कवयित्री शांता शेळके यांची 'हे एक झाड आहे' ही कविता म्हणजे शांताबाईंच्या प्रतिभा संपन्नतेची व अगाध कल्पनाशक्तीची अनुभूती घडवणारी विलक्षण कविता आहे. वरवर पाहता ही कविता झाड, माती, बीजाचे रुजणे, अंकुरणे, त्याची वाढ होऊन झाडात रूपांतर होणे याविषयी असावी असे वाटते. पण याच झाडाच्या मुळापर्यंत खोल खोल जाण्याचा प्रयत्न केला तर झाडाचे एक वेगळेच रूप उलगडत जाते जे कवितेच्या शेवटच्या अक्षरापर्यंत आपल्याला जखडून ठेवते आणि मग कविता संपल्यावर मिळते एक वेगळीच अनुभूती.
शांताबाईंच्या या कवितेविषयी माझे वैयक्तिक मत असे आहे की ही कविता पती पत्नी नातेसंबंधांवर आधारित आहे. कवितेत अभिप्रेत असलेली स्त्री ही गर्भवती आहे व अशा अवस्थेत तिचा पती तिच्याजवळ नाहीये. ती स्त्री आपल्या पती ला एका झाडाची उपमा देत आहे व स्वतःला मातीची.
पहिल्या कडव्यात शांताबाई म्हणतात-
हे एक झाड आहे याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते
या कडव्यात कवितेतील स्त्री तिच्या पतीशी असलेले तिचे नाते उलगडून सांगते. झाडासारखा खंबीर, तिला नेहमी सावली देणारा तिचा पती जरी तिच्या जवळ नसला तरी हा वाहणारा वारा दोघांची ख्याली खुशाली एकमेकांपर्यंत पोहोचवतो आहे. ते शरीराने एकमेकांच्या खूप दूर असले तरी मनाने खूपच जवळ आहेत.
पुढच्या कडव्यात शांताबाई म्हणतात-
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे जाणिवओले भास
कवितेतील स्त्री जवळ तिच्या पतीच्या ज्या आठवणी आहेत त्या सुगंधी फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या आहेत. त्या आठवणींमध्ये रममाण असलेल्या तिला पतीच्या आठवणींच्या जाणीवा पतीच्या अस्तित्वाचा भास घडवत आहेत जे भास खूपच सुखकर आहेत.
कवितेचं तिसरं कडवं खूपच सुंदर आहे-
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बालगणी याच्या कटीखांदि
या कडव्यात जाणीवपूर्वक भूतकाळ वापरला आहे. कवितेतील स्त्री च्या गर्भात तिचे व तिच्या पतीचे पहिलेच अपत्य वाढते आहे. हे क्षण अनुभवायला आज तिचा पती नसला तरी आधी त्या दोघांनी या क्षणांची खूप सारी सुखद स्वप्ने पहिली होती.
चौथ्या कडव्यात शांताबाई म्हणतात-
मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती
तिच्या पतीचे तिच्याजवळ नसणे हा एक नशीबाचा खेळ आहे. जसे कवयित्री इंदिरा संत म्हणतात, 'मातीचे मम अधुरे जीवन...' त्याचप्रकारे शांताबाई म्हणतात की आयुष्याचे रहाटगाडगे चालूच राहणार आहे. झाड म्हणजे पती तिचा आहे, ती तिच्या पतीची आहे, एक ना एक दिवस दोघांचेही आयुष्य संपणार आहे. पण या आयुष्याच्या प्रवासात तीचं नशीब हे पतीच्या नशीबाशी पूर्णतः जोडलं गेलं आहे. त्याच्या पानांवरच्या रेषा तिच्या तळहाती आहेत... त्याच्या नशिबात पत्नी वियोग आहे तसाच तिच्या नशिबात देखील पतीवियोग आहे.
पुढे कवयित्री म्हणतात-
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल
पतीच्या वियोगात एक एक क्षण घालवणं त्या स्त्री साठी खूपच कठीण जात आहे. मनाने थकत चालली आहे ती. पण असे असले तरी तिच्या पतीचा अंश तिच्या गर्भात रुजतो आहे . त्याचे रुजणे 'माझ्या रक्ताच्याही पैल' म्हणजे तिच्या उदरात वाढणार तिच्या पतीचा अंश हा तिला तिच्या प्रणापेक्षाही प्रिय आहे.
शेवटच्या कडव्यात ती स्त्री म्हणते आहे-
कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन
एक दिवस असा येईल की त्या स्त्री ला तिच्या अपत्यासाठी त्याच्या वडिलांची भूमिका साकारावी लागेल. तिचा पती अस्तित्वात असता तर त्याने झाड होऊन ज्या प्रकारे कुटुंबावर छाया धरली असती तेच काम तिला करायचे आहे. हे करत असताना ती तिच्या पती ला आठवेल. अशाप्रकारे त्याच्या आठवणींचे गाणे गुणगुणत गुणगुणत , त्याच्या आठवणींना मार्गदर्शक बनवून त्याची कमतरता भासू देणार नाही.
-----------किमयागार
वेगळाच अर्थ लावलात कवितेचा.
वेगळाच अर्थ लावलात कवितेचा. पोचला.
कविता कशी सुचते याबद्दलचा शान्ताबाईंचा एक लेख आम्हांला पाठ्यपुस्तकात होता.
त्यात त्यांनी याच कवितेबद्दल लिहिलं होतं.
त्यांच्या पाहण्यातले एक झाड मोडून पडलेले त्यांना दिसले. ते पुढे कधीतरी कवितेतून उगवले.
खूप धन्यवाद भरतजी. अजून काही
खूप धन्यवाद भरतजी. अजून काही कवितांकडे अशाच वेगळ्या नजरेने बघण्याचा विचार आहे. बघू कसे शक्य होते. असाच प्रतिसाद देत राहा. आवडले नाही तरी कळवा. आभारी आहे.
सुंदर रसग्रहण
सुंदर रसग्रहण
धन्यवाद पारिजातका
धन्यवाद पारिजातका
छान! ही कविता मी पहिल्यांदाच
छान! ही कविता मी पहिल्यांदाच ऐकली.
सुंदर लिहिले आहे... हा अर्थ
सुंदर लिहिले आहे... हा अर्थ कवयित्रीला देखील माहित असेल का शंका आहे...
निलिमाजी, च्रप्सजी धन्यवाद
निलिमाजी, च्रप्सजी धन्यवाद