..............................झीरो................................
.
"मम्मे, बुटं कुटं फेकलीसा?" इनशर्ट करत करत रव्या बोंबलला
"न्हाय माय, म्या कशापायी टाकू. ते दावेदारानं नेलं का उचलून बघ माय"
"तिज्यायला न्हेऊन्शानी, कायतर सोड म्हण"
एक सापडला बाहेरच्या खाटंखाली, दुसरा न्हाणीच्या चुलीमागं. तिथलंच फडकं मारल बसून तोपर्यंत फवं न च्या आला.
एक घास फव्याचा न एक घोट चाचा करणार्या लेकाला न्हाहाळत बसली माय.
काळं का असना पण रव्या नाकीडोळी देखना. नाकाडोळ्यापेक्षा नजरंत भरायचा बेगुमानपणा. बारीक मशीन मारलेल्या आर्मीकटला उचलून धरायची दणक्या छाती. खांदं कधी पुढं आलं नाहीत. कायम ताणलेली न भरलेली छातीच पुढं करणारा रव्या म्हनजे त्याच्या मम्मेचा नानीमांने दिलेला ताईतच जणू.
नास्टा आटपला तशी बॅग अडकवली न बुटं वाजवत रव्या भाईर पडला.
गल्लीत चार रामराम ठोकत अन धा घेत रव्या नीट कट्ट्यावर आला. तितक्यात मोरे अंमलदार आलाच बुलेट वाजवत.
"चला रविसर, लावू तुमच्या कामाचं कायतरी" म्हणत दोन बोटं टपरीकडं दाखवली. रव्या नीट टपरीच्या आश्क्याकडनं दोन पिवळे गांधीबाबा घेऊन बॅकसीटवर बसला. फाट फाट धुर फोडत मोरेची बुलेट ठाण्याकडं निघाली.
"हे बग रव्या, पवारसाहेब तर नसतील आता, राठोड आसंल. तेची तहान काय भागणार नाय. बरं यंदा रिटनचं काय खरं न्हाई आपलं. अवघड केलंय."
"पण मोरे दाजी, तुम्ही हुतय म्हणला की सेटिंग"
"गड्या, आमच्या टायमाला चलायचं, आता बदललला जमाना. फिजिकल करतोस रे तू. मार खातोस रिटनला. आता लास्ट चान्स. पुढच्या साली तर एजबार. रिझर्वेशनचं तर काय खरं न्हाई, कसं करायचं?"
"दाजी, कायबी करा. आपली ताकत संपली आता."
"करु, कायतरी लावू नेहूनशानी. एकचा हुतय का बंदोबस्त?"
"ऑ, एक? काय दाजी, बापाला एक मागितला तर कानाखाली ५ उठतेत"
"मग तेच्या आधीच भरतीला थांबायला काय झालतं"
"ते नाही जमायचं दाजी आता, हेवडं टाइम करा रिटनला म्यानेज, आख्खा पगार टाकीन वर्शभर पायाशी" बोलत वाकलाच खाली रव्या.
"ह्या..असलं असतंय व्हय, उठ लका, बारकं हुतासा तवा तुझ्या बाकडून आम्ही शिकलाव वर्दीचा थाट आन तुम्ही आसं वाकून कसं चालतय ओ"
"काय उपेग झाला दाजी, रिझर्व फोर्सला ना पेन्शन धड ना मान. नावाची वर्दी, घरात नुसता थाट बघून घ्या"
"ह्या ह्या, तसं बोलु नगासा राजं, पावणं केलं तेना झेपतंय तेवढं. आता तुमची बारी. यंदाचं लावा नेट कायतरी."
"कसं करांवं दाजी, काय उमगंना बगा. रिटन आपल्या डोस्क्याच्या भईरची बात"
"बरं, ही घे ५००, जावा घराकडं. आन ते कुळकर्ण्याच्या देवासंगं बसा जरा. च्यायला बामनं लिखापढी कशी बडवतेत तेवढं तरी शिका. मोप ताकद दिलीय आपल्यात, डोस़कं लागतय तेवढं शिका"
"व्हय दाजी, जाताव"
.....................
रव्याला जसं का कळाया लागलं तसं एकच डोसक्यात. झालं तर पोलीसच. वर्दीशिवाय श्याट काय करायचं नाय. आर्मीची भरती काय झेपली नाही तवा पोलीसाचा नाद घेऊन बसलेला. सोबतीची पाच साहाजण फिजिकल लेखी आटपून, ट्रेनिंग उरकून नाही नाही त्या ठिकाणी पोस्टिंग घेऊन बसली. ह्याची कथा पुढं सरकना. पळायला रव्या एक नंबर. २० किलोमीटर निबार पळायचा सकाळी. देशी जोर आन बैठकानं आंग दगडासारखं झालेलं. मम्मेनं खाऊ घातलेलं जीवापाड. त्यात घरच्या म्हशी. रग काय जिरायची नाही. मग उठायचा हात कुणावर तरी. वर्दीसामने झुकणारा रव्या दुसर्या कुणापुढं वाकला न्हाय कधी. डोसक्यात राखच कायम. जरा कोण भरतीचा विषय घेऊन छेडला की फोडलाच त्येला.
परवाच सोनकांबळ्याचा नित्या ठोकळ्याएवढी पुस्तके घीवून चाललेला. परिक्षा देऊनच सरकारात घुसणार ह्ये नित्याचा निश्चय, सहज म्हणून रव्याला बोलून गेला.
"राजं, कुठं पोस्टिंग? बसतंय का यंदा तरी रिटन"
सटकला रव्या. हाणून ते हाणून त्याला बोट नाचवून सांगितला.
"पुस्तकं वाचून सुधराया न्हाई तुम्ही, न्हाई इथल्याच चौकीत रिमांडला घेतला तर बोल आईघाल्या"
नित्या गप्प पुस्तके उचलून सटकला, मागनं फिदीफिदी हासली गाबडी, रव्या थाटात परेड कदम टाकत घर गाठला.
.........................
"वर्षं सरली, रीटन काय न निघता रव्या एजबार झाला. धरणग्रस्ताचं मिळनां सर्टिफिकेट का भूकंपग्रस्ताचं. कुठं तर दोन वर्षाचं का हुईना एक्झम्प्शन मिळावं म्हणलं तर ते हुईना. बनसोड्या आन पाटोळ्या सोबतच घाशीत पण त्यांना ३ वर्षे अजून होती हातात. त्येंचं भलं केलं त्यांच्या बाबानी. ओपनला काय केलं राजांनी? दीड एकर शेती, आन दोन म्हशी? बीएड, डीएड ची औकात नव्हती डोसक्याची, आता तर वर्दी बी ग्येली. रिझर्वेशनचा कय जीआर बीआर निघला तरच चान्स. एजला सूट मिळाली तरच कायतरी होतंय. नायतर उठला बाजार"
.........................
आईबापाला कीती दिवस सांगणार रिटन निघंना म्हून, त्येणी सावरुन घ्यायचं तवर घेतलं, आता मम्मेचा सुरु झाला तगादा, "काय जमना वर्दी तर लाग कुठतरी ब्यांकेत बिंकेत"
"मम्मे, एवढं लिव्हायला येत असतं तर पीएसाय नसतो झालो? न्हाई जमाया ते"
"आर्र, सोयरीक्या यायल्यात रं, पावण्याच्या डोळ्यात भरतय सगळं. कायतर नगो दाखवाया नोकरी?"
"मम्मे, लग्नाचं सोड, द्याच्या टैमाला पाव्हणे वर केलं हात, आता टैम झाला गांडू, आणतेत ववाळायला दांडू"
"बग माय, मोरे भावसाब काय करंना का?
..............
अंमलदार मोरे दाजी पाव्हण्यातला. त्येचं बी काळीज तुटायचं ह्येच्यापायी पण हात बांधलेलं त्याचे. शेवटी रव्याला बोलाऊन त्याला सोबत ठाण्यात न्यायला चालू केला. वरली खाल्ली कामं त्याला सांगायला चालू केला. पीआयपासून प्युनपर्यंत सगळे तर रव्याला ओळखायला लागले महिन्याभरात. हायवे ड्युट्या वाढल्या तशा मोरे दाजींनी रव्याला सोबत न्यायला चालू केलं. कॅन्टीनचा राह्यलेला खाकी पीस देऊन टेलरकडनं वर्दीची भरती झाली. बिना नंबराचा बेल्ट न रिकामे शोल्डर फ्लॅप सोडले तर रव्या दिसायला पार मप्पोच. बूट बीट वाजवत काठी आपटत नाईट ड्युटी मारायला मस्त मजा यायली. टोर्चच्या उजेडात बाहेरच्या गाड्या थांबायच्याच. वर्दी बघताच आल्लाद नोटा घरंगळायच्या. माल सगळा मोरे दाजीकडं पोच हुताना दिवसाला तीनचार निळे तुकडे सुटायले. घरी नोटा दिसायच्या, मम्मी आपली चारदा इचारायची.
"परमनंट करतेत ना रव्या बेटा?"
"मम्मे, सोड. आता हे ते वर्दीच समज. पगारीच्या वर सुटतील एक वर्षात"
................
"चला राजं, नवं साह्याब आलंत रेस्ट हाऊसला. पीआय साह्यबानं सांगीतलय. जाऊन येऊ."
रेस्ट हाऊसला सगळा थाटच, लाल दिवा मिरवत बाहेर थांबलेली अॅम्बॅसेडर, दोन जीपा, चार पाच सफारीवालं, दोन इन्शर्टात गॉगल मिरवणारं. एक जण फाईल घिवून भईर आला की मोरेदाजीनी वर्दी दिली. रव्याला घीवून आत घुसले तसा साह्यब फिरुन बघितला. खालमानेच्या रव्याकडे डोसक्यापासून पायापर्यंत पहात मोरेदाजीवर कडाडला.
"काय मोरे, युनिफॉर्म बदलला का नियम बदलले परस्पर? आँ"
"न्हाई सोनकांबळे साहेब, मी आहे की. ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे, गावचाच आहे आपल्या. रवी जाधव नाव हाय, आपल्या पाव्हण्यातलाय. वळकत असताल तुम्ही बी, आयकलाव की हितलेच हाव ना तुम्ही"
..............................पॉइन्ट झीरो ................................
.
मोरेदाजीची पडकी भाषा ऐकताच रव्याचा फणा उठला. ताठ मानेनं साह्यबासमोर उभारला.
"दाजी चलतो मी, जातीच्या न पुस्तकाच्या जीवावर हितं बसलंय हे. दोनदा कुत्र्यागत हाणला ते विसरलंय. चला"
"आऊट, आय से." उपजिल्हाधिकारी नितीन सोनकांबळेचा शांत आवाज आला.
......................
"लका रव्या, तुझा क्लासमेट होता ना, घ्यायचं की धीरानं. लावला असता कुठं तर ज्याक"
"न्हाई दाजी, हे काय खरं न्हाई. ह्याच्या ज्याकनं वर चढाया आपण रस्त्यावर न्हाई. दारात कधी उभा केला न्हाई ह्याला, आता त्येचं उंबरं झिजवायाची ड्युटी होत नसती बघा."
"आरं पण जमाना बदलला आता, काय घेऊन बसला जातनपात, आपण बरं, आपलं घर बरं"
"न्हाई तर, जमत नाही. पाटील साह्यबाला गाठावं लागतया. बघतो कायतरी त्येंच्याकडं"
"आरं आयक रव्या, पाटील मुलखाचा चोर बोड्याचा. ही कर ड्युटी. करु आपण कायतरी"
"दाजी, जातीसाठी माती खाईन पण असला अपमान नको. सोडा मला"
.......................
पाटलाचा दरारा मोठा तसा व्याप बी मोठा. दोन डेर्या, कारखाना, पतसंस्था न एक बँक बुडाखाली दाबलेली. वाड्यावर शे दोनश्याचा राबता कायम. रव्याची वर्दी कुठं लागावी हे पीए सावंताला कळंना. रव्याचं डोस्कं गरम. पटकन हात उचलला जायचा. त्यात डोक्यात जात बसलेली. युनिफॉर्मच्या वेडात अंगात असलेली मग्रुरी उतरंना. शेवटी पतसंस्थेच्या वसुली पथकात भरती झाली.
जीपमध्ये थाटात फ्रंटसीटवर बसून गावोगाव फिरायला रव्याला भारी वाटायलं. चार गरीबाचं बकुटं पकडून कागदं फेकायची मजा अलग वाटायली. मॅनेजर सांगायचा मागं. "हे कुळं असलीच बघा जाधव. आपल्या साह्यबांची मया आड येती. कर्ज घेतेत, द्यायच्या नावानं बोंब"
रव्याला पण साह्यबाचा पैसा आपला पैसा अशी सुरसुरी यायची. रोज दोन तीन तरी खाती वसूली केल्याबिगर घरी येऊ वाटंना.
वसूली संपत आली तशी इलेक्शन लागली. साह्यबांनी थाटातच शहरगावच्या सिक्युरीटीचे बौंसर लावले शो करायला. त्यांना मार्गदर्शनाला दिला रव्या.
सिक्युरीटीने एक मापातला सफारी आन शोचं पिस्टल रव्याला दिलं. मजबूत बुट चढवून, टाईट सफारी आन आर्मीकट मारलेला रव्या थाटात उभारायला पाटलासंगं. जणू काय पंतप्रधान राष्ट्रपतीमागं उभारल्याचा आव घेऊन. इलेक्शनच्या धुराळ्यात माय न घराकडं लक्ष बी देण हुईना. मम्मी दोन दिवस तापानी फणफणली न म्हातार्याने अॅडमिट केलं. रव्यामागच्या सभा न प्रचार काय संपनांत. रात्री दावखान्यात गेला तर डॉक्टरानी ३० हजाराची जुळणी सांगितली. आता असल्या धुरळ्यात पाटलाकडं मागायची सोय नव्हती. सावंत पीएला सांगितले तर सकाळी ये म्हणला बंगल्यावर.
सकाळी बंगल्यावर जाताच पाटील समोरच झोपाळ्यावर बसलेलं.
"अरे कॅप्टन या या. राजं तुमची मेहनत रंग आणतीय बरका. असे मावळे असले की गड आपलाच ओ"
"पण साहेब तेवढं सावंत सोयर्यांनी सांगितलय न्हवं"
"काय झालं राजं, काळजी करु नका. तुमची माऊली, आमची माऊली, एकच ओ. जावा बिनधास्त पतसंस्थेत."
"पण तिथं हुईल ना काम? नाही म्हनजे..."
"जावा कॅप्टन, आपलीच हैत सगळे"
.............................
पतसंस्थेत जाताच मॅनेजरने आत बोलावून घेतला रव्याला. काय न बोलता हातात हाजाराच्या दोन नोटा कोंबल्या.
"पण साहेब, नड ३० ची हाय ओ, मागचं पेमेंट बी दिलं नाही अजून"
"हे बघा जाधव, वरनं सांगितलं तेवढं दिलं, या आता तुम्ही"
"आर्र साह्यबानी सांगितलंय, कळंना व्हय. फोन लावा साह्यबांना, ३० ची नड आन दोन हजारात कशी भागवू" इतकं बोलत रव्याचा आवाज चिरकायला.
साह्यबाला फोन लावून ५ मिनट्ं मॅनेजर हूं हूं करत राह्यला. शेवटी दिला फोन आस लावून बसलेल्या रव्याला.
"हे बघा कॅप्टन, दिलेत तेवढं घ्या. सिक्युरीटीवाले बी गेलेत परत आता. आचारसंहिता लागलीय आता. संपलं काम. त्याचं युनिफॉर्म आन शूज तेवढं ठीवून जावा. निघा"
दारापर्यंत पोहोचलेल्या रव्यानं मागं वळून पाह्यलं. स्टाफ सकट भल्या दांडग्या फोटोतलं पाटीलसाहेब आपल्याकडं बघून हासतेत काय वाटायलं.
शांतपणे दारातल्या बाकावर बसून काढला तो बुट अन भिर्रदिशी कॅशिअरच्या केबिनवरुन पाटलाच्या फोटोकडं भिरकावला.
................................
मग्रुरीनं पोट भरत नाही अन मान
मग्रुरीनं पोट भरत नाही अन मान पण मिळत नाही.
सांगलीची भाषा न माती जाणवली. असे बरेच रवी बघितलेत. आयुष्य गेलं असंच..पण मग्रुरी नाही गेली!
भारी लिहलय
भारी लिहलय
भारी लिहिलंय >> + १
भारी लिहिलंय >> + १
मस्त च.
Double post
मस्त च.
.
मस्त च.
मस्तच.
भारीच आहे कथा
भारीच आहे कथा
धन्यवाद विनिता , आशुचॅम्प,
धन्यवाद विनिता , आशुचॅम्प, वावे, भक्ती आणि जाई.
धन्यवाद सर्व वाचकहो.
छान लिहिलंय,
छान लिहिलंय,
अशीच एक कथा राजकीय कार्यकर्त्यांच्या आयुष्यावर वाचलेली, तिची आठवण झाली
अस्सल गावरान. भाषेचा पीळ
अस्सल गावरान. भाषेचा पीळ जबरदस्त .
छान लिहिली आहे कथा..
छान लिहिली आहे कथा..
छान लिहीता. असेच लिहित राहा.
छान लिहीता. असेच लिहित राहा. पु.ले.शु
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
भन्नाटभारी!!!
भन्नाटभारी!!!
छान!!
छान!!
छान कथा. झेंडा ची आठवण झाली.
छान कथा. झेंडा ची आठवण झाली. अशा रविंबद्दल वाईट वाटतं....
अस्सल गावरान. भाषेचा पीळ
अस्सल गावरान. भाषेचा पीळ जबरदस्त .
नवीन Submitted by हीरा on 29 July, 2020 - 05:32 >> +१००
गाव तालुका वातावरणातल्या अशा वहावलेल्या तरूणांचे कॅरिकेचर मस्तच ऊतरवता तुम्ही. लिहिण्याच्या शैलीत एक तटस्थ ऊद्विग्नता जाणवते.
लिहित रहा.
मस्त लिहिलंय. वातवरणनिर्मिती
मस्त लिहिलंय. वातवरणनिर्मिती बेस्ट!
मस्त लिहीलय. व्यक्तिचित्रण
मस्त लिहीलय. व्यक्तिचित्रण आणी वातावरणनिर्मिती- दोन्ही छान जमलंय.
जबरी! भन्नाट लिहीलं आहे.
जबरी! भन्नाट लिहीलं आहे.
जबरदस्त!
जबरदस्त!
जबरदस्त आहे...
जबरदस्त आहे...
जबरी!!
जबरी!!
अभि सर पुढचा पार्ट प्लीज
अभि सर पुढचा पार्ट प्लीज प्लीज. भाषा जरी वेगळी वाटली तरीकथेतली माणसं आपली वाटली, आपल्या भोवतालची वाटली.
सगळीकडून दबल्या गेलेल्या मुलाचं चित्र सुरेख रंंगवलत.
पॉइंंट झीरो -- किती दु:ख झाल असेल रवीला...
आणि रवीचा वावर किती जरी मुजोरपणे दाखवला गेला असेल
तरिही त्याचा राग येत नाही... सहानुभूतीच वाटते त्याच्याबद्दल.
रेखीव लिहीलयत!!
गाव तालुका वातावरणातल्या अशा
गाव तालुका वातावरणातल्या अशा वहावलेल्या तरूणांचे कॅरिकेचर मस्तच ऊतरवता तुम्ही. लिहिण्याच्या शैलीत एक तटस्थ ऊद्विग्नता जाणवते.>>>>
+100
सुन्न व्हायला होते कथा वाचून. याला पुढचा भाग नाही कारण रव्याला पुढे भवितव्यच नाही. जिथे काहीतरी होईल असे त्याच्या मेहुण्याला वाटते तिथे रव्या जातीसाठी माती खाणार नाही आणि जिथे माती खातोय तिथे त्याला असेच पिळून घेणार. असे कित्येक रवी आज महाराष्ट्रात भटकताहेत.
सहानुभूती नाहीच यांना कारण यांनी स्वखुशीने झापडबंद राहून स्वहस्ते स्वतःची वाट लावून घेतलेली आहे, यांचा माज यांना डोळे उघडायला देत नाही.
गाव तालुका वातावरणातल्या अशा
डबल पोस्ट
धन्यवाद, अगदी शतशः धन्यवाद.
धन्यवाद, अगदी शतशः धन्यवाद.
माबो वरच्या सर्वच मान्यवर आयडींनी कौतुक केले. मनापासून आनंद झालेला आहे.
प्रत्येक प्रतिसादक आणि वाचकाचे मनापासून आभार मानतो.
.
@प्रगल्भ. साधना ह्यांनी म्हणल्याप्रमाणे याला पुढचा भाग नाही. कथा इथून अशीच चालू राहणार.
नाहीतरी एकदा पॉइन्ट झीरो म्हणले की अजून कुठला पॉइन्ट द्यायला हुडकणार म्हणा. पॉइन्ट संपले.
पोकळ महत्त्वाकांक्षेचं उदाहरण
पोकळ महत्त्वाकांक्षेचं उदाहरण.. छान लिहिलं आहे तुम्ही.
कथा , पात्र आणि भाषा - उत्तम
कथा , पात्र आणि भाषा - उत्तम लेखन
सुंदर लिहिलेय...
सुंदर लिहिलेय...