प्याल्यांवर आदळले प्याले ह्या दाराशी

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 July, 2020 - 00:35

भुताटकी कि चेटूक चाले ह्या दाराशी ?
मागे फिरले जे ही आले ह्या दाराशी

रोज पहाटे झाडलोट होई चिंतांची
स्थैर्य सडा-रांगोळी घाले ह्या दाराशी

निघतेवेळी कधी ओठ तर डोळे भिडले
प्याल्यांवर आदळले प्याले ह्या दाराशी

विश्वासाच्या बिजागिरीचे खिळे निखळले
मतभेदांचे पडले घाले ह्या दाराशी

वाट बघूनी डोळे शिणले आणि हर्षले
उपडे पेले सुलटे झाले ह्या दाराशी

ओढवेल त्या परिस्थितीचे स्वागत केले
काळजातले उपसत भाले ह्या दाराशी

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users