त्रिवेणी गझल

Submitted by रोहितकुलकर्णी on 22 July, 2020 - 02:10

त्रिवेणी गझल... तीन शेर

त्रिवेणी कविता हा काव्यप्रकार माननीय गुलजार साहेब ह्यांनी पुढे आणला आणि प्रसिद्ध केला. हा प्रकार जपानी हायकू (तीन ओळी / 5+7+5 शब्दांची रचना) शी साधर्म्य साधणारा असला तरी त्रिवेणी काव्य प्रकार हे 3 ओळींचे मुक्तक आहे, ज्यात शब्दरचनेला संख्येचे अथवा वृत्ताचे बंधन नाही.

त्रिवेणी गझल असाच एक विचार डोक्यात आला ज्या मध्ये तीन शेरांची गझल लिहिता येऊ शकते का? मग असा प्रयत्न केला की गझलेचा आकृतीबंध तसाच ठेवून तिसरा शेर बांधायचा.

1. मतल्याने सुरुवात केल्यावर तिसरा शेर तेच यमक ठेवून लिहिला.

2. पुढच्या प्रत्येक शेरात तिसरा शेर वाढवला

3. प्रत्येक तिसरा शेर हा पहिल्या दोन मिसऱ्यांशी साधर्म्य (अर्थस्वरूप) साधतो

4. समजा ह्या 3 शेरांच्या मधला 2 रा शेर वगळला तरी पहिला आणि तिसरा मिसरा एक स्वतंत्र शेर बनतो जो 1 ल्या आणि 2 ऱ्या मिसऱ्याच्या शेराशी साधर्म्य साधतो

ह्या समूहातील जाणकार मंडळी, तज्ञ ह्यांचे मार्गदर्शन आणि विचार अपेक्षित. अशी 3 मिसऱ्यांची बांधणी करता येऊ शकते का? असा प्रयत्न आधी झाला असेल तर कुठे वाचायला मिळेल?

*************************************************************

■ मिसळून गेली आहेस इतकी माझ्यामध्ये
◆ साखर गोंधळ घालत आहे रक्तामध्ये

★ इतके सुंदर नाते आहे अपुल्यामध्ये
_____________________________

■ मी लिहितो तू शब्दांना अवकाश नवे दे
◆ गझल बनुया दोघे हरवू शेरामध्ये

★ अर्थ प्रवाही होईल हरेक मिसऱ्यामध्ये
________________________________

■ ओंजळ पणतीपाशी नको धरूया आपण
◆ मजा वेगळी हवेस झगडून विझण्यामध्ये

★ शिल्लक आहे जोवर धग वातीच्यामध्ये
__________________________________

■ नदीस आली आहे संथपणाची चीड
◆ उगीच नाही लाट उसळली पाण्यामध्ये

★ अर्थच नाही काही नुसते वाहण्यामध्ये
___________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@रोहित तकुलकर्णी खूप सुंदर माहिती
Keep it on
अजून येऊद्या
मी देखील हायकू चा प्रयत्न केला आहे
माझ्या ' माझ्याबद्दल ' या कॉलम मध्ये .
कृपया सांगाल का की ती हायकू होऊ शकते का ?

काय तू करणार जाणून घेऊन माझ्याबद्दल
जसा मी आहे तसा राहुदे मला जरा
खूप बदलवले मी स्वतः ला सांगून तुझ्याबद्दल

आणि जर हायकू / त्रिवेणी झाली नसेल
तर मला दुसरा प्रयत्न करायला आवडेल

प्रगल्भ हायकू नाही पण त्रिवेणी म्हणता येईल

हायकू मध्ये 5/7/5 शब्दांच्या 3 ओळी असतात
उदा:
भूखी बारिश
भाँप की तलाश में
घूम रही है

काही तज्ञांशी चर्चा केल्यावर कळले की असा 3 मिसऱ्यांची मिळून गझल नाही होऊ शकत. त्रिवेणी गझल पेक्षा तीन मिसऱ्यांची त्रिवेणी शायरी होऊ शकते पण गझल नाही

येथील तज्ञांच्या प्रतिसादासाठी आणि मार्गदर्शनासाठी वाट पाहतोय