यु मेड माय डे

Submitted by नितीनचंद्र on 24 July, 2020 - 13:19

खर तर " यु मेड माय डे " हा शब्द प्रयोगच मला आवडत नाही. आपला दिवस आपल्या मालकीचा असावा. आपण स्वयंस्फुर्तीने तो घडवावा. त्या दिवशी फारसे काही घडले नाही तरी ते घडण्याच्या दिशेने एक पाऊल चालणे हे सुध्दा आपल्या नियंत्रणात असावे.

माझा दिवस परावलंबी असू नये. दुसर्याने दिलेल्या प्रोत्साहनावर अवलंबुन असू नये असे मला कायम वाटते. माझा दिवस काही घडवण्यासाठी माझ्या नियंत्रणात असावा असे वाटते, आनंद सुध्दा दुसर्या कोणी देऊ नये, तो आपला आपल्याला घेता यावा. जमलेच तर देता यावा असेही वाटते.

आपण आनंदात रहायचे असे ठरवून मला जगता येते. एखाद्या दिवशी नाहीच एक पाऊल पुढे जाता आले तरी दु:ख होत नाही. पुढे जायचे हा माझा निश्चय आहे. टार्गेट नक्कीच नाही. असे जगताना अनेक दिवस फुकट जातात हे खरे असले तरी आनंदात होतो हा सुध्दा एक निश्चय आहे.

अगदी महात्मा गांधीजींना शिव्या घातलेले पत्र ते उलट्या बाजूला काही लिहायला वापरायचे म्हणे, इतका मी स्थितप्रज नक्कीच नाही . माझा आनंद सहज हिरावला जाऊ शकतो.

आजवर आनंद हिरावण्याच्या घटना अनेकदा घडल्या. मग विनाकारण मनस्ताप असो, अपयश असो, अनपेक्षीत घटना असो पण एखादा दिवस फार तर फार मी दु:खी असायचो. अपयशात यशाची पायरी शोधून, मनस्ताप विसरून किंवा अनपेक्षीत घटनेतून जीवन जगण्याचा एक धडा शिकून मी पुढचा दिवस आनंदाने जगायला तयार असायचो.

मुड स्वींग म्हणजे काय मला कधीच माहित नव्हते. पण आजकाल तो ही प्रकार माझ्या बाबतीत घडू लागला आहे. शुल्लक घटना मनाला लागुन जाते. कधीतरी तर मुड जाण्याचे कारणच समजत नाही.

मग मी आता आनंदी रहाण्याचे वेगळे क्षण शोधु लागतो आहे. काल काय तर सरगम सिनेमा पुन्हा पाहिला. जुने आठवले आनंद झाला. खर तर या घटनेला कुणीच कारणीभुत नाही. दुरदर्शन ला वाटले त्यानी सरगम लावला. माझ्यासाठी काही खास कुणी केले नाही.

आज एक चांगली कथा वाचली. मग आठवले, मायबोलीवर माझ्या नावावर २५ कथा आहेत हे आठवले. व्हाटसप गृपवर कथा पाठवणार्याचा काही उद्देश नव्हता की मला आठवण व्हावी. पण मग मीच अनेक दिवसांनी मायबोलीवर आलो. आपणच जन्माला घातलेल्या कथांच्या कथानकात रममाण झालो आणि चक्क आनंद झाला.

ही कथा का सुचली, ती कथा का सुचली ते आठवले. त्या पात्रांना दिलेली नावे आयुष्यात आलेल्या कोणत्या व्यक्तींच्या नावामुळे सुचली हे ही आठवले.

मी मलाच म्हणालो येस वन्स अगेन यु मेड माय डे

Group content visibility: 
Use group defaults

छान Happy

अगदी महात्मा गांधीजींना शिव्या घातलेले पत्र ते उलट्या बाजूला काही लिहायला वापरायचे म्हणे,
>>>
लोकं महात्म्यांनाही शिव्या घालतात. लोकांचे काय मनावर घ्यायचे. हिच यातून शिकवण द्यायचे बापू Happy

@ टॉपिक
जेव्हा माझ्या आयुष्यातला एखादा दिवस खूप त्रासदायक वा ऑफिसच्या अतिकामात जातो तेव्हा मी आवर्जून रात्री उशीरा झोपतो. आणि त्या वेळेत छानसा आवडीचा टाईमपास करतो. रोज थोडं तरी आवडीनुसार जगलंच पाहिजे Happy

chhan

गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, काही कारणाने मनस्ताप झाला तर सबंध दिवसाचा पचका होतो.
अश्या वेळेस मी एकटं राहणं पसंद करते. आवडीचे संगीत ऐकणे, वाचन ह्या उपायांनी मनाला बरे वाटते.
छान लेख.

@नितीनचंद्र सर खूप मस्त लिहिलं आहे तुम्ही.
वाचतो आता तुम्ही लिहिलेल्या जुन्या कथा शोधून Happy

खूप छान लिहिलं आहे, नेहमीच आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवता कामा नये हे खरं आहे, कधी तरी स्वतःमुळे स्वतःसाठी पण आनंदी होणं शिकायला हवं