*वेल्हाळ*
मन झाकोळ झाकोळ
मन आभाळ आभाळ
चारी दिशा झाल्या बंद
मन नको ते वेल्हाळ
समीर ही शांत शांत
पानातून ध्वनी मंद
उन पडले उदास
मन कसे ते बेधुंद
पान पान ही हलेना
पानगळ ती दिसेना
दार खिडकीची फट
मन जड सोसवेना
मुले बांधली घरात
आई रांधते सतत
शाळा मैदानाला सुट्टी
मन गुंतले संकटात
बाबाचे ही काम घरी
आई बाईचेही काम करी
किती टीव्ही कॉम्प्युटर
मन लागेना घरीदारी
आला म्हणे राक्षस जुना
बिन चेहऱ्याचा कोरोना
घरी उगी रहा शांत
मन मनास मानेना
उगा बाहेर पडाल
शत्रू सहजी टिपेल
लावा चेहऱ्यावर चेहरा
मन अंतर मोजेना
झाले वेगळेच चित्र
डोळा दिसेनात मित्र
कामापुरते बाहेर
मन फिरते सर्वत्र
किती भीती उमजेना
शत्रू दृष्टीस पडेना
जग सारे मंदावले
मन काहीच ऐकेना
मंदावली सृष्टी सारी
कामाविना सुनी नगरी
धाव पाव रे विधात्या
मन आक्रोशते भारी
सृष्टी चक्र अखंडित
कोरोनाचे ते निमित्त
नरकासुर वधाकरिता
मन स्थिरावे शाश्वत
धूपदीप लावू दारी
टाळ घंटानाद करी
पळून लावूया नरकासुर
मन दीपोत्सव निखरी
नको संकट कसले
संघशक्तीत निमाले
तुझे माझे नको काही
मन वैरभाव विसरले
कोण रंक कोण राव
उरला नाही दुजाभाव
दीप लावा अंतर्यामी
मन तेजोमय आर्त ठाव।
© सौ मंजुषा थावरे (२६.७.२०२०)
खूपच सुंदर
खूपच सुंदर
कसलं भारी लिहिता ओ...
असं वाटतं की मायबोली वर तुम्ही फक्त व्यक्त होण्यासाठी येता... आणि व्यक्त झाल्या की पुन्हा गायब... नितळ होऊन जाता
अनेक शुभेच्छा!!
अजून येऊ द्या