04:49

अंबाजोगाईच्या दासूच्या आभाळभर कविता...
dasoo.jpg
अंबाजोगाई म्हणजे थोडं इरसाल गाव. इथली लोकं वेगळ्याच तंद्रीत असतात. प्रत्येकात एक वेगळाच आत्मविश्वास असतो. जगातील प्रत्येक विचारधारेचे पाईक आपल्याला हमखास अंबाजोगाईत पाहायला मिळतात. इथे एकाहून एक माणसे घडली. जीवनाच्या विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी अशी प्रचंड उंचीची माणसे म्हणजे अंबाजोगाईकर.

अस्वस्थतेच्या कोलाहलात मनाला उभारी देणारे शब्द ज्यांच्या लेखणीतून उतरतात असे मराठीतील प्रसिद्ध कवी व गीतकार दासू वैद्य यांच्या घडणीत अंबाजोगाईचे मोठे योगदान आहे.ज्ञान प्रबोधिनीच्या लहानग्यांच्या अभिव्यक्तीची तयारी चालू होती. गाण्याचे संगीत व शब्द कानावर पडतातच सहजच त्यांच्या सोबत फेरधरून मी मनसोक्त नाचलो. दिवसभर ते गाणे नकळत गुणगुणत होतो.

वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे .......

माझ्यासारखा वयाच्या पन्नाशीला आलेल्याला व ज्यांनी वयाच्या पाचव्या वर्षात पदार्पण केलं आहे अशांना देहभान विसरून एका सुंदर विश्वात नेणारे हे गाणे. सावरखेड एक गाव या चित्रपटातील. त्या आठवड्यात निदान दररोज तीन ते चार वेळा ते गाणे ऐकत होतो. सहजच कोण आहे गीतकार म्हणून पाहिलं तर उडालोच....तो तर आपला दासू निघाला भाई ....दासू म्हणजे दासू वैद्य. सध्याचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विभागप्रमुख. त्यानंतर मात्र मी त्यांच्या कवितांचा चाहता झालो.

दासूची कविता जेवढी मला आवडते तेवढाच हा माणूस पण आवडतो. त्याचा माझा सहवास फारसा नाही. जे काही त्याच्या बद्दल ऐकले, पाहिले, वाचले त्यातून एक वेगळेच नाते त्याच्याशी व त्याच्या कवितांशी व अर्थात गीतांशी जुळले. मनाचा राजा माणूस हा. अंबाजोगाईत आला तो अकरावीला. योगेश्वरी महाविद्यालयात सुरुवातीचा काही काळ जुळवून घेण्यात गेला. पुढे मात्र तो परिसरात ओळखीचा झाला. सायकल घेवून तासन् तास दासोपंत व मुकुंदराजांच्या समाधीच्या परिसरात स्वत्व शोधणारा दासू. साहित्य निकेतन वाचनालयात पुस्तकांच्या दुनियेत धुंदपण जगणारा दासू. आपल्या भावंडांच्या सोबत वर्तमानपत्र कोळून पिणारा दासू ....आपल्या कविता त्यात छापून आल्यात का हे पाहण्यासाठी बसस्थानकावरील लखेरांच्या पेपर स्टॉलवर भल्या पहाटे धाव घेणारा दासू.सुधीर वैद्य सरांनी तू एकांकिका लिहू शकतोस म्हणाल्यावर सरस एकांकिका लिहिणारा दासू. आपली महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात असताना कविता लेखनासाठी सुवर्णपदक मिळवणारा दासू. मला आता पुढील शिक्षण विज्ञानचे नाही तर मराठीचे व नाट्याचे घ्यायचे आहे असे ठामपणे सांगणारा दासू कधी आभाळाएवढा झाला हे कळलेच नाही.

तो त्याच्या विश्वात मी माझ्या विश्वात. तुकाराम चित्रपट प्रदर्शित झाला व दासूच्या कवितांनी कवींचा बाप असणाऱ्या तुकारामाला शब्दात उतरवले.

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ विचाराची कळ, तुकाराम
शब्दांचे इमान, अक्षरांचे रान अभंगाचे पान, तुकाराम
भेदणारे मूळ, आशयाचे कुळ भाषेचा कल्लोळ, तुकाराम
पुन्हा उगवतो, खोल पसरतो सांगून उरतो, तुकाराम

गेल्या अनेक वर्षांपासून आपण दुष्काळाशी लढतोय आणि आता कोरोनाशी. यात सगळ्यात जास्त भरडले जातात ते आपले गरीब बांधव. या बांधवांच्या भावना व अवस्था ज्यावेळी दासू शब्दात व्यक्त करतो त्यावेळी कोरड्या डोळ्यांनी काळीज रडते. अशा भकास भोवतालात व वैशाखाच्या वणव्यात माणूस आधार शोधू लागतो. अनेकांना मदत करताना आपण कमी पडतोय ही जाणीव अस्वस्थ करणारी असते. त्यावेळी सोबत येते दासूची कविता आणि गाणे.

कोरड आभाळ पोळणारी माती
उसवली नाती भोवताली
मातीतलं बीज मातीतच मेले.
डोळे झाले ओले जगण्याचे....

मराठी भाषेच्या अंगणात असा अभिव्यक्तीचा एकही प्रांत दासूच्या समर्थ लेखणीतून आपल्या पर्यंत पोहचला नाही असा नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मनाला वेगळीच उर्जा देणारा हा शब्दांचा जादूगार आहे. त्याच्या लेखणीतून अनेक सुंदर आविष्कार होतात.

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला ..
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला....

हा गोंधळ तर आंबेची प्रचंड ऊर्जा आपल्यात निर्माण करते. पिंपळपान, रंग माझा वेगळा, सारख्या अनेक मालिकांचे गाजलेली शीर्षकगीते दासूने लिहिलेली आहेत. गुगलवर दासू वैद्य म्हणून शोधले की अमाप भांडार आपल्यासमोर उभे राहते.

गत शंभर वर्षात विशेष अशा ५० पुस्तकात दासूचा ‘तूर्तास’ या कविता संग्रहाचा समावेश अंतर्नाद मासिकाने केला आहे. अमाप लेखन, मोठमोठाले पुरस्कार, भरपूर प्रसिद्धी व अगदी विद्यापीठापासून मराठी सारस्वतांच्या अनेक साहित्य संमेलनात व कवी संमेलनात अतुलनीय यश मिळवणारा दासू मात्र अजूनही साधासुधा माणूस आहे. प्रेमाची विशाल परिभाषा जगणारा दासू स्वतःच्या घरी काम करण्याऱ्या मावशीला सकाळीसकाळी स्वतः चहा करून पाजतो. लहानपणी वडिलांचे बहिणीवर असलेले वात्सल्य अनुभवल्यावर आईकडे तक्रार करणारा दासू स्वतः बाप झाल्यावर आपल्या पोरीवर जीवापाड प्रेम करतो.

जसा उभ्या महाराष्ट्रासाठी संत तुकाराम महाराज आपला तुका होतो. तसाच अंबाजोगाईच्या मातीत ज्याची मूळंआहेत असा श्री दासोपंत हरिहरराव वैद्य तुमच्या आमच्यासाठी दासू होतो. अंबाजोगाईच्या दासूच्या आभाळभर कविता आणि गाणी आपल्यासाठी नित्याच्या सोबती होतात

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रसाद, अंबाजोगाई चा उल्लेख वाचून उत्सुकतेने लेख वाचला. माहितीपूर्ण वाटला.
अवांतर - आपल्या पाणी चळवळीबद्दल ऐकून खूप कौतुक वाटतं.

प्रसाद, अंबाजोगाई चा उल्लेख वाचून उत्सुकतेने लेख वाचला. माहितीपूर्ण वाटला.
अवांतर - आपल्या पाणी चळवळीब >>>>> +१

मला मथळा वाचून लेख पासोडीबद्दल असावा असे वाटले होते पण प्रत्यक्षात निघाला वेगळाच.

पण मस्त लिहिलंय लेखातली कित्येक गाणी ह्या दासू वैद्यांची आहेत हे माहित नव्हते.
किंबहुना हे कवी, गीतकारही आहेत हेच माहित नव्हते

धन्यवाद ह्या लेखाबद्दल.

पावसाची, एका शाळकरी मुलाशी केलेली तुलना - असलेली कविता फार सुंदर होती. मला वाटतं दासू वैद्य यांचीच होती. सापडली की देते.
_________
वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला…
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला
बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा
लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

– दासू वैद्य

नवीन माहिती समजली. धन्यवाद...
सुंदर कविता आहेत...
वाऱ्यावर्ती गंध पसरला ऐकायला खूप छान आहे.. पिक्चरायझेशन वाईट आहे..