लेखाजोखा आयुष्याचा पुन्हा पुन्हा हे सांगत आहे
नको उदासी, वेदनेतही छटा सुखाची नांदत आहे
नका विचारू धवल यशाची शिखरे का मी चढू न शकलो
पोट जाळण्या लढता लढता जगणेही पण कसरत आहे
गप्प गप्प का देव अताशा मंदिरातला? कयास माझा
संस्थानाच्या विश्वस्तांची देवावरती दहशत आहे
वळचणीत का शुचित्व पडले? चंगळवादी जगी कळेना
पाप दौडते, पांगुळ्गाडा पुण्य घेउनी चालत आहे
वटपूजेची, सावित्रीची टवाळखोरी फॅशन झाली
बिनलग्नाचा प्रपंच करणे नव्या पिढीला संमत आहे
पाच पांडवांनो सांगा ना ! वंश बुडाला का हो तुमचा?
धृतराष्ट्राची आज पिलावळ धांगडधिंगा घालत आहे
पालनकर्ते, रक्षणकर्ते कायद्यांस का असे तोडती?
बलात्कारली कुणी निर्भया, कुणी मारली इशरत आहे
ज्ञान, यज्ञ अन् योग, प्रवचने साधकांस का कधी लाभली?
संपदेस योगी बाबांच्या खूप अताशा बरकत आहे
"निशिकांता" चल क्षितिजावरती विश्व नवे शोधू या जेथे
नवीन गिल्ली दांडू, नवखा डाव खेळण्या फुरसत आहे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
खूप सुंदर निशिकांत जी..
खूप सुंदर निशिकांत जी..