टीव्ही, टीआरपी अन त्याचं गणित

Submitted by DJ.. on 28 July, 2020 - 01:24

टी.आर.पी. म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट.

टी.आर.पी.चं गणित डिजिटल सिग्नलिंग मुळं खुप सोप्पं झालंय. कुठल्या चॅनेलच्या कोणत्या सिरियल ला किती व्युज मिळतात हे एका मिनिटात कळतं. तुम्ही जाता जाता नुसतं सर्फिंग करताना १ मिनिट एखाद्या चॅनेलवर थांबला तरी तो त्या चॅनेलचा व्यु असतो. त्यामुळं टीआरपी जास्त असणार्‍या मालिका ह्या खरोखर चांगल्या असतीलच असं नव्हे. प्राईम टाईम मधे बरेच लोक टीव्ही समोर येऊन सर्फिंग करत बसतात. जास्त लोक एकाच वेळी कोणत्या स्लॉट मधे टीव्ही समोर येतात तो प्राईम टाईम असतो आणि या वेळात कोणत्या चॅनेलच्या कोणत्या कर्यक्रमांना किती व्युज मिळाले तो असतो टीआरपी

सोमवार ते शुक्रवार प्राईम टाईम स्लॉट हा साधारण रात्री ८ ते १० असा असतो तर शनिवारी तो रात्री ७ ते ११ असाही असु शकतो. त्यामुळे या वेळात जी सिरियल टेलीकास्ट होते ती बर्‍याचदा जास्त टीआरपी ची असु शकते. हा टाईम स्लॉट मिळावा म्हणुन प्रॉड्युसर्स ज्या चॅनेलला जास्त व्युअर्स आहे त्या चॅनेलचे अक्षरशः उंबरे 'झी'जवत असतात. मग त्या प्रॉड्युसरच्या सीरियल मधे किती पोटेंशियल आहे हे साधारण त्या चॅनेलच्या मार्केटींग हेडला कळत असतंच. ती सिरियल कोणत्या बँड वर आणावी हा त्या त्या चॅनेलचा प्रश्न असतो. मग त्या त्या चॅनेलच्या ठरलेल्या चाकोरीत बसणारी (व्युअर्स ला नेमकं काय हवं ते दिल्यामुळे आपला चॅनेल नंबर वन होऊ शकतो याची चॅनेलवाले आधी काळाजी घेतात.. त्यानंतर एकदा चॅनेल सेट झाला की मग ते म्हणातील तीच पूर्व दिशा असते..!) मालिका असेल तर तिला प्राईम बँड मिळातो.

मराठी चॅनेल साठी रात्री ८.३० ते ९.३० हा टाईम स्लॉट मिळाला तर तो सोन्याहुन पिवळा ठरतो. कारण या स्लॉट मधे कोणताही बघणेबल हिंदी कार्यक्रम नसतो अन मराठी लोक शक्यतो मराठीच कार्यक्रम बघण्याला प्राधान्य देतात हा गेल्या काही वर्षांतला ट्रेंड आहे. त्यामुळे शक्यतो हा स्लॉट इंडस्ट्रीतल्या मातब्बर मंडळींना आंदण दिलेला असतो. या स्लॉट मधल्या कार्यक्रमांना तगड्या ब्रँड्च्या जाहिराती मिळातात त्यामुळे चॅनेल आणि प्रॉड्युसर यांना भरपूर नफा मिळातो. इंडस्ट्रीतली मातब्बर मंडळी आणि एखादा होतकरु प्रॉड्युसर यांचा योग्य मिलाफ साधला गेला तरच चॅनेल नंबर वन पोझिशन वर तग धरु शकतं. कारण इंडस्ट्रीतल्या मातब्बर मंडळींकडे नेम अन फेम असलेले कलाकार पडीक असतात. त्यांच्या जिवावर कसल्याही सिरियल्स अथवा कार्यक्रम फुळ्ळ पाणीदार करुन वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या माथी मारता येतात. तसेच मातब्बर मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊसला पैशांची कमी नसते त्यामुळे त्यांच्या सिरियल्स मधुन सहसा कोणी कलाकार पैसे मिळाले नाहीत म्हणुन एग्झीट घेऊन चॅनेलला अडचणीत आणणारे प्रसंग येणे जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे अशी बाप मंडळींच्या सिरियल्स आपल्या चॅनेलवर असाव्यात असं चॅनेललाही वाटत असतं. त्यामुळे अशा लोकांना प्राईम बँड साठी नेहमीच रेड कार्पेट घातलं जातं.

याउलट जे प्रॉडक्शन हाऊस पैशाने कमी पण प्रतिभावान असतात त्यांच्या कलाकृती प्रेक्षकच डोक्यावर घेतात. अशावेळेस त्या सिरियलना प्रायोजक आरामात मिळतात. थोडा धोका पत्करुन अशा कलाकृती प्राईम बँड वर एखादवेळेस चॅनेलवाले दाखवु शकतात. मग या अशा कमी बजेट पण भरपुर प्रायोजक मिळत असल्याने इंडस्ट्री मधल्या मातब्बर मंडाळींचं स्थान डळमळु शकतं असं लक्षात आल्यावर कुरघोडींचं राजकारण सुरु होतं. मातब्बर मंडळींकडे पैशाच्या जोरावर चॅनेलला हवं तसं वाकवायचं तंत्र अवगत असतं त्यामुळे बर्‍याचदा चांगल्या चाललेल्या प्रतिभावान सिरियल्सचा गळा घोटावा लागला तरी बेहत्तर पण मातब्बर मंडळ कायम सोबत असावं असंच चॅनेलला वाटत असतं. त्यात गैर काहीच नाही कारण चॅनेलवाले काय किंवा प्रॉडक्शन हाउस वाले काय कोणीही आपलं नाव कमावुन पैसा खेचण्यासाठीच या गळेकापु स्पर्धेत उतरलेले असतात. त्यामुळे प्रतिभावान प्रॉडक्शन कधी कधी नाराज होऊन दुसर्‍या चॅनेलकडं वळतं. वळले तर वळले. नंबर वन पोझिशन वर असणार्‍या चॅनेलला जास्त फरक पडत नाही कारण प्रेक्षकांना त्यांचंच चॅनेल आवडु लागलेलं असतं. Bw

चॅनेलवर काम करणारे प्रॉग्रामिंग हेड आणि मार्केटिंग हेड यांना आपल्या चॅनेलचा दर्शक नेमका कोण हेही बघावं लागतं. जास्त प्रेक्षक संख्या असणारे दर्शक हवे असतील तर मग त्या त्या कम्युनिटी वर आधारीत कार्यक्रम ठेवावे लागतात. मग ते दर्शक मुंबैचे की कोल्हापुरचे की सातार्‍याचे की लातुरचे की नागपुरचे की सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे हे सर्व लक्षात घेऊन मांडणी करावी लागते. कुठल्या भागातला प्रेक्षक किती वाजता जेवणं-खाणं उरकुन किती वाजता झोपतो हेही पहावं लागतं. यात पुन्हा प्रादेशिक अस्मितांना झुकता कल देणारा फेटा, टोपी, पागोटं, पगडी, मुंडासं यांचीही वेगळी गणितं असतात. अस्मिता दुखावणारं काही दाखवलं गेलं की प्रेक्षक दुरावलाच म्हणुन समजा. त्यामुळं एकीकडे इंडस्ट्रीतली मातब्बर मंडळी तर दुसरीकडे प्रादेशिक अस्मिता आणि या सार्‍यांना सांभळुन जमेल तेवढी प्रतिभा अशा त्रांगड्यातुन तावुन सुलाखुन जे चॅनेल बाहेर पडतं तेच नंबर वन होतं. त्यांनाच चांगल्या प्रॉडक्शन हाउसची पसंती मिळते आणि टी.आर.पी.चं रहाट गाडगं अव्याहत फिरत रहातं.

अशा वेळेस मग प्रेक्षकांच्या लक्षात ही गोष्ट राहतच नाही की ज्यांच्या स्वतःच्या पैशातुन १ मिनिट का होईना सर्फिंग केलेल्या चॅनेलला आणि त्यावर चालु असलेल्या सिरियल ला नंबर १ टी.आर.पी. मिळत आहे. ते बिचारे फुल्ली फालतु कार्यक्रम कसे काय जास्त टी.आर.पी. खेचत आहेत असा विचार करत चॅनेल जे दाखवेल तेच बघत राहतात आणि चॅनेलवाले टी.आर.पी. चार्ट दाखवत प्रेक्षकांनाही कसं हेच लागतं त्याला आम्ही तरी काय करु शकतो असं म्हणत जबाबदारी झटकतात.

त्यामुळे टीआरपीचं गणित आपल्याच रिमोटवर अवलंबुन आहे याचा साक्षातकार जोपर्यंत प्रेक्षकांना होत नाही तोवर रटाळ मालिका, तेच ते जाडे भरडे आणि किलोभर मेकप थापलेले रद्दड चेहरे, मक्ख चेहर्‍याने अभिनय(!) करणारे नेपोटिक , गेली २० वर्षं कुठल्यान कुठल्या चॅनेलवर रोज दर्शन देणारे अन आज ८० वर्षांच्या घरात पोहोचलेले असतानाही वीग संभाळात, मानेला झटके देत, थोडसं नाक मुरगाळुन दात काढत आपल्या माथी मारले गेलेले सो कॉल्ड अनुभवी कलाकार आणि या सर्वांना दावणीला बांधणारे कॉन्व्हेट मधुन शिकलेले आणि मराठी कथा लिहिणारे दळभद्री लेखक, पटकथा लेखक यांच्या पाणचट कलाकृती(?) मधुन शोन्या, बबड्या पहात बसण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

जर टीआरपीच्याच गणिताने या सर्वांचा बदला घ्यायचाच असेल तर शेवटी रिमोट तुमच्याच हाती आहे. जे कार्यक्रम तुम्हाला आजिबात आवडत नाहीत त्यांच्या नावाने बोटं मोडण्याऐवजी त्या कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेत तुम्ही त्या चॅनेलवर फिरकुच नका. मग बघा त्यांचा नक्षा कसा उतरतो ते. एखाद्याचे दुकान चालु ठेवणे अथवा बंद करणे गिर्‍हाईकाच्याच हाती असते हे जेव्हा सर्वांना कळेल त्यावेळेसच त्या गिर्हाईकाला चांगला दर्जेदार माल पुरवण्यासाठी दुकानदार डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवेल ना.!! Bw

उदाहरणादाखल लॉकडाउनच्या आधी कोणत्या सिरियल साठी किती टी.आर.पी. होता त्याची माहिती खाली देत आहे त्यावरुन कोणता चॅनेल नंबर वन पोजिशनला आहे याची कल्पना येऊ शकेल Wink .

टी.आर.पी. कालावधी आणि रेटिंग्स - २९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२०

१. स्वराज्य रक्षक संभाजी - ५२,६७,०००
२. चला हवा येऊ द्या - ३३,७४,०००
३. अग्गंबाई सासुबाई - २८,८९,०००
४. माझ्या नवर्‍याची बायको - २७,४८,०००
५. मिसेस मुख्यमंत्री - २७,०३,०००
६. रात्रीस खेळ चाले - २६,९५,०००

तर लॉकडाउन लागल्यानंतर रिपिट टेलिकस्ट मालिकांमुळे टी.आर.पी. चं गणित पुर्ण उलटं फिरलेलं दिसतं :

टी.आर.पी. कालावधी आणि रेटिंग्स - २३ मे ते २९ मे २०२०

१. स्वराज्य रक्षक संभाजी - १०,४४,०००
२. चला हवा येऊ द्या - ९,७१,०००
३. महाराष्ट्राची लोकधारा - ८,१५,०००
४. फुलपाखरु - ७,७१,०००
५. सह्याद्री बातम्या - ७,५५,,०००

जूनच्या शेवटच्या आठवड्याचे टी.आर.पी. रेटींग्स अजुन आलेले नाहीत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोरदार माहिती आहे ही
मी अजून 2 वेळा वाचणार आहे हा लेख.
या गणितात वेब सिरीज ने काही परिणाम झालाय का?

धन्यवाद रश्मी.. वैनी अन mi_anu Bw

या गणितात वेब सिरीज ने काही परिणाम झालाय का? >> टी.व्ही.वरचे कार्यक्रम बघणार्‍या प्रेक्षकांची कॅटेगरी पाहता वेब सिरिजने अजुन तरी काही फरक पडला असेल असं वाटत नाही कारण दोन्ही क्लासेस मधे जमीन आसमानाचा फरक अजुन तरी दिसतो आहे.

@ वावे, प्रणवंत धन्यवाद Bw

@ जिज्ञासा : How do TRPs translate into actual number of viewers/tv sets?>>
Outside of television, TRPs are calculated using the denominator as the total target audience, and the numerator as the total impressions delivered to this audience x 100. (As in 1,000,000 impressions among the target audience / 10,000,000 people in total in the target audience x 100 = 10 TRPs).

पण मला हे नाही कळलं की आपण कुठली वाहिनी लावली आहे ही माहिती सर्व्हिस प्रोव्हायडरकडे नेमकी कशी जाते?

छान माहिती आहे.

नुसते हिट झाले की व्यू काऊंट होतो का?
किती वेळ तिथे रेण्गाळला या प्द्धतीत माहीती नाही का मिळत? हे जास्त महत्वाचे ठरेल ना
आणि समजा मी आवडीची एकच मालिका लाऊन ठेवली तर तिचा एकच व्यू
आणि सर्फ करताना नावडीच्या वरून चारदा फिरलो तर त्यांना चार व्यू असे होईल ना?

@ वाव्व : सिग्नल नंबर.
@ ऋन्मेऽऽष : तुम्ही म्हणता ती एक शक्यता आहे पण समजा मानबा रात्री ८.३० ते ९.०० अशी लागत असेल तर त्या वेळात एखादा कस्टंबर १० वेळा जरी त्या चॅनेलवर ये-जा करत असेल तर तो एकच काउंट पकडत असावेत असं वाटतंय.

TRP साठी चॅनेलचे paid viewers / business associates असतात का?
म्हणजे जे चॅनेल वा मालिका घसरतायत त्याच त्यांनी लावून लावून / पुनःप्रक्षेपण बघून प्रेक्षकसंख्या फुगवायची, समाजमाध्यमावर जाणीवपूर्वक त्याचे कौतुक / निंदा करून चर्चा झडवायच्या, त्याचे प्रोमोज, सीन्स, एपिसोडस याच्या व्हिडीओ लिन्क्स या चर्चेत चिकटवायच्या जेणेकरून लोक क्लिक करतील आणि प्रेक्षकसंख्या वाढेल इत्यादि

इंटरेस्टिंग माहिती

रात्रीस खेळ चाले या सारख्या मालिकांचा आशय थोडा mature audience साठी असल्याने TRP इतर मालिकांपेक्षा थोडा कमीच राहत असावा

अच्छा असं आहे का, म्हणजे आपण जे चॅनेल १ मिनिटं साठी पण बघतो ते पण TRP मध्ये काउन्ट होतं का
आपण नाही बघितला तर TRP कमी होईल?

TRP साठी चॅनेलचे paid viewers / business associates असतात का?>> असु शकतात. तोही एक मार्केटिंगचाच भाग आहे.

रात्रीस खेळ चाले या सारख्या मालिकांचा आशय थोडा mature audience साठी असल्याने TRP इतर मालिकांपेक्षा थोडा कमीच राहत असावा>> हा कार्यक्रम बराच उशिरा टेलिकास्ट होतो हे जरी बरोबर असलं तरी काहितरी मार्केटींग गिमिक त्याआड दडलेलं आहे त्यामुळे त्याचे पुन्हा रिपीट टेलिकास्ट नसल्यामुळॅ बरेच जण ते इंटरेस्टिंग कथेमुळे बघत असावेत. मराठी कार्यक्रमात ही सिरियल पहिल्या ५ - ६ क्रमांकाचा टीआरपी सुरुवातीपासुनच खेचते.

अच्छा असं आहे का, म्हणजे आपण जे चॅनेल १ मिनिटं साठी पण बघतो ते पण TRP मध्ये काउन्ट होतं का
आपण नाही बघितला तर TRP कमी होईल?>> फरक पडणार. जास्त संख्येने लोक एखादा कार्यक्रम बघु लागले तर ज्या पद्धतिने टीआरपी वर जातो त्याच पद्धतीने तो खालीही येतो. उदा. एप्रिल, मे महिन्यातल्या काही आठवड्यात सह्याद्री वाहिनीवरील संध्याकाळी ७ च्या बातम्यां नंबर १ टीआरपी खेचत होत्या.

एखादा कस्टंबर १० वेळा जरी त्या चॅनेलवर ये-जा करत असेल तर तो एकच काउंट पकडत असावेत असं वाटतंय.
>>>>>
असू शकते,

पण आता समजा मी ८ वाजता एक मालिका लावली. आणि सलग चार मालिका बघूनच चॅनेल बदलला वा टीव्ही बंद केला
तर चारही मालिकांना माझा व्यू कसा मिळणार?
पहिलीलाच मिळणार आणि नंतर तीनचा पोपट का Happy
की त्यावेळेत पुन्हा किती जण आहेत लाईव्ह हे समजते.

भारी माहिती आहे
अशा वेळेस मग प्रेक्षकांच्या लक्षात ही गोष्ट राहतच नाही की ज्यांच्या स्वतःच्या पैशातुन १ मिनिट का होईना सर्फिंग केलेल्या चॅनेलला आणि त्यावर चालु असलेल्या सिरियल ला नंबर १ टी.आर.पी. मिळत आहे. ते बिचारे फुल्ली फालतु कार्यक्रम कसे काय जास्त टी.आर.पी. खेचत आहेत असा विचार करत चॅनेल जे दाखवेल तेच बघत राहतात आणि चॅनेलवाले टी.आर.पी. चार्ट दाखवत प्रेक्षकांनाही कसं हेच लागतं त्याला आम्ही तरी काय करु शकतो असं म्हणत जबाबदारी झटकतात.>> हे महत्वाचं कारण "माझ्या नवऱ्याची बायको" ला कितीही शिव्या घाला तरी पण " काय चाललंय काय आता तिकडे ? " असा विचार करून एक मिनिट बघणारे बरेच असतील . आणि एक मिनिट का होईना बघीतला कि कि उंचावलाच त्यांचा टीआरपी. अरे वर्षानुवर्ष चाललेय ती मालिका ( मानबा )आणि काहीही कन्टेन्ट नसताना ?

TRP साठी चॅनेलचे paid viewers / business associates असतात का? >> माझ्या मते असावेत पण ते श्रीमंत प्रोड्युसर्स ना परवडत असावे. आताच पंधरा दिवसांपूर्वी बातमी वाचली . अशी कंपनी होती जी पैसे घेऊन तुमच्या कार्यक्रमाचे व्युव्हर्स वाढवते. पण तिच्या हेड ला अटक केली का काही तरी पोलीस कारवाई झाली म्हणे . म्हणजे बातमी तशीच होती . म्हणजे हि गोष्ट अधिकृतपणे करता येत नसावी .

@ प्रगल्भ, बघाव्या लागायच्या एकेकाळी नाईलाजाने आईमुळे

सध्या ती मोबाईल अ‍ॅपवर बघते.
मराठी मलिकांचे चॅनेल सबस्क्राईबच केले नाहीत कुठलेच, त्यामुळे टीव्हीवर शून्य मालिका.
फक्त फेसबूक पोस्टमधून अबड्या बबड्या काहीतरी ऐकत वाचत असतो.

@ धागा,
मोबाईल अ‍ॅपचाही टीआरपी आता यात जोडत असतील ना?

@डीजे, पण सिग्नल ट्रान्समिट करण्याची यंत्रणा कुठे असते सेट टॉप बॉक्समध्ये? म्हणजे आपण कुठली वाहिनी बघतोय ही माहिती ट्रान्समिट कशी होते? मला खरंच कुतूहल आहे म्हणून विचारतेय. कृपया गैरसमज नसावा.

वावे, टेक्निकल बाबी मी जास्त डीटेल मधे नाही सांगु शकणार पण आपण आपल्या फोन मधुन कधी कुठल्या नंबरवर किती वाजता किती वेळ फोन लावला किंवा कोणकोणत्या साईट्स सर्च केल्या याचं रेकॉर्ड माहिती काढायची म्हटली तर जशी काढता येते तशीच माहिती इथे पण मिळत असावी.

हो, पण फोनमध्ये ट्रान्समिटर आणि रिसीव्हर दोन्ही असतात ना. सेट टॉप बॉक्समध्ये ट्रान्समिटर असेल असं वाटत नाहीये मला.
असो. बघायला पाहिजे शोधून नक्की काय सिस्टीम आहे ते.

"महाराष्ट्राची हास्यजत्रा " हा सोनी मराठी चा कार्यक्रम , जो कलर्स च्या "कॉमेडीची बुलेट ट्रेन" चा नवीन अवतार आहे , मला अतिशय आवडतो . लॉकडाउन च्या कालावधीत पारायणे झाली याची ! प्राजक्ता माळी अ‍ॅन्कर असते ....

सध्या टीआरपी वाढवण्यासाठी आलेल्या बातम्या वाचताना जी माहिती मिळत आहे ती वाचून लेखातली माहिती चुकीची आहे असे वाटत आहे.

सध्या टीआरपी वाढवण्यासाठी आलेल्या बातम्या वाचताना जी माहिती मिळत आहे ती वाचून लेखातली माहिती चुकीची आहे असे वाटत आहे.>> तुम्हाला जी माहिती मिळाली ती इथे सांगु शकता जेणे करुन काही चुकीचे असेल तर निदान ते माहित होईल. (टीप : सदर लेख टीआरपी घोटाळा होण्याआधी लिहिलेला आहे.. घोटाळ्यातील शक्यतांची अनुप्लब्धता असु शकते )

मला वाटतं ते 'चॅनल स्विच करताना ५ सेकंद थांबलण एका चॅनल वर तरी टी आर पी त तो धरला जातो' आणि सध्याच्या बातमीतल्या 'लोकांना ५०० रु देऊन घराबहेर गेलेले असतानाही तासनतास टिव्ही वर हे चॅनल लावायला लावले होते' यातल्या '५ सेकंद आणि तासनतास' या रिक्वायरमेंट बद्दल बोलत आहेत (म्हणजे तासन तास का लावावे लागले, तर ५ सेकंद चॅनल वर जाऊन पण काम भागत असेल तर)
बरोबर का फिल्मी?

वाचलेल्या माहितीनुसार पूर्ण देशभरात जवळपास पन्नास हजारांच्या आसपास टीआरपी साठीचे ट्रॅकिंग(?) डीव्हायसेस लावलेले आहेत. हे टीव्हीला लावतात का सेट टॉप बॉक्सला ते ठाऊक नाही. म्हणजे केवळ पन्नास हजार घरांमध्ये. हा पन्नास हजारांचा आकडा सँपल साईज आहे जसा एखादा सर्व्हे केला जातो तसेच. त्यावरून अंदाजे टीआरपी काढला जातो. तो युट्यूबर पोऱ्या राठी त्याने एक बरा व्हिडिओ केलाय ह्याच्यावर.
ही लिंक. https://youtu.be/6z0ZQ6Qcuns

Pages