सदैव असतो तुझाच वावर

Submitted by निशिकांत on 23 July, 2020 - 10:34

चुरगळलेल्या कागदातही सदैव असतो तुझाच वावर
शेर तुझ्यावर जरी जमेना, सखे लिहाया करतो मरमर

वाद निवळण्या, बोलत जाऊ काय चांगले घडले यावर
दोष तुझा की माझा याची करूत चर्चा आपण नंतर

जीवन म्हणजे पहिल्या अन् शेवटच्या श्वासामधले अंतर
मुक्त जगावे, नको काळजी स्वर्ग मिळायाची मरणोत्तर

असोत भिंती जुन्या पुरान्या, बनायला घर हवेच छप्पर
सूर आतल्यांचा जमला तर, बनेल घर ते नितांत सुंदर

एक कोरडी कपार आहे मनात माझ्या तू नसल्याने
आठवणी पण तुझ्या पुरवती ह्रदयी माझ्या ओल निरंतर

आयोध्येचे भूमीपूजन नको, लक्ष द्या करोनाकडे!
सूर असा लावती तयांच्या पूर्वजातला असेल बाबर

रुदनाचा आक्रोश व्हायच्या अधी करा कामे नेत्यांनो
सांगतात का सागरास "तू घाल मनाला थोडा आवर "

पूजा अर्चा, व्रत, वैकल्ये मनोकामना पूर्ण व्हावया
बाजेवरती देव दिल्याचे कुणास आले का प्रत्त्यंतर?

खरे सांग " निशिकांत " शायरी लिहावयाला लागल्यामुळे
मनी मोकळा जाहलास का व्यक्त करोनी भाव अनावर?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशिकांत सर,
व्हा मोकळे
पण प्रत्येक गझलेत पुन्हा
नव्याने गलबलून येता!!

मी काय करू , काय बोलू
माझं आख्ख्या जन्माच पुण्य
तुम्हाला देऊन टाकावं
आणि त्या बदल्यात
तुमच्या सारखं
या जन्मात तरी
निदान लिहिता यावं

कोणतं नक्षत्र आहे तुमचं?
खूपच गोड असणार बघा